मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्री राघवाष्टक

श्री राघवाष्टक

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

॥ श्री राघवाष्टक ॥

दिला देह त्वां राघवा मानवाचा । धरूनी अभीमान माझ्या जिवाचा ॥
तरी भेटि दे आपली रामराया । सदा आवडीनें स्वभक्ती कराया ॥१॥
दिले नेत्र त्वां रूप तूझें पहाया । स्वरूपीं तुझ्या स्थीर द्दष्टी रहाया ॥
कृपाळपणा काय वर्णूं तुझा मी । तरी दाखवीं दिव्य जे पाय स्वामी ॥२॥
कधीं भेटसी देसि तूं दर्शनातें । असा लागला वेध माझ्या मनातें ॥
त्वदंशें भवाब्धीस म्यां या तरावें । करूनी कृपा भेटिनें उद्धरावें ॥३॥
दिले हात वंदावया, या करानें । स्वसेवा करावीच म्यां चाकरानें ॥
असा भरंवसा हा मला ठांस पाहे । म्हणूनी तुझी वाट लक्षीत आहें ॥४॥
मना इंद्रियां जो अधिष्ठान तो तूं । करीसी सदा पूर्ण जो भक्त हेतू ॥
दयासागरा त्या तुला म्यां पहावें । सुखें सूख होवोनि आंगें रहावें ॥५॥
असा हेतु माझा प्रभो राम राजा । करीं पूर्ण तूं साधिसी भक्त काजा ॥
तुझ्याविण वाटे उदासीन दीशा । मला येउनी भेट रे जानकीशा ॥६॥
किती वेळ झाला तुला यावया रे । प्रभो पाहतो प्राण हा जावया रे ॥
उडी घाल या संकटीं राघवा रे । अहंभाव हा ग्रासि तूं आवघा रे ॥७॥
मुखें विष्णु कृष्ण जगन्नाथ नामा । स्मरें सर्वदा मी न राहे रिकामा ॥
तुझ्या दर्शनें सच्चिदानंद रामा । सदा होय आनंद आनंदधामा ॥८॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP