प्रासंगिक कविता - संभाजीस उपदेश

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावें । तजवीजा करीत बसावें । एकांत-स्थळीं ॥१॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी । चिंता लागावी परावी । अंतयामीं ॥२॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे । सुखी करून सोडावे । कामाकडे ॥३॥
पाणवठीं तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना । तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला । जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटें ॥५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बैसले । मग जाणावें फावलें । गुलामांसी ॥६॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्‍यासी जाये । धीर धरोन महत्कार्य । समजून करावें ॥७॥
आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती । याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥८॥
राजी राखितां जग । मग कार्य-भागाची लगबग । ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥९॥
सकल लोक एक करावें । गलीम निवटून काढावे । ऐसें करितां कीर्ति धांवे । दिंगतरीं ॥१०॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके । ऐसें न होतां धक्के । राज्यासी होती ॥११॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा । आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥१२॥
राज्या-मध्यें सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक । लोकांचे मनामव्यें धाक । उपजोंचि नये ॥१३॥
बहुत लोक मिळवावे । एक विचारें भरावे । कष्टें करोनि घसरावें । म्लेंच्छांवरी ॥१४॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें । महाराष्ट्र राज्य करावें । जिकडे तिकडे ॥१५॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी । चढती वाधती पदवी । पावाल येणें ॥१६॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत्‍ मानावें । इहलोकीं परलोकीं राहावें । कीर्तिरूपें ॥१७॥
शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा प्रताप । शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१८॥
शिवराजाचें कैसें चालणें । शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाची सलगी देणें । कैसें असे ॥१९॥
सकळ सुखांचा त्याग । करूनि साधिजे तो योग । राज्यसाधनाची लग-बग । कैसी असे ॥२०॥
त्याहून करावें विशेष । तरीच म्हणावें पुरुष । याउपरी आतां विशेष । काय लिहावें ॥२१॥

॥ प्रासंगिक कविता संपूर्ण ॥
॥ एकूण प्रासंगिक कविता संख्या ॥४०५॥


N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP