उत्तरार्ध - अध्याय ५१ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.

या काळीं पाचारी तो पौंड्रक कृष्णशत्रु  वश राजे, ।
सांपडले त्या प्रभुच्या आयु:शेषें करूनि न शरा जे. ॥१॥
पौंड्रक राजांसि म्हणे, “म्यां भूभूपाळ जिंकिले सर्व, ।
यादव उरले असती, पावुनि कृष्णाश्रयें महागर्व. ॥२॥
चक्रबळें करिताहे, मातें नेणूनि, कृष्ण मदवज्ञा. ।
अदवज्ञा घासाही लंध्य दव गमे, गजाहि न दवज्ञा. ॥३॥
कृष्ण नव्हे शुद्धतपा, उद्धत, पाखंड सर्वथा, अरि तो ।
गर्वें फुगला आहे, कीं शार्ङ्गगदादि आयुधें धरितो. ॥४॥
धरिलें सनाम आयुध, जें माझें नाम तेंहि गोपानें; ।
‘मी वासुदेव’ म्हणतो, दंडीन रणीं तयासि कोपानें. ॥५॥
माझें चक्र सुदर्शन खंडील रणांत कृष्णचक्रातें, ।
मातें जिंकाया न क्षम यादव, जेंवि दैत्य शक्रातें. ॥६॥
भारसहस्त्रें रचिली माझी कौमोदकी गदा, त्याची ।
भंगेल दांभिकाची कीर्ति तसी, जेंवि हेतदात्याची. ॥७॥
तें गार्ड्ग काय ? माझें शार्ड्ग सुद्दढ, अशनिही न खंडिल या, ।
तच्चापलता जाइल येणें, तपनें जसीच थंडि, लया. ॥८॥
त्या अरिच्या खडगाच्या नाशीं मत्खडग नंदक क्षम हा, ।
पावेल पुत्रशोक ज्वलनात विनाश नंदकक्ष महा. ॥९॥
मी मुख्य गदी, चक्री, खङ्गी, शार्ङ्गी, यथार्थ जाणावें; ।
गोपातें वधिन रणीं, हें माझें मत मनांत बाणावें. ॥१०॥
मज ‘वासुदेव,’ ‘चक्री’, ‘खड्गी’, ‘शंखी’, ‘गदी’, म्हणा स्पष्ट; ।
न म्हणाल असें जरि, तरि सर्वहि पावाल सर्वथा कष्ट. ॥११॥
ख्यात सखा नरकाचा मी, त्या नरकांतकासि खंडीन, ।
जरि ‘वासुदेव’ मातें न म्हणाल, खरें तुम्हांसि दंडीन. ॥१२॥
मज ‘वासुदेव’ कोणी न म्हणेल, म्हणेल भूप तो ‘हाय,’ ।
त्यापासुनि घेयीनचि अयुत वसु सुवर्णनिष्क मी राय.” ॥१३॥
या जडपौंड्रकवचनें त्यांचें मन त्या सभेंत बहु लाजे, ।
बा ! जे जाणत होते प्रभुचें सामर्थ्य शुद्धमति राजे. ॥१४॥
भूप अधन्य अदन्य, प्राकृत मानूनि हरि, खलेश तशा ।
कुविचारा हित जाणुनि, वीर्यमदोत्सिक्त हरिखले शतशा. ॥१५॥
हरिहरसमागमोत्वव कैलासीं अनुभवूनियां, आर्य ।
नारद पौंड्रकनगरा ये, चिंतुनि दुष्टदमन हें कार्य. ॥१६॥
मुनितें पौंड्रक पूजी, वर्णी पुष्कळ, म्हणे, “तुझें गमन ।
ब्रम्हांडीं अव्याहत, करिति तुज सुरादि सर्वही नमन. ॥१७॥
‘मी वासुदेव, चक्री, दाता, त्राता,’ असें असें जगीं कळिव; ।
पळिव भ्रम लोकांचा, सर्वांचें चित्त मजकडे वळिव. ॥१८॥
आपण गोप मिरवितो जो माझें ‘वासुदेव’ हें नाम, ।
त्याला वीर्यबळ नसे, पक्व नव्हे, स्पष्ट मूढ तो आम, ॥१९॥
मी एक वासुदेव त्रिजगीं होतों, वधूनि गोपातें; ।
निश्चय तूं जाण, मुने ! माझ्या साहेल तो न रोपातें. ॥२०॥
मी वासुदेव,  चक्री खवळेन रणांगणांत कोपानें, ।
तेव्हां सांग, करावें स्वप्राणत्राण काय गोपानें ? ॥२१॥
मन्नाम अमृत, राहुचि तो, न दिली सुमति बल्लवा तातें; ।
सांग, पराभविल, जरि प्रबळहि, तरि काय, मल्ल, वातातें ? ॥२२॥
यादवसह गोपांतें मारीन, द्वारकेसि जाळीन, ।
पाळीन स्वजन, भय प्रभुवर मी वासुदेव टाळीन. ॥२३॥
मी योद्ध एक जगीं, भूप मिळाले बलाढय मजला हे, ।
तो गोप उरेल कसा ? कोण प्रभुरिपु जयासि भजलाहे ? ॥२४॥
मम हय, गज, अतिवेगी, करिति चमत्कार नवनवे गमनीं, ।
यांच्या पाहुनि वेगा, कविंनीं गणिला न पवनवेग मनीं. ॥२५॥
माझा तसा बलौघ, क्षुब्धाब्धीचा अवार्य लोट कसा, ।
द्दढहि द्वारवतीचा समयीं उतरेल तो न कोट कसा. ॥२६॥
क्षम गिरिस ढांसळाया मद्नज, वाताहि घोटक वळाया, ।
रथवृंद काळवदनचि अतिपटु यदुनगरकोट कवळाया. ॥२७॥
तस्मात, सर्वत्र जगीं शक्रासहि, मत्प्रताप सांगावा, ।
थांगा वास्तवतेजा, हा न तुवां वासुदेव कां गावा ? ॥२८॥
म्हण मजचि वासुदेव, न त्या, कथ्तों तुज सुखार्थ मी नमुनी, ।
कीं तूं व्हावासि प्रभुसद्नुणरत्नाकरांत मीनमुनि.” ॥२९॥
देवर्षि म्हणे, “देतों प्रतिवाक्य मनुष्यनायका ! याचें, ।
न वद असें, श्रीहरिचें श्रीशार्ङ्गधनुष्य नायकायाचें. ॥३०॥
सर्व महीतें शासित असतां कृष्ण त्रिलोकपति तरणी, ।
खद्योत इतर ‘मी प्रभु’ म्हणतां, होईल कां न पतित रणीं ? ॥३१॥
‘मी वासुदेव,’ म्हणसी, करिसी हें काय गान ? वाचाळा ! ।
तुज लागला अहा ! हा हास्यावह काय गा ! नवा चाळा ? ॥३२॥
दुष्टजनातें नेतो लीलेनें संगरीं हरि लयातें, ।
झाला बहु गर्व तुला, सत्वर तो प्रभु, पहा, हरिल यातें. ॥३३॥
तूं पौंड्‍क; जगदीश्वर विष्णु काय गा ! जीव ? ।
म्हण वासुदेव, नाम, क्षत जों चक्रें न काय, गाजीव.” ॥३४॥
या मुनिवचनें कोपे पौंड्‍क अतिमूढ, तोतयाला जे ।
जड अनुसरले होते, लाजति न, जसा न तो तया लाजे. ॥३५॥
असुरादि मत झाले, परि हा अत्यंत मातगा, याची ।
भगवद्यशोर्थ गातों, जरि न बुधसभेंत मात गायाची. ॥३६॥
मुनिस म्हणे, “देवर्षे ! मी प्रभुवर; सत्समक्ष काय कसें ।
बोलावें हें नेणसि, उच्चारिसि वचन सविषसायकसें. ॥३७॥
बापा ! शापापासुनि भीतों, तूं तूर्ण ऊठ, जाच कसा. ।
लंघुनि, सभेंत केला सोसेल प्रभुवरासि जाच कसा ?” ॥३८॥
हें ऐकुनि, मुनिहि निघे, त्याची वर्णुनि मनांत बालिशता, ।
कीं हा बहुमान्य कनककशिपुखचरराजवेनवालिशता. ॥३९॥
मुनि जाउनि बदरींत प्रभुला पौंड्रकदुरुक्त आयकवी, ।
करिल क्षमा, स्वगुरुच्या निंदेतें आयकोनि, काय कवी ? ॥४०॥
देव म्हणे, “देवर्षे ! पौंड्रक बोलो यथेष्ट, जों आयु, ।
बा ! युद्धीं तद्नर्वा उडविन, उडवी तृणा जसा वायु, ॥४१॥
भ्रमला काय वदेना ? साधूंच्या निंदितो सुराप सदा, ।
जो मत्त, म्हणेलचि तो देवेंद्रातेंहि ‘हा ! सुरापसदा !’ ॥४२॥
ऐसें बोलुनि मुनिसीं, पावे भगवान् विराम बदरींत ।
यद्भक्तिविणें कोणी हिमगिरिच्याही कृतार्थ न दरींत. ॥४३॥
प्रभुनें वसोनि, केली अतिमुदिता साधुमंडळी बदरीं; ।
ज्याच्या तेजें उरला बाहिर, आंतहि, न एकही सदरी. ॥४४॥
नारद निघतांचि, निघे पौंड्रक,याचे तुरंग नवलक्ष, ।
अष्टसहस्र रथ, अयुत गज, अर्बुद पत्ति, सर्व रणदक्ष, ॥४५॥
ऐसी सेना घेऊनि, नानाविधशस्त्रयुत रथीं चढला, ।
पौंड्‍का अत्युग्र, जसा र्‍हद काळियगरळपावकें कढला. ॥४६॥
बहु दीपिकाप्रकाशें जाय निशीथींच यदुपरीजवळ, ।
काळतसा अतिदारुण यदुवीरांतें करावया कवळ. ॥४७॥
तो पौंड्रक भूपांतें सांगे, “हूं शीघ्र ताडवा भेरी, ।
घेरी भयें अरीला येऊ, होऊ रवें पुरी भेरी. ॥४८॥
त्रास मनीं वीरां अहितांचा, जेंवि रोष वाघाला.” ॥४९॥
ऐसी आज्ञा होतां दुंदुभि, समरा सजोनि, वाजविती; ।
सहसा सर्वहि सैनिक पौंड्रकनामप्रताप गाजविती. ॥५०॥
म्हणती, “कोठें ? सात्यकि, सांब, प्रद्युम्न, राम, यादव ! हो ! ।
रक्षा, पौंड्रक ईश्वर होय, न या पुरतृणोच्चया दव हो. ॥५१॥
‘मी वासुदेव ईश्वर’ म्हणता कोठें प्रमत्त तो गोप ? ।
कोपज्वलन प्रभुचा पाहे त्याचा करावया लोप.” ॥५२॥
यापरि मर्यादेतें लंघुनि, झाले यथेष्ट बडबडते, ।
श्रीद्वारकेंत शस्त्रें वर्षति, करिती उदंड गडबड ते. ॥५३॥
प्राप्त महाव्यसन तसें होतां रात्रींत, वृष्णि ते भ्याले, ।
बळ, उग्रसेन, सात्यकि, उद्धव, हार्दिक्य, सिद्ध हे झाले. ॥५४॥
चतुरंग सैन्य घेऊनि, रणलालस, मुख्य वृष्णिवर वीर ।
गुरुदीपिकाप्रकाशें, भेरी ताडूनि, निघति बहु धीर. ॥५५॥
पळविति दूर तमातें, वृष्णि, प्रकटूनि दीपिका लक्ष, ।
दक्ष ध्वंसिति परबळ, जाणों हे दाववन्हि, ते कक्ष. ॥५६॥
बहु हय, गज, भट मेले, ठेले होऊनि निषाद पतित रणी, ।
तो यदुभट नक्षत्रें करि, होय क्षण निषादपति तरणी. ॥५७॥
तो एकलव्यनामा दहनाचा स्पष्ट लोळ वीर गडी, ।
काळाचा भासे कीं, बहु यादवसैन्य लोळवी, रगडी. ॥५८॥
निशठासि पंचविंशति, दश सायक सारणासि तो हाणी, ।
कृतवर्म्याच्या सिरवी तो अतिखर पंच शर तनुत्राणीं. ॥५९॥
शर नवति उग्रसेना हाणुनि, समरांगणीं करी तप्त, ।
वसुदेवासहि ताडी समरीं, सोडूनि बाण तो सप्त. ॥६०॥
पंच शरांहीं ताडी अक्रूरा, उद्धवा दश शरांनीं; ।
किति म्हणति, “सांगतो हा सिंहासीं शुद्ध वाद शश रानीं.” ॥६१॥
गर्जे निषाद, ‘कोठें सात्यकि ? कोठें मदांध तो मुसली ? ।
शस्त्रास्त्रशक्ति कोठें ? भ्याली, कीं आजि वृष्णि ! हो ! रुसली ?” ॥६२॥
यादव वीरांसह चतुरंगहि बळ पळविलें निषादानें, ।
त्या दीपिका विझाल्या, झाले वाकुळ तमीं विषादानें, ॥६३॥
गेले परतोनि पुरीं वृष्णि, सबल युद्धभूमि सोडून; ।
झोडून एकलव्यें केले हतदर्प, सर्व मोडून. ॥६४॥
पौंड्रक यादवभंगें हर्षें, हांसे धरूनि पोटाला; ।
स्वभटांसि म्हणे, “पाडा, द्वारावतिच्या खणोनि कोटाला. ॥६५॥
कन्या दासीच करा, द्या एकाही न यादवा राहूं, ।
शोषा रामर्‍हद तो, माराया सैन्य यादवारा, हूं !” ॥६६॥
स्वामीच्या आज्ञेनें भट झटले, करुनियां पण, खणाया, ।
प्राकारीं टंक सबळ घन सहसा लागले खणखणाया. ॥६७॥
सात्यकि म्हणे, “मुकुंदें मज नगरी फार निरविली आहे, ।
ज्याच्या प्रतापदहनें शात्रवशलभांत मिरविली आहे.” ॥६८॥
ऐसें चिंतुनि, दारुकसुत सूत करुनि, रथीं चढे तूर्ण, ।
अरिंनीं करितां पूर्वद्वारप्राकार तो बळें चूर्ण. ॥६९॥
रामप्रभुहि निघाला, हलमुसलायुध महोग्र धरुनि करीं, ।
क्रीडा तसी कराया, जेंवि करी चंड वात तरुनिकरीं. ॥७०॥
बैसुनि मत्ततर गजीं, शुद्धमना, शुद्धनीति, शुद्धवया, ।
होऊनि पुढें, म्हणे यदुवीरांतें, सर्वमान्य उद्धव, “या.” ॥७१॥
बाहिर निघतां, सात्यकि सकळा शत्रूंसि साध्वसीं बुडवी, ।
वायव्यास्त्रें सहसा प्रथम प्राकार पाडिते उडवी. ॥७२॥
जें अस्त्रवातवेगें सहसा निर्धूत यदुवरें केलें, ।
सोडुनि बळाविलें स्थळ, बळ सहनृप पौंड्रिकाकडे गेलें. ॥७३॥
स्थळ सोडवूनि; सात्यकि तेथें ठाके, मनीं धरी कोप, ।
भात्यांतुनि काढुनि घे हस्तीं अत्युग्र सर्पसा रोप. ॥७४॥
गर्जोनि म्हणे, “कोठें आहे पौंड्रक ? नव्हे बळी थोर, ।
चोर, स्पष्ट निशाचर, दिसतां मारूनि, वारितों घोर. ॥७५॥
यादव निजले जाणुनि, आला घालावयासि जो घाला, ।
चोरचि, तो सात्यकि मी त्या क्षुद्रा, ग्रीष्म जेंवि ओघाला. ॥७६॥
चोर शिरच्छेद सुकृत, जरि मी पाहेन काय अधमास, ।
वांटुनि देइन गृध्रश्वानास, पळांत करुनि वध, मास.” ॥७७॥
ऐसें सात्यकि हांसे, जोडी सुद्दढीं धनुर्गुणीं बाण, ।
त्याच्या शिर:फळांचें द्याया काळा महाद्विजा वाण. ॥७८॥
पौंड्रक म्हणे, “अरे ! तो कोठें ? त्याच्याचि पातलों अंता, ।
स्त्रीहंता, पशुहंता, जो गुरु करि तक्षकाहिच्या दंता. ॥७९॥
मन्नाम स्वीकारुनि, मिरवी निर्लज्ज धृष्ट जो गोप, ।
मत्प्रियसखनरकवधें आला त्याचाचि बहु मला कोप. ॥८०॥
मी त्यासींच भिडेन, क्षम नससी तूं करावया समर, ।
अथवा रहा, स्वरक्तें भूमितृषा परिहरावयास मर. ॥८१॥
त्या गोपाचा नाशो त्वन्निधनश्रवणभेषजें गर्व; ।
शर्व स्मरा, तसा मी तुज; हरितों मद तुझा रणीं सर्व. ॥८२॥
शकसिल, तरि, युयुधाना ! म्यां धरिला बाण हा, सहा यास; ।
मज हसविसिल, रडविसिल त्या गोपा आपुल्या सहायास.” ॥८३॥
ऐसें वदोनि सात्यकिवरि पौंड्रक जाय, बाण काढून, ।
सात्यकि म्हणे, “सुखवितों श्वान, तुझें रक्तमांस वाढून. ॥८४॥
जगदीशातें निंदिसि, पापा ! तुजसारिखा अधम नाहीं. ।
साधूंच्या, वांछावा, बहु मानावा, तुझा वध, मनांहीं. ॥८५॥
येइल सकाळ काळियशासन केशव तुला लया न्याया, ।
तूं प्रभुसीं सांगसि, तरि सांगो निधिसीं कुलाल या न्याया. ॥८६॥
कैलासाहुनि जरि हरि नाहीं आला, उद्यां तुझा वध मी ।
करिन, स्पष्ट जयश्री भगवद्भक्तीं वसे, नसे अधमीं. ॥८७॥
‘मी वासुदेव’ म्हण, जों आला न मुकुंद; आयतीच वरी ।
श्रीकीर्ति नृपा पुण्य़ें; पापा शोभेल काय ती चवरी ? ॥८८॥
ऐसें बहु धिक्कारी, तीव्र शरें पौंड्रका उरीं हाणी, ।
न्हाणी रक्तें, कोप व्याळासि जसा, तसा तया आणी. ॥८९॥
पौंड्रकहि नव शरांहीं आधीं ताडी तया, मग दहांनीं; ।
ते करिति सात्यकीच्या धैर्या, मुनिच्या जसे न गद, हानी. ॥९०॥
एक ललाटीं पौंड्रक सात्यकिच्या बाण शूर तो बुडवी, ।
उडवी भान, स्वक्षय व्हाया जाणों महाहितें तुडवी. ॥९१॥
सूतातें, अश्वातें, खरतर शर तत्क्षणींच तो हाणी, ।
न्हाणी रक्तें, आणी नेत्रांत प्रेक्षकांचिया पाणी. ॥९२॥
गर्जे, हर्षे पौंड्रक, संपादुनि विजय, संगरीं हरिसा, ।
परि सावधान सात्यकि झाला त्या शत्रुगर्जनेसरिसा; ॥९३॥
सात्यकि गर्जोनि म्हणे, “दाखविं बळ वासुदेवका ! मातें, ।
जेविं पिपीलिक, दुर्मतिवेश्येच्या तेंवि सेव कामातें.” ॥९४॥
ऐसें दापुनि अरितें, हरितें चिंतुनि, महोग्र रोपानें ।
वक्षीं ताडी, पाडी, भ्रमवुनि, वमवुनि अशुद्ध, कोपानें. ॥९५॥
ध्वज ताडुनि, सूतातें अश्वांतें वधुनि, चूर्ण करि चक्रें; ।
पौंड्रक विरथ विलोकुनि, केलें बहु ‘हाय ! हाय !’ अरिचक्रें. ॥९६॥
येतां सुपात्र जैसा केवळ निर्धन वदान्य नर होतो, ।
झाला तैसाचि रणीं पौंड्रक भूपाळ, रसिकवर हो ! तो. ॥९७॥
साबध होऊनि पौंड्रक, सात्यकिवरि विशिख सर्पसे सोडी; ।
तो युयुधान तयाच्या चापातें उग्र सायकें तोडी. ॥९८॥
तो वासुदेव टाकी, गरगर फिरवुनि, गदा, तदा तीतें ।
सव्यकरें सात्यकि धरि, खर शर हाणी तया पदातीतें. ॥९९॥
सात्यकिशर वामकरें पौंड्रकही अंतरीं धरी, राजा ! ।
सोडी तो अतिवेगें त्याच्या भेदावया शरीरा ज्या. ॥१००॥
दशशक्तींहीं ताडी सात्यकितें वासुदेव रोषानें, ।
तो पीडिला परानें, जेंवि सुगुण कैयुगांत दोषानें. ॥१०१॥
सात्यकि तया, गदेनें त्या ताडी वासुदेवकहि; राया ! ।
माधव म्हणे, “सुकठिना सेविल, होऊनि सेवक हिरा, या.” ॥१०२॥
अन्योन्यासि वधाया ते दोघे सगद रुष्टधी ट्पती, ।
गहनीं जेंवि मृगांचे अत्यंतक्रोध दुष्ट धीट पती. ॥१०३॥
युयुधान सव्य मंडल, दक्षिण पौंड्रक महागदी चाले, ।
न्हाले रक्तें, झाले श्रांत न, एकहि न र्निश्चयीं हाले. ॥१०४॥
पौंड्रक महागदेनें युयुधानातें स्तनांतरीं ताडी; ।
युयुधान पौंड्रकातें ताडूनि भुजांतरीं, तळीं पाडी. ॥१०५॥
उठुनि, ललाटीं ताडी सात्यकितें वासुदेव तो रागें. ।
सात्यकिहि पौंड्रकातें, एकहि समरीं सरेचिना मागें. ॥१०६॥
पौंड्रक उग्र गदेतें युयुधानातें वधावया सोडी, ।
तीतें, उडोनि, झेली तो बळनिधि, वेणुयष्टिसी मोडी. ॥१०७॥
सहगद कर वामकरें धरुनि, करायासि हानि, करकरुनी, ।
माधववक्षीं मारी दक्षकरें मुष्टि हा, निकर करुनी. ॥१०८॥
सात्यकिनें त्यजुनि गदा, तोहि उरीं ताडिला स्वदक्षतळें; ।
तद्बहुयुद्ध वेधी, जेविं ज्येष्ठांत जीवलक्ष तळें. ॥१०९॥
सात्यकि, पौंड्रक, करिती दारुण भुजयुद्ध ते, जसे मल्ल, ।
प्रेक्षक जन जे, त्यांचे बा ! फुल्लाफुल्ल जाहले गल्ल. ॥११०॥
“सात्यकि मरतो,” म्हणती किति, “मानी वासुदेव हा मरतो.” ।
किति म्हणती, “दोघेही मरतिल, पर यज्ञ, काय पामर तो ? ॥१११॥
जों पौंड्रक पांच, तया मारी सात्यकि कसूनि मुष्टि दहा. ।
यादव या, दवडुनि भय, देखति जे, त्यांसि होय तुष्टिद हा. ॥११२॥
रामासीं युद्ध करी, अतिदारुण एकलव्य शर सोडी; ।
त्याचें धनु बळ तोडी, मोठी या संगरीं असे गोडी. ॥११३॥
धनु तोडुनि, दश सूतीं, तीस रथीं, बाण अर्पिले रामें. ।
ध्वज खंडुनि, कोपविला शत्र, जसा भूत नृहरिच्या नामें. ॥११४॥
तों सज्ज करी दुसरें द्दढ दशतालप्रमाण तो धनुतें; ।
शर हाणितांचि केलें विच्छिन्न बळें समस्तयोधनुतें. ॥११५॥
छेदी अरिच्या असितें मग जगदीशाग्रज, क्षमानाथा ! ।
दुसराहि खडग खंडुनि, बळ सर्वाचाहि डोलवी माथा. ॥११६॥
शक्तिहि निषादपतिनें पाठविली यदुवरासि माराया, ।
ती धरुनि, तिणेंचि बळें तो क्षत केला उरांत, बा ! राया ! ॥११७॥
खरशक्तिविद्ध होऊनि, मूर्च्छित पडला निषादपाळ कसा ? ।
म्हणसिल, पुससिल जरि, तरि दारुणनागीविषार्त बाळकसा. ॥११८॥
अष्टाशीतिसहस्त्र क्रोधी पर, भेक पन्नगा, रामा ।
वेढिति निषाद राक्षस, जैसे त्या भक्तसन्नगारामा, ॥११९॥
नाना शस्त्रें ताडी परबळ रामा विषादरहितातें, ।
केला श्रीस्कंदाच्या, सद्यश व्हाया, विषादरहि तातें. ॥१२०॥
परम हळें शत्रु बळें आकर्षुनि, सर्व मारिले मुसळें; ।
करितील निषादबळें या प्रभुचें, काय वन्हिचें कुसळें ? ॥१२१॥
मांसें, रक्तें, सेवुनि, करिती राक्षसपिशाच नृत्यातें; ।
गाती बळभद्राच्या होऊनि अत्यंत तृप्त, कृत्यातें. ॥१२२॥
केलीं, पसरुनि आस्यें, हास्यें, लास्यें, पिशाचयोषांहीं. ।
पापिगृहीं विषदाहीं ऐसे पावोनि तोष दोषांहीं, ॥१२३॥
तो एकलव्य, संज्ञा पावोनि, उठे, रणीं उभा राहे, ।
पाहे स्वनिषादक्षय, बहु शोकक्रोध मानसीं वाहे. ॥१२४॥
परजी परजीवनलयदक्ष गदा तो तदा महाशत्रू, ।
धावुनि, बळभद्राचें सक्षत ताडुनि करी बळें जत्रू. ॥१२५॥
बळहि गदेच्या ताडी, धांवूनि, निषादपा, तया पातें ।
प्रेक्षक न शिवों देती, पावोनि विषाद, पातया पातें. ॥१२६॥
करिति गदायुद्ध असें बळभद्रनिषादराज, या नाकीं, ।
पाताळींहि, बहु भिउनि, वदले, ‘येथेंहि आज याना कीं ? ॥१२७॥
बळदेव, निषादेश्वर, सात्यकि, पौंड्रक नरेंद्र, हे चवघे ।
करिति तदा रण दारुण, त्या काळीं लोक कांपले अवघे. ॥१२८॥
क्षणदा सरली, भगवान् लोकांचा बंधु जाहला उदित, ।
पहिल्याहुनि उग्र समर करिती चवघेहि वीर ते मुदित. ॥१२९॥
बदरीहूनि निघाला, गरुडीं बैसूनि, सर्वशूरवर; ।
तों यांचे सिंहध्वनि परिसे प्रभु कृष्णनाथ दूरवर. ॥१३०॥
जगदीश म्हणे, “होतो संगर, हा सिंहनाद आर्याचा, ।
हा निश्चित सात्यकिचा, प्राप्त असे समय शेषकार्याचा.” ॥१३१॥
येऊनि पावे, पाहे प्रभु रणरंगीं बळादि यदुवीर, ।
निज पांचजन्यनादें दे त्यांतें, दर्शनेंहि, मग धीर. ॥१३२॥
नमिति, स्तविती, धावुनि, मुनि यादव, पाहतां हरि समोर; ।
कृष्णीं हे बहु, मेघीं सादर, परि नसति यापरिस, मोर. ॥१३३॥
लोकांचें तम रविच्या, प्रभुच्या भय तेंवि जाय, आगमनीं; ।
त्या पौंड्रकनरपतिचें आणी अच्युत असहय आग मनीं. ॥१३४॥
प्रभु उतरुनि, सत्कारुनि, दे आज्ञा जावयासि पक्षीना; ।
त्या दारुकयुक्तरथीं बैसे, तो परमदासि रक्षीना. ॥१३५॥
मग पांचजन्य दरवर हरवरसत्पात्र वाजवी राया ! ।
अत्यद्भुत रव हा बा ! ऐकुनि, धरि मेघ लाज वीरा या. ॥१३६॥
बळसात्यकिच न, नादें नारदपर्वतहि हर्षले खांत; ।
पौरजनांतचि न, नृपा ! कोंदे अत्यंत हर्ष लेखांत. ॥१३७॥
प्रभुतें पाहुनि, पौंड्रक, सात्यकितें त्ययुनि, तो महा धीट, ।
कृष्णाकडेचि जाया, युद्धार्थी वातसा निघे नीट. ॥१३८॥
जाय प्रभुवरि पौंड्रक जों, तों सात्यकि पुढें उभा राहे, ।
त्यासि म्हणे, “पहिला न त्यागावा, धर्म हा असा आहे, ॥१३९॥
मज आधीं जिंक, बहा मग तूं या वृष्णिनायका रणगा; ।
करिसि प्रथमातिक्रम अयशस्कर, यासि काय कारण ? गा !” ॥१४०॥
करुनि अवज्ञा, पौंड्रक, जाऊं लागे तसाचि हरिवरि तो, ।
बा ! राया ! ज्या प्रभुच योगींद्रदुराप मुक्ति अरि वरितो. ॥१४१॥
सात्यकि तया गदेनें, आधीं निर्भर्त्सना करी, ताडी, ।
देव म्हणे, “येऊं दे बा ! मायेहूनि बहु बरी ताडी.” ॥१४२॥
सात्यकिस करी आज्ञा तो, ज्याचे भाट देव, वीरा या ।
प्रभु गांठि आपणासीं घालाया वाट देववी राया ! ॥१४३॥
प्रभुसि म्हणे तो पौंड्रक, “कोठें होतासि तूं ? अरे ! गोपा ! ।
हो पात्र, नाम माझें घेऊनि, अपराध करुनियां, कोपा. ॥१४४॥
तुज मारुनि, आप्त तुझे सर्वहि बुडवावयासि शोकांत, ।
आलों प्रख्यात यशें व्हाया मी वासुदेव लोकांत, ॥१४५॥
स्त्रीघाती, शिशुघाती, रे ! गोपा ! तूं प्रसिद्ध गोघाती, ।
जी विजयेच्छा धरिली, पापा ! करितोंचि आजि मोघा ती. ॥१४६॥
माझें खरें सुदर्शन, माझी कौमोदकी गदा साची, ।
मी शार्ङ्गीं, स्वामीची सत्या आख्या जगीं, न दासाची. ॥१४७॥
माझाचि सत्य नंदक खङ्ग, तुझा स्पष्ट कपटनंदकसा. ।
करिसि कुचेष्टा, घेयिल, झांकाया तोंड, न पट नंद कसा ? ॥१४८॥
त्वां स्त्री, पशु, शिशु, मारुनि, गोपा ! जो पोषिला, तया गर्वा ।
तुजसकट वासुदेव प्रभुवर मी आजि नाशितों सर्वा. ॥१४९॥
घे शस्त्र, सिद्ध हो, जरि सामर्थ्य असे करावया समर; ।
माझ्या चक्रें, दुस्तरदोषसमुद्रीं तरावयास, मर.” ॥१५०॥
शर धरुनि, समक्ष असें तो पौंड्रक वासुदेव बडबडला, ।
श्वानाच्या सिंह, तसा प्रभु त्याच्या प्रलपितें न गडबडला. ॥१५१॥
स्मित, करुनि, श्रीस म्हणे, “प्रभु तूं, प्रभुवद नावरायाचें, ।
कथिलेंहि न कोणीं कीं, ‘वदसी हें, वद न नांव रायाचें.’ ॥१५२॥
‘स्त्रीहंता,’ ‘गोहंता,’ ‘शिशुहंता,’ म्हणसि मज, सुखें म्हण, गा ! ।
धिक्कारितोसि, राजा ! धिक्कारावें जसें जना भणगा. ॥१५३॥
जरि वासुदेव चक्री असणें आपणचि काम, हा बा ! हो; ।
मज गोपातें ‘मारिन’ म्हणसी, तरि उशिर कां ? महाबाहो ! ॥१५४॥
जो सत्य गदी, चक्री, शार्ङ्गी, तो वासुचेव राहेल, ।
साहेल स्फटिक, लटिक काच परीक्षा न, भंग पाहेल, ॥१५५॥
‘आपण सत्यचि’ ऐसें वाटे मज, तुजहि; दिव्य हें युद्ध, ।
क्रुद्ध व्यर्थ न व्हावें, राजा ! उतरेल यांत, जो शुद्ध. ॥१५६॥
कत्थन काय करिसि ? हें करिति अधम न करितांहि कार्यातें; ।
विक्रम करुनि करावें, जनमत अभिमत नसेचि आर्यातें. ॥१५७॥
असशिल  शक्त, तरि करीं कत्थन, आधीं करूनि, वध माजा, ।
बडबडसि कां ? चढ रथीं, शार्ङ्गसुदर्शन धरूनि अधमा ! जा.’ ॥१५८॥
ऐसें म्हणतां, आला माराया तोतया सजुनि, यातें; ।
कुतुकें उत्साह दिला बा ! राया ! तों तयासि जुनियातें. ॥१५९॥
हाणी एक शर हळुच भगवान् कनकाक्षकाळ वीरा या, ।
देवर्षिप्रमुखसुकविमुक विस्तारार्थ चाळवी राया ! ॥१६०॥
हाणी कपटसुदर्शनशार्ङ्गगदापाणि शर दहा राजा ! ।
त्या हृदयें त्यांतें घे, श्रीच्या गजराजवरद हारा ज्या. ॥१६१॥
अतिशीघ्र दारुकाला दारुणतर पंचवीस शर मारी, ।
एकैका तुरगातें दश, तो वासुदेव परमारी. ॥१६२॥
प्रभुसि विशिख सत्तर हा मत्त, रहाया स्वनामयशा, हाणी. ।
वाणी म्हणे, “जयाचा वर्णाया मी प्रताप न शहाणी.” ॥१६३॥
चित्तीं प्रभु मानवला धृष्टपणें वासुदेवका राया ! ।
शर लागों दे त्याच्या करीर्त्यर्थ, जरिहि समर्थ वाराया. ॥१६४॥
तोडी ध्वज, सारथिशिर; मारी चारीहि वाह, बा ! हरि तो, ।
शार्ङ्गच्युतबाणांहीं रथ मोडी, देव विश्वजो करितो. ॥१६५॥
मग किंचित् करि हास्य प्रभ, दावुनि हात हा तया मत्ता, ।
सत्ता सत्या दावी जो ,बा ! सत्वरिक्ति नट जसा दत्ता. ॥१६६॥
भग्नरथावरुनि उडे, तो पौंड्रक पुंडरीकनेत्रास ।
माराया भिरकावी खड्ग, न धरि मृत्युचा मनें त्रास. ॥१६७॥
त्या खङ्गातें शतधा खंडी चंडीपतिप्रिय स्वामी; ।
तरिहि म्हणे, “रे ! गोपा ! तुज मारुनि, रक्षितों यशा स्वा मी. ॥१६८॥
प्रेषी  पौंड्रक परम प्रभुतें पाहावयासि परिघातें, ।
त्यातेंही छेदी, जो देता शक्रासि शर्म अरिघातें. ॥१६९॥
मग तो त्रिंशद्भार प्रखरतर पर स्वचक्र घे राजा ! ।
कैंचा विवेक ? पडला षडरातींचा प्रसिद्ध घेरा ज्या. ॥१७०॥
गर्जोनि, म्हणे पौंड्रक, “हरितों तव गर्व सर्व, गोपा ! हें; ।
आलें रे ! तव मस्तक उडवाया, सावधान हो, पाहें.” ॥१७१॥
ऐसें म्हणोनि, शतगुण फिरवुनि निज चक्र, वी तो सोडी;
गर्जे, हरिसा, परिसा फार रसीं तोतयाचिया गोडी. ॥१७२॥
उडुनि रथावरुनि प्रभु पौंड्रकनरराजचक्र तें चुकवी, ।
सुकवी कळिकाळवदन यन्नाम, स्तविति सर्व ज्या सुकवी. ॥१७३॥
“दैवमहो ! धैर्यमहो ! वीर्यं राज्ञोऽस्य दु:सहं जगति.” ।
ऐसें वदला, आम्हीं वर्णावी शक्ति बहु न कां मग ती ? ॥१७४॥
चक्र चुकवितां, पौंड्रक भूप झुगारी शिळा अजावरि तो, ।
सात्यकिच निरभिमान प्रभुपदपद्माचिया रजा वरितो. ॥१७५॥
सत्संगतिमातेचा सदनुग्रहरूप पदर ज्वावरि, तो ।
मोक्षातेंही सोडूनि, या श्रीपतिच्याचि पदरजा वरितो. ॥१७६॥
कृत्येतें शुद्ध जसा, कृष्ण शिळेतें तसा नृपा ! फिरवी, ।
ऐसा कोण त्रिजगी ? जो अजितप्रभुपुढें प्रभा मिरवी. ॥१७७॥
यापरि सुचिर क्रीडे, मग भगवान् वासुदेव पर चक्रें ।
पौंड्रकमस्तक खंडी; जेणें केलींच भस्म परचक्रें. ॥१७८॥
त्याचा मस्तक आधीं मागुनि समराजिरांत काय गळे; ।
केला मुक्त असाही, साधूंचे दाटविल न काय गळे ? ॥१७९॥
भाव परम द्दढ ज्याचा, “मी चक्री, वासुदेव सत्य” असा; ।
बा ! पूतना तरे, मग होइल भगवत्स्वरूप तो न कसा ? ॥१८०॥
पौंड्रातें उद्धरूनि प्रभु जाय द्वारकेंत, बा ! राया  ! ।
मुदित सुधर्मेंत बसे स्वजनाचा विरहताप वाराया. ॥१८१॥
राम निषादवरातें  धांवोनि उरांत शक्तिनें ताडी; ।
आयुष्य शेष, यास्तव त्यातें काळाकडे न ती धाडी. ॥१८२॥
तो एकलव्य भव्य स्तव्यगुणा अच्युताग्रजा वक्षीं ।
उग्र गदेनें ताडी, वीरांच्या ख्याति मेळवी लक्षीं. ॥१८३॥
राम क्षोभे, ‘शोभे, तो भेदो भेकसा,’ म्हणे, स्वगदा ।
उचली, दीर्घ भुजांहीं; भीता त्या परम दावि या अगदा. ॥१८४॥
‘बळभद्रगदा हरिल स्वप्राणातें,’ असें मनीं समजे; ।
भिऊनि, निषादपति पळे; बुडवी, केले रणीं बहु श्रम जें. ॥१८५॥
हरि जेविं गजामागें, त्याच्या पाठीस सगद बळ लागे, ।
देवी वदल्या, “सखि ! हो ! अयश:पंकें, पळोनि, मळला गे !” ॥१८६॥
शिरुनि समुद्रीं, योजन पंच, द्वीपांतरीं दडाला हो ! ।
परत बळभद्र, म्हणे, “अपकीर्ति प्राप्त या जडाला हो.” ॥१८७॥
जाय सुधर्मेंत नृपा ! राम, पराभवुनि एकलव्यास, ।
ज्याचा प्रताप पाहे लयदहनाहूनि ऊन न व्यास. ॥१८८॥
तों शैनेयहि आला, संपादुनि संगरांत विजयाला, ।
रामाला, कृषाला, बहु मानिति सर्व तेंवि निज याला. ॥१८९॥
त्या दिव्य सभेमध्यें, उद्धव, अक्रूर, उग्रसेन, असे ।
यादव सर्व मिळाले, जेथें सहराम देवदेव असे. ॥१९०॥
विप्रादिकांसि वंदुनि भेटे, तें सुख वदेल काय कवी ? ।
नायक विश्वाचा त्या स्वजनासि समस्त वृत्त आयकवी. ॥१९१॥
“मज सांब शंकरप्रभु, करुनि कृपा, भेटला; अहो ! याचा ।
प्राप्त प्रसाद झाला, कोणाहि कधींहि जो न होयाचा. ॥१९२॥
भक्तीं प्रेम प्रभुचें तें अतुळ अनंत काय सांगावें ! ।
गावे शिवगुणचि, न पर; कां हंस त्यजुनि वायसां गावें ? ॥१९३॥
बुध ! हो ! बहु काय वदों ? केलें श्रीशंकरें मम स्तवन, ।
शोभविलें या प्रभुनें विश्व, वसंतें जसें समस्त वन. ॥१९४॥
मद्भक्त बहु प्रेमळ बदरींत पिशाच पाहिले, हो ! ते ।
पाठविले स्वर्गातें, भव्य मणि चुकोनि राहिले होते. ॥१९५॥
करुनि प्रसन्न आलों अतिवत्सल बाप तेंवि शंकर हा, ।
‘शिव, शिव,’ म्हणा सुमति ! हो ! नाशिल, जें पाप, तें;
विशंक रहा.” प्रेमें बहु प्रंश्सुनि ते यादव सर्व देवदेवातें, ।
गेले स्वगृहा, मग जें वैदर्भीगेहवृत्त, सेवा तें. ॥१९७॥
अंत:पुरांत भेटे वैदर्भीयुक्त सत्यभामेला, ।
शंभुप्रसाद सांगे, ज्या परिसुनि अरि म्हणोनि ‘हा !’ मेला. ॥१९८॥
कृष्ण म्हणे, ‘पुसुनि तुम्हां, मी गेलों, शंकरें दया केली, ।
बहु रुचती भक्तांची सत्कृति, अन्या नको तया केली. ॥१९९॥
झाले अभद्र, न भजुनि; अत्यंत भजोनि शंकरा बरवे, ।
जो प्रभु म्हणतो, ‘रंका ! हो रवि. होऊनि रंका, राब रवे !’ ॥२००॥
दर्शनहर्षें भुललों, सर्वज्ञ मनोरथा परि समजला, ।
प्रभु गौरविता झाला, देऊनि वर शिखिरथापरिस मजला.” ॥२०१॥
केल्या प्रमुदितह्रदया, सांगुनि परम प्रिय, प्रिया अजितें; ।
अजि तें सुयश कविजना गाया सप्रेम आपणा सजितें. ॥२०२॥
भूसुर सर्व सुखविले नमनें, स्तवनें, सभाजनें, दानें; ।
कोठें दु:ख नुरविलें, इष्ट पुरविलें स्वकीर्तिच्या गानें. ॥२०३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP