युद्धकान्ड - प्रसंग दुसरा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


समुदातिरीं राम राजीवनेत्रें । भुमी सेज दर्भाजनीं तीन रात्रें । बहूतांपरी दीधला श्रेष्ठ मानू । परी सागरू तो नव्हे सुप्रसन्नू ॥१॥
फळें तोय सांडूनियां नित्य नेमें । बहूतांपरीए प्रार्थिला सिंधु रामें । परी नायके जो बळें धुंद जाला । रघूनायका कोप तात्काळ आला ॥२॥
उभा राहिला काळ कृतांतु जैसा । बळें सिंधु जाळावया राम तैसा । दिसे रूप अद्भूत वज्रांग ठाणें । करीं चाप तें सज्जिलें अग्रिबाणें ॥३॥
बळें ओढितां घोरघोषें करारी । दिशा दाटल्या वन्हि शीतें थरारी । भयें बैसला काळपोटीं दरारा । चवों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥४॥
बहू क्षोभला राम जाळूं निवाला । पुढें सिंधु भेटावया शीघ्र आला । म्हणे स्वामि हो थोर अन्याय जाला । समुद्रासि हो शीघ्र पालाण घाला ॥५॥
नळाचेनि हस्तें जळीं चंड शीळा । गिरिशृंग तर्तीला हो जी नृपाळा । वदे निश्चयें आदरें हा समुद्रू । तेणें थोर संतोषला रामचंद्रू ॥६॥
बहूतांपरी राम संतोषवीला । पुढें सिंधु तोही जळामाजि गेला । नळें वानरांचीं दळें सिद्ध केलीं । गिरीशृंग आणावया शीघ्र गेलीं ॥७॥
त्वरें उत्तरें चालिले भार सैरा । बळी धांवती एकमेकां पुढारां । शिळा शीखरें झाडखंडें प्रचंडें । बळाचे कपी चालवीती उदंडें ॥८॥
कपी धांवती लक्ष कोटयानुकोटी । बळें गर्जती थोर आनंद पोटीं । गिरीकंदर देश लंघूनि जाती । शिळा शीखरें शीघ्र घेऊनि येती ॥९॥
निळे पींवळे श्वेत आरक्त काळे । पिके जांभळे गौर जाभे गव्हाळे । बहु रंग पाषाण नानापरींचे । उभे वक्र वर्तूळ गाभे गिरीचे ॥१०॥
कपीवीर ते शीघ्र घेऊनि जाती । बळें मघवाचेपरी वर्षताती । शिळीं सेतु बांधी नळू लागवेगें । असंभाव्य तीं चालिलीं शैलशृंगें ॥११॥
कपी मोडिती वाड झाडें कडाडां । कडे पाडती पर्वतांचे खडाडां । उडया घेति आकाशपंथें धडाडां । बळें टाकिती सिंधुमव्यें थडाडां ॥१२॥
विशाळा जडा वर्तुळा त्या उदंडी । बहू मस्तकीं वाहती चंड धोंडी । शिळा शीखरें फोडिती ते अभंगें । नभों भार झेंपावती लागवेगें ॥१३॥
कपी मारुतीसारिखें जे उडाले । गिरी मंदरासारिखे चालवीले । कपी साक्षपी देवरूपी बळापे । कडे लागले ते सुवेकाचळाचे ॥१४॥
बळें सेतु बांधावया वेगु केला । शतें योजनें लांब विस्तीर्ण जाला । दश योजनें भव्य रुंदी तयाची । जळीं बांधलीं सर्व पांचां दिसांची ॥१५॥
कपी सर्व आनंदले कार्य जालें । बळें गर्जती चित्त सूखें निवालें । सुवेकाचळा सेतु बांधोनि नेला । नळा वानराला जयो प्राप्त जाला ॥१६॥
म्हणे रामराणा तया सुग्रिवातें । दळें चालवा सागराचेनि पंथें । निरूपी कपी शीघ्र सेनापतीला । निळें सर्व सेनेसि संकेत केला ॥१७॥
दळें सर्वही वानरांची निघालीं । पुढें चालतां दाटणी थोर जाली । कडेचा पडे तो उडे अंतराळीं । सुवेळाचळा पावले शीघ्रकाळीं ॥१८॥
सुवेकाचळाभीतरीं राजभारें । दळें लोटलीं वानरांचीं अपारें । बळें घोरघोषें कपी गर्जताती । दिशाचक्र सिंधू गिरी पाहताती ॥१९॥
त्रिकूटागिरीशीखरीं दिव्य जें कां । रघूनायकें देखिली रम्य लंका । दिसे तेजबंजाळ लावण्यराशी । तयां देखताम पारणें लोचनांशीं ॥२०॥
म्हणे धन्य रे धन्य तो विश्वकर्मा । असंभाव्य या पर्वताचा महीमा । सुवर्णाचळासारिखा दीसताहे । सिता सुंदरी या स्थळामाजिं आहे ॥२१॥
पुढें राम बोले रिसांवानरांशीं । असावें तुम्हीं सर्व सेनाप्रदेशीं । कपीचक्र अव्यग्र तें सिद्ध जालें । निळें वानरें सर्व सन्नद्ध केलें ॥२२॥
कपीभार ते सर्वही स्वस्थ जाले । पुढें धर्मता उत्तरीं राम बोले । म्हणे सुग्रिवा बापुडें शुक्र सोडा । तया पायिंचे सर्वही पाश तोडा ॥२३॥
तया आंगदें सोडतां तो उडाला । मुखीं रामनामें नभीं गुप्त जाला । बळें चालिला मुक्ता मूखें त्वरेंशीं । त्रिकूटाचळीं भेटला रावणासी ॥२४॥
म्हणे रावणू गा शुका काय झालें । नव रात्रपर्यंत कोठें क्रमीलें । वदे शूक हो लंकनाथा वरिष्ठा । मुखें व्यर्थ बोलों नये अप्रतिष्ठा ॥२५॥
तयां वानरांच्या दळामाजिं गेलों । देहें पालटीलें स्वयें शूक जालों । नभोमंडळीं राहिलों अंतराळीं । बळें वानरांचीं दळें तीं न्यहाळीं ॥२६॥
समुद्राचिये उत्तरें भीम सेना । दहा योजनें दाट भूमी दिसेना । तिथें मुख्य ते रामसौमित्र बंधू । कपिश्रेष्ठ सुग्रीव राजा अगाधू ॥२७॥
उचिष्टोत्तरें तूमंचीं त्या कपीला । मुखें बोलिलों सर्वही सुग्रिवाला । मला सांगतां वीर कोपासि आले । कितीएक ते पाठिलगिं उडाले ॥२८॥
कपीवीर धांवोनियां पाठिलागीं । मला ताडिते जाहले ते प्रसंगीं । बहू सूख जालें तयां वानरांतें । कठोरें करें ताडिलें या देहातें ॥२९॥
बहू कष्ट जाले प्रभो या जिवासी । नसो वोखटी वेळ ती वैरियासी । रिसां वानरांचीं असंभाव्य मांदी । पुढें घातलें हो मला पाशबंदीं ॥३०॥
प्रभू काय सांगों चमत्कार जाला । समुद्रांतुनी सिंधु बोहर आला । रुपें भव्य तो मूर्तिमंतू निघाला । अती आदरें भेटला राघवाला ॥३१॥
पुढें बोलतों जाहला तोयराशी । तयें शुद्धि सांगीतली राघवासी । म्हणे जी बळें सिंधु बांधा दयाळा । नळाचेनि हस्तें जळीं चंडशीळा ॥३२॥
कपी प्रेरिले त्या रघूनायकानें । शिळा तारिल्या त्या नळा वानरानें । कपी भार ते सर्व ऐलाड आले । सुवेळाचळा मस्तकीं ते मिळाले ॥३३॥
कृपाळूपणें बोलिला रामचंद्र । कपीला म्हणे शूक सोडा नरेंद्र । पुढें वानरीं सोडिलें लागवेगीं । समर्था तुला भेटलों ये प्रसंगीं ॥३४॥
प्रभू सांगतों बुद्धि आतां करावी । त्वरें जानकी राघवा भेटवावी । सिता पाठवीतां बरें लंकनाथा । न होतां असें प्राप्त होईल वेथा ॥३५॥
शुकें सांगतां रावणा कोप आला । म्हणे कोण लेखा नरां वानरांला । रणामंडळीं सोडितां बाणवृष्टी । बळें आपुल्या सर्व जाळील सृष्टी ॥३६॥
बळें पूजितों भूमि आकाश बाणीं । म्हणे काय तीं लेंकुरें दैन्यवाणीं । न होतां असंभाव्य त्या बाणवृष्टी । सुखें  सांगती थोर संग्रामगोष्टी ॥३७॥
अमित्रीं तिहीं एक अद्‍भूत केलें । समुद्रासि पालणिलें सैन्य आलें । नव्हे पाहतां गोष्टी सामान्य कांहीं । परी राक्षसां शुद्धि अद्यापि नाहीं ॥३८॥
पुढें हेर बोलीविले आदरेशीं । शुका सारणातें म्हणे गर्वराशी । मिळालीं दळे श्रावणारीसुताचीं । तुळा रे बळें त्या रिसां वानरांचीं ॥३९॥
तयें बोलिल्यानंतरें लंकनाथें । बळें चालिले शीघ्र आकआशपंथें । सुवेळाचळा देखतां सिद्ध जाले । देहे आपुले ते तिहीं पालटीले ॥४०॥
रुपें जाहले वानरू वेषधारी । कळेना कळा बाणलीसे शरीरीं । दळीं कोटिच्या कोटि संख्या असेना । तिहीं राक्षसीं तूळिली सर्व सेना ॥४१॥
सभे बैसले राम सौमित्र जेथें । शुका सारणाला नव्हे रीघ तेथें । पुढें अंतरीं दूर राहून वेगीं । बळें तूळिते जाहले ते प्रसंगीं ॥४२॥
सभे अंतरें लक्ष लावोनि ठेले । अकस्मात बीभीषणें ओळखीलें । धरीलें करीं त्या शुका सारणातें । म्हणे दूत हे धाडिले लंकनाथें ॥४३॥
तदा बोलिला राम बीभीषणाला । दळें दाखवा सर्वही शीघ्र त्याला । तुळा जा दळें तीं शुकासारणा हो । तुम्ही आपुलें कार्य सिद्धीस न्या हो ॥४४॥
स्तुतीउत्तरें सारण शीघ्र बोले । कृपासागरें हेर ते रक्षियेले । प्रभू देहजे स्नेहआज्ञा दयाळा । तुजलगिं कल्याण हो जी नृपाळा ॥४५॥
निरोपेंचि तात्काळ ते हेर गेले । तया रावणाला नमस्कार केले । प्रभू मृत्यु आला बळें लागवेगें । परी सूटका जाहली थोर भाग्यें ॥४६॥
दळामाजिं बीभीषणें ओळखीलें । धरूनी बळें तैं सभेमाजिं नेलें । उदारें रघूनायकें सोडवीलें । कृपाळूपणें भूपती मुक्त केले ॥४७॥
कळेना दळीं कोण संख्या बळाची । असंभाव्य सेना बहू विक्रमाची । तयांच्या बळा ऊपमा काय द्यावी । समारंगणीं भेटि त्यांची न  व्हावी ॥४८॥
रघूनाथ सौमित्र बीभीषणानें । कपी सुग्रिवें अंगदें मारुतीनें । बळें घेऊं लंका असा नेम केला । घडीनें घडी कोप येतो तयांला ॥४९॥
मनीं वाटतें बुद्धि ऐशी करावी । सिता आदरें राघवा भेटवावी । तया बोलतां कोपला गर्वराशी । म्हणे ताडिलें काय नेणों तुम्हांसी ॥५०॥
भया सांगतां त्या नरां वानरांचे । सदा सर्वदा भक्ष जें राक्षसांचें । मज रावणासारिखा कोण आहे । समारंगणीं काळ भीडों न राहे ॥५१॥
महा थोर दामोदरीं गर्वराशी । पुढें रावणू वेंवला सारणेंसी । तया मस्तकीं उंच आकाशपंथीं । पुढें पाहतां दृष्टि फांके दिगंतीं ॥५२॥
सुवेळा चळीं दृष्टि घालेनि पाहे । असंभाव्य तें सैन्य पोटीं न साहे । पुढें रावणू सारणालगिं पूसे । कपी सांग रे सर्व आहेत कैसे ॥५३॥
कपीभार पाहूनियां हेर आले । पुसे रावणू सारणू शीघ्र बोघे । वदे देखिल्यासारिखें सत्य वाचे । पुढें दाखवी भार गोळांगुळांचे ॥५४॥
म्हणे सारणू ते कपी वीर जेठी । मिळाले असंभाव्य कोट्यानुकोटी । देहे पर्वतासारिखे काळरूपी । रणीं भीडतां शूर संग्रामकोपी ॥५५॥
म्हणे लंकनाथा कपी पैल पाहें । समस्तांमधें आगळा बैसलाहे । समारंगणी वीर नेतां विरामा । महा मुख्य सेनापती नीळनामा ॥५६॥
दिसे दूसरा त्याचिये दक्षिणांगीं । बळें डुल्लतू वीर लोहीत अंगीं । धरा हाणतां पुच्छघातें थरारी । कपी अंगदू नाम त्याचें सुरारी ॥५७॥
मिळाले कपी रीस कोट्यानुकोटी । पुढें बैसला भार घालेनि पाठीं । सदा सर्वदा लक्ष ज्यांचें त्रिकूटीं । बहूसाल युद्धा उतावीळ पोटीं ॥५८॥
करी चंड उडडाण आकाशपंथें । महामेघ वीतूळती अंगवातें । समारंगणीं भीडतां अग्रवादू । बळें आगळा नाम त्याचें कुमूदू ॥५९॥
देहे सिंधुरासारिखा पैल पाहे । महावीद विंघ्याचळामाजिं राहे । सुपर्णास सांडून उड्डाण ज्यांचें । कपी थोर हा ऋषभू नाम त्याचें ॥६०॥
दिसे पैल पुच्छासनीं वीर भारें । खचे स्वर्ग तें याचिया भूभुकारें । कपी शर्भ ऐसें तया नाम राया । उतावीळ हा थोर शूत्र जिताया ॥६१॥
कपी वीनतू पैल पाहा विशाळू । रणीं धांवतां परिप्रेतां सुकाळू । देहे आचळासारिखा ताम्रवर्णी । विरां वानरांमाजिं अद्‍भूत कर्णी ॥६२॥
भृकूटी भयासूर त्या भीम पाहें । भुमी अंगरोमावळी रूळताहे । कपी क्रंदनू भूपती नाम ज्याचें । तयासारिखें देह नाहीं बळाचें ॥६३॥
प्रमाथी कपी वीर कैसा कडाडी । महामेघ गंभीर जैसा गडाडी । रणीं झुंजतां थोर कल्पांत मांडे । तयां वानरांशीं बळें कोण भांडे ॥६४॥
सुवर्णाचळासारिखा देह ज्याचा । मुखें विक्रमू बोलवेना बळाचा । गवायू कपी वीर तात्काळ कोपे । उडाणें सवीतारथीं अश्व कांपे ॥६५॥
विशाळू गजू वानरू पैल पाहो । तुळीतो सदा सर्वदा सख्य बाहो । त्रिकूटाचळीं लविली दृष्टि जेणें । बळें सर्व रोमांच येती फुराणें ॥६६॥
विरांभाजिं हा धूम्रचंड प्रतापी । महापर्वतासारिखा चंडकोपी । रिसू कर्कशू घोर घोषू अगाधू । बळी होय हा जांबुवंतासि बंधू ॥६७॥
कपीचें बहूसाल सामर्थ्य वानी । मुखें बोलतां रावणू वीट मानी । म्हणे रावणू सारणा मूर्ख होशी । मजदेखितां मर्कटां वर्णितोसी ॥६८॥
असों दे रिसें मर्कटें या प्रसंगीं । रिपू दाखवी मुख्य तो राम वेगीं । अभिप्राय जाणूनि लंकापतीचा । वदे सारणू मागुतीं रम्य वाचा ॥६९॥
पहा राम तो पैल कोदंडपाणी । रुपें सांवळा रम्य लावण्यासाठी । रतीचा पती तूळितां तुच्च होये । विराजे रिसां वानरांमाजिं पाहें ॥७०॥
पहा राम विश्राम आत्मा जगाचा । बळें काळहर्ता विहर्ता अवाचा । तुणीरांबरें कांत माथां लपेटा । झणत्कारिती वाजटा चापघंटा ॥७१॥
महावीर तो देखतां धाक सूटे । समारंगणीं भीडतां काळ वीटे । तयाशीं बळें भीडतां पूरवेना । कदाही जयो प्राप्त होतां दिसेना ॥७२॥
तया दक्षणे दूसरा बैसला हो । महावीर सौमित्र राया पहा हो । असंभाव्य सामर्थ्य याचें कळेना । बळें आगळा जिंकितां जिंकवेना ॥७३॥
कपी राघवा वामभागींच आहे । त्रिकूटाचळू दृष्टिनें वक्र पाहे । कपीनाथ सुग्रीव तो ओळखावा । कळेना असंभाव्य त्याचा उठावा ॥७४॥
कपी आणिले सर्व भूमंडळींचें । असंख्यात संख्या नसे भार त्यांचे । वनीं मैत्रिकी जोडिली राघवांशीं । रघूनायका साह्य जाला जिवेंसी ॥७५॥
सिता शोधिली मारिलें कूमरासी । वनें मोडिलीं जाळिलें त्रीकुटासी । बळें आगळा भूपती पैल पाहे । समस्तांमधें मारुती शोभताहे ॥७६॥
महाभीम भिगोळ काळा कराळू । विशाळें नखें फोडितो ब्रह्मगोळू । रिसां कर्कशांमाजिं हा काळकेतू । बळें आगळा पैल जो जांबवंतू ॥७७॥
उतावीळ मारावया दैत्य पाहे । महा वीर बीभीषणू शोभताहे । तयें सांगतां रावणा दु:ख जालें । असंख्यात कोपानळें दग्ध केलें ॥७८॥
करीं खड्‍ग घेऊनियां सारणाला । प्रसंगीं तये शीघ्र मारूं निघाला । म्हणे सारणू जी पिडा कां करीतां । सुखें बोललों सर्वही सत्य वार्ता ॥७९॥
तुळाया दळें पाठवीलें भुपाळें । रिपूचीं दळें पाहिलीं तीं विशाळें । तयासारिखें बोलिलों सत्य भावें । समर्थापुढें मिथ्य कैसें वदावें ॥८०॥
प्रभू आमचा कोण अन्याय जाला । खरें सांगतां कोप येतो तुम्हांला । नसे पाहतां अल्प अन्याय कांहीं । नसे मिथ्य आम्ही नसों स्वामिद्रोही ॥८१॥
पुढें रावणू कोप सांडून ठेला । पुसे आदरें मंत्र माहोदराला । सुवेळाचळा कोण रे पाठवावा । रिपूचा विवेकें बरा शोब घ्यावा ॥८२॥
वदे वीरु माहोदरू रावणातें । सुवेळाचळा पाठवा शार्दुलातें । महा धूर्त हा जाणतो सर्व मत्तें । बळें शीघ्र तूळील रीपूदळातें ॥८३॥
पुढें दैत्य बोलविला आदरेंसी । म्हणे सैन्य पाहोनि यावें त्वरेंशीं अलंकार देऊनियां तोषवीला । बळें हेर तो शीघ्र जाऊनि आला ॥८४॥
नमस्कारिला राव तो आदरेंशीं । म्हणे रावणू म्लान कां दीसतोशी । अधोमूख राहोनि शार्दल बोले । म्हणे हो कपी काळ जैसे उदेले ॥८५॥
बहू दाटलीसे असंभाव्य सेना । नसे रीघ तेथें कदा जाववेना । परी मी तयांमाजिं तैसाच गेलों । बहू ताडिलों पाडिलें कुस्त केलों ॥८६॥
निरोपें तुझ्या शीघ्र गेलें सुरासी । रुपें जाहलों वानरू वेषधारी । मला हिंडतां हिंडतां थोर मानें । पुढें लक्षिलें धूर्त बीभीषणानें ॥८७॥
कपी धांवले दूत त्या सुग्रिवाचे । पुरोहीत चत्वारि बीभीषणाचे । धरूनी मला चालवीलें त्वरेंशीं । पुढे चालतां देखिलें राघवासी ॥८८॥
म्हणे धन्य तो रामराजा दयाळू । मला देखतां शीघ्र सोडी नृपाळू । मनीं माझिये वाटतें निश्चयेशीं । रघूनायका भेटवावें सितेसी ॥८९॥
समाचार तो सर्वही श्रूत केला । तया सांगतां रावणा क्रोध आला । पुढें राक्षसें शीर केलें रिपूचें । वनीं चालिला सत्व घ्याया सितेचें ॥९०॥
अशोकीं वसे जानकी भूमिबाळा । वदे रामनामावली सत्त्वशीळा । पहा रावणें शीर मायीक केलें । छळाया सितेकारणें शीघ्र नेलें ॥९१॥
म्हणे रावणू व्यर्थ त्वां धीर केला । रणीं दीर भर्तार तूझा निमाला । कपी राक्षसांतें महा मार जाला । प्रहस्तू जयो शीघ्र घेऊनि आला ॥९२॥
रिपू सांगतां ते भयातूर जाली । भयें जानकी शोकसिंधू बूडाली । शिरें देखतां मूर्च्छना  शीघ्र आली । देहे सांवरेना भुमीं अंग घाली ॥९३॥
भविष्योत्तरें बोलिलीं वाल्मिकाचीं । म्हणे कायसा बोलिला तो विरिंची । पहा आजि तें सर्वही व्यर्थ जालें । कृतांतापुढें मश्यका येश आलें ॥९४॥
बहू लोक होतां देहेभाव सांडी । म्हणे रावणू सत्त्व सीता न सांडी । महा प्रेत्न सायास म्यां व्यर्थ केला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥९५॥
दळें सिद्ध केलीं बळें लंकनाथें । प्रतीमल्ल राक्षेस चत्वार पंथें । महा वीर ते सर्वही शस्रपाणी । बुजूं पाहती भूमि आकाश बाणीं ॥९६॥
कपीचक्र तेंही बळें सिद्ध जालें । निळें वानरेंशी प्रतीमल्ल केलें । महा वीर ते गर्जती मेघ जैसे । भुतां खेचरां थोर कल्पांत भासे ॥९७॥
सुवेळाचळा राम पाहे स्वभावें । तया मस्तकीं शृंग तें दोन गांवें । नभीं लागला उंच आकाशपंथें । म्हणे राम गा सुग्रिवा जाई तेथें ॥९७८॥
म्हणे वीर सुग्रीव आज्ञा प्रभूची । असंभाव्य सेना रिपां वानरांची । महा वीर तात्काळ सर्वै मिळाले । बळें शृंग वेंघावया सिद्ध झाले ॥९९॥
कथेलगिं श्रोतीं पुढें चित्त द्यावें । म्हणे दास अर्थांतरीं वीवरावें । स्वहीता कथामृत घ्यावें फुकाचें । सदा सेवितां दु:खदारिद्य कैंचें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP