ध्रुवचरित्र - भाग २६ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२६.
धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया ॥१॥
जयाच्या दर्शनें पातकाई धुणी । होय तो सज्जनीं मान्य सदा ॥२॥
विश्वीं विश्वंभर दाखविती पूर्ण । भवाचें बंधन तोडोनियां ॥३॥
जाती विजाती व्हावया प्रज्ञानहो । एक मग मोहो सोडविती ॥४॥
नामा म्हणे सदां साधुसी वाणितां । वाचे पवित्रता अखंडित ॥५॥
२७.
नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥
कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥
वय तरी थोडें भावना उदंड । काय तुज चाड सांग आतां ॥३॥
न बोलसी तरी साधेना हें काज । अंतरींचें नीज मज कळे ॥४॥
आला लाभ काळ फळलीसे भावना । उघडोनी लोचना पाहीं मज ॥५॥
ऐकोनी ध्रुवानें सज्जनाची वाणी । नेत्र विकासोनी पाहे तदा ॥६॥
पुढें उभा मुनि लावण्याचा गाभा । आपुलिया लाभालागीं नाचे ॥७॥
नामा म्हणे ध्रुवें वंदिले चरण । बोलिलें वचन ऐका आतां ॥८॥
२८.
बैसायासी गेलों पितीयाचे अंकीं । उठविलें एकी माउलीनें ॥१॥
सरेना सरेना कोणी उठवीना । ऐसा ठाव जाणा वांछितसे ॥२॥
उपाय न कळे मागावें कोणासी । भावना आपैसी उठावली ॥३॥
नामा म्हणे शब्द ऐके देवऋषी । मग त्या बाळकासी आश्वासीते ॥४॥
२९.
ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं ॥१॥
कैसें तें बोलावें कैसें तें वानावें । वेदासही ठावें नोहे जेकां ॥२॥
निलोत्पल रवि गगनाही हिनावी । ऐसी शोभा दावी इंद्रनीळ ॥३॥
मरगजालागीं जोडलें सौरभ्यें । आनंदाचे कोंब चारी भुजा ॥४॥
मुगुट कुंडलें सर्वांगीं भूषण । लेणीयासी लेणें अंगाचिया ॥५॥
इंद्रधनुष्याची मांडणी मेघाची । माळ वैजयंतीची गळां रुळे ॥६॥
कस्तुरी कपाळीं रेखलीसे भाळीं । उटी ते पिवळी सर्वांगासी ॥७॥
सायुध सुंदर शोभताती कर । प्रभा ते अपार कोंदाटली ॥८॥
अभय हस्त एक पुढें तुकावला । आपुल्या भक्ताला सांभाळाया ॥९॥
गोजिरी गोमटी ध्यानीं उभी ठेली । नामया माउली माथा ठेवी ॥१०॥
३०.
ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप ॥१॥
परी तें कांहीं तैसें न राहे निश्चळ । चित्त तें चंचळ मावारलें ॥२॥
पुढती सायास करी नानापरी । न राहे अंतरीं साचोकारें ॥३॥
आवडीनें जीव झाला कासावीस । तंव त्या परेशास कृपा आली ॥४॥
ब्राम्हाणाचें रूप उभा ठेला पुढें । निज भक्तांचें कोडें परवावया ॥५॥
कपोलासी शंख लाविला स्वहातें । तेव्हांचि तयातें ज्ञान झालें ॥६॥
वैकुंठ पिठीचें अधिष्ठान साचें । तें रूप तयाचे द्दष्टी पडे ॥७॥
नामा ह्मणे काय सांगावा नवलावो । भक्तांलागीं देवो साहकारी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP