मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसाईसच्चरित|
अध्याय ३२ वा

साईसच्चरित - अध्याय ३२ वा

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां पूर्वाध्यायीं कथन । पावला विजयानंद निर्वाण । बाळकरामही निजानंदलीन । साईचरणसंनिध ॥१॥
तैसेच तात्यासाहेब नूलकर । मेघाही नि:सीम भक्तप्रवर । उभयतांहीं अर्पिलें शरीर । द्दष्टीसमोर साईंच्या ॥२॥
याहून मोठा चमत्कार । व्याघ्रासारिखा प्राणी क्रूर । तयाचाही निधनप्रकार । परिसिला सविस्तर श्रोत्यांनीं ॥३॥
आतां सांप्रत अध्यायांत । स्वयें बाबांच्या मुखें वर्णित । ऐसा गोड कथितों वृत्तांत । श्रोतयां अत्यंत हितकारी ॥४॥
असतां एकदां बाबा वनांत । झालें गुरुदर्शन अकल्पित । कैसी गुरूची करणी अद्भुत । परिसा तें चित्त देऊनी ॥५॥
या कथेची परम नवलाई । वानूं मी पामर किती काई । भक्तिश्रद्धामुक्तिदाई । स्वमुखें साई वदले जी ॥६॥
तैसेंच एका बाईचें मन । होतां घ्यावें बाबांचें दर्शन । वसावें तेथें दिवस तीन । रहावें निरशन व्रतस्थ ॥७॥
कैसा तियेसी आणिला प्रसंग । कैसा करविला निर्धारभंग । कैशा पुरणपोळिया सुरंग । करविल्या खमंग तिजकरवीं ॥८॥
पोळ्या केवळ नाहीं करविल्या । यथेच्छ तिजकरवीं खावविल्या । परकार्यार्थ देह झिजविल्या । सार्थकीं लाविल्या हें श्रेय ॥९॥
यांतचि आहे प्रम कल्याण । उपासाहून अनेक गुण । कैसें तिजला दिलें ठसवून । कधींही विस्मरण न घडेसें ॥१०॥
तैसेंच जया परमार्थीं आवड । कैसा करावा अभ्यास द्दढ । करावें कैसें साहस अवघड । साधाया जोड नित्याची ॥११॥
ये अर्थींचा कथानुक्रम । अमृताहूनही गोड परम । श्रोतयां उपजेल भक्तिप्रेम । दु:खाचा उपरम होईल ॥१२॥
आतां येथोनि कथा गोड । श्रवणार्थियांचें पुरेल कोड । वक्त्यां श्रोतयां स्वानंदजोड । पुरेल होड श्रवणाचें ॥१३॥
प्रेमभरित अलोलिक । वदवितील साई कथानक । मज पामरा मूर्खा देख । लिहितांही कौतुक पदोपदीं ॥१४॥
जेवीं गंगादर्शनें पाप । अथवा चंद्राच्या दर्शनें ताप । तेवीं साईमुखींचे आलाप । पाप - संताप - हारक ॥१५॥
आतां आपण श्रोतेजन । करा श्रवणार्थीं सादर मन । महाराज साईमुखींचें वचन । निजगुरुदर्शनकारक ॥१६॥
जरी वेदवेदाङ्ग अध्ययन । केलें श्रुतिशास्त्रपारायण । गुरुकृपेवीण नाहीं ज्ञान । इतर तो शीण केवळ ॥१७॥
अव्यक्तादि स्थावरान्त । हा संसारवृक्ष अति विस्तृत । जन्ममरणशोकाकुलित । द्दष्टजात नाशिवंत ॥१८॥
छेड आणि नाशयुक्त । म्हणोनि यातें वृक्ष वदत । तो हा अव्यक्त स्थावरान्त । वृक्षोपमित संसार ॥१९॥
तो हा द्दष्ट नष्टस्वरूप्प । ऊर्ध्वमूळ संसारविटप । जयाचा अपार शाखाव्याप । नाकळे अत्यल्पही कवणा ॥२०॥
क्षणामागें क्षण लोटे । तैसा हा पसरे फुटती फाटे । कधीं दुरून रमणीय वाटे । आलिंगितां कांटे सर्वांगीं ॥२१॥
कदलीस्तंभसम नि:सास । जैसें मृगजळ वा गंधर्वनगर । तृष्णाजलें बद्धापरिकर । ऐसा हा तरुवर साजिरा ॥२२॥
अविद्याकामकर्मोद्भव । अव्यक्तबीजामाजीं प्रभव । जो प्रतिक्षण अन्यथा - स्वभाव । असतां अभावात्मक स्वयें ॥२३॥
अनर्थात्मक हा ठायींचा । अविद्येपोटीं जन्म याचा । ईषणातृष्णादि पाणियाचा । सांठा तयाच्या सभोंवतीं ॥२४॥
धन - धान्य - पुत्र - दारा । परिग्रहाचा जया पसारा । देहबुद्धीमुळें या थारा । तया आधारा तो वर्ते ॥२५॥
अनंत प्राणी लिंगभेद । हेच जया वृक्षाचे स्कंध । कर्मवासानादि पारंब्या निर्बंध । तेणें हा सबंध फोफावे ॥२६॥
श्रुतिस्मृत्यादि पत्रीं जो भरला । शब्दस्पर्शादि पल्लवीं तरतरला । यज्ञदान - क्रियाकुसुमीं डवरला । रसरसला जो द्वद्वरसीं ॥२७॥
अंत नाहीं याचिये फळां । उपजीविकाभूत हा सकळां । भूर्भुवादि  लोक हा सगळा । ययावेगळा राहीना ॥२८॥
कधीं नृत्य गीत वादन । कधीं क्रीडा हास्य रुदन । ऐसा हा अश्वत्थ सनातन । अधोवदन सर्वदा ॥२९॥
शबलब्रम्हीं आविर्भाव । असंगशस्त्रें जयातें अभाव । शुद्धमूलाधार जो सद्बाव । ज्योतिस्वभाव तो जाणा ॥३०॥
तें ब्रम्हा सत्य सर्वाधार । जग हें मिथ्या स्वप्नाकार । जया न आद्यंत निर्धार । मध्येंच वसणार कैसें तें ॥३१॥
यदर्थ परिश्रम करिती निरक्त । संत संतत जेथें अनुरक्त । मुमुक्षूंचें जें अपेक्षित । जें अभीप्सित साधकां ॥३२॥
असेल इच्छा तें ठायीं पडावें । तेणें संतांशीं शरण रिघावें । मग ते वदतील तें तें ऐकावें । समूळ वर्जावें कुतर्का ॥३३॥
बांधूनियां मनाची मोट । करूनि बुद्धीचा कडेलोट । होऊनियां नि:संग निपट । लक्षावें नीट गुरुचरणां ॥३४॥
कुतर्कांचा करा झाडा । ना तों करितील मार्गांत झगडा । अभिमान पायातळीं रगडा । तरीच पैलतडा पावाल ॥३५॥
ये अर्थींची गोड आख्यायिका । बाबा स्वयें वदले ती ऐका । सेवितां गुरुवचनपीयूखा । परम हरिखा पावाल ॥३६॥
एकदां आम्ही चौघेजण । वाचूनि पोथीपुस्तक पुराण । करूं लागलों ब्रम्हानिरूपण । ज्ञानसंपन्न होऊनि ॥३७॥
‘उद्धरेदात्मनात्मानं’ । हें गीतेचें घेऊनि वचन । अयुक्त सर्वथैव परावलंबन । ऐसें प्रवचन एक करी ॥३८॥
तया प्रत्युत्तर करी अन्य । मन स्वाधीन तोचि धन्य । असावें संकल्प - विकल्पशून्य । कांहीं न आपणावीन जगीं ॥३९॥
अनित्य सर्व सविकार नित्य एक निर्विकार । म्हणोनि नित्यानित्याविचार । करा निरंतर तिजा वदे ॥४०॥
चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान । करूं आदरी विहिताचरण । कायावाचा पंचप्राण । करी समर्पण गुरुचरणीं ॥४१॥
गुरु परमात्मा चराचर । भरला असे सबह्याभ्यंतर । ऐसा व्हावया निजनिर्धार । निष्टा अपार आवश्यक ॥४२॥
अनागमज्ञ केवळ तार्किक । वादोन्मुख आणि चिकित्सक । तयां न स्वप्नींही ज्ञान सम्यक । शुद्ध भाविक पाहिजे ॥४३॥
ऐसे आम्ही चौघे सुबुद्धा । निघालों लावूं कांहीं शोध । स्वबुद्धीनेंच व्हावा तो शोध स्वतंत्र निर्वेधमानसें ॥४४॥
ऐसी इच्छा तिघांच्या अंतरीं । वनीं विचरतां स्वच्छंद परी । भेटला मार्गांत एक वणजारी । प्रश्न तो करी आम्हांतें ॥४५॥
ऊन पडलें आहे प्रखर । प्रयाण किमर्थ आणि कुठवर । चाललों तयास केलें प्रत्युत्तर । वनवनांतर धुंडाया ॥४६॥
पुसे आम्हांस तो वणजारी । शोध कशाचा लावितां तरी । आम्ही वदते जाहलों उत्तरीं । गुप्तार्थीं न बरी परिस्फुटता ॥४७॥
पाहुनी तयांची धांवाधांव । वणजारियाचा कळवळला जीव । म्हणे वन दुर्गम नकळतां ठाव । स्वेच्छास्वभाव विचरूं नये ॥४८॥
रानींवनीं हिंडावयास । सवें घ्यावें वाटाडियास । भर दुपारीं ऐसें साहस । करितां आयास किमर्थ ॥४९॥
नका सांगूं गुप्तार्थ परी । बसा खा भाकर तुकडा तरी । पाणी प्या जा तदनंतरीं । राखा सबूरी अंतरीं ॥५०॥
आला जरी इतुका काकुळती । आम्ही तैसेच निघालों पुढती । धिक्कारिली तयाची विनंती । थकलों कीं अतीव मार्गांत ॥५१॥
आम्ही अवघेच बुद्धिमान । काढूं आपुला मार्ग शोधून । वाटाडियाचेम काय प्रयोजन । होता कीं अभिमान हा पोटीं ॥५२॥
परी तें रान अति विस्तीर्ण । विशाल - तुंग विटपीं विकीर्ण । रिघे न जेथें सूर्यकिरण । मार्गक्रमण कैं तेथें ॥५३॥
होऊनियां दिशाभूल । भ्रमलों इतस्तत: निष्फल । थोर दैवाचे तेणेंच हें स्थल । मागुती निश्चल पावलों ॥५४॥
दैवें लाविलें आल्या वाटे । पुनश्च पूर्वील वणजारी भेटे । म्हणे भरलां वाटतें अव्हाटे । चातुर्य आटे बुद्धीचें ॥५५॥
कार्य सान अथवा मोठें । मार्ग दावावया लागे बोटें । शोध न लागे रित्या पोटें । बुद्धीचे फाटे अफाट ॥५६॥
असल्यावीण ईश्वरी घाट । मार्गीं होई न कोणाची गांठ । देऊं नये अन्नासी पाठ । वाढिलें ताट डावलूं नये ॥५७॥
भाकरतुकडा देई कोण । घे खा म्हणे तयाचें वचन । मानावा पूर्ण शुभशकुन । कार्यनिर्विन्घकारक ॥५८॥
करा आतां अल्पाहार । धरा चित्तीं किंचित धीर । परी त्यां रुचेना हा सुविचार । पुनश्च निराहार निघाले ॥५९॥
न लावितां शोध कांहीं । अन्नसेवन करणें नाहीं । ऐसें वदून मग ते पाहीं । दुराग्रहीं नाडले ॥६०॥
मज लागली होती भूक । तृषेणें कोरड कंथास सोक । वणजारियाचेंही प्रेम अलोलिक । वाटलें कवतुक तयाचें ॥६१॥
आम्ही विद्वान मोठे पढीक । दयामाया नाहीं ठाऊक । उष्टया हातें असतां धनिक । हांकिला न काक एकानें ॥६२॥
हा तों अविद्वान अनधिकारी । नीच वर्ण ज्ञात वणजारी । परी स्वाभाविक प्रेम अंतरीं । भाजी भाकर खा म्हणे ॥६३॥
ऐसें लाभावीण प्रेम । करी जो तोच सुबुद्ध परम । तयाचा आदर हाचि अप्रतिम । विद्योपक्रम वाटला ॥६४॥
म्हाणोनियां आदरपूर्वक । वणजारियानें दिधलेला एक । चतकोर खावोनि प्यालों मी उदक । तों काय कौतुक वर्तलें ॥६५॥
गुरुराज आले अकल्पित । म्हणती वादावादी किमर्थ । मग निवेदिला इत्थंभूत । वर्तला वृत्तांत तयांस ॥६६॥
येतां काय मजसमेत । लावूनि देतों शोध त्वरित । परी जो आदरील मद्वचनार्थ । तयाचाच स्वार्थ फळेल ॥६७॥
इतरांनीं तें नाहीं मानिलें । परि म्यां शिरसामान्य केलें । इतर सर्व निघून गेले । मग मज घेतलें गुरुरायें ॥६८॥
नेलें एका विहिरीवर । दोन्ही पायांस बांधिला दोर । वरती पाय खालती शिर । पाण्याबरोबर सोडिला ॥६९॥
पाण्यास पोहोंचूं नयेत हात । पाणीही जाऊं नये मुखांत । ऐसें मज अलगत लोंबत । सोडिलें विहिरींत गुरुरायें ॥७०॥
झाड होतें कांठीं एक । तयास दोरीचें दुसरें टोंक । बांधून गेले गुरुराय नि:शंक । कोणा न ठाऊक कोठें तें ॥७१॥
घटका गेल्या दहा बारा । परतले मग ते माघारा । काढोनि बाहेर मज झरझरा । पुसलें कीं बरा आहेस तूं ॥७२॥
मग म्यां दिधलें प्रत्युत्तर । होतों अत्यंत आनंदनिर्भर । भोगिलें जें सौख्य अपार । तें काय पामर मी वानूं ॥७३॥
परिसतां हें माझें वचन । जाहले गुरुराय सुखसंपन्न । निजहस्त अंगावरी फिरवून । जवळी राहवून घेतलें ॥७४॥
सांगतां येती प्रेमाचे उमाळे । मग मज नेलें गुरूनें शाळे । पक्षिणी पिलियां पांखीं कवळे । मजलागीं कळवळे ते रीतीं ॥७५॥
काय गो गुरूची शाळा । सुटला जनक - जननींचा लळा । तुटली मोहममतेची शृंखळा । लाधलों अवलीळा भुक्तता ॥७६॥
सुटला दुरापाश सगळा । भंगली प्रवृत्ति - प्रतिबंध -  अर्गळा । वाटे या गुरूच्या गळ्यांतचि गळा । घालूनि त्या डोळां वसवावें ॥७७॥
तयाचें प्रतिबिंब नसतां डोळां । तो काय शुद्ध मांसाचा गोळा । अथवा त्याहून बरा मी आंधळा । ऐसी ही शाळा मज झाली ॥७८॥
लागतां या शाळेस पाय । कोण हतभागी माघारा जाय । माझें घरदार बापमाप । सर्वचि गुरुराय जाहले ॥७९॥
इतर इंद्रियें सहितमना । सोडूनियां निजस्थाना । ठेलीं येऊनि एका नयना । ध्यानावधानाकारणें ॥८०॥
गुरु एक द्दष्टीचें ध्यान । इतर सर्व गुरूसमान । नाहीं गुरूविण दुजें आन । ‘अनन्य अवधान’ या नांव ॥८१॥
करितां गुरूस्वरूपध्यान । कुंठित होय बुद्धिमन । म्हणोनि शेवटीं करावें नमन । नि:शब्द मौन धरोनियां ॥८२॥
ना तों ज्ञानार्थ गुरू करावे । शून्य सदुपदेशाच्या नांवें । दक्षिणा देतां वित्ता मुकावें । अनुतापा पावावें परिणामीं ॥८३॥
गुह्यज्ञानाची केवळ चावटी । मिरवे प्रांजळपणाची दिवटी । पाजिली दंभें जया बाळगुटी । देईल शेवटीं तो काय ॥८४॥
बाह्यात्कारीं मोठा सोंवळा । अंतर्यामीं नाहीं कोंवळा । प्रतीतीच्या नांवें आंवळा । तयाची शाळा निकामी ॥८५॥
जेथें शब्दज्ञानाला ऊत । ब्रम्हाज्ञानाची नाहीं प्रचीत । स्वमुखें गुरु निजगरिमा गात । शिष्या निजहित तें कैंचें ॥८६॥
जयाचा बोल झोंबेना वर्मीं । साक्षी न पटे अंतर्यामीं । तयाचें गुरुत्व काय कामीं । व्यर्थ रिकामी वटवट ती ॥८७॥
असो ऐसी दिधली सेवा । दाविला मज ज्ञानाचा ठेवा । लागला न मज शोध करावा । अर्थ गिंवसावा किंचितही ॥८८॥
अर्थजात स्वयें प्रकटलें । अप्रयासीं हातीं चढलें । गुरुकृपेचें ऐसें केलें । शोधणें ठेलें ठायींच ॥८९॥
खालीं डोकें वरती पाय । टांगी उफराटें जैं गुरूराय । तैं मज आनंद कैसा होय । समर्थ गुरुमाय जाणाया ॥९०॥
संतांघरची उलटीच खूण । हें तों अनुभवजन्य ज्ञान । एथें निष्ठाच एक प्रमाण । एक साधन गुरुकृपा ॥९१॥
कर्मठास विधिनिषेधपण । ज्ञानियातें ज्ञानाभिमान । योगियातें दंभाचा शीण । विश्वासावीण चालेना ॥९२॥
पंडितांचे गर्वांध डोळे । अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे । ज्ञाइया तयास पाहूनि पळे । संगें न मेळे तयांच्या ॥९३॥
ज्ञानी वदे माझीयावीण । देव तरी दुसरा कोण । मी तों स्वयेंच ज्ञानसंपन्न । चिद्धन परिपूर्ण तो मीच ॥९४॥
भक्त स्वकीय भक्तिभावीं । ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी । तनुमनधनेंसीं स्वामीसी गोंवी । स्वामीसी निरवी सर्वस्व ॥९५॥
ही एक माझी कर्तबगारी । ही मत्सामर्थ्याची थोरी । ही मद्बुद्धिवैभवाची उजरी । नसे ही फुंजरी तयातें ॥९६॥
जें जें घडे तें देव घडवी । तोच उतरवी तोच चढवी । तोच लढे अथवा लढवी । कर्ता करवी तो एक ॥९७॥
कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथां । स्वयें स्वीकारी अति नम्रता । भक्ता सदैव देवतंत्रता । नाहीं स्वतंत्रता तयातें ॥९८॥
असो हे जे चौघे प्रबुद्ध । करीत होते कशाचा शोध । हें तों येथवर राहिलें मुग्ध । परिसावा उद्बोध तयाचा ॥९९॥
हे सर्व कर्मठ घनपाठी । विद्वत्तेची घमंडी पोटीं । करितां शब्दज्ञानाची चावटी । निघाली गोठी देवाची ॥१००॥
निजज्ञानाचिया नेटेंपाटें । देव कैसा कोठें राहाटे । आपणां कैसा कवण्या वाटे । युक्तीनें भेटे हा हेत ॥१०१॥
प्रबुद्धांमाजी श्रीसाई एक । मूर्तिमंत वैराग्य विवेक । परब्रम्हा स्वयें देख । कां हा अविवेक आलंबिती ॥१०२॥
ऐसी श्रोते घेतील आशंका । तरी हालोकसंग्रह देखा । साईसमर्था भक्तोद्धारका । हीनत्व हें कां आणील ॥१०३॥
स्वयें आपण असतां अवतारी । वंद्य मानूनियां वणजारी । अन्नब्रम्हा निजानिर्धारीं । सेवूनि थोरी गाइली ॥१०४॥
तैसेंच तया जो अवमानी । तयाची कैसी होते हानी । गाइली ही प्रबुद्धांची कहाणी । कोणी न ज्ञानी गुरूविण ॥१०५॥
मातृपित्राचार्यानुशासन । यांवीण अशक्य धर्मज्ञान । तेंही सर्व अध्ययनाधीन । विनाअनुष्ठान तें व्यर्थ ॥१०६॥
संपादूं लागे आशीर्वचन । होईं मातृवान पितृवान । आणिक होईं आचार्यवान । श्रुतिवचन विश्रुत हें ॥१०७॥
या त्रयींचें जें अनुसंधान । अथवा ईज्याध्ययनदान । जन्ममृत्यूंचें व्हावया उल्लंघन । परम साधन हें एक ॥१०८॥
हीं सर्व चित्तशुद्धीचीं साधनें । यांवीण आत्मवस्तूचें नाणें । हातीं न चढे ऐसें तें जिणें । व्यर्थ येणें जन्मास ॥१०९॥
शरीर इंद्रिय आणि मन । बुद्धिही नेणे करूं आकलन । ऐसें जें आत्मस्वरूप गहन । तयाचें दर्शन गुरुकृपें ॥११०॥
जेथें ‘प्रत्यक्ष’ वा ‘अनुमान’ । उभय प्रमाणें अप्रमाण । तया करतलगत आमलकासमान । कोण गुरूविण दावील ॥१११॥
धर्म अर्थ तिसरा काम । प्राप्त होतील करितां श्रम । परी चवथा पुरुषार्थ परम । गुरूविण श्रम सर्वथा ॥११२॥
या शिर्डीसंताचिया दरबारा । जोशीही येती देती मुजरा । संगती नरदेहाचा होरा । भविष्य थोरां - मोठयांस ॥११३॥
धन - धान्य - वैभवभोगी  । राजे रजवाडे आणि जोगी । तडी तापडी रागी विरागी । दर्शनालागीं उत्कंठित ॥११४॥
जपी तपी व्रती संन्यासी । यात्रेकरू क्षेत्रनिवासी । गायक नर्तक परिवारेंसीं । येत शिर्डीसी दर्शना ॥११५॥
महारही येई जोहारा । या श्रीसाईचिया दरबारा । म्हणे हाचि एक मायबाप खरा । चुकवील येरझारा जन्माच्या ॥११६॥
आत्मलिंग जयाचे गळां । विभूति फांसिली जयाचे भाळा । जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा । पहावा सोहळा जंगमाचा ॥११७॥
मानभाव गारोडी येती । गोंधळी प्रेमें गोंधळ घालिती । भवानीचा जोगवा मागती । अति प्रीती बाबांसी ॥११८॥
अंध पंगू कानफाटे । जोगी नानक भाट दिवटे । समर्थ साईंच्या भक्तिपेठे । धांवती मोठे प्रेमानें ॥११९॥
डुगडुगे सरोदे पांगूळ । कोल्हाटिणीही करिती खेळ । तेथेंच हा वणजारी प्रेमळ । आला कीं वेळ साधुनी ॥१२०॥
धन्य धन्य साईंची आकृती । वैराग्याची ओतीव मूर्ती । निर्विषय नि:संग नि:स्वार्थी । भक्तभावार्थीं अनुपम्य ॥१२१॥
असो आतां पूर्वानुसंधान । मुख्य कथेचा धागा धरून । सुरू करूं कीं आख्यान । श्रोतीं अवधान देइंजे ॥१२२॥
बाबा न स्वयें उपाशी राहत । कोणासही न राहूं देत । उपोषिताचें न स्वस्थ चित्त । कैंचा परमार्थ तयाचा ॥१२३॥
देव न लाधे रित्या पोटीं । आधीं आत्म्याची करा संतुष्टी । या उपदेशाची आणिक गोष्टी । श्रोतयांसाठीं निवेदितों ॥१२४॥
भुकेनें ऐन दुपारचे वक्तीं । खालची माती जैं होते वरती । अन्नब्रम्हापदाभिव्यक्ति । उपजते वृत्तीस चित्ताच्या ॥१२५॥
अति दुर्धर ऐसी वेळा । तोंडीं न देतां अन्नाचा गोळा । हीनदीन इंद्रियमेळा । विसरे निजकळा सर्वस्वी ॥१२६॥
पोटीं नसतां अन्नाचा ओलावा । देव कवण्या डोळां पहावा । कवण्या वाचे महिमा वर्णावा । कर्णें परिसावा तो कवण्या ॥१२७॥
सारांश सकल इंद्रियां शक्ति । तरीच घडे देवाची भक्ती । जरी अन्नावीण क्षीणत्वा येती । तरी त्यां न गति परमार्थीं ॥१२८॥
अतिभोजन तेंही न हितकर । मितभोजन खरें सुखकर । उपास - अतिरेक भयंकर । असुख निरंतर भोगवी ॥१२९॥
एकदां एक बाई शिर्डीस । पत्र घेऊन केळकरांस । आली साईंचे दर्शनास । परम उल्लास मानसीं ॥१३०॥
महाराजांचे पायांपाशीं । बसावें तीन दिवस उपवासी । बाईनें निर्धारिलें मानसीं । तिचें तिजपाशींच रहिलें ॥१३१॥
बाबांच्या नित्यक्रमानुसार । परमार्थाचा करितां विचार । आधीं कंबरेस बांधावी भाकर । बाईचा निर्धार उफराटा ॥१३२॥
जया मनीं देव गिंवसावा । भाकरतुकडा आधीं खावा । असल्यावीण समाधान जीवा । कैसेनि देवा उमगावें ॥१३३॥
भुकेल्या पोटीं देव सांपडे । हें तों कल्पांतींही न घडे । उपासतापास यांचें सांकडें । चालेना इकडे साईंसी ॥१३४॥
अंत:साक्षी महाराजांसी । होतेंच हें ठावें पूर्वील दिवसीं । आधींच दादा केळकरांपाशीं । होतें कीं भाषित झालेलें ॥१३५॥
आतां या शिमग्याच्या सणाशीं । राहतील कां माझीं पोरें उपाशी । कैसें मी राहूं देईन त्यांसी । मग मी कशासी पाहिजे ॥१३६॥
साईमुखावाटे बाहेर । पडले नाहींत जों हे उद्नार । तोंच दुसरे दिवशीं तयार । पातली शिरडीवर ही बाई ॥१३७॥
उपनांव बाईचें गोखले । उक्त प्रकारें मनीं निर्धारिलें । दादांच्या येथेंच गांठोडें लाविलें  । पत्र दिधलें तयांस ॥१३८॥
कानीटकर काशीबाहेर । आप्तसंबंधें पत्र देई । विनवी दादांस लावाया सोई । दर्शनार्थ साईबाबांच्या ॥१३९॥
बाई शिरडीस पातल्या । तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या । दर्शन होऊन क्षणभर बसल्या । तोंच तयांस उपदेश ॥१४०॥
कोणाचें काय अंतर्गत । साईनाथ जाणे समस्त । ऐसें न कांहीं भूमंडळात । नसे जें अवगत तयांस ॥१४१॥
‘अन्नमन्नाद’ विष्णुरूप । उपास तापास आणि निर्लेप । निराहार आणि निराप । किमर्थ हा व्याप वाउगा ॥१४२॥
काय आवश्यकता आपुल्याला । उपास तापास करावयाला । बाबा आपण होऊन तियेला । ऐसिया बोला बोलले ॥१४३॥
जा त्या दादाभटाचे घरीं । खुशाल पुरणाच्या पोळ्या करीं । तयाच्या पोरांबाळांस चारीं । स्वयेंही पोटभरी तूं खाईं ॥१४४॥
नवल तो शिमग्यासारिखा सण । बाई येण्याचा योगही विलक्षण । दादांचें कुटुंबही  तत्क्षण । अस्पर्श होऊन बसलेलें ॥१४५॥
विराली उपोषणाची उकळी । स्वयंपाकाची आली पाळी । मग ती परम प्रेमसमेळीं । आज्ञा पाळी बाबांची ॥१४६॥
चरण बाबांचे अभिवंदून । दादांचिया घरीं जाऊन । पुरणपोळीचें जेवण करून । सर्वांस वाढून जेवली ॥१४७॥
काय आख्यायिका ही सुंदर । काय अंतर्गत अर्थोपसंहार । व्हावें ऐसें गुरुवचनीं स्थिर । नाहीं मग उशीर उद्धारा ॥१४८॥
ऐशीच एक आणिक कथा । आठवली होती साई समर्थां । कथिली प्रेमें भक्तां समस्तां । सादर श्रोतां परिसिजे ॥१४९॥
जया मनीं परमार्थीं आस । तयानें केले पाहिजेत सायास । करूं लागे द्दढ अभ्यास । व्हावें साहसही स्वल्प ॥१५०॥
ऐसें हें सत्कथामृत चरणतीर्थ । सेवावें नित्य कल्याणार्थ । होतां संतचरणीं विनीत । होईल पुनीत अंतर ॥१५१॥
एकदां मी लहान असतां । फडका बांधोन पोटाभोंवता । धंदा मिळावा निर्वाहापुरता । आणुनि चित्ता निघालों ॥१५२॥
चालतां चालतां बीडगांवा । आलों तेथें घेतला विसांवा । फकीराचा माझ्या न्याराच कावा । आनंद जीवा वाटला ॥१५३॥
तिकडे मिळालें जरीचें काम । मीही खपलों अविश्रम । फळले ते माझे सकळ श्रम । पहा पराक्रम फकीराचा ॥१५४॥
माझ्या आधींच लाविलेले । हुशार हुशार नांवाजलेले । चार पोरांहीं काम केलें । तेंही मापिलें ते समयीं ॥१५५॥
एकानें पन्नास रुपयाचें केलें । शंभरांचें दुजियाचें झालें । तिजियाचें दीडशांचें भरलें । माझें सर्वांहुनी द्विगुणित ॥१५६॥
पाहूनियां माझी हुशारी । धनी बहु आनंदला अंतरीं । बहुतांपरी मज गौरव करी । प्रेम भारी मजवरी ॥१५७॥
मज तयानें पोषाख दिधला । डोईस पागोटें अंगावर शेला । परी मीं तो बांधून ठेविला । जैसा दिधला तैसाच ॥१५८॥
कोणाचें देणें कोणास पुरतें । कितीही द्यावें सदा अपुरतें । माझें सरकार जैं देऊं सरतें । न सरतें तें कल्पांतीं ॥१५९॥
देणें एक माझ्या सरकारचें । तयासी तुळे काय तें इतरांचे । अमर्यादास मर्यादेचें । भूषण कैंचें असावें ॥१६०॥
माझें सरकार न्या न्या वदे । मजलाच जो तो म्हणे दे दे । कोणी न माझ्या बोलासीं लक्ष दे । एकही सुधें ऐकेना ॥१६१॥
उतून चालिला आहे खजिना । एकही कोणी गाडया जाणीना । खणा म्हणतां कोणीही खणीना । प्रयत्न कोणा करवेना ॥१६२॥
मी म्हणें तो पैका खणावा । गाडयावारीं लुटून न्यावा । खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ॥१६३॥
आमुची तरी काय गती । मातीची होऊन जाईल माती । वारा जाईल वार्‍याच्या संगती । येईना मागुती हा वेळ ॥१६४॥
असो माझिया फकीराची कळा । माझिया भगवानाची लीळा । माझिया सरकाराचा ताळा । लई निराळा न्याराच ॥१६५॥
मीही कधींच कोठें जातों । कोणाही ठायीं जाऊन बैसतों । परी हा जीव मायेंत घोंटाळतो । गोते खातो अनिवार ॥१६६॥
माया आहे फार कठिण । तिणें केलों मी हीन दीन । माझिया माणसांची रात्रंदिन । घोंकणी करून असतों मी ॥१६७॥
‘जो जो जैसें जैसें  करील । तो तो तैसें तैसें भरील’ । ध्यानांत ठेवी जो माझे बोल । सौख्य अमोल पावेल तो ॥१६८॥
हेमाड साईंसी शरण । अपूर्व हें कथानिरूपण । साईच स्वयें करी जैं आपण । माझें मीपण फिकें तैं ॥१६९॥
तोच या कथेचा निवेदिता । तोच वाचिता तोच परिसता । तोच लिहिता आणि लिहविता । अर्थबोधकताही तोच ॥१७०॥
साईच स्वयें नटे ही कथा । तोच इये कथेची रुचिरता । तोच होई श्रोता वक्ता । स्वानंदभोक्ताही तोच ॥१७१॥
मग ऐसिया श्रवणाची गोडी । ही काय थोडी परमार्थजोडी । भक्त सभाग्य जे हे सुखपरवडी । आनंद निरवडी भोगिती ॥१७२॥
आतां पुढील अध्यायाचें सार । साईंच्या उदीचा महिमा अपार । श्रोते सज्जन पसरितों पदर । होऊनि सादर परिसावा ॥१७३॥
हेमाड वदे अति विनीतता । कृपा उपजली साईसमर्था । त्यांनींच वदविलें निजसच्चरिता । कथा रसभरिता अपूर्व ॥१७४॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । गुरुमहिमाबर्णनं नाम द्वात्रिंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP