युद्धकान्ड - प्रसंग आठवा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


सुमित्रासुतें पाडिला इंद्रजीतू । रणीं ग्रासिला काळ जैसा कृतांतू । दळें फूटलीं वीर मागें पळाळे । कितीएक घायाळ लंकेंत गेले ॥१॥
सभामंडपीं वीर घालेनि मेटें । भुमीं पीटिती थोर दु:खें ललाटें । मुखें बोलती इंद्रजीतू निमाला । पुरीभाजिं तो थोर आकांत जाला ॥२॥
त्रिकूटाचळीं मृत्यू आला बहूतां । समस्तांसि संहार हे मूळ सीता । सुपारश्व संबोखितां ते प्रसंगीं । पिशाचापरी ऊठला लागवेगीं ॥३॥
तया रावणा मूर्छना सांवरेना । भुमीं आंग घाली कदा आवरेना । स्त्रियापुत्रकन्यादिकें तोंड घेती । प्रसंगीं तये थोर जाली रुदंती ॥४॥
अशोकावनामाजिं तो शीघ्र गेला । सितेलगिं मारावया सिद्ध जाला । पुढें देखतां ते भयातूर जाली । सुपारश्व धांवोनियां आड आली ॥५॥
बहूतांपरी राव तो बोधवीला । पुढें रावणू क्रोध सांडून ठेला । महावीर दोघे पुरीमाजिं आले । रणीं जावयालगिं ते सिद्ध जाले ॥६॥
पुढें ऊठवीलीं दळें सिद्ध होती । रथी सारथी हस्ति घोडे पदाती । महाविक्रमें चालिलें राजभारें । दणाणीतसे मेदिनी घोरभारें ॥७॥
असंभाव्य तीं सोडिलीं बाणजाळें । कपी टाकिती चंड शीळा उफाळें । महावीर संघट्टले एकमेकां । बळें भेदिती दूरि टाकूनि शंका ॥८॥
महाभार आरंभिला वानरांतें । पुढें बाण कामूक तें सिद्ध होतें । उभा राहिला विक्रमें वीर कैसा । बळें सर्व संहारितो काळ जैसा ॥९॥
बहूसाल तों सोडिलीं बाणजाळें । तुटों लागलीं राक्षसांचीं शिसाळें । असंभाव्य तीं पोकळीमाजिं जाती । पुरे धांव तेथूनियां खालिं येती ॥१०॥
बहूसाल संहार केला दळाचा । करी कोण लेखा तया घायकांचा । रणीं राघवें लविलें घायवारे । पळाले पुरीमाजिं ते थोर मारें ॥११॥
भयें बोलती सांगती रावणाला । रणामाजिं तो सर्व संहार जाला । असंभाव्य तो कोपला पापराशी । पुढें धाडिलें शीघ्र तीघाजणांशीं ॥१२॥
विरूपाक्ष विद्युन्मतू आणि मन्तू । रथारूढ होऊनियां लंकनाथू  । महाशस्त्रसामुग्रिया तो समर्थू । बळें चालिला रुंधिला राजपंथू ॥१३॥
असंभाव्य सेना पुढें आणि मागें । रणामंडळा चालिला लागवेगें । बहूसाल वाघें पुढें एक वेळां । समारंगणीं नाद केला भुगोळा ॥१४॥
रथां घोडियां कुंजरां दाटि जाली । उफाळे बळें चंड सेना निघाली । बहू शस्त्रपाणी बहू छत्रछाया । बळें वोळले मेघ जैसे पडाया ॥१५॥
उभा राहिला रावणू राजभारें । तिघे वीर ते भीडती घोर मारें । पुढें देखितां रावणू सांवरेना । उभा राहतां धीर पोटीं धरेना ॥१६॥
बळें वाइलीं रावणें चंड चापें । बहूसाल ते बाण सोडे प्रतापें । असंभाव्य तीं सोडिलीं बाणजाळें । तुटों लागलीं पादपाणी शिसाळें ॥१७॥
कपी सर्वही छेदिले मुख्य शत्रू । रणामंडळीं गर्जला तो अमित्रू । कपी खोंचलें नेट पोटीं धरेना । पराधिक्य तें सुग्रिवा साहवेना ॥१८॥
बळें हांक देऊन तैसा निघाला । तया पाठिशीं तो विरें वीर आला । कितीएक ते बाड जुंबाड हातीं । कितीएक ते धांवती शृंग घेती ॥१९॥
कितीएक घेऊनियां चंड शीळा । कितीएक फीराविती भिंडिमाळा । कितीएक ते झाडिती शस्त्रधारा । कितीएक घेऊनि आले कुठारा ॥२०॥
कितीएक ते खड्‍ग घेऊनि आले । कितीएक ते शूळपाणी मिळाले । कितीएक लोहार्गळा ते प्रसंगीं । कितीकीं गदा घेतल्या लागवेशीं ॥२१॥
कितीएक घेऊनि आले दशघ्री । कितीएक घेऊनि आले शतध्नी । किती तोमरें पट्टिशेंशीं निघाले । कितीएक ते शूळ घेऊनि आले ॥२२॥
किती फर्शपाणी किती चक्रपाणी । कितीएक ते वीर खट्‍वांगपाणीं । कितीएक आसीलता झाडिताती । कटयारा सुर्‍या वीर घेऊनि येती ॥२३॥
बहूतांपरींचीं बहूसाल शस्त्रें । बहू हांक देती विशाळें वगत्रें । कपीनायका भोंवतीं दाट थाटें । रणीं धांवती वीर ते कड्‍कडाटें ॥२४॥
पुढें रावणें देखिला थोर थावा । असंभाव्य तो सुग्रिवाचा उठावा । कपीचक्र तें घोर अद्‍भूत आलें । मनामाजिं तें थोर आश्चर्य केलें ॥२५॥
कपींचा रणीं लोळ कल्लोळ आला । गजारूढ माहामतू सिद्ध जाला । तया रावणा देखतां युद्ध होतें । बहू मांडला आट त्या राक्षसांतें ॥२६॥
गजारूढ माहामतू शैल जैसा । शिळा टाकितो वीर सुग्रीव तैसा । गजामस्तकीं ते शिळा चंड आली । गरारून तो कुंजरू आंग घाली ॥२७॥
गजा पाडितां छेदिला उष्ट्रदंतीं । बळें चालिला शूळ घेऊनि हस्तीं । म्हणे साहरे साह तूम सुग्रिवाला । सुळा टाकितां वीर वर्ता उडाला ॥२८॥
पुढें शूळ मोडूनियां लागवेगें । गदाघात हाणे तया पृष्टिभागें । महा वीर तो घोर मारें पळाला । रणीं राक्षसां थोर संहार जाला ॥२९॥
विरें वीर राक्षेस ते भग्र केले । कपी धीट ते नीट मारीत आले । तयां देखतां वीरुपाक्षू निघाला । बहूसाल धिक्कारिलें सुग्रिवाल ॥३०॥
पुढें सुग्रिवें बाड जुंबाड हातें । रिपूचे रथीं टाकिलें थोर घातें । वरी पाहतां झाड सन्मूख आलें । विरें बाण टाकूनि छेदून नेलें ॥३१॥
शिळा टाकिली चंड त्या सुग्रिवानें । बळें फोडिली बाणघातें विरानें । पुन्हां राक्षसें घोर संधान केलें । कपी सुग्रिवें तुच्छ मानूनि नेलें ॥३२॥
पुढें सुग्रिवें शृंग त्या आचळाचें । करीं घेतलें अग्र मंद्राचळाचें । बळें टाकिली ते शिळा घोर घातें । विरूपाक्ष तो चालिला मृत्युपंथें ॥३३॥
रणीं राक्षसां पातली मृत्युवेळा । पुढें देखिलें रावणें त्यांसि डोळां । अहा रे कसें काय जालें कपाळा । भयें भूलला पातली कंपवेळा ॥३४॥
पुढें रावणें देखिलें सव्यभागीं । महावीर विद्युन्मतू ते प्रंसगीं । तया बोलला पाहसी काय वीरा । महावीर तो पेटला घोर मारा ॥३५॥
रथारूढ होऊनियां सुग्रिवाला । पुढें शीघ्र पाचारिलें त्या कपीला । शरांचीं शतें टाकिलीं राक्षसानें । विरश्रीबळें राहिलें सुग्रिवानें ॥३६॥
