भक्तवत्सलता - अभंग २६ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२६.
केशिराजा आदि सकळा अनादी । तूंचि कृपानिधि नारायणा ॥१॥
अव्यक्ता अक्षरा सर्व अविनाशा । अगा पंढरीशा  पांडुरंगा ॥२॥
तूंचि ब्रह्मचारी गोपिकांचे घरीं । सर्वस्वें उद्धरी सर्व जीवां ॥३॥
लटिकें दाविसी गोकुळाभीतरीं । नामा ह्मणे शिरीं भार वाही ॥४॥

२७.
अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥
तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥
अनंत जयाच्या सेवा वोजावणी । नामरूप गुणीं नामातीत ॥३॥
नामा ह्मणे अंत असेना जो कांहीं । सांपडतो पाहीं पंढरीये ॥४॥

२८.
देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥
देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥
देव देव करितां शिणलें माझें मन । जेथें जाय तेथें पूजा पाषाण ॥३॥
नांमा तोचि देव ह्लदयीम पाहे । नामा केशवाचे न सोडी पाय ॥४॥

२९.
वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥
हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥
शोभतसे पायीं भक्त ब्रिदावळी । जीवासी सांभाळी दीनानाथ ॥३॥
माझा अभिमान धरून मानसीं । नामा ह्मणे होसी भक्तां साह्य ॥४॥

३०.
करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥
वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥
सूर्य चंद्रादिक घालिती लोटांगण । करी प्रदक्षिणा स्वयें गंगा ॥३॥
नामा ह्मणे ऐसें सांगतां बहुत । वेदशास्त्र ग्रंथ ठकावले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP