दया घोंगे - आषाढाच्या धारांमधुनी अवचि...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आषाढधारा
आषाढाच्या धारांमधुनी अवचित श्रावण फ़ुलतो ग,
हळवा, ओला आठव येता मनात पावा घुमतो ग!

क्षितिजावरूनी इंद्रधनूला पूल मनाला खुणवितो
गंधित, धुंदित श्वास धरेचा तनामनाला खुलवितो.
वार्‍यासंगे मत्त केवडा अवचित दारी फ़ुलतो ग,
आतुर, ओला आठव ओठी गीत धुंद गुणगुणतो ग!

थेंब रवाचा शुभ्र कोवळा पानावरूनी ओघळतो
नवथर चंचल मेघ सावळा गिरिशिखरावर अडखळतो.
थुईथुई नाचत मनात अवचित मोरपिसारा झुलतो ग,
नाजूक, ओला आठव अजुनी नयनातच घुटमळतो ग!

मावळतीवर स्वर्ण सोहळा स्वर्गसुखाला लाजवितो
पिसाटवारा अंगांगासह उरात काहुर माजवितो.
कुंजावरूनी जुईचा अवचित पदर जरासा ढळतो ग,
खट्याळ ओला आठव कानी गुपित जुने कुजबुजतो ग!

मल्हाराचा सूर अनावर सहस्त्र धारांतून फ़ुटतो
शापदग्ध जणू यक्ष प्रियेला आर्त स्वरातून आळवतो.
बघता बघता नयनी अवचित झरझर श्रावण झरतो ग,
व्याकुळ, ओला आठव येता उरात काटा सलतो ग!!


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:32.5930000