पुढें सुग्रिवें घेतली चंड शीळा । बळें टाकिली त्यासि लक्षूनि डोळां । शिळा फोडिली राक्षसें बाणघातें । बहू कोप आला तया सुग्रिवातें ॥३७॥
शिळा घेतली दूसरी सुग्रिवानें । पुन्हां टाकिली चंड माहाविरानें । तयें राक्षसें फोडिलें त्या शिळेला । महावीर तो धीर देता दळाला ॥३८॥
कपीनाथ सुग्रीव देखोनि ऊणें । बहू कोपला वीर तो कोटिगूणें । बळें लांगुलें घाव हाणे महीला । गदें झेलिलें तोडिलें त्या रथाला ॥३९॥
निमाले गदा लागतां दिव्य घोडे । रथू वीघडे चूर्ण होऊनि मोडे । पडे सारथी दैन्यवाणा उताणा । विरां राक्षसां मूर्छना सावरेना ॥४०॥
रणीं ऊठला वीर तो सिद्ध जाला । गदा घेतली हांकिलें सुग्रिवाला । बळें हाणतां झेलिली त्या कपीनें । पुन्हां हाणिती एकमेकां गदेनें ॥४१॥
बळाचे महावीर दोघे प्रतापी । गदा हाणिती भीडती काळरूपी । गदाघात संघट्टणें वन्हिवृष्टी । जळों लागली पावकें सर्व सृष्टी ॥४२॥
बळें हाणतां भंगलें सर्व कांहीं । गदा टाकिल्या घेतले शूळ तेही । रणीं भीडतां शूळ ते चूर्ण झाले । महावीर ते मल्लयुद्धासि आले ॥४३॥
दणाणा रणामाजिं ते मुष्टिघातें । बळें हाणिती एकमेकां निघातें । कपी सुग्रिवें दीधली वज्रमुष्टी । महावीर तो पाडिला प्रेतसृष्टी ॥४४॥
तया देखतां मंत धांवोनि आला । रणामंडळीं हांकिलें अंगदाला । बहू त्रासिता जाहला घोर वाणीं । तयें अंगदा भेदिलें पंचबाणीं ॥४५॥
तया मूर्छना देखितां जांबुवंतें । महावीर तो तोडिला वृक्षघातें । विरें राक्षसें वृक्ष छेदूनि नेला । रणीं भेदिला ऋक्ष तो मग्र केला ॥४६॥
रणीं भेदिलें देखिलें त्या रिसाला । गवाक्षा विरा थोर आवेश आला । पुढें लक्षिता जाहला राक्षसांतें । बळें ताडिले थोर पाषाणघातें ॥४७॥
विरें शीघ्र पाषाण तो भग्र केला । शरें नीकुरें भेदिलें त्या कपीला । गवाक्षू कपी तो भुमीं अंग आली । तंई अंगदें मूर्छना सावरीली ॥४८॥
करीं सार आसीलतेशीं निघाला । बळें हांक देऊनि सन्मूख आला । कठोरें करें ताडिलें राक्षसातें । महामंतु तो चालिला मृत्युपंथें ॥४९॥
रणामंडळीं शामति जाली रिपूंची । दळें गर्जतीं जाहलीं वानरांचीं । उणें देखतां रावणा कोप आला । प्रतापें रणामाजिं युद्धा निघाला ॥५०॥
रथू लेटिला रावणें शीघ्र काळें । बहूसाल तीं सोडिलीं बाणजाळ । पुढें देखतां राम तत्काळ छेदी । पुन्हां रावणू घोर संधान साधी ॥५१॥
नभीं सोडिले बाण कोटयानुकोटी । असंभाव्य जाली बहू थोर दाटी । महामेघ तो मोकली मेघधारा । रघूनायकें छेदिले ते सरारां ॥५२॥
पुढें रावणू थोर कोपें कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाडी । बहू कोपला तो असूरास्त्र सोडी । तंई चालिल्या त्या नभीं चक्रकोडी ॥५३॥
असंभाव्य तीं चाललीं घोर चक्रें । महा तेज पुंजाळ त्यांचीं वगत्रें । कपीवाहिनीमाजिं ते एकवेळे । तुटों लागलीं वानरांचीं शिसाळें ॥५४॥
पुढें देवगंधर्व अस्त्रांस सोडी । तिहीं तोडिल्या सर्वही चक्रकोडी । रणीं रावणू रुद्रअस्त्रास घाली । शुळामूसळांची नभीं दाटि जाली ॥५५॥
धुधाटें कपीच्या दळामाजिं यावें । तंई योजिलें तें महाअस्त्र देवें । महाथोर माहेश्वरी मूळमंत्रें । तयें सोडिलें सूटलीं वज्रशस्त्रें ॥५६॥
लोहोमूसळें ते गदा शूळ होते । बळें तोडिले पाडिले वज्रघातें । दशग्रीव तो क्षोभला काळ जैसा । तये भेदिलें पंचबाणीं सुरेशा ॥५७॥
रिपूबाण सर्वांग भेदून गेले । दळीं रावणाच्या महा घोष जाले । वपू भेदिली रावणें पंच बाणीं । चळेना रणीं राम तो वज्रठाणी ॥५८॥
रणीं ऊसणें घेतलें राघवानें । दशग्रीव तो भेदिला सप्त बाणें । महा दु:ख जालें तया रावणाला । सुमित्रासुता थोर आवेश आला ॥५९॥
तया अग्रजालागीं घालूनि मागें । महावीर तो चालिला लागवेगें । सुमित्रासुतें बाणघातें निघातें । रिपूसारथी धाडिला मृत्युपंथें ॥६०॥
पुढें मागुतें थोर संधान केलें । रिपूच्या धनूलगिं छेदून नेलें । तया वीर बीभीषणा कोप गाढा । रणीं चालिला चंड वाहून मेढा ॥६१॥
तयें पाडिलें अष्ट तूरंगमांतें । ध्वजस्तंभ तो छेदिला बाणघातें । रथू सारथी सर्वही भ्रग्र केला । दशग्रीव दूजे रथीं स्वार जाला ॥६२॥
महाशक्ति ब्राह्मी तया रावणानें । अनूजावरी टाकिली तैं फुराणें । कडाडीत धांवे महावीज जैसी । करी शेष मागें रिपूबांधवांसी ॥६३॥
सुमित्रासुतें घोर संधान केलें । महाशक्तिनें शीघ्र छेदून नेलें । शरें ताडितां पावका वृष्टी झाली । कितीएक राक्षेससेना निमाली ॥६४॥
रणीं रावणू तो कडाडीत कोपें । सिमा सांडली घोर रूएपं प्रतापें । धुधु:कार सांडीत धर्डीत दाढा । अनर्थासि ऊठावला वीरा गाढा ॥६५॥
महाशक्ति काढूनि मायासुरासी । बहू काळ सन्नीध तैशी विरांची । तयेलगिं त्या रावणें सिद्ध केलें । जयेमाजिं ब्रह्मांड बिंबोन गेलें ॥६६॥
कडाडीत घोषें धडाडीत ज्वाळा । तडाडी नभामाजिं नक्षत्रमाळा । महावीर ते थोर ध कें गळाले । विमानाहुनी देव नेटें पळाले ॥६७॥
सुमित्रासुता लक्षिलें रावणानें । त्वरें टाकिली शक्ति माहविरानें । बळें आदळे ते अकस्मात अंगीं । रणीं वीर सौमित्र तो प्राण त्यागी ॥६८॥
दळीं वानरांचे हाहाकार जाला । महावीर सौमित्र युद्धीं निमाला । कपी वीर नैरृत्य धांवोनि आले । तया भोंवतीं वीर सर्वै मिळाले ॥६९॥
पुढें शोक आरंभिला राघवानें । तया वारिलें शीघ्र बीभीषणानें । म्हणे काय जी स्वामिया कोण वेळा । उभा रावणू तो पिटावा नृपाळा ॥७०॥
सुमित्रासुता मारिलें तो उभासे । कपीवाहिनीं थोर आकांत भासे । प्रभी शोक सांडोनि वेगें उठावें । धनुर्बाण घेऊनियां सिद्ध व्हावें ॥७१॥
रणीं रावणें भेदिला ब्रह्मचारी । मिळाले कपी देखिल्या दैत्यहारी । बळें हांक देऊनि क्रोधें नरेंद्रें । सिमा सांडली रामकाळग्रिरुद्रें ॥७२॥
करीं बाण कोदंड चंड प्रतापी । रणीं रावणा भासला काळरूपी । पुढे देखतां पातली कंपवेळा । उभा राम ग्रासील नेणों भुगोळा ॥७३॥
चळें सूटला रावणा कंप देहीं । भयें भूलला न स्मरे युद्ध कांहीं । पडे चांचरे धांवतां थोर धाकें । पुढें पाहतां राम सर्वत्र देखे ॥७४॥
रणीं पाडिलीं दैत्यकूळें अपारें । तया रावणा लागले घायवारे । बळें झोडितां थोर नेटें पळाला । चळीं कांपतो गर्वताठा गळाला ॥७५॥
रणीं भ्रष्टला तो भयातूर जाला । पुढें रावणू मंदिरामाजिं गेला । समाचार मंदोदरीलगिम बोले । म्हणे आजि युद्धीं बहू कष्ट जाले ॥७६॥
समाचार तो सर्वही सांगताहे । म्हणे काय होणार ते होते आहे । बहूतापरी तूं मला शीकवीलें । परी मूर्ख मीं सर्वही तुच्छ केलें ॥७७॥
करूं काय आतां प्रिये सांग वेगीं । बहू बोलतां जाहला ते प्रसंगीं । त्बरें काळनेमी पुढें पाठवीला । स्वयें शीघ्र ऊठोनि होमास गेल ॥७८॥
पुढें चालिला वीर तो काळनेमी । बहूसाल तो थोर कापट्यकर्मीं । हनूमंत जाईल द्रोणागिरीला । पथामाजिं तो बैसला योग केला ॥७९॥
वने कर्दळी पोफळी नारिकेळी । वनें आंवळी जांवळी रम्य वोळी । बहू वृक्षजाती बहू पुष्पजाती । बहू कूप बावी तळीं ओघ जाती ॥८०॥
वनें पावनें जीवनें भूवनें तीं । सुखें गोमुखें रम्य वृंदावनें तीं । तिरें सुंदरें बांधले सारवाटे । अकस्मात ते देखतां सौख्य वाटे ॥८१॥
रणीं पाडिली वीर सौमित्र जेथें । मिळाले कपी ऋक्ष ते सर्व तेथें । सभस्तां मनीं लागली थोर चिंत्ता । कपी बोलती नासलें कार्य आतां ॥८२॥
पुढें राघवा शोक तो आंवरेना । धरीतां बळें धीर पोटीं धरेना । मिळाली दळें भोंवतीं दैन्यवाणीं । विलापें वदें राम कारुण्यवाणी ॥८३॥
पुढें बोलतां जाहला वैद्य तेथें । प्रभू शोक केल्या पुढें काय होतें । म्हणे औषधी शीघ्र आतां अणाव्या । न जातां निशी सर्व देहीं पिळाव्या ॥८४॥
बहूसाल तो पंथ दूरस्थ आहे । करा वेग हा काळ जातो न राहे । समस्तांकडे पाहिलें राघवानें । कपी बोलते जाहले सर्व मानें ॥८५॥
बळासारिखी बोलिली सर्व सेना । निशीमाजिं तो आचळू आणवेना । रघूनायकें पाहिलें मारुतीला । कपीराज तो शीघ्र ऊदीत जाला ॥८६॥
म्हणे राम गा मारुता ये प्रसंगीं । विरांसारखी शक्ति तूं बोल वेगीं । वदे मारुती स्वामि देवाधिदेवा । गिरी आणितों शीघ्र सांगाल तेव्हां ॥८७॥
तयें बोलतां राघवा सूख जालें । कपीतें प्रतीउत्तरीं गौरवीलें । म्हणे मारुती जाय गा हे प्रसंगीं । गिरी आणिला पाहिजे रात्रभागीं ॥८८॥
म्हणोनि तुवां शीघ्र आतांचि जावें । विरा लक्ष्मणालगिं त्वां ऊठवावें । कपी मारुती वीर तैसा उडाला । अकस्मात तो आश्रमामाजिं गेला ॥८९॥
स्थळें निर्मिलीं रम्य नानापरींचीं । बहूसाल तों भूवनें कूसरीचीं । मुनी बोलती हो दयाळा बसावें । फळें तोय सेऊनि सूखें रहावें ॥९०॥
म्हणे मारुती राहतां पूरवेना । तृषा लागली धीर पोटीं धरेना । मुनीनें तडागा जळा दाखवीलें । जळा सेवितां थोर आश्चर्य जालें ॥९१॥
जळांतूनि धाविन्नली जी विशाळा । विरें मारुतें देखिलें तीस डोळां । मिठी घातली मारुतें चूर्ण केली । तिच्या मेदमांसें भुमीं तृप्त जाली ॥९२॥
निघाली तियेंतून तें दिव्य कांता । निरूपी सुखें सर्व साकल्य वार्ता । म्हणे राक्षसू बैसला कूडभावें । समर्था प्रभो त्यासि आधीं वधावें ॥९३॥
नव्हे मिथ्य साचार हे सांगतों मी । प्रभो धाडिला रावणें काळनेमी । तयें बोलतां मारुती वाड जाला । ऋषी ऊठला शीघ्र युद्धासि आला ॥९४॥
महावीर राक्षेस कैसा कुकमीं । बहूसाल ते साहले काळनेमी । प्रसंगीं तये थोर संग्राम जाला । कपीच्या करें काळनेमी निमाला ॥९५॥
विरें सुंदरीलगिं उद्धार केला । उडाला बळें तो नभामाजिं गेला । गिरीचंद्र टाकूनियां लागवेगीं । कपीवीर द्रोणाचळीं ते प्रसंगीं ॥९६॥
वटा वेढिता जाहला शेष जैसा । गिरी बांधुनी छेदिला शीघ्र तैसा । उडाला नभामाजिं तो लागवेगें । बळें जातसे मारुती व्योममार्गें ॥९७॥
कपी लागवेगें बळें जात आहे । महीमंडळीं तेज हेलावताहे । अयोध्यापुरीमाजिं । रामानुजानें । कपी भेदिला पाडिला एक बाणें ॥९८॥
मुखीं रामनामावळी बोलताहे । महावीर तो त्यास येऊन पाहे । म्हणे कोण तूं सांग आम्हां कपी रे । बहूसाल तूं दीससी साक्षपी रे ॥९९॥
मुखीं रामनामें सखा वाटतोसी । विरा कोण तूं कोठपर्यंत जाशी । म्हणे मारुती वोखटें थोर जालें । सुमित्रासुतालगिं देहांत आलें ॥१००॥
समाचार सांगीतला मारुतानें । मुखें बोलिलें शीघ्र रामानुजानें । कपी कष्टलासी बहू दूर जातां । सुखें बाणमूखावरी बैस आतां ॥१०१॥
त्वरें पाठवीतों विरा शीघ्र जावें । पुढें राहिलें कार्य वेगीं करावें । म्हणे मारुती हें कदाही घडेना । उडाला नभीं लंघितो देश नाना ॥१०२॥
त्रिकूटाचळीं राम तो वात पाहे । विरें वीर तो सर्वही बैसलाहे । अवस्था बहू लागली आवरेना । बहू रात्र जाली कपी कां दिसेना ॥१०३॥
बहू राम तेथें उतावेळ जाला । अकस्मात तों मारुती शीघ्र आला । कपी सर्व आनंदले गर्जताती । प्रभूलगिं सांगावया शीघ्र जाती ॥१०४॥
मनीं चिंतिलें शीघ्र हातासि आलें । तयासारिखें तें समस्तांसि जालें । सुषेणें रसू काढिला औषधीचा । क्षतामाजिं तो ओतिला अमृताचा ॥१०५॥
सुमितासुतालगिं आरोग्य जालें । समस्तीं विरीं मारुता गौरवीलें । त्वरें ऊठिला वीर सौमित्रबाहो । रघूनायकें देखिला दिव्य देहो ॥१०६॥
कपी राम सौमित्र मेळा मिळाला । गिरी मारुती शीघ्र ठेऊन आला । पुन्हां मागुती भेटती एकमेकां । तया देखतां सूख जालें अनेकां ॥१०७॥
कथा ऐकतां नासतें कार्य होतें । महा विघ्र तें भग्र होऊनि जातें । सुखानंद आनंद नाना विलासी । अखंडीत हे प्राचिती रामदासीं ॥१०८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP