पंढरीमाहात्म्य - अभंग ४६ ते ४९

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥
धरितां पंढरीची वाट । पापें पळालीं सपाट ॥२॥
कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥
घेता विठोबाची भेटी । दोष जाती उठाउठी ॥४॥
करितां चंद्रभागे स्रान । सर्व पापा घडे हान ॥५॥
नामा म्हणे रे केशवा । आह्मी करूं तुझी सेवा ॥६॥

४७.
वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे ॥१॥
उदंड उपास कासया करावे । पुरे एका भावें भाविकांसी ॥२॥
तीर्थ क्षेत्र मूळ जाणा वाळुवंट । कटीं कर नीट भक्तांसाठीं ॥३॥
नामा म्हणे माझी वैकुंठ पंढरी । तेथें निरंतरी जन्म देंई ॥४॥

४८.
आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥
नलगे संतति आणि धन मान । एक असे ध्यान विठो-वाचें ॥३॥
सत्य कीं मायिक आमुचें बोलणें । तुझी तुज आण सांग हरि ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळुनी । नामा लोटांगणीं महाद्वारीं ॥५॥

४९.
वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥
वैकुंठीं जाऊनि काय बा करावें । उगेंचि बैसावें मौनरूप ॥३॥
नामा ह्मणे मज येथेंच हो ठेवीं । सदा वास देंई चरणांजवळी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP