मानपंचक - मान द्वितीय

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


उपासना वोळखावी । कोण तो देव तो कसा ।
करावें भजन तें कसें । कैसी आहे प्रसन्नता ॥१॥
उपासना वोळखिली । देव तो अंतरीं वसे ।
भजावें वोळखावें तें । बुधीयोगें प्रसन्नता ॥२॥
रायासीं वोळखी होता । सेना हि वोळखी धरी ।
मुख्य सामर्थ्य रायाचें । सेनेमधें विभागलें ॥३॥
सेवकें सांडिला राजा । सेविल्या पादरें प्रजा ।
तेणें सामर्थ्य हि गेलें । पराधेन विटंबना ॥४॥
जनीं जनार्दन आहे । परंतु सज्जनीं वसे ।
जना आणी सज्जनाला । येकची करितां नये ॥५॥
जगामधें जगदात्मा । स्वामी सेवक वर्तवी ।
स्वामी सुखासनामधें । सेवकें वाहाती सदा ॥६॥
आदीक धारणा जेथें । नित्यानित्य विचारणा ।
तो स्वामी उधरी बधा । बधें बध सुटेचिना ॥७॥
वैद्य तो वांचवी रोग्या । रोग्या रोगी न वांचवी ।
तारकु बुडत्या तारी । बुडतें तारकु नव्हे ॥८॥
ज्ञातया ज्ञान मागावें । अज्ञाना मागतां नये ।
सभाग्या सेवितां भाग्य । अभाग्या सेवितां नये ॥९॥
मोक्ष देतो प्रचीतीनें । तयासी तुळणा नसे ।
मुख्य तो सद्रुरु जाणा । यातना चुकवी जनीं ॥१०॥
जो वंद्य सर्व ही लोकां । तयासी वंदितां बरें ।
निंद्य तें वंदितां खोटें । समान करिसी मुढें ॥११॥
देव दैत्य भले पाहीं । संतासंत भुमंडळीं ।
अमृत विष हें एक । कदापी मानितां नये ॥१२॥
देवनामें माहा पापी । तरले उद्धरले किती ।
दैंत्यनाम जपे ऐसा । येक ही नाडळे जनीं ॥१३॥
भेदाभेदक्तिया देहीं । लागली हे सुटेचिना ।
जेथील विषयो तेथें । विपरीत करितां नये ॥१४॥
मुखेंची सेवितां आन्नें । आपानीं घालितां नये ।
अन्याय करिती तैसा । समान मानिती जनीं ॥१५॥
विंचु सर्प दुखदाता । अंतरात्माच वर्तवी ।
परंतु हीत तें घ्यावें । समान वर्ततां नये ॥१६॥
त्यागात्यागें देहे चाले । समान करितां पडे ।
अभागी उमजेना तो । पाषांडी राक्षसी क्रिया ॥१७॥
समान देखणें आत्मा । समान करणें दया ।
वंद्य निंद्य विचारावें । हे मुख्य जाणती कळा ॥१८॥
अन्नदाता प्राणदाता । बुधीदाता भुमंडळीं ।
तारकु मारकु येकु । ऐसें हें घडतें जनीं ॥१९॥
सुख तें आवडे लोकां । दुख तें नलगे कदा ।
पुण्य तें आदरें घ्यावें । पाप तें दुरी त्यागणें ॥२०॥
सद्‍बुधी अंगीकारावी । कुबुद्धी आत्मघातकी ।
अन्मार्ग चुकवावा तो । सन्माग हीतकारकु ॥२१॥
यातीभ्रष्ट क्तियाभ्रष्ट । सर्वभ्रष्ट अनर्गळु ।
पाहातां पातकी दोषी । तो संग नर्क भोगवी ॥२२॥
खरें खोटें समानत्वें । मानिती लोक ते कसे ।
गभाध वर्तती जैसे । तैसे ते आत्मघातकी ॥२३॥
कुसंग पातकें लाभे । सत्संगें पुण्यसंग्रहो ।
जाणता पाहिजे ज्ञाता । तो रक्षी धर्मस्थापना ॥२४॥
देह्यानें रक्षणें क्रीया । देह्यातीत विचारणा ।
शब्दें ची शब्द बोलावा । शब्दातीत विवंचना ॥२५॥

इति श्री मानपंचक सारासारविवेक मान ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP