पंचसमासी - समास ४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
मागां बोलिलें निरूपण । केलें पाहिजे साधन । तया साधनाचें लक्षण । ऐसें असे ॥१॥
व्हावया ज्ञानाची प्राप्ति । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ति घडलिया मुक्ति । पाठी लागे ॥२॥
मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावया विचार । ऐक बापा ॥३॥
तेथें नऊ पायर्‍या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जी चढतां तुटे श्रम । नि:शेष जीवांचा ॥४॥
तें तूं गा श्रवण । करावें नित्यनिरूपण तया निरूपणाची खूण । ऐसी असे ॥५॥
सज्जन आणि कृपाळू । ज्यास ज्ञान परिमळू । तया संगतीनें मळू । तुटे अज्ञानाचा ॥६॥
अद्वैतचर्चा अखंड । जेथें नाहीं पाषांद । तये संगतीनें बंड । नुरे मीपणाचें ॥७॥
श्रवण करावे ते ग्रंथ । जेथें बोलिला परमार्थ । शृंगार-श्रवणीं अनर्थ । नेमस्त आहे ॥८॥
म्हणोनि तें त्यजावें । जेथें नाना युक्तिलाघवें । भक्ति ज्ञान वैराग्य भावें । घ्यावें आदरें ॥९॥
नाना कथा चमत्कार । नवरसिक अपार । तें त्यजूनिया सार । अद्वैत घ्यावें ॥१०॥
श्रवण केल्याचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तेणें करितां प्रांजळ । आत्मज्ञान होय ॥११॥
सगुण सर्वोत्तमाचें ध्यान । करावें गुणानुवादन । हरिकथानिरूपण । करीत जावें ॥१२॥
या नांव दुसरी भक्ति । ऐक तिसरीची स्थिति । सर्वकाळ आदरें चित्तीं । नाम असावें ॥१३॥
चवथी पादसेवन । पांचवी असे अर्चन । सकळांचें करावें पूजन । विधीप्रमाणें ॥१४॥
सकळवंदन सहावी । दास्यत्व ही सातवी आतां ऐका आठवी । भक्ति कैशी ॥१५॥
सखा देवचि मानावा । अख्मड तोचि आठवावा । भार आभार घालावा । तयावरी ॥१६॥
नववी ते अद्वैत जाण । करावें आत्मनिवेदन । विचार घेतां अभिन्न । मुळींच आहे ॥१७॥
हें नवविध भजन । सायुज्यमुक्तिसाधन । तेणेंकरितां शुद्ध ज्ञान । प्राण्यास होय ॥१८॥
शुद्ध ज्ञानाचे बळेम । अंतरीं वैराग्य प्रबळे । तेणें लिंगदेह मोकळें । होय वासनेसी ॥१९॥
लागे स्वरूपानुसंधान । नाठवे देहाभिमान । विश्रांतीतें देखे मन । तद्रूप होय ॥२०॥
आदिपुरुष एकला । नाहीं द्वैताचा गलबला । संगत्यागें अवलंबिला । शुद्ध एकांत ॥२१॥
तेथें मन पांगुळलें । आपणास विसरलें । आपणास भुलोन गेलें । स्वरूपबोधें ॥२२॥
मी कोण हें नकळे । अवघा आत्मा प्रबळे । तेणें बळें मन मावळे । कर्पूरन्यायें ॥२३॥
तेथें शब्द कुंठित झाला । अनुभव अनुभवीं निमाला । आतां असो हा गलबला । कोणीं करावा ॥२४॥
वाटे एकांतासी जावें । पुन: हें अनुभवावें । उगें निवांत असावें । कल्पकोटी ॥२५॥
नमो वक्तृत्त्वउपाधि । पांगुळली स्वरूपीं बुद्धि । लागली सहज समाधी । हेतुरहित ॥२६॥
गुरु शिष्य एक झाले । अनुभवबोधीं बुडाले । त्यांचे शुद्धीस जे गेले । तया तीच गति ॥२७॥
तुटला स्मसारबंधू । आटोनि गेला भवसिंधू । बुडाला बोधीं प्रबोधू । विवेकबळें ॥२८॥
ज्ञानाग्नि प्रगट झाला । मायाकर्पूर जळाला । विवेकें अविवेक ग्रासिला । तये ठायीं ॥२९॥
झालें साधनाचें फळ । चुकलें जन्माचें मूळ । निष्कलंक आणि निर्मळ । तोचि आत्मा ॥३०॥
दृढ बाणली आत्मस्थिति । मिथ्यत्वें मुरडली वृत्ति । सांगिजेल वर्तनगति । पुढील समासीं ॥३१॥ इति श्री० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP