श्री वेंकटेश्वर - पदे १२१ ते १३०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१२१
हनुमंताचे जन्मकथन । रमायणीं आणिक कथन ।
कोणते सत्य म्हणोन । मानावे श्रोतयांनी ? ॥५.६९॥
हा विकल्प न धरावा साचार । काळपरत्वें होती अवतार ।
जे जे कल्पींचे जैसे चरित्र । तितुके साचार सत्य पै ॥७०॥

१२२
धन्य धन्य हा पर्वत । पापे पळाली  असंख्यात ।
ब्राह्मण अनुतापें तेथ । अट्टहासें करीत नामस्मरण ॥६.२९॥
विकट पापें नाशित । म्हणोनि व्यंकटाचल नाम सत्य ।
ब्राह्मण लोटांगण घालित । आला त्वरित हरीजवळी ॥३१॥
नयनीं देखता शेषाचल । सकळ पापां सुटे पळ ।
भूवैकुंठ केवळ । कैंचा विटाळ ये ठायीं ॥३४॥

१२३
जेथे आता उभा घननीळ । श्रीव्यंकटेशस्वामी दयाळ ।
तेथेचि होते वारूळ । चोळरायें खणियेले जे ॥९.२५॥
गर्तेतुनी निघाले विमान । तेचि देवालय देदीप्यमान ।
श्रीव्यंकटेश मनमोहन । तेथे पूर्ण प्रकटला ॥२६॥
राजा म्हणे ते वेळीं । श्रीजगन्निवासा, वनमाळी ।
तू राहे ये स्थळीं । जेथे उभा आहेसी आता ॥४३॥
या वारुळाची जे गर्ता । याच स्वरूपें तत्त्वता ।
चिरकाळ लक्ष्मीकांता । उभा राहे तैसाचि ॥४४॥
अजूनिही श्रीव्यंकटेश । ते स्थळीं आहे श्रीनिवास ।
अद्यापि गर्तेमाजी पाउले राजस । झाकिली, कोणा न दिसती ॥४५॥
ते कालीं तेचि मूर्ती । अद्यापि उभा आहे श्रीपती ।
भक्तजन डोळां देखती । शेषाचलीं जाउनियां ॥४६॥

१२४
ऐसा हा श्रीधरवर । श्रीव्यंकटेश दयाकर ।
ब्रह्मानंद कृपासमुद्र । तो साचार रक्षी भक्तां ॥१०.६१॥

१२५
ज्या कुळीं उद्‍भवलो साचार । तेही ऐका सर्वज्ञ चतुर ।
शहापुराहूनि परिकर । पूर्वदिशेस क्रोशावरी ॥१२.६३॥
कुडची नामें लघुग्राम । तेथील कर्णिक वृत्ती उत्तम ।
शांडिल्य गोत्रज त्याचे नाम । संकरसपंत मूळ पुरुष ॥६४॥

१२६
ऐसा सद्‍गुरू चैतन्यघन । गोविंदराज नामाभिधान ।
ज्याचे देखता महिमान । गोविंदचि अवतरला ॥१.१८॥
जो क्रोधनगभंजन वज्रधर । जो कामगजविदारक हरिवर ।
जो अपरोक्षज्ञानाचा सागर । जो मंदिर धैर्याचे ॥१९॥
ज्याची ऐकता कवित्वरचना । आश्र्चर्य वाटे सर्वांच्या मनां ।
ज्याणें भक्तिबळें नारायणा । आपणाधीन केला असे ॥२०॥
ऐसा तो गोविंदराज ॥ नमूनि त्याचे चरणांबुज ।
रात्रंदिवस चरणरज । वीर इच्छा करीतसे ॥२१॥

१२७
आता ऐका सावधान । श्रीवेंकटेशाचे चरित्र गहन ।
जे ऐकता भावेंकरून । सर्व मनोरथ पूरती ॥३३॥
श्रीवेदव्यास स्वमुखेंकरोनी । बोलिला भाविष्योत्तर पुराणीं ।
त्याचा मथितार्थ काढोनी । प्राकृत भाषणीं रचियेले ॥३५॥

१२८
शतानंद म्हणे राजोत्तमा । ऐक वैकुंठगिरीचा महिमा ।
बहुत शोधिता उपमा । दुसरी त्यासी नसेंचि ॥८४॥
वैकुंठनायक, मुरारी । तो साक्षात वसे पर्वतावरी ।
ज्याचा महिमा ऐकता श्रोत्रीं । पावन होती जडमूढ ॥८५॥
सत्यवतीहदयत्न । भविष्योत्तरीं बोलिला गहन ।
कलियुगीं वर्तेल माहात्म्य पूर्ण । सर्वकामफलप्रद जे ॥८६॥
सकळ यात्रेचे फळ । महामखाचे पुण्य केवळ ।
श्रवणमात्रें मनोरथ सकळ । पूर्ण होती तत्काळीं ॥८८॥

१२९
चैतन्यघना, श्रीनिवसा ॥ श्रीगोविंदा, वैकुंठवासा ।
भक्तवत्सल रमाविलासा । मायाधीशा जगत्पते ॥१०२॥
तू कृपा करशील जरी । तरी ग्रंथसिद्धी होय निर्धारीं ।
श्रीवेंकटेशा शेषाद्रिविहारी । करीं धरी बाळकातें ॥१०३॥
श्रीगोविंदपदारविंद । तेथील सेवावया मकरंद ।
कुडची वीर होऊनि षट्‍पद । दिव्य आमोद सेवीतसे ॥१०४॥

१३०
तू सूत्रधारी सर्वेश्र्वर । कर्ता करविता तूचि समग्र ।
जैसे नाचविता सूत्र । बाहुली नाचे तैसेचि ॥३.९६॥
वाजविणार नसता बरवा । कैसा वाजेल पोवा ।
जगन्निवासा कमलाधवा । तुझे परित्र तू बोलवी ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP