युद्धकान्ड - प्रसंग दहावा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


तया रावणालगिं देहांत आलें । प्रधानासि बीभीषणें पाठवीलें । तुम्हीं शीघ्र अंत:पुरामाजिं जावें । समस्तांसि तात्काळ घेऊन यावें ॥१॥
प्रभू बोलतां वीर तैसे निघाले । पुढें शीघ्र अंत:पुरामाजिं गेले । समस्तां वधू मार्ग लक्षीत होत्या । उदासीन उद्विग्र चिंतातुरा त्या ॥२॥
तया देखिले ते अकस्मात डोळां । भयातूर त्या कंप सूटे चळाळां । तयांमाजिं मंदोदरी मुख्य नारी । तये सांगती हो निमाला मुरारी ॥३॥
प्रसंगीं तये थोर कल्लेळ जाला । दुखमाजिं तो सौख्यसिंधू बुडाला । भुमीं लोळती रूदती एकवेळा । देहे व्यस्त हाणोनि घेती कपाळा ॥४॥
समस्तां जणींचे महा शब्द जाले । दुखाचे तया योग सर्वै मिळाले । मुखें बोलती थोर कल्लोळ जाला । समस्तां सुखांचा अळंकार गेला ॥५॥
धळी टाकिती ऊर हाणून घेती । धरेना असंभाव्य जाली रुदंती । चिरें फाडिती ते अळंकार गेले । भुमीं लोळती मोकळे केश जाले ॥६॥
पुढें सर्व राजांगना त्या निघाल्या । दशग्रीव जेथें रणामाजिं आल्या । रणीं कांत देखून आकांत केला । बहू पाप हो ओखटा काळ आला ॥७॥
अकस्मात तें सर्व सौभाग्य गेलें । समर्था प्रभू कां उदासीन केलें । समस्तांसि शोकार्णवीं बूडवीलें । असंभाव्य हें दू:ख ठाकूनि आलें ॥८॥
म्हणे राम बीभीषणा जाय आतां । बहूतांपरी तोषतावें समस्तां । निमाल्यावरी वैर कां हो करावें । विवेकेंचि मंदोदरी नीववावें ॥९॥
कृपासागरें वीर तो पाठवीला । अक्रस्मात राजांगनांमाजिं आला । प्रबोधेंचि नानापरी तोष केल्या । समस्तीं जणीं भूवना पाठवील्या ॥१०॥
पुन्हां मागुती वीर तात्काळ आला । म्हणे हो प्रभू पाठवीलें तयांला । वदे मागुता राम बीभीषणाला । रणीं रावणू अग्रि द्या जा तयाला ॥११॥
पुढें ऊठला तो रणामाजिं आला । हुताशीं तया रावणा वीधि केला । समुद्रीं शुचिष्मंत होऊनि आला । नमस्कार केला तया राघवाला ॥१२॥
वदे राम तैसाचि त्या बांधवातें । कपीनाथ सुग्रीव राजा तयांतें । तुम्हीं शीघ्र नैरुत्यआथासि न्यावें । विधीयुक्त भद्रासनीं बैसवावें ॥१३॥
महावीर तींही नमस्कार केले । पुढें सव्य घालूनि तैसे निघाले । सवें चालती ते असंभाव्य सेना । ऋषी देव ते रूढ झाले विमाना ॥१४॥
बहूसाल वाद्यध्वनी घोष जाला । बळीं गर्जती नाद गेला भुगोला । कपीनाथ सौमित्र ते राजभारें । दळें चालिलीं वानरांचीं अपारें ॥१५॥
महादूत वेगीं पुढें पाठवीले । बळें सिद्ध लंकापुरीमाजिं गेले । त्वरें लविले काम पूर्वींच तींहीं । बहू वेग त्या राक्षसां वानरांही ॥१६॥
बहूसाल कामार ते लक्ष कोटी । स्थळें सिद्ध होतां असंभाव्य दाटी । प्रसंगीं तया तांतडी फार जाली । पहाया सुखें लोकमांदी मिळाली ॥१७॥
शिडया पायिंच्या उंच आकाशपंथें । असंभाव्य तें लागलें काम तेथेम । बहू जाणते वेग मोठया बळाचा । पुरीमाजिं तो एक मेळा तयांचा ॥१८॥
कपींच्या करें अल्पशी भग्र जाली । पुरी मागुती सर्वही सिद्ध केली । त्रिकूटाचळीं भव्य चत्वार द्बारें । विशाळें नभासारखीं थोरथोरें ॥१९॥
दिसे रम्य लंकापुरी कांचनाची । बरी पाहतां हांव पूरे मनाची । हुडे कोट गेले नभामाजिं उंची । जगीं धन्य निर्माण केली विरंची ॥२०॥
पहाया गवाक्षें लघू दीर्घ द्वारें । बहूसाल जाळंधरें थोरथोरं । असंभाव्य चर्या गिरी तो विलासे । वरी सर्व रेखाटिलें व्योम भासे ॥२१॥
बहु कोट दामोदरें थोरथोरें । सजे बाहुडया चौक नाना प्रकारें । महा मंदिरें सुंदरें थोरथारें । भुयेरें बरीं वीवरें तीं अपारें ॥२२॥
बहू चित्रशाळा बहू होमशाळा । बहू सुंदरा धर्मशाळा विशाळा । तके थोर वृदावनें पार ओटे । सभामंडपीं देखतां सौख्य वाटे ॥२३॥
बिदी हाट बाजार माडया दुकानें । मठया पर्णशाळा महा यागस्थानें । वनें वाटिका जीवनें ओघ जाती । झरे कालवे वाहती पाट जाती ॥२४॥
ध्वजा गोपुरें शीखरें तीं अपारें । बहू देव देवालयें थोरथोरें । तळीं कूप बावी जळ पूर्ण जालीम । बहूतांपरींचीं स्थळें सिद्ध केलीं ॥२५॥
बळी झाडिती लोटती सर्व शाळा । सडे शिंपिती घाडिती रंगमाळा । सुगंधी बहू गुंफल्या पुष्पमाळा । जळें निर्मळें बैसका त्या सुढाळा ॥२६॥
सुवर्णाचिया रत्नमंडीत भिंती । हिरे पाच गोमेद ते ढाळ देती । सडे शिंपिले कस्तुरी केशरानें । बहूसाल तीं रम्य यानें विमानें ॥२७॥
ध्वजा त्या गुढया तोरणें ऊभवीलीं । पुरी सर्व शृंगारमंडीत केली । पताका निशाणें वरी दिव्य छत्रें । बहू चामरें दिव्य मांर्तडपत्रें ॥२८॥
तया राजद्बारीं बहू दाटि जाली । सभामंडपीं मंडळी ते मिळाली । पुढें रावणानूज शृंगारवीला । विधीयुक्त बैसवीला ॥२९॥
धमामा नभीं दुंदुभीनाद जाला । सुरीं अंबरीं पुष्पर्षाव केला । रघूनायकें सेवका राज्य दीलें । सुरां सोडिलें थोर आन्मदवीलें ॥३०॥
असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । निशाणावरी तो विरीं घाव केला । महावीर संतोषले राज्यतोषें । बहूसाल ते गर्जती नामघोषें ॥३१॥
समस्तांजणांचें बहू पाप गेलें । सुरांचें महा शल्य निर्मूल केलें । यथासांग लंकापुरी ते प्रसंगीं । विरीं वानरीं पाहिली लागवेगीं ॥३२॥
पुढें सर्वहि वीर तैसे निघाले । रघूनायका भेटले स्वस्थ जाले । समाचार ते सर्वही सांगताती । जगन्नायका थोर आनंद चितीं ॥३३॥
म्हणे राम गा मारुती ये प्रसंगीं । अशोकावना जाय तूं लागवेगीं समाचार सांगे तये सुंदरीला । कपीवीर तो शीघ्र तैसा निघाला ॥३४॥
अशोकीं वसे जानकी शोक भारी । अकस्मात तेथेंचि आला वनारी । नमस्कार घालूनि तो बोलताहे । सुवेळे समस्तांस कल्याण आहे ॥३५॥
दशग्रीव संहारला लंकवासी । प्रतापें दिलें राज्य बीभीषणासी । प्रभूनें समाचार हा सांगवीला । तंई जानकी थोर आनंद जाला ॥३६॥
स्तुतीउत्तरें बोलती एकमेकां । सिता तोषली दूरि टाकूनि शंका । म्हणे मारुती हा समाचार नेतों । पुढें जावया शीघ्र जाऊनि येतों ॥३७॥
नमस्कार केला तये जानकीसी । म्हणे रे कपी तूं चिरंजीव होसी । त्वरें चालिला भेटला राघवाला । पुन्हां मागुती पाठवीलें तयाला ॥३८॥
म्हणे गा विरा सांग बीभीषणातें । वना जाउनी आणिजे जानकीतें । दिजे मंगळस्नान नाना प्रकारें । सुगधें फुलेलें अलंकार चीरें ॥३९॥
महावीर ते शीघ्र तैसे निघाले । पहाया सिता सर्वही सिद्ध जाले । बहूसाल वाद्यें दळेंशीं निघाले । कपी लागवेगीं त्रिकूटासि गेले ॥४०॥
सुवेळाचळामाजिं तो रामराजा । पहा तया चालिल्या देवफौजा । मदोन्मत्त ऐरावतारूढ जाला । सुरांशीं सुरेशू पुढें शीघ्र आला ॥४१॥
पुढें शीघ्र मेषारुढ पावकानें । करीं शुभ्र शक्ती तया ताम्रवर्णें । बहू भूषणें देव तो अग्नि आला । सुखे चालिला राम पाहावयाला ॥४२॥
पहा दंडपाणी महामेघ जैसा । तयालगिं बैसावया थोर ह्मैसा । पती दक्षिणेचा तदारूड जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४३॥
नरारूढ होऊनि नैरृत्यनाथें । त्वरें जाइजे धूम्रवर्णें समर्थें । करीं खड्‍ग घेऊनियां सिद्ध जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४४॥
जळाधीश नक्रीं समारूढ जाला । करीं पाश तो शीघ्र घेऊनि आला । सवें सागरांचा समूदाव आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४५॥
निळा वर्ण तो वायु अंकूशपाणी । मृगारूढ होवोनियां नीळवर्णीं । सुताच्या गुणें आवडीनें निघाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४६॥
गदा घेउनी तो प्रभू उत्तरेचा । हयारूढ तो शुभ्र वर्णू तयाचा । महा सुंदरू तो सुधारूप आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४७॥
रुपें कर्दळीसूत तो शूळपाणी । जपे अंतरीं रामरामेति वाणी । महादेव नंदीवरी रूढ जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४८॥
गणेंशीं गणाधीश अंकूशपाणी । चतुर्भूज तो भव्य सिंदूरवर्णीं । महास्थूळ तो मूषकारूढ जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४९॥
सुरांचा गुरू आंगिरा दूसरा तो । प्रतापें कुबंरू धनाचा बळो तो । रथारूढ होऊनि मार्तंड आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥५०॥
विधी मुख्य हंसासनीं सृष्टिकर्ता । तयाचेनि उत्पत्ति हा विश्वभर्ता । ऋषी देव गंधर्वमेळा मिळाला । सुखें चालिले राम पाहावयाला ॥५१॥
गुणी नाचणी गायका स्वर्गवासी । अलापें कळा कूशळा त्या विलासी । दळें भूतळीं चालिले देव कोटी । बहूतांपरी चालिले रामभेटी ॥५२॥
सदाशीव तो शीघ्र भेटीस आला । पदीम चालि तो राम सन्मूख आला । प्रितीने सखे भेटती एकमेकां । तया भेटतां सौख्य जालें अनेकां ॥५३॥
विरंचीस आलिंगिलें राघवानें । बहू सूख तें मानिलें ब्रह्मयानें । पुढें भेटला शक सूखे निवाला । तया मानसीं थोर आनंद जाला ॥५४॥
ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । पुढें राम आलिंगनीं सिद्ध जाले । समस्तांसि तो भेटला रामचंद्र । महीं लोटला सर्वसूखें समुद्र ॥५५॥
सभा बैसली सर्वही स्वस्थ जाली । कथा राहिली पाहिजे चालवीली । रघूनायकें मारुती पाठवीला । त्वरें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥५६॥
पुढें भेटला शीघ्र बीभीषणातें । बहूसाल सन्मानिलें मारुतातें । तयालगिं उंचासनीं बैसवीलें । म्हणे आजि हें भाग्य माझें उदेलें ॥५७॥
सखा वाटसी राघवें धाडिलासी । बहूसाल तें सौख्य जालें मनासी । प्रभूची मला काय आज्ञा करावी । शिंरीं वंदितों मी करन्यास दावी ॥५८॥
पुढें मारुतें मात ते जाणवीली । म्हणे जानकी वैभवें आणवीली । महावीर ते शीघ्र तैसे निघाले । दळेंशी अशोकावनामाजिं गेले ॥५९॥
बहूसाल यानें गजां घोडियांचीं । सर्व चालिलीं दिव्य सूखासनाचीं । महावीर ते सर्व येऊनि मागें । त्वरें वीर ते चालिले लागवेगें ॥६०॥
पुढें भेटते जाहले जानकीला । नमस्कार साष्टांग केला तियेला । अनूवादिजे शीघ्र नैरृत्यनाथें । तुम्हां न्यावया पाठवीलें समर्थें ॥६१॥
तरी जन्ननी शीघ्र आतां उठावें । महा मंगलस्नान आधीं करावें । अळंकार चीरें पुढें सिद्ध केलीं । सुगंधेल तेलें बहू आणवीली ॥६२॥
बहूसाल आनंद तो जानकीला । स्तुतीउत्तरीं गौरवीलें तयाला । म्हणे मारुती जन्ननी मान दीजे । उदासीन बीभीषणाला न कीजे ॥६३॥
कपी बोलतां मान्य ते गोष्टि केली । सवें राक्षसी शीघ्र तैशी निघाली । बहूसाल उष्णोदकें सिद्ध होती । बहू कूशळा राक्षसी माखि ताती ॥६४॥
स्तुतीउत्तरीं माखिलें जानकीला । म्हणे आजिंचा दीन हा धन्य जाला । चिरें सुंदरें कंचुकी रत्नमाळा । सुगंधी बहू घातल्या पुष्पमाळा ॥६५॥
अळंकार भांगार जांबूनदाचे । महीमंडळींच्या नृपाळांत कैंचे । तया मारुतें बैसका सिद्ध केली । जगज्जन्ननी बैसली सिद्ध जाली ॥६६॥
पुढें ठेविलें पात्र दूधाफळांचेम । शकूनार्थ द्यावें म्हणे रम्य वाचें । दिलीं पंचकें दोनि दोघां जणांला । कपी मारुती आणि बीभीषणाला ॥६७॥
जिवाच्या सख्या राक्षसी जानकीच्या । बहू दीस होत्या वनीं संगतीच्या । दिलीं पंचकें दोन दोघीं जणींला । महाशर्म नामें तये त्रीजटेला ॥६८॥
म्हणे जानकी लोभ आतां असावा । उदासीन वाटे बहूसाल जीवा । समस्तां जणांतें फळें पाठवीलीं । मुखें जानकीनें बहू स्तूति केली ॥६९॥
फळें सेविलीं आच्मनें शुद्धि केलीं । पुढें शीबिका ते विरें आणवीली । पताका चिरें सुंदरें दिव्य छत्रें । पुढें विंजणे चामरें तें विचित्रें ॥७०॥
दळें चाललीं दाटणी थोर जाली । सिता शीबिकेमाजिं तैशी निघाली । तुरें सुंदरें गंभिरें वाजताती । असंभाव्य वाद्यें ध्वनी गर्जताती ॥७१॥
महा सुंदरें रम्य दिव्यांबरें ते । वरी सर्व आच्छादिलें शीबिकेतें । पुलस्ती कपी वीर सन्नीध जाती । पुढें वारिती वेत्र घेऊनि हातीं ॥७२॥
अशोकावनींहूनि ते लागवेगें । बहूवीध सन्नीध येती प्रसंगें । सवें चालिले लोक त्रीकृटवासी । पहाया अती आदरें जानकीसी ॥७३॥
सभे बैसला देव कैलासवासी । गणाधीश तो ईश सर्वां गुणांसी । विधी शक्र ते सर्व गंधर्व आले । ऋषी देव तेतींस कोटी मिळाले ॥७४॥
मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । सिता आणितां जाहली थोर दाटी । शतांचीं शतें धांवती वेत्रपाणी । दळें वारिती गर्जती घोर वाणीं ॥७५॥
पहाया सिता वीरमांदी मिळाली । प्रसंगीं तये दाटणी थोर जाली । बळें टाकिती एकमेकांसि मागें । कपी रीस ते धांवती लागवेगें ॥७६॥
झडा घालिती एकमेकां पुढारें । दिसेना पदीं सर्व सेना उभारें । पुढें पाव्हया घालती मस्तकांतें । महा वीर ते हाणिती वेत्रघातें ॥७७॥
कितीएक आकाशपंथीं उडाले । कितीएक ते वृक्षअग्रीं दडाले । कितीएक ते फीरती अंतराळीं । कितीएक ते घोष उल्हासकाळीं ॥७८॥
कपींचीं दळें चचळें फार जालीं । महाभार देखोनि मागें पळालीं । बळी गर्जती थोर घोषें फुराणें । वरी साधती अंतराळीं किराणें ॥७९॥
महाभार देखोनि माहाविरांचे । भ्रमों लागले भार गोळांगुळांचे । दिसेना सिता आर्त पोटीं सरेना । उतावीळ त्यां धीर पोटीं धरेना ॥८०॥
कपी धांवती शीघ्र पाहावयाला । परी रीघ नाहीं पुढें जावयाला । प्रसंगीं महा भार देखोनि दृष्टीं । रघूराज तो बोलिला एक गोष्टी ॥८१॥
सितेकारणें वानरीं कष्ट केले । किती वेळ हे बाणघातें निमाले । उतावीळ पोटीं पहाया सितेला । दिसे स्पष्ट ऐसें करावें तियेला ॥८२॥
महोत्साव यात्रा तथा पर्वकाळीं । विवाहीं युधांतीं तया अंतकाळीं । गृहीं सासर्‍याचे तया जन्नकाचे । नव्हे नित्य ते संगतीं नोवर्‍याचे ॥८३॥
पुढें धाडिलें शीघ्र त्या अंगदाला । म्हणे रे तया सांग बीभीषणाला । म्हणावें बळें आपुलें लोक वारा । पुढें शीघ्र येऊनियां दूरि सारा ॥८४॥
त्वरें धांवला राव त्रीकूटवासी । बहू वारिलें मारिलें मारिलें राक्षसांसी । पुढें काढिले पट्टकूळा सकूळा । दिसों लागली जानकी दिव्य बाळा ॥८५॥
समस्तीं सिता देखिली आदरेंशी । असंभाव्य सौंदर्य लावण्यराशी । तये देखतां सर्व सूखें निवाले । कपी बोलती आजि नि:पाप जालें ॥८६॥
सिता देखती जाहली रामचंद्रा । नमस्कार केला तसाची महेंदा । तया राघवें पाहिलें जानकीला । पुढें भूलतां वक्र आव्हेर केला ॥८७॥
उदासीन ते जानकीलगिं केलें । सभामंडळीं सर्व बेरंग जालें । सभेमाजिं ते बोलती एकमेकां । सितेलगिं आव्हेरिलें राघवें कां ॥८८॥
अवस्था नहू लागली ते प्रसंगीं । बुडाले कपी धीर सर्वै विरंगीं । मुखें बोलती सर्वही कोण वेळा । शिणे मारुती कंप जाला भुगोळा ॥८९॥
सभा बैसली त्या द्बिजाब्राह्मणांची । असंभाव्य सौंदर्यता त्या सितेची । कितेकीं मनामाजिं संकेत केला । तिहीं अंतरीं कल्पिले दोष तीला ॥९०॥
रघूनाथ हा हेत जाणे मनींचा । सदा सर्वदा साक्ष सर्वां जनांचा । जिवांतील जाणे तया चोरवेना । महा पातकी पाप त्याचें सरेना ॥९१॥
म्हणोनी प्रसंगें उदासीन केलें । जनीं कल्पिलें सर्वही व्यर्थ गेलें । म्हणे राम तो जानकीलगिं जावें । स्वइच्छा सुखें त्वां दिगंतीं फिरावें ॥९२॥
प्रसंगीं तये शब्दकाठिण्य रामें । मुखें बोलिजे अर्थभेदें विरामें । अधोमूख सीता विलोकी भुमीतें । मही भीजती जाहली अश्रुपातें ॥९३॥
म्हणे न्याय अन्याय सर्वै बुडाला । दिसे आज कल्पतरू वांज जाला । नसे अल्प अन्याय सर्वै बुडाला । दिसे आज कल्पतरू वांज जाला । नसे अल्प अन्याय ब्रह्मांड केला । वृथा दंड हा कोण धर्मै मिळाला ॥९४॥
मनीं अल्प हे कल्पना कां करावी । म्हणे कल्पिली बुद्धि पोटीं धरावी । बहूसाल बोलेनियां काय आतां । महासौख्य तें पावकें भस्म होतां ॥९५॥
म्हणे  जानकी त्या रिसां वानरांसी । बहूसाल ते कष्ट जाले तुम्हांसी । परी मागुती एक जीवीं धरावें । बहूसाल त्या पावका चेतवावें ॥९३॥
पुढें शीघ्र खाणोनियां कुंड केलें । असंभाव्य त्या पावका चेतवीलें । शिखा धांवती ऊर्ध्व आकाशपंथें । पिडा जाहली खेचरां भूचरांतें ॥९७॥
विरंची हरादीक देवां समस्तां । मनामाजिं ते थोर जाली अवस्था । मुखें बोलती सर्वही कार्य जालें । परी मागुती काय हें विघ्र आलें ॥९८॥
स्वभावेंचि हा वन्हि जाळीत आहे । तयामाजिं हे जानकी केंवि राहे । धडाडीत ज्वाळा पुढें पाहवेना । तया अंतरेंही उभें राहवेना ॥९९॥
मनामाजिं पूजा यथासांग केली । पुढें जानकी पावकामाजिं गेली । तये स्पर्शतां पावकू शुद्ध जाला । निवाला प्रसंगीं तये शांत जाला ॥१००॥
तयामाजिं ते जानकी शोभताहे । समस्तीं सभा लोक त्रैलोक्य पाहे । पुटीं घालिजे पूतळी कांचनाची । तयेहूनि ते दिव्य काया सितेची ॥१०१॥
अळंहार चीरें बहू पुष्पमाळा । सुगंधें तनू चर्चली दिव्य बाळा । जगज्जननी शीघ्र बाहेर आली । सभे देखतां दिव्य सीता निघाली ॥१०२॥
महावीर ते गर्जले नामघोषें । कपीवीर ते तोषले सर्व तोषें । सुरीं अंबरी पुषवर्षाव केला । नभीं दुंदुभीनाद कल्लोळ जाला ॥१०३॥
सिता मुख्य ते पावकामाजिं होती । वृथा रावणें चोरिली हे वदंती । रमा सागरांतूनि नेली हरीनें । तयाचेपरी जानकी राघवानें ॥१०४॥
पुढें जानकी रामअंकीं विराजे । रमा आदिनारायणा जेविं साजे । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ गाजे । कपीवाहिनीमाजिं आनंद माजे ॥१०५॥
जनाच्या मनाकारणें धीर केला । कृपेचा कृपासागरा पूर आला । कृपादृष्टिनें पाहिलें जानकीला । पुढें शीघ्र आलिंगिलें त्या सितेला ॥१०६॥
म्हणे दास हे श्र्लोक रामायणाचे । जरी अल्प सोपेचि नाना गुणांचे । कितीएक पाल्हाळ टाकोनि मागें । कथा चालिली ते पुढें लागवेगें ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP