मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३४५ ते ३४९

श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें - पदे ३४५ ते ३४९

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३४५ वें.
श्री लक्ष्मी नारायण सदया मज या भवनिधि पासुनि तारिं तारिं ॥धृ०॥
तळमळुनि विषयीं बहु मळविं मन । हळ हळ होउनियां मी भारिं भारिम ॥श्री०॥१॥
भय रहित आपन स्फुरविं निजात्म खुण । नुरविं देह मीपण संकट हें वारिं वारिं ॥श्री०॥२॥
अद्वय स्वरुप भक्ति देउनि ज्ञान विरक्ति । विष्णु कृष्ण जगन्नाथा ब्रह्मानंदी सारिं सारिं ॥श्री०॥३॥

पद ३४६ वें.
लक्ष्मी नारायण प्राण सखा माझा । देखिला नयनीं वैकुंठींचा राजा ॥धृ०॥
वामांकि विराजे लक्ष्मी जगदंबा । दिव्यालंकार भरित विश्र्वकदंबा । जो निरालस्य प्रिय आत्म भक्त काजा ॥ ल० दे० ॥१॥
भव भय हे मिथ्या कळवुनि परिहारि । नवनव सुख दायक आत्मैक्य विचारीं । भक्तांसि गांजितां मोडी शत्रु माजा ॥ल० दे० ॥२॥
जो वरद हस्त मस्तकीं मुकुट ज्याच्या । रत्न जडित कंठीं हार पदकांचा । आनंदिं मेळवि भक्तजन समाजा ॥ल० दे० ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथचि हा कळला । सच्चिदानंदघन दासावरि वळला । दर्शनेंचि मज आनंद होय ताजा ॥ लक्ष्मी नारायणा प्राणसखा माझा । देखिला नयनीं वैकुंठींचा राजा ॥४॥

पद ३४७ वें.
लक्ष्मी नारायणा पारायण करिं जिव्हे साचा । नाहीं पारा-वार सारा हा संसारचि असाचा ॥धृ०॥
परावर चरावर व्यापक श्री रमावर, धराधर शेषशायी वराभयकर स्मर, तरावया हाचि यत्न पारक भवाचा ॥ल०॥१॥
भरावया साध्वी चारी, पराभवी दु:खें सारीं, न राहवि विघ्नें वारी, हरां दिकां तो प्रियभारीं, मधुकैठभारी सत्य स्मारक जिवाचा ॥ल०॥२॥
दधी मधु द्राक्षारस, सांडुसि सर्व विरस, सच्चिदानंद सुरस नित्य घोंटी आत्मरस, विष्णु कृष्ण जगन्नाथ तारक हे वाचा ॥ल०॥२॥

पद ३४८ वें.
आजिचा सुदीन रे सुदीन आमुचा उदयला भाग्याचा । लक्ष्मी नारायण पाहिला दयाघन देव वैकुंठींचा ॥धृ०॥
नवरत्नांचा हार गळयामधिं गाळ वैजयंती । भव्य भाळ सिंव्हासनि केवळ सच्चित्सुखमय मूर्ति ॥आ०॥१॥
नारद तुंबर गाति नाचति जे देहात्म वियोगी । सनक सनंदन सनत्सनातन तत्सुत जात योगी ॥आ०॥२॥
सुखर ऋषिवर थाट बैसले सन्मुख जागो जागीं । मन्मन पाहुनि उन्मन झालें तन्मय अद्वय आंगीं ॥आ०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा छंद आत्म भजनाचा । मंद हसित आनंदकंद निरखुनि मुख पंकज नाचा ॥आ०॥४॥

पद ३४९ वें.
नित्य करुनि स्मरणातें, पूजति: श्री लक्ष्मीनारायणातें ॥धृ०॥
सहस्त्र कमळें तुळसी वाहुनी, आलिंगुनि चरणांतें ॥नि०॥१॥
अवलोकुनि शिरिं मुकुट कुंडलें, रत्नजडित श्रवणांतें ॥नि०॥२॥
मंद-हसित आनंद भरित करि, शुद्धांत:करणातें ॥नि०॥३॥
निज भक्तांतें अनुदिनि रक्षुनि, नुरवि जनन मरणातें ॥नि०॥४॥
भजन मनोरथ पुरवि सदोदित, करि संकट हरणातें ॥नि०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभू, दे सुख पद शरणातें ॥नि०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP