मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
कित्ताध्यान

कित्ताध्यान

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


कित्ताध्यान (चाल - ओव्याची.)

पाहून पवित्र विजनस्थान । तेथें घालावें मृदुलासन ॥
वरी साधोन पद्मासन । निश्चलमन बसावें ॥१॥
काय शिरो ग्रीवासमान । उत्संगीं ठेऊनि कर उत्तान ॥
होऊनिया मुकुलित नयन । भुवन मोहन चिंतावा ॥२॥
शरयूतीरीं अयोध्या नगर । तेथें कल्पवृक्षाचा बाग सुंदर ॥
तयामाजी श्रीराममंदिर । हेमप्राकार चिंतावा ॥३॥
सुवर्ण मंडपीं पुष्पक विमान । मध्यें विराजे रत्नसिंहासन ॥
वरी अष्टदल नलिन । कर्णिका विस्तीर्ण जयाची ॥४॥
सूर्य मंडलमय प्रथमास्तरण । सोममंडलमय द्वितीयास्तरण ॥
वन्हिमंडलमय तृतीयास्तरण । योगपद्मासन त्यावरी ॥५॥
मृदुश्लक्ष्ण सुतूलिका उपधान । उभयपार्श्वीं उपबर्हण ॥
जेथें घालूनि वीरासन । श्रीरघुनंदन बैसला ॥६॥
जें शुद्ध ब्रम्हा केवल । लोकत्रय व्यापून उरल ॥
तें रविवंशीं प्रगटल । तो हा निर्मल श्रीराम ॥७॥
दशवार्षिक बालकाकृति ।  ध्यातां पहातां न होय तृप्ती ॥
ऐसी ज्याची रमणीय मूर्ति । तो रघुपति ध्याइजे ॥८॥
जयाची अंग प्रभा श्यामल । अतसीकुसुम कां मेघ सजल ॥
सहस्त्रार्क प्रकाश सोज्वल । ध्यावा निर्मल श्रीराम ॥९॥
जयाचें आरक्त पादतल । पद्मपत्राहूनि मृदुला ॥
ऊर्ध्वरेखा वज्रध्वज कमल । चिन्हें निर्मळ ध्याइजे ॥१०॥
जयाच्या अंगुली दीर्घ सरल । पूर्ण चंद्रसे नखचक्रवाल ॥
प्रभा कोंदाटली बहुला । ध्यावा निर्मल श्रीराम ॥११॥
जयाची टांच जणू विद्रुमदल । नवनीत गर्भापरी मृदुल ॥
पुढती निगूढगुल्फयुगल ।  घ्यावा  निर्मल श्रीराम ॥१२॥
जयाचे पायीं कनक नूपुर । घागर्‍या वाजती अत्यंत मधुर ॥
वरि विराजे रत्नतोडर । घ्यावा निर्मल श्रीराम ॥१३॥
जयाचें रम्य जंघायुगल । मागुती पोठर्‍या अत्यंत मृदुला ॥
वरी शोभतसे जानुमंडल । घ्यावा निर्मल श्रीराम ॥१४॥
जयाचें ऊरुद्वंद्वपीवर । बरवा झळके पीतांबर ॥
कांठ जयाचें विद्यत्पिंजर । घ्यावा० ॥१५॥
कटीं जयाच्या कनक शृंखल । नवरत्न कोंदणें अत्युज्वल ॥
किंकिणी गजबजती मंजुळ । घ्यावा निर्मल० ॥१६॥
जयाचें गंभीर नाभिकुहर । जलावर्ता सारिखें रुचिर ॥
ब्रम्हायाचें जन्ममंदिर । घ्यावा निर्म० ॥१७॥
जयाचें उदर त्रिवलि भंगुर । मध्यें रोमराजि सूक्ष्मतर ॥
कोटि ब्रम्हांड विहार चत्वर । घ्यावा० ॥१८॥
जयाचें त्द्ददय कपाट विशाळ । किचिदुन्नतस्तन मंड्ळ ॥
अनुमानगम्य जतुस्थल । घ्यावा निर्म० ॥१९॥
आजानुबाहू पीनस्कंध । मध्यें विराजे कनकांगद ॥
भव्य प्रकोष्ठ रम्य मणिबंध । आनंदकंद ॥घ्यावातो ॥२०॥
कटक तोडरे रत्नखचित । करतल सुरेख आणि रक्त ॥
अंगुली रत्नमुद्रांचित । घ्यावा निर्म० ॥२१॥
नख चंद्राची झळके चंद्रिका । दक्षिण हस्तीं ज्ञानमुद्रिका ॥
सांगे वेदांत चिंतनिका । वायु बालका सच्छिष्या ॥२२॥
अंगीं केशराची उटी । शेला झळके जरि कांठी ॥
सुवर्ण यज्ञसूत्र प्रभा गोमटी । त्द्ददय संपुटीं ध्याइजे ॥२३॥
श्रीवत्सश्रीची शोभा अपार । गळां शोभे मुक्तहार ॥
मध्यें कौस्तुभप्रभेचा बहर । घ्यावा० ॥२४॥
जयाची परिणद्ध कंबुकंठ । सुरेख नीट हनुवट ॥
पक्व बिंबाधरपुट  । घ्यावा निष्कपट श्रीराम ॥२५॥
मंदहासें विकसित गल्ल । उत्तुंगरम्य नासिका सरळ ॥
कर्णांतविशाळ नयन युगल । घ्यावा० ॥२६॥
भिवया चापाकृति कुटिल । विशाळभाल कुरळकुंतल ॥
श्रवणीं रमणीय मकरकुंडल । घ्यावा० ॥२७॥
भाळीं चर्चिलें गंध केशरी । मध्यें लाविला तिलक कस्तूरी ॥
सुवर्ण किरीट शोभे शिरीं । घ्यावा० ॥२८॥
शिरपेंचाचा झळके हिरा । वरती शोभे कलगी रुचिरा ॥
दक्षिणभागीं मौक्तिक तुरा । घ्यावा साजिरा श्रीराम ॥२९॥
वाम भागीं जनक नंदिनी । सीता देवी आमुची जननी ॥
मेघा जेवीं सौदामिनी । घ्यावी मनीं नित्यदा ॥३०॥
दक्षिण भागीं सुमित्रा सुत । तुणीरधनुर्द्वंद्व संयुत ॥
उभा भक्तिरस मूर्तिमंत । चित्तीं सतत घ्याइजे ॥३१॥
कर जोडुनि उभा पुढती । अनुपम ज्याची दास्य स्थिती ॥
अंजनेचि उत्तम गति । घ्यावा मारुती सदगुरु ॥३२॥
श्रीराम चरणीं ठेवूनि माथा । प्रार्थीत जावें त्या समर्था ॥
मायबापा गा रघुनाथा । भवव्यथा सोडवी ॥३३॥
नलगे भुक्ति नलगे मुक्ति । मायबापा गा रघुपती ॥
द्यावी जन्मजन्मीं सत्संगती । अनन्यभक्ती निज चरणीं ॥३४॥
पंत विठ्ठलाचा कित्ता । प्रात:काळीं नित्य वळवितां ॥
सहज सदक्षर येईल हाता । हा सर्वथा निश्चय ॥३५॥
होऊनिया निर्मत्सर । हें आचरितां एक संवत्सरा ॥
पुढती तुम्हा माझे उपकार । वारंवार स्मरतील ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP