मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|

अभंग भाग २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥ एक घाय दोन खंड । ऐसें बोलावें रोकड ॥१॥
जेणें उठती संशय । तें बोलणें कामा नये ॥२॥
बहविधा झालें ठावें । सत्य कोणीही जाणावें ॥३॥
रामी रामदास म्हणे । एक निश्चयें बोलणें ॥४॥

॥२॥ तोंवरी तोंवरी डगमगीना कदा । देहाची आपद झाली नाहीं ॥१॥
तोंवरी तोंवरी परमार्थ स्वयंभ । जंव पोटीं लोभ आला नाहीं ॥२॥
तोंवरी तोंवरी अत्यंत सद्भाव । विशेषें वैभव आलें नाहीं ॥३॥
तोंवरी तोंवरी सांगे निरभिमान । देहाशीं अभिमान झाला नाहीं ॥४॥
तोंवरी तोंवरी धीरत्वाची मात । प्रपंची आघात झाला नाहीं ॥५॥
रामदास म्हणे अवघेची गाबाळी । ऐसा विरळा बळी धैर्यवंत ॥६॥

॥३॥ प्रपंच त्यागियेला बुद्धि । जडली परमार्था उपाधी ॥१॥
मन होई सावचित्त । त्याग करणें उचित ॥२॥
संप्रदाय समुदाव । तेणें जडे अहंभाव ॥३॥
रामदास म्हणे नेम । भिक्षा मागणें उत्तम ॥४॥

॥४॥ प्रपंच केला तडातोडी । पडली परमार्थजीवडी ॥१॥
सावधान व्हावें जीवा । त्याग केलाची करावा ॥२॥
काम क्रोध राग द्वेष । अंगीं जडले विशेष ॥३॥
रामदासें बरें केलें । अवघें जाणुनी त्यागिलें ॥४॥

॥५॥ नको ओळखीचे जन । अंगीं वाजे अभिमान ॥१॥
आतां तेथें जावें मना । जेथें कोणी ओळखेना ॥२॥
लोक म्हणती कोण काय । पुसतांही सांगों नये ॥३॥
रामदास म्हणे पाही । जेथें कांहीं चिंता नाहीं ॥४॥

॥६॥ तुम्हां आम्हां मुळीं झाली नाहीं तुटी । तुटीवीण भेटी इच्छीतसां ॥१॥
इच्छीतसां योग नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एक स्थळीं । वायां मृगजळीं बुडों नका ॥३॥
बुडों नका आतां सावध असावें । रूप ओळखावें जवळीमच ॥४॥
जवळींच आहे नका धरूं दूरीं । बाह्य अभ्यंतरीं असोनियां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा खेद । नसोनियां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिक संबंधीं । रामदास बोधीं भेटी झाली ॥७॥

॥७॥ अनंताचा अंत पाहावया गेलें । तेणें विसरलों आपणासी ॥१॥
आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गवसेना दोहीकडे ॥२॥
दोहीकडी देव आपणचि आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत । देखतां देखत कळों आलें ॥४॥
कळों आलें भार देखतां विचार । पुढें सारासारविचारणा ॥५॥
विचारणा झाली रामीं रामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें ॥६॥
मुक्त केलें मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी एक ॥७॥

॥८॥ शाहणे म्हणवितां ब्रह्मज्ञानेंवीण । संसाराचा शीण करोनीयां ॥१॥
करोनि संसार रात्रंदिवस धंदा । कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥
चुकलेती वायां तुम्ही कां बंधुहो । अंतरीं संदेही जन्मवरी ॥३॥
जन्मवरी ओझें वाहिलें वाउगें । व्यर्थ कामरंगें रंगोनिया ॥४॥
रंगोनिया कामीं अंतरावें रामीं । दास म्हणे ऊमीं कामा नये ॥५॥

॥९॥ ज्ञान झालें भक्तजना । सांडूं नये उपासना ॥१॥
ऐका साराचेंहि सार । मुख्य सांगतों विचार ॥२॥
हेंचि सर्वांचे कल्यान । मानूं नये अप्रमाण ॥३॥
दास म्हणे अनुभवलें । भजन भगवंताचें भलें ॥४॥

॥१०॥ प्रवृत्ति सासुरें निवृत्ति माहेर । तेथें निरंतर मन माझें ॥१॥
माझे मनीं सदा माहेर तुटेंना । सासुरें सुटेना काय करूं ॥२॥
काय करूं मज लागला लौकिक । तेणें हा विवेक दुरी जाय ॥३॥
दुरी जाय हित मजचि देखतां । प्रयत्न करूं जाताम होत नाहीं ॥४॥
होत नाहीं यत्न संतसंगाविण । रामदास खुण सांगतसे ॥५॥

॥११॥ ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी ॥१॥
आपणासी भेटी झाली बहुतां दिसां । तुटला वळस मीपणाचा ॥२॥
मीपणाचा भाव भावें केला वाव । दास म्हणे देव प्रगटला ॥३॥

॥१२॥ दिसतें नासेल सर्वत्र जाणती । या बोला वित्पत्ति काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न घडे । साकार हें मोंडे दास म्हणे ॥३॥

॥१३॥ मन हें विवेकें विशाल करावें । मग आठवावें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म मनीं तरीच नीवळे । जरी बोधें गळे अहंकर ॥२॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वस्वरूपीं राहतां । विवेक पाहतां नि:संगाचा ॥४॥
नि:संगाचा संग दृढ तो धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥

॥१४॥ आम्हीं सावधान गावें । तुम्हीं सावध ऐकावें ॥१॥
सकळ सृष्टीचा गोसावी । त्याची ओळख पुसावी ॥२॥
स्वयें बोलिला सर्वेशु । ज्ञानेंविण अवघे पशु ॥३॥
दास म्हणे नाहीं ज्ञान । तया नरकीं पतन ॥४॥

॥१५॥ जेणें ज्ञान हें नेणवें । पशु तयासि म्हणावें ॥१॥
जेणें केलें चराचर । कोण विश्वासि आधार ॥२॥
ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्यापरता ॥३॥
अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा ॥४॥
रामदासाचा विवेक । सर्वां घटीं देव एक ॥५॥

॥१६॥ देह आरोग्य चालतें । भाग्य नाहीं न्यापरतें ॥१॥
लाहो घ्यावा हरिभक्तीचा । नाहीं भंवसा देहाचा ॥२॥
देह आहे क्षणभुंगर । तुम्ही जाणतां विचार ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अकस्मात लागे जाणें ॥४॥

॥१७॥ ज्याचेनि जितासी त्यासि चुकलासी । व्यर्थचि झालसि भूमिभार ॥१॥
भूमिभार जिणें तुझें गुरुविणें । वचनें प्रमाणें जाण बापा ॥२॥
जाणें तूं हे गति गुरुविण नाहीं । पडसी प्रवाहीं मायाजाळीं ॥३॥
मायाजाळीं वायां गुंतलसि मूढा । जन्मवरी वोढा तडातोडी ॥४॥
कांहीं तडातोडीं कांहीं तडातोडीं । कांहीं देव जोडीं । आयुष्याची घडी ऐसी वेची ॥५॥
ऐशी वेची बापा आपुली वयसा । दास म्हणे ऐशा काळी घाली ॥६॥

॥१८॥ काय करितें हें मन । साक्ष आपुला आपण ॥१॥
काय वासना म्हणते । आपणास साक्ष येते ॥२॥
मन असे बरगळ । केल्या होतसे विव्हळ ॥३॥
सोडीना हें संसारिक । कांहीं पाहावा विवेक ॥४॥
दास म्हणे सावधान । पदरीं बांधलें मरण ॥५॥

॥१९॥ करुनि अकर्ते होऊनियां गेले । तेणे पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
तोचि धन्य जनीं पूर्ण साधनांनीं । जनीं आणि वनीं सारिखाचि ॥२॥
सारिखाचि जेथें जेथें पालटेना । नये अनुमाना कोणी एक ॥३॥
कोणीएक लोक देहासी पाहाती । अंतरींची गति कोण जाणे ॥४॥
कोण जाणे काय सांगतां मनींचे । जनासि जनासें कळतसे ॥५॥
कळत असे परि अंतर शोधावें । मनासि बोधावें दास म्हणे ॥६॥

॥२०॥ तुम्ही आम्ही करूं देवाच निश्चय । जया नाहीं लय तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापूनि अंतर देव आहे ॥२॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे । अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टीं ॥३॥
ज्ञान देहीं होतां पाविजे अनंता । हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥४॥

॥२१॥ बोलवेन तें बोलावें । चालवेना तेथें जावें ॥१॥
नवल स्वरूपाच्य योगें । जीवपणाचे वियोगें ॥२॥
वाट नाहीं तेथें जावें । जाणवेना तें जाणांवें ॥३॥
रामदासीं दृढबुद्धि । होतां सहज समाधी ॥४॥

॥२२॥ गेलों वस्तूशीं भेटाया । तिकडे ब्रह्म इकडे माया ॥१॥
दोहींमध्यें सांपडलों । मीच ब्रह्म ऐसें बोलों ॥२॥
वस्तु निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अवघें मनाचें करणें ॥४॥ ॥ एकूण अभंगसंख्या ॥१०३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP