पूर्वमेघ - श्लोक १ ते ४

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(१) पावे शाप, सखिविरहें दीर्घ, सत्वापहारी ।
वर्षाचा, जो, धनपतिरुषें, जैं चुके स्वाधिकारीं ॥
ऐसा यक्ष क्रमि दिन कुणी, सांवली जेथ दाट ।
सीतास्नानें शुचिजल अशा रामगिर्याश्रमांत ॥

(२) कामी, कान्तेविण, गिरितटीं लोटि तो मास कांहीं ।
तेणें त्याच्या कनकवलय श्रीणहस्तीं न राही ॥
आषाढाच्या प्रथम दिवशीं अद्रिच्या तुंग भालीं ।
पाहे मेघा, गजवर करी जेंवि उत्खातकेली ॥

(३) कष्टें राहे बघतचि तिथें द्दश्य तें मोहकारी ।
रोधी बाष्पें नयनिं, चिर तो मग्न झाला विचारीं ॥
होती उत्कंठित सुखिहि ते लोक मेघोदयानें ।
कान्ताश्लेषातुर विरहितां दु:ख तें काय सानें ? ॥

(४) रक्षायातें असु रमणिचे, जों नभोमास येत ।
योजावा हा जलद अपुला क्षेमसन्देशदूत ॥
या भावें, तो कुटजकुसुमां घेउनी नूतनांतें ।
हर्षें पूजी, करि मधुवचें तोयदा स्वागतातें ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP