मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे १२१ ते १३३

श्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे १२१ ते १३३

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद १२१ वें. ( राग व ताल सदर )
गुरु दत्त चरण चिंतुनि मनिम तृप्त हो सदा ॥धृ०॥
विषय हें विष सुख न निमिष दे मला कदा । जनिं स्मृति हर पद निरंतर स्मरुनियां करूं धंदा ॥गु०॥१॥
नवविधा भक्तियोगें जीवन्मुक्ति वारि आपदा । नारीनर ऐसा करुनि विचार हरूं भव कंदा ॥गु०॥२॥
अनंत सुकृतें भेटला मनुष्यजन्म एकदां । दत्त विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथ सेवितो ब्रह्मानंदा ॥गु०॥३॥

पद १२२ वें. ( मन बैरागी मोरा रे, या चालीवर. )
श्री नरसिंह सरस्वति स्वामी, शरण तुला मी आलों रे ॥धृ०॥
श्रीपाद श्रीवल्लभ देवा नरहरी राया मज नेईं निज पायीं रे । अखंद ठेवीं क्षमा करुनि कांहीं जरि अपराधी झालों रे ॥श्री०॥१॥
सुरवर गण संस्तुत करुणामुर्तें दुस्तर भवनिधि पासुनि त्राहीं रे । बिचारितांही न कोणि मजला पाही तुजविण मनीं बहु भ्यालों रे ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मजला रक्षीं मारुनि शत्रु साही रे । सर्वांग दाही करावा न सुचे उपायीं नेणुनि विषय विष प्यालों रे ॥श्री०॥३॥

पद १२३ वें ( जलभरन जात० या चालीवर. )
नरसिंव्ह सरस्वति गुरुयतिवर कर ठेउनि शिरीं वर देईं सुखकर ॥धृ०॥
परत परत मन फिरत विषय सुखीं । जरि न धरित करिं निजपदिं स्थिर ॥न०॥१॥
चरण दाउनि तव स्मरण करविं मज । तरविं भवजलधि जनीं स्मृत हर ॥न०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ जोडुनि कर मागत । ब्रह्मानंदा माजीं रत करिं निरंतर ॥न०॥३॥

पद १२४ वें. ( रागजिल्हा तालत्रिवट. )
नरसिंव्ह सरस्वति स्वामी नरहरे । करिं निज कृपा जलधर वृष्टि निरंतर ॥धृ०॥
रमतां विषयीं मन भ्रमत भोगुनि दु:ख । श्रमत विविध तापें जिव तळमळ हर ॥न०॥१॥
जनक जननि तुझी कनक सदृश दिप्ति । सनक सनंदनादि ध्याति आत्म हितकर ॥न०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ व्हावया स्वरुपीं रत । द्यावी भक्ती अखंडित अभय वरदकर ॥न०॥३॥

पद १२५ वें. ( राग व ताल सदर )
भेटसि कधीं नरसिंव्ह सरस्वति स्वामी । शरिर हें क्षणभंगुर धरवेना मनीं धीर ॥धृ०॥
दत्त दिगंबर करुणा सागर । नसुनि निष्ठुर ऐसा लविलसि कां उशीर ॥भे०॥१॥
भव व भयंकर वाटुनि निरंतर । तुझी आठबण येतां नयनीं सुटतें नीर ॥भे०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ चरणिं ठेविन माथा । दर्शनें होईल माझें चित्त आत्मपदीं स्थिर ॥भे०॥३॥

पद १२६ वें. ( नमो भक्त सुरतरलते० या चालीवर )
श्रीदत्तात्रेय गुरु अवधूता ॥धृ०॥
दत्तगुरु नरसिंव्ह सरस्वति गुरुवरा सुंदरा दुर्भराला हरा स्तविति निर्जर तुज निरंतर तूंचि हितकर मोक्षप्रद ॥श्री०॥१॥
दावि मज निज पाय या भवसागराला तराया जरा शीकरा विषयिं बळकत चित्त मळकत चित्सुख निकट नेणिजे पद ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मीपणा कातरा ना करा द्या वरा उद्धरा येइं सत्वर ठेविं शिरिं कर लविं न उशिर कंठ सद्नद ॥श्री०॥३॥

पद १२७ वें. ( रागयमन कल्याण तालत्रिवट )
गुरु नरसिंव्ह सरस्वति पाहुंया । करुनियां त्वरा वेगें गाउंया ॥धृ०॥
हरुनि देह मीपण दाविल निजात्म खुण । लक्षुनि अखंड गुण गाउंया ॥गु०॥१॥
औदुंबर कल्पतरु तेथें वसति श्रीगुरु । सन्मुख जोडुनि कर राहुंया ॥गु०॥२॥
दत्त विष्णु गुण गाथा प्रिय कृष्ण जगन्नाथ । सद्‌गुरुचरणी माथा वाहुंया ॥गु०॥३॥

पद १२८ वें. ( राग व ताल सदर )
नरसिंव्ह सरस्वति पाहिला । सिंहासनावर शोभे तरुतळवटिं ॥धृ०॥
धन्य वृक्ष औदुंबर, जेथें दत्त दिगंबर । नारद तुंबरादिकीं गाईला ॥न०॥१॥
नारीनर घेती भेटी, भाव भक्ति बळ नेटी । चला जाउं कृष्णातटीं राहिला ॥न०॥२॥
दत्त विष्णु हा त्रैमूर्ति दृष्य द्रष्टा ज्याची स्फूर्ति । कृष्ण जगन्नाथें चित्तीं वाहिला ॥न०॥३॥

पद १२९ वें. ( रागजिल्हा. तालत्रिवट )
शरण गुरुराज तुला स्वामी । भक्ति अखंडित दे अंतर्यामीं ॥धृ०॥
श्री नरसिंव्ह सरस्वति नरहरि राया । प्रपंच हा भला न वाटतो मजला । अघटित वय निश्चय विषय दुराशा । निजात्म भेटीचा बहु नेट लागला । पुरवि मनोरथ ठेवुनि सुख धामीं ॥श०॥१॥
संग रहित निस्संग मनें निश्चळ स्वरुपचि व्हाया । किति ग्रंथ वाचिला विवरुनि घोंकिला । तरि झोंक अधिक मी ज्ञाता । विषयीं चंचळ मज कां असा करुनी टांकिला । नाठवूं कधिं देह ह्मणुनियां हा मी ॥श०॥२॥
अभय वरप्रद ठेविं शिरीं कर । नरहरे काय उगला अजुनि राहिला । विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझ्या छंदें निर्लज्ज जाहला । सर्वत्रीं पाहिला निरहंकृतिनें जोडीं निजधामीं ॥श०॥३॥

पद १३० वें. ( रगजिल्हा. तालत्रिवट )
भला रे नरसिंव्ह सरस्वति आला । आत्मपदीं रमवि जिवाला ॥धृ०॥
भस्म चर्चित काया पादुका शोभति पायां । कंठीं दिव्य रुद्राक्षांच्या माला ॥भ०॥१॥
दंड कमंदलु करिं भव्य जटाजूत शिरीं । दर्शनें आनंद भारीं झाला ॥भ०॥२॥
दत्त विष्णु सिंव्हासनीं पाहिला निज नयनीं । कृष्ण जगन्नाथ वंदी त्याला ॥भला०॥३॥

पद १३१ वें ( रागतिलंग तालत्रिवट )
नरसिंह सरस्वति यतिराज भेटले आजि मला । गुरुपद सजिव सुखीं लंपट जीव हा रमला ॥धृ०॥
सेविन असंग मनी अभंग महानिज भला । आनंद समुद्र होईन क्षुद्र सांडूनि विषय जला ॥न०॥१॥
दत्तगुरू विष्णुच्या पदीं चित्त लावूनियां बसला । कृष्ण जगन्नाथ ह्लदयीं शद्ध सद्‍गुरुंचा डसला ॥न०॥२॥

पद १३२ वें. ( चालहरि भजनावीण काळ घालवूं नकोरे )
दत्त विष्णु गुरु नरहरि राम एक झाला । सच्चित्सुख आपण हा अनुभव जयीं आला ॥धृ०॥
करितां संसार काम । आठवतें नित्य नाम । तेंचि ब्रह्मानंद धाम । पाववी जिवाला ॥द०॥१॥
द्रष्टा हें दृष्ट सकळ । नटला तरि स्थिति अविकल । नुरवुनि अज्ञान पटल । स्वस्वरुपीं विराला ॥द०॥२॥
दत्त विष्णु गुरु नरहरि । राम नाम जप अंतरिं । कृष्ण जगन्नाथ वरी । अद्वय भजनाला ॥द०॥३॥

पद १३३ वें. ( भजनी चालीवर )
श्रीगुरु दत्तात्रेय दत्तात्रेय तोचि दाशरथि राम ॥धु०॥
एकत्वें मज अनुभव आला । अखंड जपतां नाम ॥श्री०॥१॥
श्री नरसिंह सरस्वति स्मरतां । भेटे निज सुखधाम ॥श्री०॥२॥
विष्णु गुरु कृपा कृष्ण जगन्नाथा । फळली निष्काम ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP