संत चोखामेळा - करुणा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


४७) अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥
हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥
धरणें घेऊनि तुमचे द्वारीं । बैसेन उगाच मी गा हरी । कांही न करीं भरोवरी । नाम हरी गाईन ॥३॥
तुमची लाज तुम्हांसी । आपुलिया थोरपणासी । ब्रीद बांधिलें चरणासी । तें चोख्यासी दाखवीं ॥४॥

४८) अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथें ती पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥

४९) अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥
अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥
कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरीं । तरीच मज हरी सुख होय ॥४॥

५०) अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
या परतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥

५१) असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥

५२) अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥
नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥
पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद । तेणें सर्व बाध हरे माझा ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नवस । पुरवी सावकाश देवराया ॥४॥

५३) अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार । न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥

५४) अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥

५५) आतां नकां भरोवरी । तूं तों उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशीं । अहर्निशी राखावें ॥२॥
ब्रीद गाजे चराचरीं । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP