उत्तरार्ध - अध्याय ५३ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


नंद, यशोदा, यांचा भेटावे रामकृष्ण हा हेत, ।
आयकिलें कीं आले गोवर्घनगिरिसमीप आहेत. ॥१॥
द्याया रामा, कृष्णा, बहु दधि, नवनीत, कृसरपायस, ती ।
घेऊनि जाय यशोदा बर्हविभूषण, यथेष्ट साय, सतो. ॥२॥
नंद, यशोदा, गोपी, गोप, प्रेमें उपायनें वन्यें, ।
देऊनि, भेटति कृष्णा, मानिति पाहोनि लोचनें धन्यें. ॥३॥
प्रभु साग्रज होय सुखी, यांतें पाहोनि हा जसा नंद, ।
आलिंगुनि, नमुनि म्हणे, “झालों भेटोनि आज सानंद.” ॥४॥
नमुनि यशोदेतें तो भेटे सप्रेम राम; कृष्ण, नृपा ! ।
करवाळी, घे अंकीं, बहुत इची देवकीपरीस कृपा. ॥५॥
नंद यशोदा, लागे, जेंवि प्रभु, तेंवि गहिवरायाला, ।
कवि माताताताहुनि अतिवत्सल म्हणति महिवरा ! याला. ॥६॥
आलिंगनें प्रभूच्या संह्रष्टें गोपगोपिकाचित्तें, ।
बा ! जेंवि लोभिहृदयें विरहोत्तर लब्ध जाहल्या वित्तें. ॥७॥
कुशळ पुसे गांईचें, वत्साचें प्रभु, पदार्थ ते सेवी, ।
प्रेमें धरि बर्हांगद, काढुनि रत्नांगद स्वयें ठेवी. ॥८॥
नंद म्हणे, “पुससी, तरि आहे सर्वत्र कुशळ बा ! कृष्णा ! ।
बहु दु:ख एक हें, कीं तूं न दिससि, दर्शनी महातृष्णा.” ॥९॥
रडुनि, यशोदा वदली, “बा ! स्मरण सदा तुजें, नसे विसर, ।
सोडूनि मानसातें, हंस क्षणही दुजें न सेवि सर. ॥१०॥
म्हणतें, ‘दु:ख सराया शंकर, नुति करुनि पाठ, विनवीन,’ ।
परि मन वेडें, सोडुनि तुज, न किमपि अन्य आठवि नवीन.” ॥११॥
भगवान् म्हणे, “यशोदे ! माते ! सोडूनि खेद, जा गेहा, ।
त्वत्पुत्र स्वजनाच्या त्राणीं, न करूनि भेद, जागे हा. ॥१२॥
तुज जन जे स्मरतील, प्रेमें ते मन्मनांत भरतील, ।
होतिल मद्भक्त, सुखें माते ! भवसागरासि तरतील. ॥१३॥
त्वन्नमन, त्वत्कीर्तन, करिते सज्जन, न जे मनीं वक्र, ।
ते प्रियतर मज होतिल, ओतिल पीयूष तमुखीं शक्र.” ॥१४॥
गाढालिंगनदानें निववि, प्रेषी व्रजासि पितरांतें, ।
तैसेंचि प्रभु सुखवी, अभिमत पुरवुनि, तयांहि इतरांतें. ॥१५॥
साधु म्हणति, “पितर क्षण हितरक्षण करितयासि न पिसरती, ।
मग रीति साधुपतिची बा ! देइल कोणत्या न कविस रती ? ॥१६॥
हे नंदयशोदांसीं भेटि हरी सर्व दोष देवाची; ।
व्यास म्हणे, “तोहि तरे, जन जो श्रोत्यासि तोष दे, वाची.” ॥१७॥
श्रीगोवर्धनगिरिहुनि निघुनि, श्रीकृष्ण पुष्करा गेला, ।
जो अरिस, जसा जलधिस घटज, करायासि शुष्क रागेला. ॥१८॥
मुनि पुष्करतीर्थींचे प्रभुवर्यें नमुनि सुखविल सर्व, ।
पूजुनि तेहि, स्तविती, जो सुरतरुचा उरों न दे गर्व. ॥१९॥
ऋषि वदले, ‘जगदीशा ! अत्यद्भुत वीर्य हें तुझें नव न ।
भवन श्रीस सुकीर्तिस, तूंचि करिसि आमुचें सदा अवन. ॥२०॥
सानज हंस सुदुर्जय, ऐसाचि विचक्र असुरहि देवा ! ।
होते वासवभयदहि, तुज अजितासींहि लाविला हेवा ! ॥२१॥
होते सहाय लोकप, तरि हरि, यांतें कदापि न खपविता, ।
त्या असुरवधीं धरितें झालें तव मृदुल हेंचि नख पविता. ॥२२॥
हें तप न परमपुरुषा ! तुजवांचुनि आमुचें तगायाचें, ।
तव संस्मरणचि तारक, सार कवि म्हणति ‘दुजें न गायाचें.’ ॥२३॥
अवतरलासि प्रभु तूं, स्थापाया वेदविहितधर्मातें; ।
द्याया खळबळदळनें आम्हां स्वपदाश्रितांसि शर्मातें. ॥२४॥
नमन तुज असो वरदा ! बा । पुण्यस्मरणकीर्तना ! देवा ! ।
विघ्न असेचि निवारुनि, आम्हांपासूनि घे सदा सेवा. ॥२५॥
वंदन असो तुला बा ! कृष्णा ! तूं साधुकाननवसंत, ।
पावतिल त्वद्भजनीं निरुपम सुख नित्य का न नव संत ? ॥२६॥
किति वर्णावें, वदले जें प्राप्तानंद शुद्धधी ऋषि, तें ? ।
कृषितें घन, सद्नितितें प्रभु, सेविति सुयश कविकुळें तृषितें.” ॥२७॥
श्रीकृष्ण म्हणे, “मुनि ! हो ! स्वस्थ असा सर्व, चित्त साधि न हो, ।
तुमचें अभीष्ट जें, तें मी, लोभी जेविं वित्त, साधिन, हो ! ॥२८॥
जे निजधर्मीं सादर, मज बहुमत सर्वकाळ ते जन,  हो ! ।
म्हणतां, ‘त्या साधूंतें लंघुनि धृतगर्व काळतेज न हो.’ ॥२९॥
माझें सर्वस्व तुम्ही, मी आळस कां करीन भवदवना ? ।
भवदवनाशकघन मी, हा तुमचा भाव, जेंवि भव दवना. ॥३०॥
धर्मस्थापन, सदवन, दुष्टदमन, हेंचि मद्‌व्रत प्रथित; ।
मी तुमच्या, प्राणाच्या प्राणी जेंवि, व्यथेस्तव व्यथित. ॥३१॥
ऐसें देउनि अभय प्रभु पुष्करतीर्थवासि भव्य जना, ।
गेला द्वारवतीला, याचि यशा सुकवि भजति, न व्यजना. ॥३२॥
श्रीद्वारवतींत जसा देव, तसाचि प्रवेशला हर्ष, ।
पुष्पांचें, लाजांचें, प्रभुवरि करिती कुमारिका वर्ष. ॥३३॥
ननाविध वाद्यांचा, कोंदुनि गगनोदरीं, सुरव राहे; ।
जी पूजा या प्रभुची, नाहीं त्या शतमखा सुरवरा हे. ॥३४॥
श्रीद्वारकेंत करिता झाला, नांदोनि नित्य नवल हरी, ।
नव लीला अवतारीं या, जैशा सागरांत नव लहरी. ॥३५॥
श्रीभारतभगवद्यश, चिंतुनि हरिचरणसारसां, गावें; ।
संसारात तराया श्रीगुरुपरिचरण सार सांगावें. ॥३६॥
नित्य श्रवण कराया, बा ! राया ! सत्सभा रता गाया, ।
ऐकोनि सुरभिचाही सेवीलचि वत्स भारता गा ! या. ॥३७॥
वैशंपायन, सांगे, “घडति जयावृत्ति सांग बारा ज्या, ।
कुळ तारूनि, तरेल, त्रिजगीं तो परम धन्य, बा ! राजा ! ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP