समर्थ रामदासस्वामी रचित - विद्यानिधान गणराज विराजता...

पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.


विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळ पाहे ।
विघ्नांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरी न साहे ॥१॥
गंडस्थळें झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।
शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ॥२॥
फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।
साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ॥३॥
वीतंडसा बलवंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।
अंदूस तोडरगुणें करितो चपेटा । गर्जिन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा ॥४॥
घ्यानीं धरील नरकुंजर बुद्धिदाता । त्याची फिटे अवलिळा सकळैक चिंता ।
आधीं गणेश सकळां पुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा अवजा न लागे ॥५॥

[करुणास्तोत्रें : १]

गजवदन विराजे रंगसाहित्य माजे । रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।
फरश कमळ साजे तोडरीं ब्रीद गाजे । सिद्धि बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजें ॥१॥
गजवदन सुरंगीं रंगसाहित्यरंगीं । नटवर नटनाटयें नाटयनट्वांगसंगी ।
अभिनव नटलीळा रंगणीं रंग माजे । चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ॥२॥

[गणेशशारदासद्‌गुरु]

गजमुख सुखदाता मानसीं आठवावा । मग विमळमतीचा योग पुढें करावा ।
सुरवर मुनि योगी वंदिती घुंडिराजा । सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ॥१॥

[विमळ विवेक]

तनू वितंड चंडसी । प्रचंड शुंड दंडसी ।
सुरंग रंग रेखिला । घवघवित देखिला ॥१॥
नमूं गणेश तो गुणी । विराजतो विभूषणीं ।
जनासि सौख्यकारकू । विशाळ विघ्नहारकू ॥२॥

(लघु रामचरित्र)

ॐ नमोजि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाम्सुन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरुनी ॥२॥
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणि विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥३॥
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कांपती बापुडीं ।
होऊन जाती देशधदी । नाममात्रें ॥४॥
ह्मणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर ।
आदिकरुनी हरिहर । अमर वंदिती ॥५॥
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धि ।
आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥६॥
जयाचें आठवितां घ्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनिया मन । पांगुळे सर्वांगीं ॥७॥
सगुण रूपाची ठेव । महालावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥८॥
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदें डुल्लत ।  
ह्ररुषें निर्भंर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥९॥
भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥१०॥
नाना सुगंध परिमळें । थबथबां गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्‌पदकुळें । झुंकराशब्दें ॥११॥
मुर्डीव शूंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्षणा मंदसत्वी ॥१२॥
चौदा विद्यांचा गोसावी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥१३॥
रत्नखचीत मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फाकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥१४॥
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघुलघु ॥१५॥
लवथवित मलपे दोद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्करें ॥१६॥
चतुर्भुंज लंबोदर । कासे कासिला पीतांबर ।
फडके दोदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥१७॥
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसल वेटाळी ।
उभारोनि नाभिकमळीं । टकमका पाहे ॥१८॥
नाना याति कुशममाळा । व्याळपरियंत रूळती गळां ।
रत्नजडित ह्रदयकमळा । वरी पदक शोभे ॥१९॥
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥२०॥
नट नाटय कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥२१॥
स्थिरता नाहीं एक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साजिरी मूर्ति सुलक्षण । लवण्याखाणी ॥२२॥
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाऊलें दोनी ॥२३॥
ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबारांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लामा । अष्ट नायका होती ॥२४॥
ऐसा सर्वांगें सुंदर । सकळ विद्यांचा आगरू ।
त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥२५॥
घ्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥२६॥
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥२७॥
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीनाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥२८॥
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजन स्वार्थ । कलौचंडीविनायेका ॥२९॥
ऐसा गणेश मंगलमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछया धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP