मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक ४१ ते ५०

पवित्र उपदेश - श्लोक ४१ ते ५०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

सुनिर्मळ करा मना विषय वासना सोडुनी । सुबंधु जनहो तुम्हां विनवितों करां जोडूनी ॥
अखंड सुख व्हावया सदनिं एक चित्तें रहा । सुकीर्ति मिळवा खरा सुजन बोलती लाभ हा ॥४१॥
श्री मारुती सांगत दास लोकां । न वेतना त्या तुम्हिं चित्तिं लेखा ॥
स्वामी पुढें नम्र सदा असावें । अन्य स्थळीं मानस तें नसावें ॥४२॥
स्वामी ईश्वर मानुनी निशिदिनी कार्यासि राहे पुढें । देहाची ममता उडे सुजन तो जाई न कोणीकडे ॥
जाणे एकचि चाकरी नच कधीं मानापमाना पुसे । ऐसा सेवक लाभला तरि उणें स्वामीस कांहीं नसे ॥४३॥
फळें सेवी श्रीमत्पवन सुत तो जाउनि वनीं । करी सेवा भावें  दशरथ सुताची गुणखनी ॥
प्रतापाची राशी सकळ सघनाशी कपिपती । चिरंजीवी झाला निजपद रतां देत सुगती ॥४४॥
स्वामी त्या विकळा अनंत सुख दे सन्मान त्याचा करी । ऐसी होय फळप्रदा मज गमे त्या सेवका चाकरी ॥
निष्ठा एकचि सर्व कार्य करिते ऐसी तिची थोरवी । ती प्रेमें वरितां मनांत धरितां सत्कामना पूरवी ॥४५॥
ऐसें दिव्य चरित्र तो रघुपती श्रीसद्‌गुरुनीं घरीं । प्रेमें आणियला करूनिभजना भक्तिप्रिय श्रीहरी ॥
केलें पूर्ण सुखी तयां भवभया वारूनि सिंहासनीं ।  बैसे ध्यान अखंड चित्तिं धरितां जाती अघें नासुनी ॥४६॥
उपासना जो करि राघवाची । भीती न त्या चित्तिं कधीं भवाची ॥
आत्मानुसंधान बळें तयाला । न वासना बंध सुखें निवाला ॥४७॥
दाता श्री रघुराज एक कथितों मी घेउनी प्रत्यया । माझ्या सद्‌गुरुनीं मला निरविलें जातां स्वधामीं जया ॥
केलें पालन पोषण आजवरी ऐसा दयेचा निधी । जो त्याच्या पदिं चित्त अर्पण करी त्या तो न सोडी कधीं ॥४८॥
सासू श्री जनकात्मजा बघ तुझी श्रीराम तो सासरा । देईल स्वपदीं तुला भवभया वारूनि जो आसरा ॥
त्याचा वांचुनि अन्य दैवत नसे निष्ठा धरीं अंतरीं । सेवा त्या प्रभुची करीं निशिदिनीं जो सर्व दु:खें हरी ॥४५॥
देवा समान पतिला निज चित्तिं मानीं । सेवा करूनि सुखवी न कदापि हानी ॥
अभ्यागतांसि बहु तोषविं अन्नदानीं । राधे फळेल तप होंचि तुला निदानीं ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP