मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
संसारिकांस उपदेश २२ ते २५

उपदेश - संसारिकांस उपदेश २२ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२२.
देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥
येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥
लावूनि मोहातें दास्यत्व करविती । अंतकाळीं होती पाठि-मोरे ॥३॥
मायेचे भूलीनें भुललीं सकळें । हें तुज न कळे कटकट ॥४॥
यापरी आयुष्य वेंचेलरे जना । पुढें यमयातना न चुकती ॥५॥
धोतरा देऊनि चोर सर्व हरीती । नामा ह्मणे गति तेचि झाली ॥६॥

२३.
यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥
तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥
ज्याचें विषयावर ध्यान । परद्रव्य परस्त्री गमन । धर्मासी विन्मुखपणा । तें कुळ आपुलें ॥३॥
भावेंविण भक्ति करिती । भक्तिविणें भाव दाविती । त्यांची तुह्मीं फजिती । बहुतां प्रकारें करावी ॥४॥
मंत्रसंचारी जे लोक । देव सांडून देवताउपासक । झोटिंग वेताल खेताल देख । ते सखे बाप तुमचे ॥५॥
लटिके वासनेच्या नवसा । करिती करविती पशुहिंसा । त्यानें बहुत दिवस भरंवसा । दिला आहे ॥६॥
धातकी पातकी गुरुद्रोही । हित सांगतां गुरूसी हेडवी । विष्णुदासावेगळें करून पाहीं । सांगितले तितुके आणावे ॥७॥
नामा ह्मणे एक्या पातकीयाम दंडिताती । नाना विपत्ति काय सांगूं किती । विष्णुसासाचे वंदिती । चरणरज ते यम ॥८॥

२४.
दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतीं ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥३॥
एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ॥४॥
घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥
नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥

२५.
नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥
यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥
शरीराची आशा बाळ हें तारुण्य । अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥
लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार । नेतां यमर्किकर न सोडिती ॥४॥
मायबाप सखी न येती सांगातें । जंव शरीरीं पुरतें बळ आहे ॥५॥
न येती सांगातें सज्जन सोयरीं । वानप्रस्थ ब्रह्मचारी श्रेष्ठ झाले ॥६॥
घेशील तूं सोंग संन्यास आश्रम । सांडोनि घराश्रम न सुटसी ॥७॥
नामा ह्मणे नाम नित्य नरहरी । म्हणतां श्रीहरी तरशील ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP