पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक ७ ते १०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


लीना सुप्तौ वपुर्बोधे व्याप्नुयादानखाग्रगा ॥
चिच्छायोपेतधीर्नात्मा विज्ञानमयशब्दभाक् ॥७॥

बुद्धि होऊनी चिदायुक्त ॥ जागृती नखशिखांत व्यापत ॥
निद्रे माजीं तीच लय पावत ॥ या नांव विज्ञानमय ॥५२॥
हा ही कोश आत्मा नव्हे ॥ कां कीं जेथ लयादि अवस्था आहे ॥
आत्मा तैसा कधींच नोहे ॥ अवस्था रहित ॥५३॥
वादी - बुद्धि आणि दूजें मन ॥ हया दोंरूपीं एकचि अंत: करण ॥
मग तयाचेदोन कोश कल्पून ॥ कैसे बोलिला ॥५४॥

कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतांतरिंद्रियम् ॥
विज्ञानमनसी अंतर्बहिश्वैते परस्परम् ॥८॥

सि० - दोन्हीं रूपें एकचि अंत: करण ॥ परि एक असे कर्ता दुसरे कारण ॥
मग तयांचें एकीकरण ॥ कैसें व्हाबें ? ॥५५॥
म्हणोनी कोश दोन बोलिले ॥ अंतर्बहिर्भेदें जाहले ॥
कर्ता कारण म्हणियले ॥ बुद्धिमना ॥५६॥
अंतरीं राहता कर्ता जाण ॥ बाहेर येतांचि होतसें मन ॥
म्हणोनी दोन कोश कल्पून ॥ बोलियलों ॥५७॥

काचिदंतर्मुखा वृत्तिरानंदप्रतिबिंबभाक ॥
पुण्यभोगेभोगशांतो निद्रारूपेण लीयते ॥९॥
कदाचित्कत्वतोऽनात्मा स्यादानंदमयोऽप्ययम् ॥
बिंबभूतोय आनंद आत्माऽसौसर्वदास्थिते: ॥१०॥

पुण्य कर्माचें फळ भोगितां ॥ वृत्तीची हौनी अंतर्मुखता ॥
चिदानंद प्रतिबिंब पडतां ॥ सुख भोगी ॥५८॥
तोचि पुण्ययोग संपला ॥ निद्रारूपें जाती लयाला  ॥
ऐशा या वृत्ति कोशा म्हणितला ॥ आनंद मय ॥५९॥
तोही आत्मा नोहे जाण ॥ कां कीं जेथ अनित्यपण ॥
एवं हे पंचकोश उपेक्षून ॥ टाकियले ॥६०॥
इयापंचकोशाचे पैलीकडे ॥ जयाचें प्रतिबिंब बुद्धींत पडे ॥
आनंद नित्यपण कधीं ही न मोडे ॥ तोचि आत्मा ॥६१॥
इया लक्षण ॥ कोण करील विचक्षण ॥
परि श्रुती बोलियली खुण ॥ त्याग लक्षणें ॥६२॥
सूर्य कैसा आहे तैजस ॥ म्हणतां कोण दावावें वस्तूस ॥
तरी सकल वस्तु अप्रकाश ॥ होती जयापुढें ॥६३॥
हेम जैसें काम बोलणें ॥ तेंशींच आत्म्याचीं लक्षणें ॥
कोण वाखाणूं तो वाखाणे ॥ मौनावले वेद ॥६४॥
वेदें घेतलें मौन ॥ तेथ आम्ही काय हुटहुटून ॥
परि मुनि बोलियले म्हणोन ॥ बोलावें लागे ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP