उत्तरार्ध - अध्याय ३१ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


जाणुनि गति राजांची, भ्याले बहु असुर, सर्व मग मोहें, ।
ते लागले पळाया ! भंगीं आश्चर्य किमपि न गमो हें. ॥१॥
त्यांसि निकुंभ म्हणे, “रे ! धरितां अपकीर्तिहेतु कां चाल ? ।
परम अधर्म पलायन, यमपाशीं सांपडोन कांचाल. ॥२॥
किति दिन, अयशें पावुनि ताप म्हणत ‘हाय ! हाय !’, वांचाल ? ।
परमाधर्में नरकीं, विष्ठेंत किडे तसेच, सांचाल. ॥३॥
विजयें येथें शर्म, स्वर्गीं मरणें यथेष्ट भोगाल; ।
गेहीं स्त्रीचे सुस्मितविकसित देखाल काय हो ! गाल ?” ॥४॥
धिक्कारिले निकुंभे असुर परतले करून येकोपा, ।
ते द्विगुण वेग करिती, कीं निजधर्में करूं नये कोपा. ॥५॥
सत्रीं दानव साग्रज सानुज ने पार्थ हा तदा विलया, ।
कृष्णसखा काय रणीं असुरांचा सार्थ हात दाविल या ? ॥६॥
गगनीं शिरतां मारित असुरभटांतें जयंत सप्रवर, ।
प्रसरुनि सर्वत्र, परा भिववी सर्वत्र, जेविं सप्रवर, ॥७॥
असुरांच्या रक्तांची उग्र नदी त्या रणांत वाहविली, ।
भूकरवीं निजभारापगमानंदेंचि चिळस साहविली. ॥८॥
सर्व स्वसहाय असुर मरतांचि, निकुंभ तो नभीं उसळे, ।
ज्याच्या शरा पर, जसे क्षुधिता हिरवेहि हरभरे उसळे. ॥९॥
मारी प्रवर, जयंतहि, शरततिची तच्छिरांत चडकण गा ! ।
घे काढुनि तेज गमे, आपणचि म्हणेल काय ‘चड’ कणगा ? ॥१०॥
सुखवाया परलोकीं स्वसहायस्वजनचित्त अरिघातें, ।
हाणी प्रवरोरावरि तो असुरोत्तम निकुंभ परिघातें. ॥११॥
प्रवर पडे क्षितिवरि, तों कवळी त्यातें जयंत बाहूंनीं, ।
सप्राणातें सोडी, ताडी खङ्गें अरीस बाहूनी. ॥१२॥
हाणी निकुंभ परिघें, स्वस्ति रची देवराज तनयाला; ।
नारद म्हणे, “करीं बा ! तूंचि शचीदेवरा ! जतन याला.” ॥१३॥
स्तुति वरि परिघा बरवी, परि घाबरवी न तो शचीतनया, ।
आला जो अमरींच्या उष्णें नयनोदकें रचीत नया. ॥१४॥
विक्षत होय अरि, म्हणे, ‘श्रमवूं येथें स्वबाहु, तरि त्यातें ।
वधिन कसा मी समरीं या परिघें ज्ञातिघात करित्यातें ? ॥१५॥
हौनि गुप्त सटकला, गेला, जेथें सराम अरिहोता; ।
धन्य खळहि ते, ज्यांच्या द्दष्टिस सद्‌ध्येय पडत हरि होता. ॥१६॥
तो ऐरावतानागीं चढुनि सहामर, पहावया समरा ।
आला, म्हणे, “असुरहो ! या स्वर्गीं चिर रहावयास, मरा.” ॥१७॥
पोटासीं पुत्रातें धरि, भेटे कडकडोन सखयातें, ।
सन्मित्रप्रेमविपुळ, द्दष्टांतीं योग्य शून्य न ख या तें. ॥१८॥
जयवंत जयंत रणीं झाला,शक्रासही महानंद. ।
पुत्रप्रेम बहु,’ म्हणति कवि, ‘करि विजयीं व्रजीं महा नंद.’ ॥१९॥
शक्राच्या आज्ञेनें सुरदुंदुभि वाजले, मग नगांनीं ।
मंडित, तसे स्तवांनीं, भरिती गंधर्वही गगन गानीं. ॥२०॥
सत्रसमीपचि देखे प्रियसखफाल्गुनसमेत अजितातें, ।
प्रभुवरि धांवे; व्यावा पुत्र असाचि प्रवीर अजि ! तातें, ॥२१॥
देवर्षिप्रमुख महायोगी कंदुकसमा उसळल्याला ।
वदले, “निकुंभ मरतो, कीं प्रभुसंमुखचि तो मुसळ ल्याला.” ॥२२॥
शिखरच्युत उपलतसा दानव जगदीश्वराउपरि घसरे, ।
तेव्हां बरीक मागें, गरुडीं हाणोनि तो सुपरिघ, सरे. ॥२३॥
ताडी रामा, कृष्णा, सात्यकितें आणि धर्मराजातें, ।
भीमकिरीटियमातें; तैसेंचि अचाट कर्म राजा ! तें. ॥२४॥
न दिसे, करी प्रहार प्रद्युम्नातेंहि काय सांगावें ? ।
प्रभुहत म्हणुनि, अशांतें, देवनदींतील वायसां, गावें, ॥२५॥
सर्वहि सांपड्ले त्या दैत्यवराच्या महोग्रपरिघातें, ।
न, ‘रिघा’, तें कर्म म्हणे, शोकीं कोणाचियाहि परि घातें. ॥२६॥
बिल्वोदकेश्वरदयेप्रति म्हणती, “वाळतात नदि ! सेतें; ।
हें बाळां व्याघ्रवनीं वीर सकरवाळ तातन दिसे तें.” ॥२७॥
सांबीं प्रहार परिघें, वसुदेवींही, तदा करी राया ! ।
कोणी न देखती बा ! शस्त्रपटुहि, ताडिर्ता, शरीरा या. ॥२८॥
बिल्वोदकेश्वरातें लागे प्रार्थूनि केशव घ्याया, ।
देखाया मायेचें सामर्थ्य नुरोनि लेश वध्या या. ॥२९॥
श्रीशंकर प्रसादें कृष्णा, इतराहि, तो जना दिसला. ।
हें किति ? काढी प्रभुचें ध्यान मनींच्या तमा अनादि सला. ॥३०॥
दिसतां निकुंभ, त्याच्या परिघीं, देहीं, शिताश्व शर हाणी; ।
कुंठित होवुनि पडले; न करिति अरिची, जरीहि खर, हाणी, ॥३१॥
अर्जुन कृष्णासि पुसे, “मद्बाणांहीं महाद्रि फोडावा, ।
मग हा कसा महास्त्रप्रखरांहीं संगरांत सोडावा ?” ॥३२॥
प्रभु सांगे, “लक्ष समा, जाउनि उत्तरकुरूंत, हा तपला, ।
झाला प्रसन्न ईश्वर, कीं यमनियमांसि सर्वदा जपला. ॥३३॥
रूपें तीन वरी हा, जीं अत्युगें सुरासुरावध्यें, ।
रक्षी द्वार श्रीशिव, या असुराला दिल्या वरांमध्यें. ॥३४॥
श्रीशंभु म्हणे, ‘माझें, विप्राचें, कीं महासुरा ! हरिचें ।
अप्रिय परि जरि करिसिल, जाळिल तुज तेज विष्णुच्या अरिचें, ॥३५॥
ब्रम्हाण्य मी हर, हरि; ब्राम्हाण आम्हांसि आश्रय व्यक्त, ।
भक्त ब्रम्हाकुळाचा निर्भय, जो धर्मनयपथासक्त.’ ॥३६॥
देहत्रयांत एकें दितिची सेवा सुरारि हा कंरितो; ।
आम्हांवरि द्वितीयें देहें सांप्रत महायुधें धरितो; ॥३७॥
भानुमतीच्या हरणीं म्यां याचा देह नाशिला तिसरा, ।
ऐसा अवध्य देवासुरशस्त्रास्त्रांचिया महाविसरा.” ॥३८॥
देव म्हणे, “तुज कथिली वरदानकथा सुरारिची थोडी, ।
युद्धप्रसंग हा, बा ! वरवीररसींच तूं धरीं गोडी.” ॥३९॥
षट्‌पुरगुहेंत अर्जुन, वाजाया देवमुरज, शिरला, हो ! ।
मागुनि तोहि, विधि म्हणे ज्याचें पदपद्मसुरज ‘शिर लाहो.’ ॥४०॥
चंद्रार्कद्युतिहीना, निजतेजेंचि प्रकाशिता, मोटी, ।
षट्‌पुरगुहाविचित्रा, दैत्यांच्या जींत नांदती कोटी. ॥४१॥
जीमाजि उष्ण, शीत, स्पष्ट स्वेच्छानुरूप, बा ! राया ! ।
वारा या सुगुहेंत क्षम समयीं सर्व ताप वाराया. ॥४२॥
शिरला अशा गुहेंत प्रद्युम्नप्रमुख सर्वही योध, ।
शोध करुनि, सोडविले यादव, केला जयां खळें रोध. ॥४३॥
प्रभु समर निकुंभासीं करितां, सांगे सुतासि, कीं, ‘तोडा ।
वृष्णिभटांचें मायाबंधन, ते नृपहि बांधिले सोडा.’ ॥४४॥
बा ! जे प्रद्युम्नानें प्रभुवचनेंकरुनि सोडिले राजे, ।
लाजे मुख दावाया सर्वहि, न तयांत एकही सजे. ॥४५॥
हाणी परिघें शुद्धीं युद्धीं तो, बहु खिजोनि, घोर तया, ।
शरणागतां म्हणे जो, “स्वस्थ विमानीं निजोनि घोरत या.” ॥४६॥
प्रभुहि गदेचा बसवी. घोरचि घोरासुरासि फटकारा, ।
पाहे वाट कराया काळप्रभुची जयासि गट कारा. ॥४७॥
परपरिघाभिहत अजित, अजितगदाभिहत परहि तो पडला, ।
न घडावा, तोचि पहा स्वयश:प्रेमें प्रकार हा घडला. ॥४८॥
पांडव ‘हा ! हा !’ वदले, कीं ते शिशु, देवदेव हे माता, ।
यादव ‘हा ! हा !’ वदले, कीं ते झष, कृष्ण तोय, गा ! ताता ! ॥४९॥
मुनिवर कृष्णहितार्थ श्रुतिजप करिति, स्तुतीहि सुक्तांनीं, ।
प्रत्यागतासु झाला प्रभु, यश हें मानिजेल मुक्तांनीं. ॥५०॥
उठला उपेंद्र आधीं, मग तोहि निकुंभ, पुनरपि कवी ते ।
युद्धीं प्रकार दाविति नव, सुहृदां जेंवि सुनर पिकवीते. ॥५१॥
वृषभतसे, द्विरदतसे, कीं शालावृकतसेहि, ते क्रुद्ध ।
युद्ध करिति, सत्कविंनीं गावें यश हें सदा महाशुद्ध. ॥५२॥
अत्यद्भुत हें, साहे, हाणीही, ब्रम्हा जें, तडाखा तें; ।
प्रभुरक्षित नसतें. तरि वाटे ब्रम्हांड ही तडा खातें. ॥५३॥
विष्णुसहि ईश्वराची लेशहि न वरोक्ति अन्यथा करवे, ।
अमृताचेचि प्रभुयश गावुनि नटनांत धन्य थाक रवे. ॥५४॥
यत्न न चाले, तेव्हां झाली अशरीरिणी असी वाणी; ।
‘कृष्णा ! देवब्राम्हणकंटक हा तूं सुदर्शनें हाणीं.’ ॥५५॥
बिल्वोदकेश्वरचि हें बोले, ‘यातें वधूनियां चक्रें, ।
धर्मयश विपुळ पावें. स्वमुखें वाखाणिजेल तुज शक्रें.’ ॥५६॥
बिल्वोदकेश्वरातें नमुनि, प्रभु चक्र तत्क्षणीं सोडी, ।
तोडी निकुंभमस्तक, गोडी यांतचि, सुधारसीं थोडी. ॥५७॥
असुरांच्या नाशानें झाला बिल्वोदकेश्वरा तोष, ।
फारचि आला होता विप्रात्यपमानमंतुनें रोष. ॥५८॥
सुर दुंदुभि वाजविती, देवावरि पुष्पवृष्टी शक्र करी, ।
हरि हरिच, सत्र तें सर, ते दैत्यब्रम्हादत्त नक्रकरी. ॥५९॥
मुनि सुप्रसन्न झाले, जग होय प्रमुदित, क्षमापाळा ! ।
प्रभु यादवांसि वांटी दैत्यांच्या रूपगुणवती बाळा. ॥६०॥
त्या क्षत्रियांसही दे कन्यारत्नेंहि देव, समजावी. ।
हे श्रुतिपथें कथारुनि हृदयीं, नाशावयासि तम, जावी. ॥६१॥
उत्तम वस्त्रें, रत्नें, सतुरग रथ षट्‌सहस्त्र, धर्मातें ।
दे, ब्रम्हादत्तविप्रा षट्‌पुर विभुगीतपुण्यकर्मातें. ॥६२॥
बिल्वोदकेश्वराच्या प्रीत्यर्थ प्रभु करी समाजातें, ।
शिववार्ता सुरभिसमा, इतरा वार्ता खरीसमा ज्यातें. ॥६३॥
मल्लक्रीडा, गानें, नृत्यें, बहु रम्य करविलीं वाद्ये, ।
दिधलीं महासमाजीं अन्नें, वस्त्रें, धनें, तयां आद्यें. ॥६४॥
सत्र समाप्त यथोक्त प्रभु करवी ब्रम्हादत्तविप्रकरें, ।
त्यातें मग नमुनि निघे, जो स्तविला नित्य सक्तविप्रकरें. ॥६५॥
केला धन्य प्रभुनें जन्मुनि वसुदेव देवकीसहित, ।
हें किति अद्भुत ? साधुनि सन्मुनिवसु देव दे बकीस हित. ॥६६॥
स्वजनसह मुकुंद धरुनि वासरस, द्वारकापुरा गेला, ।
वैकुंठ न तें म्हणतां, कानचि सद्वार कापु रागेला. ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP