उत्तरार्ध - अध्याय ३४ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


क्रीडाप्रसक्त यादव असतां, दानव निकुंभ मायावी ।
भानुसुता भानुमती ने; खळहृदयांत कां क्षमा यावी ? ॥१॥
कीं वजनाभ याचा भ्राता, त्याची प्रभावती तनया ।
हरिली, तोही वधिला, प्रद्युम्नें, या स्मरे मनीं अनया. ॥२॥
होता छिद्र पहात द्वारवतीच्या वनांत दानव हा, ।
ज्याच्या त्रासें म्हणती सुर, मग कां न म्हणतील मानव ‘हा !’ ? ॥३॥
बहु आर्त नाद करिती अबला अंत:पुरांत भानूच्या, ।
द्राक्षा खातो, लंघुनि खर कटकालाहि रत्नसानूच्या. ॥४॥
वसुदेव, उग्रसेन, त्राणार्थ त्वरित धांवले, परि तो ।
नाहीं दिसला, गेला; मायाबळ खळ असेंचि बा ! करितो. ॥५॥
ते भानुमतीहरण प्रभुतें कथिती स्वयेंचि भेटोन, ।
सार्जुन गरुडीं बैसे, क्रोधें भगवान् मुकुद पेटोन. ॥६॥
चढुनि रथीं, ‘मागुनि ये,’ प्रद्युम्नातें असें स्वयें सांगे; ।
गांठुनि वज्रपुरपथीं अरिस, म्हणे प्रभु, ‘मुली ! भिसी कां ? गे !’ ॥७॥
पाहुनि तिघांसि, झाला तो आपणही त्रिधा गदापाणी; ।
वामकरीं कन्येतें धरुनि, गदेनें तिघांसही हाणी. ॥८॥
जरिहि समर्थ परवधी, वीरांच्या वीरराज नति घेते, ।
निर्दय हौनि, कन्येकरितां करिती प्रहार न तिघे ते. ॥९॥
वैतस्तिक बाणांहीं प्रद्युम्नजनार्दनार्जुन क्रोधें ।
ताडिति, कन्या रक्षुनि शिक्षेनें आणि युक्तिच्या शोधें. ॥१०॥
भानुमतीसह हौनि गुप्त निकुंभ त्रिदेह चोर, पळे; ।
जाणों तों गज त्यांच्या सायकदावानळांत होरपळे. ॥११॥
परि लागलेचि त्याच्या कृष्णार्जुन काम वीर हे मागें; ।
वज्रापुढें धरावा प्रबळेंही काय धीर हेमागें  ? ॥१२॥
गांठुनि समीप येतां शीघ्र तिघे वीरराज मारीत; ।
झाला पक्षी सहसा तो मायावी निकुभ हारीत. ॥१३॥
हाणी वैतस्तिक खरतर शर नरराय गाढकायाला ? ।
कन्या महौषधि करीं, शस्त्राचा काय गा ! ढका याला ? ॥१४॥
सप्तद्वीपा पृथ्वी श्रीकृष्णानुगत तो अरि भ्रमला, ।
गमला वातमनोगति, बहुबळ परि धांवतां बहु श्रमला. ॥१५॥
उत्तरगोकर्ण महागिरितें तो दुष्ट लंघितां पडला, ।
त्रिजगदलंघ्यप्रभुपदलंघनपरमापराध त्या घडला. ॥१६॥
असुर, सुर, तपोधन, मुनि, ज्या परमेश्वरपदा सदा नमनें ।
करिति, तयातें लंघी; जें लंघावें नृपा ! कदा न मनें. ॥१७॥
पडतां, गोकर्णातें लंघुनि,तो देवसिंधुपुलिनींच, ।
प्रभुसुत सांवरुनि, म्हणे, “हो सावध, हा मरेल मुलि ! नीच.” ॥१८॥
मूर्च्छा जाय, उठे, तो कृष्णशरार्दित निकुंभ, मग नातें ।
लावी मित्रपणाचें पवनासी, आक्रमूनि गगनातें. ॥१९॥
जाय यमदिशेसि, तयामागें केशव सपार्थ तो लागे; ।
वनदिग्देवी म्हणती, “राहुसवें हा अपार्थ तोला, गे !” ॥२०॥
अरि षट्‌पुरांत गेला, सार्जुन हरि राहिला बिलद्वारीं, ।
ज्याचा प्रताप पूजित साधूंच्या वरसभामिलद्वारीं. ॥२१॥
प्रभु पुत्रासि म्हणे, “ये सत्वर, नेवुनि पुरासि मुलगीतें.” ।
केलें क्षणांत तेंचि प्रद्युम्नें सर्व वृष्णिकुलगीतें. ॥२२॥
तन्नियति गुहेसि म्हणे, “हा असुर कशास, गे ! सखि ! लपाला ? ।
वांचेल कसा गरुडा वंचुनि अहि ? तेंवि या अखिलपाला. ॥२३॥
प्रभु, पार्थ, प्रद्युम्न द्वारीं असतांहि, धरुनि आवांका, ।
असुर बिळांतून निघे, म्हणता देवांसि, “करूनि ‘आ’ वांका.” ॥२४॥
निघतां बिळांतुनि, तया, पसरुनि शरजाळ, पार्थ कवि रोधी. ।
हाणी गदा नरशिरीं, व्हाया निजबाहुसार्थक, विरोधी. ॥२५॥
बहुकंटका परगदा बसतांचि शिरीं धनंजय भ्रमला; ।
श्रमला, गमला मृतसा, कृतसाहस रक्त भडभडा वमला; ॥२६॥
प्रद्युम्नशिरींहि गदा घाली, चुकवूनि द्दष्टिला, दुष्ट; ।
हाही सूर्च्छित होतां, झाला चित्तांत पाप तो तुष्ट. ॥२७॥
पुत्रहि सखाहि, मूर्च्छित पाहूनि, गदा गदाधरें धरिली, ।
परि लीला हे, प्रभुनें संकल्पें सृष्टि निर्मिली, हरिली. ॥२८॥
आला समर पहाया, निज गजराजीं चढोनि पाकारी, ।
गर्जे; प्रभुतें जाणों निववाया देवद्दष्टि हाकारी. ॥२९॥
जेंवि महापुरुष धरी, तेविं अरिवधा महासुर गदेतें, ।
दे भय इतरां, गांठुति मूषकपति, मूषकां उरग दे तें. ॥३०॥
मंडळगति हरि, अरिही, गर्जे, गरगर गदा यदा फिरवी, ।
हरिहि, अरिहि, गज वाटे, परि गज तो, जो सदा मदा मिरवी. ॥३१॥
असुरेश, सुरेश करिति पुष्पवतीकारणें महायुद्ध; ।
वृष्भ जसे, द्विरद जसे, कीं शालावृक जसे, तसे क्रुद्ध. ॥३२॥
जो हरि सदरि समरपटु, ताडी तो अरिस हरि सदाधार, ।
ज्याच्या अहितवधूंच्या डोळ्याला लागली सदा धार. ॥३३॥
साहुनि अरिप्रहार, स्वगदेनें अरिस मस्तकीं ताडी, ।
पाडी, आपणहि पडे, पतनें सुरधृति दिगंतरीं धाडी. ॥३४॥
वैकुंठांगुष्ठोदरगत बहु शिव सुरसहाय हा यव दे. ।
तत्पातें जग, जैसें गळतां करसुरस, ‘हाय हाय’ वदे. ॥३५॥
देखति बहु प्रपंचीं सर्वत्र अनित्यवस्तुचा लोक, ।
त्यां जाणों प्रभु दावी अत्यद्भुत नित्यवस्तुचा शोक. ॥३६॥
जें गगननदीजीवन बहु शीत, सुगंध, अमृततमिश्र करी, ।
सिंची शक्र  प्रभुवरि, तें तत्क्षण सर्व मोहताप हरी. ॥३७॥
प्राप्तप्राण हरि उठे, चक्र उगारुनि म्हणे, “अरे ! घे रे ! ।
संसारींचे चुकविल षडरातींचेहि हें अरे ! घेरे.” ॥३८॥
ऐस देव वदे, तों अतिमायावी निकुंभ, देहातें ।
सोडुनि, उडे, पळे, खळ, सोडी, जन जेंवि दीप्तगेहातें. ॥३९॥
श्रीव्यास म्हणे, “आलें कपट खळाचें न केशवध्यानीं” ।
केलें असेंहि जरि, परिहरिलें प्रभुयश न लेश वध्यांनीं ॥४०॥
देव म्हणे, “उठल्यावरि वधिन, उचित हा असा वधा नाहीं; ।
कीं वीर व्रत रक्षी, बुडतें वधिल्या असावधांनाही.” ॥४१॥
तों सावधान हौनि, पार्थ, प्रद्युम्न, पातले जवळ; ।
अरि वधुनि, मेळवाया यश शशधररश्मिहूनि जें धवळ. ॥४२॥
मायावी काम मनीं समजे, प्रभुला म्हणे, “अहो ! तात ! ।
येथें निकुंभ नाहीं; अतिकपटी हत सुखें न होतात.” ॥४३॥
ऐसें प्रद्युम्न वदे, तों होय अद्दश्य परकळेवर तें; ।
मायाबळ योगबळाहुनि नीच, पळार्ध पर कळे वरतें. ॥४४॥
करिती यदुकुरुकुळवर कृष्ण, न पाहुनि कळेवरा, हास्य; ।
हें कुतुक ध्यातृजना, अधिक तयाहुनि कळे वराहास्य. ॥४५॥
नरनारायण हांसति, वंचन करितां, धरूनि रागा, जों; ।
तों लागले निकुंभ व्योमीं बहु शतसहस्र बा ! गाजों. ॥४६॥
अयुतसहस्रें भूवरि, गगनीं भरले निकुंभ, किति हरितें, ।
किति कामातें वेष्टिति, किति विजयातें, विचित्र करि अरि तें. ॥४७॥
किति पार्थाच्या धनुतें, किति झोंबति ते निकुंभ भात्यांतें, ।
किति भुज, किति चरण, चरण, धरिति, संख्या, भीतिहि,नसेचि बा ! त्यांतें. ॥४८॥
यापरि धरुनि धनंजय, गगनीं नेला, नृपा ! असी मोटी ।
माया केली; दिसती ते कोटि निकुंभ, पार्थही कोटी. ॥४९॥
अंत निकुंभांसि नसे, गगनीं, पार्थांसही नसे अंत; ।
ऐसें मायाकौतुक असुरांचें अतुळ वर्णिती संत. ॥५०॥
दिव्य ज्ञानें कृष्णें, प्रद्युम्नें, मुख्य शत्रु लक्षून, ।
केले द्विधा शरांहीं सर्वहि ते, मूळ पार्थ रक्षून. ॥५१॥
कपटनिकुंभ च्छेदुनि बाणांहीं, मुख्य मारिला चक्रें, ।
सोडविला पार्थ, जसा प्रभुनें गजराज पीडिला नक्रें.॥५२॥
गगनांतुनि पार्थ पडे, पडतां होताचि निश्चयें चूर्ण, ।
प्रद्युम्न प्रभुवचनें त्यातें परि सांवरूनि घे तूर्ण. ॥५३॥
सन्मुनि करिती, “जय, जय, पाहि, नसस्ते,” अशासह स्तवन, ।
स्वर्द्रूचें, गंगेचें, जोडी ज्याच्या यशास हस्त वन. ॥५४॥
सुर कुसुमवृष्टि करिती, वाद्यें विविधें उदंड वाजविती, ।
गाजविती सर्व दिशा जयजयकारें, घनासि लाजविती. ॥५५॥
पार्थातें सांत्वुनियां, गरुडीं वाहुनि, सकाम वनमाळी ।
गेला, पुर सुखवाया धावुनि, जैसें स्वकीय वन माळी. ॥५६॥
द्वारवतींतहि होता, देता भवसिंधुपारदान मुनी; ।
त्या परमप्रियभक्ता पूजी श्रीकृष्ण नारदा नमुनी. ॥५७॥
भानुमतीजनकातें विधिज म्हणे, “स्ववश जग न भानो ! हें, ।
क्षणभरिही आश्रय तूं या दैन्या मोहखगनभा नोहें. ॥५८॥
दुर्वासा दुर्ललितें भानुमतीच्या धरी मनीं ताप, ।
“जाइल हे शत्रुकरीं,” ऐसा दे रेवत्ती इला शाप. ॥५९॥
तो मुनि, मुनिजनसह म्यां स्तवुनि, विनविला, ‘असा कुलीनांहीं ।
न करावा कोप, मुने ! काय चुकत लाडक्या मुली नाहीं ? ॥६०॥
दे कन्येसि अभय, बा ! भरितोचि तुझा अनुग्रह रित्यातें, ।
आम्ही तुज विनवितसों; निजबाळक जें, अनुग्र हरि त्यातें.’ ॥६१॥
द्रवला मुनिवर, वदला, ‘शत्रु करीं सांपडेल, परि कन्या ।
दूषण पावेल न हे, वाहेल, सुगंध सर्वदा धन्या. ॥६२॥
सुभगा पुत्रवती हे होइल, वांछिति जसा मुली नवरा, ।
पावेल, वाढवाया लोकांत यशा, तशा कुलीन वरा.’ ॥६३॥
देता झाला भगवान् दुर्वासा प्रार्थिला तर दहांनीं, ।
न करितिच, पाय धरितां, करितां विज्ञापना, वरद हानी. ॥६४॥
म्हणुनि सुता शत्रुकरीं गेली, केली यदूत्तमें मुक्ता.” ।
युक्ता सहदेवा हे द्यावी, हंसा खगा जसी मुक्ता.” ॥६५॥
या श्रीनारदवचनें हा अर्थ युधिष्ठिरासि जाणविला, ।
प्राणविलासी साक्षात्  कृष्णेचा केशवेंचि आणविला. ॥६६॥
माद्रेयासि दिली ती, विधिवत् पूजूनि, भानुनें कन्या. ।
या प्रभुविजयश्रवणें विजय मिळे अस्तिका जना धन्या. ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP