मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
पश्चात्तापपर पद

पश्चात्तापपर पद

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - पश्चात्तापपर (प्राप्त होय जें निधान) या चाली०

उत्तम जन्मा येउनि रामा गेलों उगा वाया ॥
दुष्टपातकी शरण मि आलों सत्वर तव पाया ॥धृ०॥
आधीं चुकलो मुकलो मी निज वेद स्वाध्याया
कर्में श्रौतस्मार्त न घडलीं सद्नति साधाया ॥
पुराण परिसुनि सादर झालो यशहि न तव गाया ॥
स्वस्थपणें कधिं नाहीं फावलें तुजला पूजाया ॥१॥
आर्जविलें बहु लवण भंजनें व्याहया जावाया ॥
क्षुधित अतिथि कधिं नाहीं घेतला प्रेमें जेवाया ॥
उदार कर कधिं केला नाहीं पैसा एक द्याया ॥
नाम फुकटचें तें हि  आलें स्वामी वदना या ॥ उत्तम० ॥२॥
कपट करुनिया निपट भोंदिल्या बहुत आया बाया ॥
केली धनगृह क्षेत्र स्त्री पशु शिशुवर बहु माया ॥
नित्य सजविली वसन भूषणें निंद्या ही काया ॥
सिद्ध ठेविली सदाहि रसना सज्जन निंदाया ॥ उत्त० ॥३॥
वटवत निशिदिनि केलि चहुंकडे मन हें रमवाया ॥
केलें स्नान न संध्या जपतप दुष्कृत शमवाया ॥
क्षणहि न केला साधु समागम भवदव निववाया ॥
सद्य: कामुक झालों पाहुनि परधन परजाया ॥ उत्त० ॥४॥
नाहीं विद्या कला कुशलता तुजला रिझवाया ॥
शुद्ध मधुर वाणीही नाहीं तुजला विनवाया ॥
बुद्धिहि नाहीं न कळे कांहीं शरणागत व्हाया ॥
थकलि मजल सर्वथा दयाळा स्वहित आचराया ॥ उत्त० ॥५॥
हरि कनबाळू करि दीनावरि करुणेची छाया ॥
निगम नगारा गर्जे ऐसा निखिला कळवाया ॥
यावरि विश्वासुनियां आलों जवळ तुझ्या पाया ॥
सुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वामी रघुराया ॥
उत्तम जन्मा येउनि रामा गे० ॥६॥
पद - राग कापी ताल दीपचंदी. (संस्कृत)
(भजभज गोपालं) या चालींवर.

शुद्धं ब्रम्हापरं । वंदे सीतारामं ॥ शुद्धं ब्रम्हापरं ॥धृ०॥
हैमवतीहर चित्त विरामं ॥ दिनकर वंशललामं ॥ वंदे सीतारामं ॥ शुद्धं ॥१॥
पदरजौद्धृत गौतमवामं ॥ सजल पयोधरश्यामं ॥२॥
विग्रहविभव विडंबित कामं ॥ विठ्ठल कुतुकाऽरामं ॥ वंदे सी० ॥३॥


Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP