श्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


२१
जे जे इच्छा करील प्राणी । ते पूर्ण करील चक्रपाणी ।
यालागी ग्रंथपठणीं । आळस सर्वथा न करावा ॥१४४॥
देवीदास विनवी पुढतपुढतीं । ग्रंथ हा केवळ भागीरथी ।
श्रवणस्नानें उत्तम गती । प्राणिमात्रास पै होईल ॥१४५॥

२२
जागृत फार विशेषा । धाव पाव व्यंकटेशा ॥
श्याम चतुर्भुज पंकजनयना । प्रसन्नदर्शन मंगलवदना ॥
पावन कीर्तिच्या सदना । संकटनाशक हषीकेशा ॥१॥
प्रतापदर्पा विराट पुरुषा । सर्वोत्कर्षा तू अविनाशा ॥
तोडिसि नाना आशापाशा । घेसि पूर्ण सकळ यशा ॥२॥
अपार तुझा महिमा गोड । माझे मनिचे पुरवी कोड ।
दुर्घट जन्ममरणमुळ तोड । देऊनि भावभजनलेशा ॥३॥
जय जय गरुडध्वज गोविंदा । सद्‍गुरु केसरि उद्‍बोधा ॥
शिवदिन-जीवन-परमानंदा । त्रिमळ नारायण ईशा ॥४॥

२३
देवा व्यंकटरमणा स्वामी, देवा, साक्षी अंतर्यामी ।
दुर्घट संकत वारुनि भक्ता ठेविसी सुखधामीं ॥१॥
लक्ष्मीचा भर्ता, तूचि पुरता कर्ता पतीतपावन नामी ।
शास्त्रे, वेद, पुराणे थक्कित वर्णु काय गुण मी ॥२॥
स्वरूपसुंदर देखुनि रतिपति लज्जित की सवदायी ।
सगुण निर्गुण ध्यान कसे हे लक्षू गोविंदा, मी ॥३॥
भावभक्तीचा डोल्हारा, तू डोलसि मज विश्रामी ।
केशरि गंध रेखिला । शिवदिन वंदितो निष्कामी ॥४॥

२४
सुख आटावे, दु:ख दाटावे, देवा! त्वां भेटावे ।
आणिक काही न मागे तुजला, बाह्यांतरिं भेटावे ॥१॥
देवा व्यंकटरमणा रे, स्वामी! भवभयशमना रे ॥
प्रमाण आज्ञाधारक तत्पदिं साष्टांगीं नमना रे ॥२॥
हरि गोविंदा, पावन बिरुदा बोल न लवि कदा की ।
विकल्प-दुर्जन-मर्दन तूझे तेज:पुंज गदा की ॥३॥
अधोक्षजा रे, सुमनपुजा रे द्यावि मला गुरुवारीं ॥
तिर्थप्रसादें निववी काया भक्तकाजकैवारी ॥४॥
शिवदीनाचा हेत मनाचा तूची पुरता कर्ता ।
दुर्घट संकत विघ्ने नाना केसरिरूपें हर्ता ॥५॥

२५
जय जय वेंकटेशा वेंकटेशा ।
मम कुलदैवत, सुहद, परेशा ॥ध्रु.॥
तव कृपाकटाक्षलेशा । नासी त्रिमिर भवदु:खपाशा ॥१॥
त्रिभुवनापाळा सर्वाध्यक्षा । स्वभक्ता रक्षिसि शुद्ध पक्षा ॥२॥
ध्यानीं मनीं पूर्ण आशा । डोळां पाहीन मी जगदीशा ॥३॥
तव नामें दुर्बुद्धिभासा । नासुनि दत्ता प्रेमप्रकासा ॥४॥

२६
भाग्यें वेंकटेश देव देखिला हो ।
तत्क्षणीं हदयपटीं रेखिला हो ॥ध्रु.॥
भव्य मुकुट शिरिं, तिलक ललाटीं ।
वदनें चंद्र तुच्छ लेखिला हो ॥१॥
मानस-षट्‍पदें तत्पदकंजीं ।
चिन्मकरंद-बिंदू चाखिला हो ॥२॥
अभयंकर करें संसृतिडोहीं ।
जेणें रामतनय राखिला हो ॥३॥

२७
चला वेंकटेश पाहू । मन त्याचे पायीं वाहू ॥ध्रु.॥
परम सुखास्पद दर्शन ज्याचे । जन्मल्याचे फळ पाहूं ॥१॥
वैकुंठाहुनि देवशिखामणी । आला त्याचे गुण गाऊं ॥२॥
दिव्य अनंताकृतिनगवासी । होऊ, प्रसादहि सेवू ॥३॥

२८
भज भावें वेंकटराज रे ॥ध्रु.॥
देव दयानिधि हाचि रमावर ।
भजकांचे करि काज रे ॥१॥
पूर्ण परात्पर शेषशयन हा ।
थोर नाटकी महाराज रे ॥२॥
रामसुतप्रभु जडापहारक ।
ज्यासि वंदि सुरराज रे ॥३॥

२९
त्रिभुवनेश्वर त्रिमलनायका । विनवि त्रिंबक तें गुज आयका ॥
त्रिविधताप-निवारणचंदना । त्वरित तोडि गुणत्रयबंधना ॥१॥
मुख कसें तरि दाखविसीं जगीं । चरणिंची बिरुदावलि ते बगी ।
सबळ म्यां तुज आणियलें उणें । पतितपावन तूं कवण्या गुणें ॥२॥
तम विलोकुनि सूर्य जिवें पळे । द्विरद देखुनि सिंह भयें सळे ॥
शलभ पक्षिबळें वणवा विझे । कवण मूर्ख तुझ्या बिरुदा रिझे ॥३॥

३०
बहुत उद्धरिले निजदास गे । मज झणी करिशील उदास गे ।
गिरिवरील महोत्सव येकदा । जिवलगे, मज दाविसि गे कदा? ॥४॥
जधिं पडेल तुज अनुकूल गे । मज तधी मग धाडिसि मूळ गे ।
तरि तुझ्या घरिं काय असे उणें । विसर हा पडला कवण्या गुणें ॥५॥
बहुत खंति तुझी मज वाटते । कठिण दूर दिगंतर वाटते ।
पतितपावन नाम तु आठवी । गरुडवाहन सत्वर आठवी ॥६॥
गिरिवरील महोत्सव दाखवी । चरणतीर्थ मनोहर चाखवी ।
जननिये, अपराध तु नाठवी । उदरवाढ करूनिहि साठवी ॥७॥
अति अमंगळ बालक घाण तें । जननिला चरणद्बय हाणतें ।
परि तयावर ती बहु माउली । शिरिं करीं तळहातिची साउली ॥८॥
निसुर सांडिन कोकरू श्रीधरा विसरसी झणी मध्वमुनीश्वरा ।
लिखित म्यां लिहिलें अपुल्या करीं । उचित होईल जें तुज तें करी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP