मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
रात्रींतुन चारदां करुं नक...

लावणी ४६ वी - रात्रींतुन चारदां करुं नक...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


रात्रींतुन चारदां करुं नका, अजुन गळां कां पडतां ? ।
नको नको म्हणते, तरि कितिदां मजवरते चढतां ? ॥धृ०॥
असा पुरुष भोगणें मला हें दु:ख सोसवेना ।
किति नाजुक मी आहे सख्या, हें आण पुरतें ध्याना ।
कां छळितां तुम्हि ? मला सुखाची झोप घेउं द्या ना ।
किति समजुन सांगते, तरी कांहिं माझें ऐका ना ।
मला भोगिल्याविण कंचा दिस येकही टळेना ।
असे घडि घडि जेव्हां तेव्हां मला कष्टवितां राहा ना ।
धरुन खवाटे किती लववितां ? शरिर माझें दुखतें
मुद्या आणि जोडवें हातांतिल मानेला रुपते
असे श्रमविल्यामुळें सकाळीं मुख माझें सुकतें
व्याकुळ होते फार सख्या, संग तुशी घडतां ॥१॥
वय तिसामधें तुम्ही, वर्ष मज सोळावें सरतें ।
करूं लागतां तेव्हां फार मी कासाविस होते ।
वर बसल्यावर तुम्ही, खालतीं मी फार तरमळते ।
जिव घ्यावा नारिचा मात्र येवढें तुम्हां कळतें ।
रोज उठुन भोगणें असें हें न मानवें मज तें ।
मोठया जिवावर दोन वेळा मी तुम्हांजवळ निजते ।
तिनतिनदां तरि कां हो लुगडें माझें वर करतां ?
बळकट कळ लाऊन दर वेळे स्तन रगडुन धरतां
तेव्हां येतंस राग, परंतु नये रागें भरतां
घडी न जातां मधे येक तुम्हि लागलेच भिडतां ॥२॥
हळुच करा, पुरुषार्थ आपला नका दाखवूं येव्हां ।
तोंड वेडेवाकडें मी करिते कळ निघते तेव्हां ।
बाहेर जाउन येते, विसावा येक वेळ घ्यावा ।
पाय होतिल मोकळे, फिरुन कडि दाराला लावा ।
असें वाटतें या जंजाळांतून सुटेन केव्हां ।
तुम्ही मनांत म्हणतसाल, पुरता प्राण हिचा घ्यावा ।
कितिक उशिर लागेल तुम्हांला तरि सांगा आतां
असें पुसूं लागलें मी म्हणजे ‘उगिच रहा’ म्हणतां ।
जाति प्राण जिवलगा, अहो मी मेले चरफडतां ॥३॥
थांबा हो, संशय वाटतो जाहले मी शिउंनयेसी ।
तरि दूर व्हा ना, आतां तुम्हापुढें गत करुं मी कैसी ? ।
कसें वाइट वाटेना ? मनाला येईना किळशी ।
शेवटल्या प्रेमांत म्हणतसा, तुं थांब अमळसी ।
अशि दुसरी कोणाची बायको निजल तुम्हांपासी ? ।
मीच म्हणुन ऐकते गोष्ट जी तुम्ही म्हणतां तैसी ।
अतां च्यावर दिस बरी मी तुमच्या कामांतुन गेले
स्वस्थ सुखाची निजन येकली, बरें एवढें झालें
सत्तेचा घेईन विसावा, तुम्ही निजा उगले
उजाडलें, मी जातें अतां, तुम्ही येतां कीं लवंडता ? ।
होनाजी बाळा म्हणे, नारिचा पति आहे आवडता ॥४॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP