मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|

अभंग भाग ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥ प्रश्न ॥ नमो वागेश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्र करी वक्तवासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैसा तो परमात्मा । बोलिजे अनात्मा कवण तो ॥३॥
कोणता प्रपंच कोणें केला संच । मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण ते अविद्या सांगावी ते विद्या । कैसें आहे आद्या स्वरूप तें ॥५॥
स्वरूपीं ती माया कैशी मूळमाय । इशीं चाळवाया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कैसें तें चैतन्य । समाधान्य अन्य कवण तें ॥७॥
कवण जन्मला कवणा मृत्यु आला । बद्ध मुक्त झाला कवण तो ॥८॥
कवण जाणता कवणाची सत्ता । मोक्षही तत्त्वता कोण सांगा ॥९॥
सांगा आम्हां खूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्र दास करी ॥१०॥

॥२॥ उत्तर ॥ नमो देवमाता नमो त्या अनंता । सांगों प्रश्र आतं श्रोतयांचें ॥१॥
श्रोतयांचा प्रश्र जीव तो अज्ञान । जया सर्वज्ञान तोचि शिव ॥२॥
शिवापर आत्मा त्यापर-परमात्मा । बोलिजे अनात्मा । अनिर्वाच्य ॥३॥
वाचा हा प्रपंच मायिक जाणावा । घडी मोडी देवापासोनियां ॥४॥
विषय अविद्या त्याग तो सुविद्या । निर्विकल्प आद्या स्वस्वरूप ॥५॥
कल्पना हे माया सत्त्व मूळमाया । इशीं चाळवाया चैतन्य तें ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य । ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जिवा मृत्यु आला । बद्ध मुक्त झाला तोचि जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता । मोक्ष हा तत्त्वतं ईश्वरचि ॥९॥
ईश्वर निर्गुन चेतवी सगुण । हेचि ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥
दास म्हणे सर्व मायचेचें करणें । रूप सर्व जाणे अनुभवी ॥११॥

॥३॥ प्रश्न ॥ संतसंगें तुज काय प्राप्त झालें । सांग पां वहिलें मजपाशीं ॥१॥
मज पाशीं सांग कोण मंत्र तूज । काय आहे गूज अंतरींचें ॥२॥
अंतरींचें गुज काय समाधान । मंत्र जप ध्यान कैसें आहे ॥३॥
कैसें आवाहन कैसें आवाहन कैसें विसर्जन । कैसें पिंडज्ञान सांगे मज ॥४॥
सांग मज कोण तुझी उपासना मुद्रा ते आसना सांगें मज ॥५॥
सांग पंचीकरण चित्त-चतुष्टय । कैसें तें अद्वय जीव शिव ॥६॥
जीव शिव ऐक्य झाले कोणे रीतीं । सांग मजप्रती अष्टदेह ॥७॥
अष्टदेह पिंडब्रह्मांडरचना । तत्त्वविवंचना सांगें मज ॥८॥
सांग मज भक्ति कैशी ते विरक्ति । सायुज्यता मुक्ति कवण ते ॥९॥
कोण तें साधन कोण तें बंधन । ऐसे केले प्रश्र रामदासें ॥१०॥

॥४॥ उत्तर ॥ संतसंगें मज काय प्राप्त झालें । सांगतों वहिलें तुजपाशीं ॥१॥
मंत्र हा तारक रामनाम एक । गूज हरादिक चिंतिताती ॥२॥
ज्ञान समाधान सगुणाचें ध्यान । निर्गुणीं अभिन्न आपणचि ॥३॥
दृश्य आवाहन दृश्य विसर्जन । तेथें पिंडज्ञान आढळेना ॥४॥
उपासना हरि मुद्रा अगोचरी । सिद्धासनावरी समाधान ॥५॥
पंचीकरण पिंडब्रह्मांड आव-रण । साक्षी तो आपण एकलाची ॥६॥
जीव शिव ऐक्य झालें येणें रीतीं । प्रकृतीच्य अंती द्वैत कैचें ॥७॥
अष्टदेह स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह जाण महाकारण ॥८॥
विराट हिरण्य आणि अव्याकृति । आठवा प्रकृति मूळमाया ॥९॥
एक तत्त्व जाण त्याचें नांव भक्ति । जाणावी विरक्ति संगत्याग ॥१०॥
सायुज्यता मुक्ति तेंचि तें अचळ । साधनांचें मूळ गुरुदास्य ॥११॥
गुरुदास्यें चुके संसारयातना । जाणतील खुणा अनुभवी ॥१२॥
अनुभवेंवीण होय सर्व शीण । निरसले प्रश्र दास म्हणे ॥१३॥

॥५॥ अहो सद्रुरूची कृपा । तेणें दाखवी स्वरूपा ॥१॥
तो हा गुरु परब्रह्म । जेणें केलें स्वयें ब्रह्म ॥२॥
धरा सद्नुरुचरण । जेणें चुके जन्ममरण ॥३॥
अहो सद्रुरु तोचि देव । दास म्हणे धरा पाव ॥४॥

॥६॥ शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज ॥१॥
जो जो प्रयत्न रामावीण । तो तो दु:खासी कारण ॥२॥
शंकराचें हळाहळ । जेणें केलें सुशीतळ ॥३॥
आम्हां तोचि तो रक्षित । रामदासीं नाहीं चिंता ॥४॥

॥७॥ अंतरीं गुरुवचन । बाह्य नापिका वपन ॥१॥
अतर्बाह्य शुद्ध झालों । राम-दर्शनें निवालों ॥२॥
मन मुंडिल्या उन्मन झालें । शिर मुंडिल्या काय केलें ॥३॥
दासें तीर्थविधि केला । रामीं पिंड समर्पिला ॥४॥

॥८॥ माझे मनीं सर्व सुख व्हावें तुज । म्हणोनियां गूज सांगतसें ॥१॥
सांग-तसें हित त्वां जीवीं धरावें । भजन करावें राघवाचें ॥२॥
राघवाचें प्रेम जें करी विश्राम । येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥
जाण बा वचन हें माझें प्रमाण । वासहसें आण राघवाची ॥४॥
राघवाची भक्ति ते माझी विश्रांति । असों द्यावी चित्तीं दास म्हणे ॥५॥

॥९॥ ज्याचें नाम घेशी तेंचि तूं आहेसी । पाहे आपणापासीं शोधोनियां ॥१॥
शोधितां शोधितां मीपणाची नाहीं । मीपणाचें पाहीं मूळ बरें ॥२॥
मूळ बरें पाह नसोनियां राहा । आम्हां तैसे आम्हां सर्वगत ॥३॥
सर्वगत आत्मा तोचि तो परमात्मा । दास अहमात्मा सांगतसे ॥४॥

॥१०॥ जो कां भगवंताचा दास । तेणें असावें उदास ॥१॥
काय देतिल तेंचि ध्यावें । कोणा कांही न मागावें ॥२॥
आशा कोणाची न करावी । बुद्धि भगवंतीं लावावी ॥३॥
सदा श्रवणमननें । आणि इंद्रियदमनें ॥४॥
नानापरी बोधूनि जीवां । आपुला परमार्थ साधावा ॥५॥
रामदासीं पूर्णकाम । बुद्धि दिली हे श्रीराम ॥६॥

॥११॥ बोलवेना तें बोलावें । चालवेना तेथ जावें ॥१॥
नवल स्वरूपाच्या योंगें । जीवपणाचे वियोगें ॥२॥
वाट नाहीं तेथें जावें । जाणवेना तें जाणावें ॥३॥
नसोनियां भेटी घ्यावी । तुटी असोनि पाडावी ॥४॥
रामदासीं दृढबुद्धि । होतां सहज समाधि ॥५॥

॥ अभंगसंख्या ॥७६॥

॥ एकूण नित्यनौमित्तिक विधिसंग्रहसोपान गीतसंख्या ॥२२१७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP