रूपक अलंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या श्र्लोकांतील (दोन वाक्‍यांच्या) दोन कर्त्यांमधील अभेद शब्‍दानें सांगितलेला असला तरी, श्र्लोकांतील दोन क्रियांमधील अभेद शब्‍दाने सांगितलेला नाही. आणि ह्या दोन क्रियांच्या अशाब्‍द अभेदालाच निदर्शनेचा सगळा भार सहन करावा लागत आहे म्‍हणून, म्‍हणजे क्रियांच्या अशाब्‍द अभेदावर मुख्यतः निदर्शनेचा आधार असल्‍यानें, येथे निदर्शनाच आहे. तुम्‍ही म्‍हणाल की, ‘आमचा पूर्वीचा श्र्लोक निदर्शनालंकाराचें उदाहरण होत नसेल तर, तो निदर्शनेचें उदाहरण म्‍हणून अलंकार-सर्वस्‍वकारांनी अलंकार प्रकरणांत, कां दिला आहे?’’ यावर आमचे म्‍हणणें हें कीं, ‘‘(त्‍या) भ्रांतिष्‍टानेंच (अलंकार-सर्वस्‍वकारांनीच) तुम्‍हांला फसविलेले दिसते. आणि तुम्‍ही पडला प्रामाणिक; दुसर्‍यांनी न सांगितलेले तुम्‍ही कधीही सांगायचे नाही. आतां तुम्‍ही जे असे म्‍हटले आहे की, रूपकामध्ये बिंबप्रतिबिंबभाव असतच नाही;’’ ते सुद्धा तुमच्या (डोक्‍यांतील) भ्रांतीमुळेंच. कारण, अलंकारसर्वस्‍वावरील विमर्शिनी ह्या टिकेंत, बिंबप्रतिबिंबभावांनी युक्त असलेल्‍या रूपकाचें उदाहरण खालीलप्रमाणें दिलें आहेः-
‘‘मदनरूपी हत्तीच्या, मलिन अशा मदानें लिडबिडलेल्‍या कानांतला शंखच; अथवा पुष्‍कळशा काजळाचा काळा रंग लागल्‍यामुळें सुंदर दिसणारी, रतीच्या गालाखालची उशीच; अथवा भुंग्‍यांनीं ज्‍याच्या आंतील भाग झाकून टाकला आहे असा आकाशरूपी वृक्षाचा पुष्‍पगुच्छच, असे हें कलंकयुक्त व अमृतपूर्ण चंद्राचें बिंब पहा.’’
ह्या श्र्लोकांत, कलंक व हत्तीचा (काळा) मद ह्यांचा बिंब-प्रतिबिंबभाव आहे. शिवाय, लांच्छित व अंकित हे श्र्लोकांतील दोन शब्‍द, एकाच अर्थाचे असल्‍यामुळें, या ठिकाणी वस्‍तु-प्रतिवस्‍तु-भाव आहे, असें विमर्शिनीकारांनी म्‍हटलें आहे. हें असू दे; पण, ‘निर्दिष्‍ट’ म्‍हणजे शब्‍दांनी सांगितलेला विषय असें जें तुम्‍ही लक्षणांत म्‍हटले आहे, त्‍यावर आम्‍ही विचारतो कीं, शब्‍दांनी सांगितलेला विषय म्‍हणजे कोणत्‍याही शब्‍दांनीं सांगितलेला विषय, असा अर्थ,  कां उपभेयाच्या अवच्छेदक-धर्मरूपानें सांगितलेला, हा (तुमचा) अर्थ ? तुमचा पहिला अर्थ असेल तर, ‘सुंदर कमलं भाति लतायमिदमद्‌भुतम्‌’ (लतेवर, अद्‌भुत असें हें सुंदर कमल शोभत आहे.) ह्या वाक्‍यांत होणार्‍या अतिशयोक्तींत, तुमचें रूपकाचें हें लक्षण जाऊं लागेल. (म्‍हणजे यांतील अतिशयोक्तीला तुम्‍हांला रूपक म्‍हणावें लागेल.)
कारण कीं, सुंदर ह्या शब्‍दामध्यें असलेल्‍या सुंदरत्‍व ह्या धर्माच्या रूपानें, आणि इदं ह्या शब्‍दानें, अतिशयोक्तीच्या वाक्‍यांत, विषयाचा निर्देश झालेला आहे.  तुम्‍ही म्‍हणाल कीं, ‘सुंदरत्‍व ह्या धर्माचा, विषयी जें कमल त्‍याच्याशीच अन्वय होतो, वदनरूप विषयाशी (सुंदरत्‍वाचा) अन्वय होत नाहीं.’ पण, तसें म्‍हणूं नका. कारण, कमल ह्या शब्‍दानें कमलाशीं तद्रूप असलेल्‍या मुखाचाच लक्षणेनें बोध होत असल्‍यानें, सुंदरत्‍व वगैरे पदार्थांचा त्‍या मुखाशीच अन्वय करणें योग्‍य होईल. कमल याचा कमलदृश हा लक्ष्यार्थ होत असल्‍यानें, मुखाचें विशेषण होणार्‍या त्‍या कमळाशीं सुंदरत्‍व या पदार्थाचा अन्वय करणें योग्‍य होणार नाहीं. यावर तुम्‍ही म्‍हणाल-‘आमच्या लक्षणवाक्‍याचा अर्थ हा कीं, कोणत्‍याही रूपानें सांगितलेला (तादृश) विषय हा उद्देश्य, व विषयीचें (विषयाशीं) ताद्रूप्य हें त्‍यांतील विधेय असें जेथे असेल तें रूपक. ह्या दृष्‍टीनें पाहता, वरील अतिशयोक्तीच्या वाक्‍यांत सुंदरत्‍व ह्या विशिष्‍ट धर्मानें युक्त अशा उद्देश्याला उद्देशून कमलताद्रूप्याचें विधान नसल्‍यामुळें, आमचें रूपकाचें लक्षण अतिशयोक्तींत जाण्याचा प्रसंगच नाही.’ पण तुमचें हें म्‍हणणें बरोबर नाही. कारण कीं, मग ‘मुखचंद्रस्‍तु सुंदरः’ इत्‍यादि रूपकवाक्‍यांतील विषय व विषयीं हे दोन्हीही समासामध्यें असल्‍यानें त्‍या दोघांना स्‍वतंत्र (पृथक्‌) विभक्ति नाही. अर्थात्‌ त्‍या दोहोंत उद्देश-विधेय-भाव नाहीं, आणि म्‍हणूनच तुमच्या रूपकाच्या लक्षणांत, ह्या वाक्‍यांतील रूपकाचा समावेश करतां येणार नाही. (म्‍हणजे तुमच्या लक्षणांत अव्याक्ति-दोष होऊं लागेल.) आतां दुसरा पक्ष घेऊन, उपमेयाच्या अवच्छेदक-धर्मानें युक्‍त उपमेय (म्‍ह० विषय)
जेथे सांगितला असेल तथें रूपक होतें;’ असा लक्षणांतील ‘निर्दिष्‍ट’या शब्‍दाचा अर्थ तुम्‍ही घेत असाल तर, अनिह्नुते हें तुमच्या लक्षणांतील विशेषण निरर्थक होईल. कारण, अपह्नुति अलंकारांत, उपमेयाचा, अवच्छेदक धर्मानें युक्त अशा धर्मीरूपानेंच निषेध होत असल्‍यामुळें, उपमेयतावछिन्नरूपानें विषयाचा निर्देश असतच नाही. मग अपह्नुतीमध्यें, तुमचें लक्षण जाण्याचा प्रसंग कोठून येणार? शिवाय, तुमच्या लक्षणाच्या तुम्‍ही केलेल्‍या विवेचनांत निश्र्चय ह्या शब्‍दाला तुम्‍ही आहार्य हे जें विशेषण लावलें आहे, तेंही निरर्थक आहे. कारण भ्रांतिमान्‌ अलंकारांत, भ्रांति या विशिष्‍ट दोषानें उपमेयाचा संपूर्णपणें प्रतिबंध झाल्‍यामुळें, उपमेयाच्या विशिष्‍ट धर्माचा स्‍पर्शसुद्धां भ्रांतिमान्‌ अलंकारांत नसतो; अर्थात्‌, भ्रांतिदोषानेंच उपमेयतावच्छेदकाचा निरास होत असल्‍यानें तुमच्या विवेचनांतील आहार्य ह्या, निश्र्चयाला लावलेल्‍या विशेषणाचा कांहीही उपयोग नाही. आणि तुम्‍ही जें ‘निर्दिष्‍ट’ हे विशेषण लक्षणांत घातलें आहे, त्‍यामुळें, तुम्‍ही कुलवयानंदांत सांगितलेल्‍या ‘नायं सुधांशुः कीं तर्हि सुधांशुः प्रेयसी-मुखं.’ (हा चंद्र नव्हे, तर मग चंद्र कोणता? तर, प्रेयसीचें मुख हाच चंद्र.) ह्या अपह्नुतींत, तुमच्या लक्षणाची अतिव्याप्ति होण्याचा प्रसंग येईल. कारण कीं, या श्र्लोकार्धात चंद्राच्या ठिकाणी जरी चंद्रत्‍वाचा अपह्‌नव केला असला तरी, आरोपाचा विषय जें प्रेयसीमुख त्‍याचा मात्र मुखत्‍व ह्या रूपानें अपह्‌नव झालेला नाही. ‘पण हें रूपकच आहे’ असें म्‍हणाल तर, तसें ही तुम्‍हांला म्‍हणता येणार नाहीं. कारण मग, तुमच्याच बोलण्याशीं तुमचा विरोध येण्याचा प्रसंग येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP