अनिल दीक्षित - जिच्या अक्षरांना रूप भव्य...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


माझी मराठी मराठी
जिच्या अक्षरांना रूप भव्य आभाळाचे आले
जिच्या शब्दाशब्दांनाही नवे फ़ुटतात भाले
जिच्या अर्थांना झळाळ कोटी सूर्यांचा लाभतो
जिच्या काळजामधून गंध प्राजक्ताचा येतो
जिच्यापरी ना मधाळ बोली जगाच्या या पाठी

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी

जिथे उकारमधून घुमे ओंकाराचा नाद
जाई-जुई विलींपरी येई वेलांटीस गंध
काना भासतो राधेचा जणू कान्हा ओलाचिंब
दिसे टिंबाटिंबातून राधेचेच प्रतिबिंब
मात्रांमधून गात्रांत दिव्य तरंग उठती

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी


हिच्या जिभेवर गोड माझ्या ज्ञानेशाची ओवी
हिच्या काळजात श्लोक परखड रामदासी
हिच्या हातात सुरेल संत तुकयाची गाथा
हिची उगवे सकाळ जवी जात्यावर गाता
भूपाळीने आभाळात मेघ भक्तीचे दाटती

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी

हिच्या रंध्रारंध्रातून आहे आईचाच पान्हा
ऐन संकटी बापाचा दिसे कण्खर बाणा
बोटे कडाडा मोडती अशी आजीपरी माया
आम्रवृक्षापरी गोड... जशी आजोबांची छाया
जशी दरवळे मनात माहेरची मऊ माती

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी

शब्द चकवा नि भूल शब्द काट्यातले फ़ूल
शब्दाशब्दात लपले एक अवखळ मूल
शब्द इतके नाजूक लाजाळूच्या पानांसम
सल शब्दांचा असा की अश्वत्थाम्याची जखम
शब्द मारती-तारती, शब्द घडवती क्रांती

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी

भाषा टिकेल मराठी ? नका पडू काळजीत
हिला पूजतोय आम्ही काळजाच्या पालखीत
आहे रक्तात मराठी, आहे आत्म्यात मराठी
उठतील राखेतून फ़क्त शब्दच मराठी
टीकाकारांना पुरून फ़क्त उरेल मराठी

अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी

Translation - भाषांतर
N/A

References :
९९२२६१३३७५
Last Updated : 2016-11-11T12:52:32.0000000