मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ८१ ते ९०

श्री रामाचीं पदें - पदे ८१ ते ९०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद ८१ वें
तूं रामकृष्ण हरि मुखीं गाई रे । यासि कोणाचें कांहिं भय नाहीं रे ॥ सांग लाजसि कशास । जन हांसतिल वाटे कीं मी झटलों अशास ॥या०॥धृ०॥
आईबाप बोलतिल या साठीं रे । तूम थरथर कांपसि पोटी रे । काय करिसि तूं चोरी । उणेपणा पावे थोरी ॥या०॥१॥
जिकडे तिकडे सोयरीं धायरीं आमचीं मोठीं रे । त्यांसि कळेल किं मारितिल सोटीं रे । किंवा घरची नष्टीं भारीं । जावय पुत्र कन्या नारी ॥या०॥२॥
नको येउं देउं क्रोध मनामाजी रे । प्रश्नोक्ति हे समजेल सुज्ञ जिंवां माजी रे । सुंदर मनुष्य तनु भजनानंदाविण आयुष्य व्यर्थ जाई रे ॥या०॥३॥
प्रेमें वाजवितां कर टाळी हातीं रे । तरि कोण पहातिल येथें मातें रे । ऐसें दचकुनि मन । मी न करिंच भजन ॥या०॥४॥
प्रेमें गाउनि वाजवुं कर टाळी रे । तुज रक्षिल श्रीराम वनमाळी रे । प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथ । होइल सहाय ॥या०॥५॥

पद ८२ वें
नयनिं राम पाहुनि आनंद झाला ॥धृ०॥
शामल सुंदर मूर्ति मनोहर । दर्शनोंचि जिव माझा धाला रे ॥न०॥१॥
सच्चित्सुखमय आपण जो अद्वय । त्याचा अनुभव मज आला रे ॥न०॥२॥
धन्य धन्य आजिचा दिवस माझा सोनियाचा । कल्पनापुंज निमाला रे ॥न०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ जाणे ही सकळ मात । उरों नेदी ठाव भवाला रे ॥न०॥४॥

पद ८३ वें
जीव जीवन राजीवनयन माझि मनिच्छा पूरक राम । दूर करुनि संशय मी पाहिन, गाइन मज भव पारक राम ॥धृ०॥
कायिक वाचिक मानसीक खरा, निश्चय माझा तारक राम । राजाधिराज रामचंद्र परमात्मा जगोद्धारक राम ॥जी०॥१॥
पिंवळा पितांबर सांवळा सुंदर आवळावा मनहारक राम । कोटी सूर्य तेजोमय अगणित, लखलख सुखकारक राम ॥जी०॥२॥
गार होय मति आनंदभरें, ठसतां ह्लदय विदारक राम । बसतां उठतां धंदा करितां, अखंड मनिचा स्मारक राम ॥जी०॥३॥
साचें त्रिजग नगाचें अद्वय, अधिष्ठान चित्कनक राम । सनक सनंदन ध्याति वंदिति, मानिति जननि जनक राम ॥जी०॥४॥
वानिति सुरनर कमलज शंकर, ध्याति सदा निष्कलंक राम । विष्णू कृष्ण जगन्नाथाचा, संकट विघ्न निवारक राम ॥जीव०॥५॥

पद ८४ वें
वैष्णव सद्नुरु निजला माझा रे । चिद्रत्नासनिं वीराजे आपण राजा रे ॥धृ०॥ लक्ष लक्ष्मण चिच्छक्ती जानकि भजा रे । दृष्ट अयोध्येचा साक्षी भक्त काजा रे ॥वै०॥१॥
विवेक मारुति दीन सदा राम पदाला रे । कृष्ण जगन्नाथ घे आंगें दर्शनाला रे ॥वै०॥२॥

पद ८५ वें
रामा दयाघना क्षमा करुनि मज पाहीं । जरि बहु अपराधी खराचि मी अन्यायी । तुजविण पहातां रे पहातां रे पहातां रे संसारीं सुख नाहीं, निमिषभर कांही निमिषभर कांहीं ॥रा०॥धृ०॥
कोठिल कोण मी न जाणिला हा पत्ता । आजवरि अज्ञानें मिरवीली विद्वत्ता । देहात्मत्वाची स्थिति झाली उन्मता । येउनि जन्मा रे, व्यर्थ श्रमविली आई, हेंच मनि खाई ॥रामा०॥१॥
नाथ अनाथ तूं माय बापही तैसा । परि मी उद्भवलों पतीत पापी ऐसा । तरि निज नामाचें महत्व सांडिसि कैसा । पावन नामा रे, जाच देति रिपु साही, सा़च वपु दाही ॥रामा०॥२॥
करुणा सागरा राघवा रघुराजा । विषयीं पांगला नका करूं जिव माझा । भजनीं चांगला मिळवीं साधु समाजा । भुलुनि प्रपंचा रे, श्रमुनि भ्रमुनि ठायिं ठायीं, ह्लरुनि वय जाई ॥रामा०॥३॥
सच्चित्सुख तो तूं परब्रह्म केवळ । विश्वीं व्यापला तरंगिं जैसें जळ । अवतरतोसि हें उपासकाचें बळ । भक्तजनांला रे, चित्र विचित्र उपायिं, सतत सुखदायी ॥रामा०॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ तुझा मी लेक । चरणीं शरण दे स्मरण आपुलें एक । हातीं संतांची सेवा घडविं अनेक ॥ जगदभिरामा रे, मानस हें तव पायीं, जडविं लवलाहीं ॥रामा०॥५॥

पद ८६ वें
विश्वाचा विश्राम रे । स्वामी माझा राम रे । आनंदाचें धाम त्याचें, गाऊं वाचे नाम रे ॥धृ०॥
चिद्रत्नाची खाण रे । एकाकीं जाण रे । प्राणाचाही प्राण माझा । गडया तुझी आण रे ॥वि०॥१॥
देवाचा जो देव रे । तो हा स्वयंमेव रे । अलक्ष्य लक्षुनी साक्षी । घेऊं अंगें खेव रे ॥वि०॥२॥
शिवाचा आराम रे । भक्त पूर्ण काम रे । मुक्त योगीजन गाती । जयासी निष्काम रे ॥वि०॥३॥
मिथ्या हे अनेक रे । सत्य राम एक रे । विष्णु कृष्ण जगन्नाथ । करी हा विवेक रे ॥वि०॥४॥

पद ८७ वें
ऐसा उपकार कैसा विसरूं श्रीरामा । बहुत भाग्यें भेटलासी देवा निजसुखघामा ॥धृ०॥
दुर्लभ हे नरतनु देउनियां आह्मां । भक्तिमार्गें लवियलें पूर्ण परब्रह्मा ॥ऐसा०॥१॥
घडी घडी कळविसी आपणचि सार ॥ बळवुनी वृत्ति देसी आत्मपदी थार ॥ऐसा०॥२॥
विषय जनित सुख दु:ख समजाया । भली युक्ति केली विस्तारुनि मिथ्या माया ॥ऐसा०॥३॥
धन्य हा प्रप्मच केला आत्मदृष्टि सारा । अखंड आनंद दाटे करितां विचारा ॥ऐसा०॥४॥
तुजविण देव दयाघन नाहीं कोणी । आत्मभावें कृष्ण जगन्नाथ लोटांगणीं ॥ऐसा उपकार०॥५॥

पद ८८ वें
आला राम, मेघश्याम, सुंदर भक्त मनोविश्राम ॥धृ०॥
टिळक रम्य कस्तुरी कपाळीं । मदन मनोहर मूर्ति सांवळी । भजकां जो सप्रेम आंवळी । पूर्ण करुनियां काम ॥सुं०॥१॥
रत्नजडित शिरिं मुकुट विराजे । श्रवणि कुंडलें लखलख साजे । जनक जननि जो त्रिभुवन गाजे । अखंड ज्याचें नाम ॥सुं०॥२॥
कंज नयन भव भंजन रघुविर । संत साधु मनरंजन रघुविर । आंजनेयसह जानकिचा वर । शिवगौरी सुखधाम ॥सुं०॥३॥
चाप बाण धर त्रिविध ताप हर । कांपति ज्याला योद्धे दुर्धर । जय जयकारें गर्जति वानर । समर्थ ज्याचें नाम ॥सुं०॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाचा । भजनी लंपट स्वभाव साचा । अखंड नाम स्मरणें नाचा  होइल विपद विराम ॥सुं०॥५॥

पद ८९ वें
रघुराय रघुराय मज दाखविं रे निजं पाय ॥धृ०॥
काय करिसि कोणा ठायीं आमुचा । जनक आणि तूं माय ॥मज०॥१॥
सार नसुनि संसारीं विटलों । दार पुत्र धन चिंतुनि सुकलों । प्रापंचिक व्यवसाय ॥मज०॥२॥
तारक पतितोद्धारक तूं तरि । पारक जन सुखकारक श्रीहरि । जन न भजन वय जाय ॥मज०३॥
फार दुष्ट समुदाय व्यापला । भार हरक अवतार आपुला । अजुनि उशिर तुज कय ॥म०॥४॥
वारंवार किति विनवुं आपणा । गार करीं मति हरुनि मीपणा । नुरउनि सर्व अपाय ॥म०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझा । आठव अंतरि देवचि न दुजा । न सुचति अन्य उपाय ॥रामा मज०॥६॥

पद ९० वें
सकळ जन भाग्य उदय झाला, अयोध्ये रामचंद्र आला ॥धृ०॥
जन्मोजन्मिचें पुण्य कोटी । तयासची होय राम भेटी । वधुनि रावणादि दुष्टांला ॥अ०॥१॥
थाट सुग्रिवादि वानरांचे । नाचती सन्मुख रामाचे । अशा ह्या साधुं पर्वकाळा ॥अ०॥२॥
साधु सद्भक्त संत येती । कीर्तनीं गजर थाट करिती । प्रेमानंद समस्तांला ॥अ०॥३॥
धन्य आजि दिवस सोनियाचा । पाहिला थाट कीर्तनाचा । नित्य जन घेति दर्शनाला ॥अ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाची । आवडी ह्लदयिं पूर्ण साची । न सोडी प्रेमळ भक्तांला ॥अ०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP