उपमालंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां या उपमालंकाराचें उदाहरण देतों-
“ एकीकडून वडील मंडळींची भीति; आणि दुसरीकडून मला बघणें ( बघण्याची उत्सुकता ), ह्या दोहोंमध्यें ( सांपडल्यामुळें ) ( जिचा ) फार गोंधळ उडाला आहे अशा त्या हरिणाक्षीच्या, किंचित्‍ उमलणार्‍या कमळाप्रमाणें सुंदर डोळ्यांचा, हायरे ( मला ) मुळींच विसर पडत नाहीं. ”
ह्या ठिकाणीं, उमलणार्‍या कमळाचा वाचक ‘ दलदरविन्द ’ हा शब्द, उपमान ( हा अर्थ ) दाखविणारा असून, त्याचा सौंदर्य, ह्या समानधर्मवाचक शब्दाशीं समास झाला आहे? ; व त्यामुळें प्रतीत होणारी ( लुप्ता ) उपमा ही, ह्या श्लोकाचा संपूर्ण ( प्रधान ) वाक्यार्थ जो विप्रलम्भ-शृंगार, त्याला उपकारक असणार्‍या स्मृतिभावाला मदत करते, व त्या स्मृतीच्या द्वारा, येथें ( प्रधान असलेल्या ) विप्रलम्भशृंगाराला उपकारक होते ( शोभविते ), म्हणून ती अलंकार आहे. “ ह्या ठिकाणीं स्मृति ( हा व्यभिचारी भाव ) प्रधान असल्यामुळें व्यंग्य आहे ” असें म्हणतां येणार नाहीं; कारण ( ह्या श्लोकांतील ) ‘ मी विसरत नाहीं, ‘ ह्या शब्दांनीं, स्मृतीच्या अभावाचा निषेध करून, त्याद्बारां ( येथील ) स्मृति हा भाव शब्दानें स्पष्टपणें सांगितला आहे. तसेंच, ‘ ( श्लोकाच्या ) पूर्वाधात आलेल्या त्रास व औत्सुक्य ह्या परस्परांवर चढाई करूं पाहणार्‍या दोन ( व्यभिचारी ) भावांचा संधि ’ या ठिकाणीं प्रधान आहे ’ असेंही म्हणतां येणार नाहीं; कारण तो भावसंधि नायिकेशीं संबद्ध असल्यानें ( तिच्याप्रमाणें ) तो अनुवाद्य ( म्ह० उद्देश ) कोटींत येतो; आणि शिवाय तो ( भावसंधि श्लोकाच्या उत्तरार्धांत आलेल्या स्मृतिभावाचें अंग आहे; म्हणून, भावसंधि व उपमालंकार ह्या दोहोंनीं ( येथें ) स्मृति हा भाव उपस्कृत झाला आहे; आणि तो स्मृतिभाव व ‘ हा ’ ( हायरे ! ) ह्या शब्दानें सूचित होणारा संताप हा अनुभाव-हीं दोघें ( म्ह० स्मृति हा व्यभिचारी भाव व संताप हा अनुभाव ) विप्रलंभशृंगारालाच उपकारक होतात; आणि म्हणूनच येथें त्याचें ( म्ह० विप्रलंभ शृंगाराचें ) प्राधान्य आहे. पण, अप्पय्य दीक्षितांनीं चित्रमीमांसा ( नांवाच्या आपल्या ) ग्रंथांत उपमेचीं दोन लक्षणें दिलीं आहेत, तीं अशीं-
(१) उपमिति-क्तियेला ( म्ह० दोन वस्तूंची तुलना करण्याच्या क्तियेला )  सिद्ध करणारें, दोषरहित व व्यंग्य नसलेलें असें जें सादृश्याचें वर्णन, त्याला उपमालंकार म्हणावें. अथवा
(२) स्वत:च्या निषेधांत ज्याचा शेवट होत नाहीं असें, दोषरहित व व्यंग्य नसलेलें सादृश्याचें वर्णन, त्याला उपमालंकार म्हणावें.हीं दोन्हींही लक्षणें चुकीचीं आहेत. कारण, विलक्षण ( म्ह० चमत्कारकारी ) शब्द हें ज्याचें स्वरूप, अथवा विलक्षण ज्ञान हें ज्याचें स्वरूप, तें वर्णन, ( स्वत: ) शब्दांनीं कधींही वाच्य होत नसल्यानें, त्याला ( वाच्य ) अर्थालंकार म्हणतां येणार नाही. आणि शिवाय तें सादृश्यवर्णन ( स्वभाव-त:च ) व्यंग्यरहित असल्यानें त्याला अव्यंग्य हें विशेषण लावणेंही व्यर्थ आहे. आतां, ‘ वर्णनाला विषय होणारें अदुष्ट व अव्यंग्य असें जें सादृश्य, ती उपमा ’ असें म्हणाल तर, ‘ जसा बैल तसा ( हा ) गवा ( आहे ) ’ ह्या वाक्यांत, उपमालंकार आहे असें म्हणण्याची पाळी येईल. त्याच-प्रमाणें, ‘ काल व उपसर्जन ह्यांच्या बाबतींतही हें ( अशिष्यत्व ) सारखेंच ( समजावें )’- ह्या ठिकाणींही असेंच; ( म्ह० ह्या वाक्यांतही उपमालंकार आहे असें मानण्याची पाळी येईल. ) कारण अशिष्यत्व वगैरे साधारण धर्म येथेंही असल्यानें त्याच्या योगानें, प्रधानप्रत्ययार्थ ह्या ( उपमाना ) चें
( काल व उपसर्जन ह्या उपमेयांशीं होणारें ) सादृश्य येथेंही ( म्ह० या सूत्रांतही ) सांगितलें आहे. “ येथें ( ह्या सूत्रांत ) वचन भिन्न असण्याचा दोष असल्यानें, ( आमच्या उपमालक्षणातील ) अदुष्ट या विशेषणानें ( यांत होणार्‍या ) उपमेला टाळतां येईल, ” असेंही तुम्हांला ( म्ह० अप्पयदीक्षितांना ) म्हणतां येणार नाहीं. कारण प्रस्तुत ( सूत्र-) वाक्या-हून निराळ्या अशा दुसर्‍या एखाद्या वाक्यांत, ( सूत्रांतील दोन उपमेयांच्या ऐवजीं ) एकच उपमेय केलें तर, त्याच्याशीं ( प्रधानप्रत्ययार्थ या उपमानाच्या ) असल्येल्या सादृश्याला उपमालंकार मानण्याचा प्रसंग येईल. यावर तुम्ही म्हणाल, “ या ठिकाणी तुलनेची क्तिया सिद्ध झाली असली तरी येथें सादृश्याचें वर्णन ( मात्र ) नाहीं; कारण येथील सादृश्याचा विषय चमत्कार-कारी नाहीं; आणि कवीच्या व्यापाराचा विषय चमत्कार उत्पन्न करणारा असणें, यालाच वर्णन म्हणतात, ( म्ह० वर्णन या शब्दाचा हाच अर्थ ). ” पण हें ( तुमचें ) म्हणणें बरोबर नाहीं; कारण अशारीतीनें, ‘ चमत्कार-कारी ’ हे शब्द ( तुमच्या ) उपमेच्या लक्षणांत तुम्हांला भागच पडत असल्यामुळें, ‘ उपमितिक्तियानिष्पत्तिमत्‍ ’ हें ( साददृयाला ) तुम्ही दिलेलें विशेषण व्यर्थ आहे. कारण जें सादृश्य ( नुसतें ) वरवर प्रतीत होतें, पण ( पूर्णपणें ) सिद्ध झालेलें नसतें, तें चमत्कृति उत्पन्न करीत नाही. याच-प्रमाणे ( तुमच्या, उपमेच्या ) दुसर्‍या लक्षणांत, ‘ ज्याचा शेवट निषेधांत होत नाहीं तें ’ ( सादृश्यवर्णन ) हें ( तुम्ही सादृश्यवर्णनाला दिलेलें विशे-षण ) निरर्थक आहे. कारण, व्यतिरेक अलंकारांत, कमल वगैरेंच्या सादृ-श्याचा केलेला निषेध, आणि अनन्वय अलंकारांत सादृश्याचा संपूर्णपणें केलेला निषेध, ( हे दोन्हीही ) चमत्कार उत्पन्न करणारे असल्यानें, त्या निषेधाकरितां ( त्या दोन्ही अलंकारांतील ) सादृश्य सांगितलें आहे, असें आम्ही पूर्वीच ( उपमाप्रकरणाच्या सुरवातीला ) म्हटलें आहे. शिवाय “ ( ह्या स्त्रीच्या ) गालावरून तिच्या स्तनप्रदेशावर पडणारा कुरळ्या केसाची बट , चंद्रबिंबावरून मेरु पर्वतावर लोंबणार्‍या ( काळ्या ) सापा-सारखा दिसत आहे. ” ह्या व ह्यासारख्या दुसर्‍या, श्लोकांत असलली उपमा ( स्वत:च ) मुख्य वाक्यार्थ होत असल्यानें, ( तिला ) अलंकार ( म्हणतां येणार ) नाहीं. पण तुमच्या ( म्ह. अप्पयदीक्षितांच्या ) उपमालक्षणांतील उपमितिक्तिया- निष्पत्तिमत्‍ अदुष्ट व अव्यंग्य हीं ( सादृश्याची म्ह. ) सादृश्यवर्णनाचीं विशेषणें यांतील ( वरील श्लोकांतील ) उपमेला लागू असल्यानें, तुमचे उपमा-लक्षण या उपमेंत अतिव्याप्त होणार. ( मह. स्तनाभोगे०यांतील उपमेलाही उपमा-लंकार म्हणावें लागेल. ) ( मग बिघडलें कुठें ? ) “ ह्याही उपमेला ( उपमा-लंकाराचें ) उदाहरण म्हणा कीं, ” असें मात्र म्हणू नका. कारण मग व्यंग्य उपमेला उपमालंकारांतून काढून टाकण्याकरितां अव्यंग हें विशेषण देण्याचा तुम्ही केलेला प्रयास व्यर्थ होण्याची वेळ येईल. ‘ ह्या श्लोकांत, अभेदप्रधान उप्रेक्षा आहे ’ असें म्हणणेंही म्हणणेंही तुम्हांला शक्य नाहीं, कारण मग कल्पितो-पमा निर्विषय होण्याचा प्रसंग येईल. शिवाय, “ उपमान नांवाचा व्यापार ( क्तिया ) , तुलना करण्याची क्तिया सिद्ध होईपर्यंत राहतो, असा जर बोलण्याचा अभिप्राय ( बोलण्याची इच्छा ) असेल तर त्याला ( त्या व्यापाराला )उपमा अलंकृति म्हणावें ” या तुम्ही ( म्हणजे अप्पय्य र्दाक्षितांनीं ) स्वत: केलेल्या उपमेच्या लक्षणसूत्रांत, अलंकार म्हणून मानल्या गेलेल्या उपमेचाच निर्देश केला आहे. आणि पुन्हां त्याच ठिकाणीं , ‘ अलंकार ’ म्हणून मानलेल्या उपमेच्याच लक्षणांत, ‘ अदुष्टत्व व अव्यंगत्व हीं विशेषणें येतात, ’ असें तुम्ही म्हटलें आहे. आतां ‘ स्तनाभोगो० या श्लोकांत उपमान व उपमेय यामधील सादृश्य हें जें उपमेचें स्वरूप, त्याहून जास्त दुसरा वाक्यार्थंच नाहीं. मग तुमच्या ‘ स्तनाभोगे०’ मधील उपमेनें अलंकृत तरी कुणाला करायचें ? शिवाय तुमच्या उपमा-लक्षणांत, वर्णनाचें विशेषण म्हणून तुम्ही सादृश्य हा शब्द योजिला आहे; पण तसें करण्याची कांहीं जरून नाहीं. कारण ( सादृश्य हा शब्द गाळून ) ‘ उपमितिक्तियानिश्पत्तिमद्वर्णनमुपमा । ’ एवढेंच ( उपमेचें ) लक्षण तुम्ही दिले असतें तरी, तेवढयानें सुद्धां, तुम्हांला हवा असलेला अर्थ त्यांतून निघू शकला असता. अशा रीतीनें, ( म्हणजे “ वरील चर्चेमुळें ) ” स्वत:-सिद्ध, भिन्न व साधारणधर्मामुळें ( सर्वांना ) मान्य, असें, उपमानाशीं उपमेयाचें, शब्दांनीं वाच्य जें सादृश्य, तें एकदाच ( म्हणजे एकच वाक्यांत ) सांगितलें असेल तर ती उपमा. ”

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP