मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे १९१ ते २००

प्रार्थनापर पदें - पदे १९१ ते २००

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद १९१ वें.
यारे गडी यारे गडी अयोध्येसि जाऊं, शाम मनोहर सुंदर मूर्ति राम डोळां पाहुं ॥या०॥धृ०॥
कीर्तनाच्या थाटें जातां वाटे पूण गाऊं, ब्रह्मानंदी मज्जन व्हाया सज्जन पदिं शिर वाहुं ॥या०॥१॥
नेट याचा मोठा येथें नित्य राहुं, संत जनाची भेटी घेउनि चित्सुखीं विसाऊं ॥या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रेम पूर्ण लाहूं, हेतु मानसिंचा सद्‍गुरु कृपे सिद्धि पावूं ॥या०॥३॥

पद १९२ वें.
आंगें संत संगें होय तो हा सीताराम, रत्न जडित सिंहासनिं शोभे मेघश्याम ॥धृ०॥
पाहा सुहास्य वदन, महा सुखाचें सदन, भक्त योगि जन मन, मोहन विश्राम ॥आं०॥१॥
एक पत्नि एक बाण, एक वचन प्रमाण, अनंत जिवांचें कल्याण, गुण धाम॥आं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, नांदे अखंडानंदात, ह्लदयिं यत्स्वरुप ध्यात, विपद विराम॥आं०॥३॥

पद १९३ वें.
श्याम सुंदर नयनिं पाहुं राम एकदा । ध्यानि आठवे सदा, गांठ होइल कदा ॥धृ०॥
काम पुरवुनि जो सकळ वारि आपदा । नाम वदनिं वदा, वाम भागिं प्रमदा ॥श्या०॥१॥
शोभे जानकिजीवन दृढ मारुती पदा । हरि दैहिक मदा, देतो अमृत पदा ॥श्या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ वश भजन नवविधा । सुख स्फुरवि ह्लदा, नुरवूनि आपदा ॥श्या०॥३॥

पद १९४ वें.
नाचा नाचा दिवस जाणोनी सोनियांचा आला । जानकी जीवन होय उत्साह मनाचा ॥धृ०॥
रावणादि राक्षसांचा, संहार करुनि साचा । विजयि प्रतापी शोभे राम राजा त्रैलोक्याचा । दिव्य आत्म सिंहासनिं जीवन जीवांचा ॥ना०॥१॥
नाहींच अटक बंध, मुखें गाउनी प्रबंध । नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद । अयोध्योमाजी आनंद, प्रेम राघवाचा नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद । अयोध्येमाजी आनंद, प्रेम राघवाचा ॥ ना०॥२॥
न विसरतां नावेक, दृश्य देखतांचि देख । करितो आत्म विवेक, कृष्ण जगन्नाथ लेंक । सेवितो विष्णु राम एक, नित्य वैभवाचा ॥ना०॥३॥

पद १९५ वें.
चला चला पाहुं राम राजा अयोध्येचा । आजि सुदिन सोन्याचा, भाग्योदयचि आमुचा ॥धृ०॥
दिव्य सिंहासनीं शोभे, भव्य दश वदनारी । सव्य भागीम लक्ष्मण वामांकीं जानकी नारी । श्यामल सुदंर पूर्ण सागर दयेचा ॥पा०॥१॥
रत्न जडित माथां, मुकुट कुंडलें कानीं । गळां वैजयंती माळा, पितांबर परिधानी । पूर्ण ब्रह्मानंद दाता विजय श्रीयेचा ॥पा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, नित्य आत्म भजनांत । होउनि आनंदमय नाचे संत सज्जनांत । नाम संकीर्तनाविण वय हें न वेंचा पा०॥३॥

पद १९६ वें.
न येसि कां रे अजून प्रभु जानकि जीवना । जगदवना, सुख भवना ॥न०॥धृ०॥
पाप जनित हे त्रिताप गांजिति, माझि मति पहा कशि । जिकडुन्‍ तिकडून्‍ मज सोसवेना ॥न०॥१॥
न सुचे कांहिं उपाय, हरिं हे अपाय, काय पाहसी गम्मत्‍ । हटकुन्‍ पकडून्‍ करिं शत्रु हवना ॥न येसि०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, दावि निज पाय मज । माय बाप तूंचि तुज, हुडकून्‍ मांडिलें स्तवना ॥न येसि०॥४॥

पद १९७ वें.
पुरवि मनाची तान, राम आनंद निधान । नुरवि देह भान ज्याचें ध्यान छान छान ॥धृ०॥
विश्रांतीचें स्थान दे मज सुख समाधान । नाहीं ज्या समान, व्यापक आन मान मान ॥पुरवि०॥१॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ निजानुसंधान । धरितां भगवान्‍, करवि अमृतपान्‍ पान्‍ ॥पुरवि०॥२॥

पद १९८ वें.
तूं झहकरिं ये श्रीरामा रे । तूं झडकरिम ये श्रीरामा रे श्रीरामा रे, श्रीरामा रे ॥तूं०॥धृ०॥
विषय वासना संग करी मनोभंग, निजात्मा रामा रे । नाम रुपात्मक देहभाव हरीं, भेट देउनि सुखधामा रे । सुखधामा रे । सुखधाम रे ॥तूं०॥१॥
त्रिविध ताप मज जाचवि हे मति, कांचचि मेघश्याम रे । नाचविते अति चित्त निरंतर, कल्पुनि स्त्रीधन कामा रे । धन कामा रे । धन कामा रे ॥तूं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ शरण मी, दावी पद स्वयंधामा रे । या मानव जन्मीं भजन रहित, जाऊं काल न रिकामा रे । न रिकामा रे । न रिकामा रे ॥ तूं झड ०॥३॥

पद १९९ वें.
धरुनि आलों आपुल्या प्रेमा ॥ गा श्रीरामा ॥ मेघश्यामा ॥ करुणा दृष्टीं मजकडे पाहे ॥ गा श्रीरामा मेघश्यामा० ॥धृ०॥
जन्मुनि जन्मुनि वारंवार । करितां श्रमलों हा संसार । पुरे झाला जीव बेजार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥१॥
आपण अखंड सुख साचार । नकळुनि किती भ्रमलों अनिवार । माझा मज कळला अविचार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०ध०॥२॥
नेणुनि नित्या नित्य विचार ॥ मी तव अन्यायी हा फार । आत्मज्ञानें करिं उद्धार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥३॥
तुजसम त्रिजगीं नाहिं उदार । आतां करिं इतका उपकार । शाश्वत चरणीं देईं थार । गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥४॥
सच्चित्सुख हेमालंकार । नटसी विश्वात्मक अवतार । विष्णु कृष्ण जगन्नाथाकार ॥ गा श्रीरामा  मेघश्यामा०॥धरु०॥५॥

पद २०० वें.
येईं रे येईं रे वेगीं येईं रे श्रीरामा । कां रे अजुनी अंत पहासी, संत मनोविश्रामा ये०॥धृ०॥
निष्ठुर नव्हसी कधीं आयकों पुराणीं । मक्त जनाची कळवळ ऐसी, गर्जे व्यास वाणी ॥येई०॥१॥
तुजवीण माझें निज सुख बोलवेना । भजन पुजन नित्य, नेम चालवेना ॥ येईं रे०॥२॥
किती आठवूं या खोटया जाणुनी प्रंपचा । तोटा आयुष्याचा न सरे, मोठा कर्म संचा ॥येईं रे०॥३॥
 विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरे निज नामा । या मानव जन्माचें साधन, आपण मुखधामा ॥येई रे०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP