करवीर माहात्म्य - खंड ३

करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते.

अगस्तीस झालेलें करवीरक्षेत्राचें स्मरण
व क्षेत्राच्या माहात्म्याचें लोपामुद्रेस केलेलें कथन.

नारद ह्मणाले;  मार्कंडेया ! नंतर अगस्ती मुनी पत्‍नीसह गोदातीरीं गेले, परंतु त्यांचें मन काशीत्यागाच्या दुःखाच्या लहरीमुळें शांत होईना. त्यांनीं कोठें बसावें, कोठें मूर्च्छा येऊन पडावें तर कोठें चालावें, वेडयासारिखें वागावें व नानाप्रकारें बडबडावें. अशा कष्टमय स्थितीत ते फिरत असतां त्यांनीं शंकराची प्रार्थना केली कीं, हे विश्वेश्वरा ! तुझ्या वियोगानें मला कांहीं सुचत नाहीं. सर्वांतर्यामीं तूं वास करित आहेत; करितां माझें हृद्गत जाणून तुझें नित्य दर्शन घडेल असें क्षेत्र मला आठवून दे. ही त्याची दीनवाणी ऐकून शंकरानीं कृपाळू होऊन त्यांचे मनांत शिरुन करवीर क्षेत्राची आठवण त्यास करुन दिली. त्या क्षेत्राची आठवण होतांच अगस्ती मुनी एकदम आनंदानें उठले, व स्त्रीस सत्वर पुढें चालूं लागणेस त्यांनीं सांगितलें. त्यांच्या चेहेर्‍यावर एकदम आलेला प्रफुल्लितपणा व संतोषवृत्ति पाहून लोपामुद्रेनें प्रश्न केला कीं, "महाराज ! आपण इतका वेळ काशी वियोगाच्या दुःखामुळें तळमळत होता, परंतु एकाएकी संतोष वृत्तीनें उठून आपण मला पुढें चालण्यास आज्ञा केली, करितां एकदम अशी आनंदवृत्ति होण्याचें कारण काय तें मला सांगावें." हें ऐकून अगस्ती मुनी ह्मणाले श्रीविश्वेश्वर प्रसादानें दक्षिणकाशी (करवीर) क्षेत्राची मला आठवण झाली, त्यामुळें मला आनंद झाला. त्या पुण्यपावन क्षेत्राचें माहात्म्य तुला सांगतों तें ऐक.

विश्वेदर्शनं यत्र काशीवासश्च मत्प्रियः ॥
स्नानं मणिकर्ण्यां च मत्प्रियं हि वरानने ॥
सर्वमेतद्भवेन्नूनं करवीरे महापुरे ॥
अधिकं चापि भूयोअ मे महादेव्याः प्रदर्शनं ॥
पूर्वं संकल्प इत्यासीद्गतव्यं करवीरकं ॥
विधिनाद्य सुपूर्णोऽयं महद्भाग्यं हि मामके ॥
परोपकरणं जंतोर्यथा फलति तत्क्षणात् ॥
तथाऽन्ये सर्वधर्मा वै न फलंतीति मे मतिः ॥
एकक्रिया द्वयर्थकरी पुण्यंवद्भिरवाप्यते ॥
यद्धिविंध्यस्य दमनं करवीरप्रदर्शनं ॥
(क.म. ६-२५)

भुक्ति व मुक्ति देणारे करवीरक्षेत्र श्रीविष्णूनें देवीरुपानें आपल्या उजव्या हातांत धरिलें आहे. मला काशीवास, विश्वेश्वराचें दर्शन व मणिकर्णिकेचें स्नान फार आवडतें, तें सर्व मला या ठिकाणीं मिळेल. जसें एकाच क्रियेनें दोन कार्यें साधतात तसें काशी सोडल्यानें देवावर उपकार करण्याच्या हेतूनें विंध्यदमन होऊन, करवीर क्षेत्राचें दर्शन व त्या ठिकाणीं वास करण्याचा लाभ मला मिळेल. परोपकारासारिखे पुण्य नाहीं, परोपकार जसा लवकर फळ देतो तसें दुसरें कोणतेंही धार्मिक कृत्य देत नाहीं असें माझें मत आहे. यामुळें माझा भाग्योदय आला असें मी समजतों. करवीराच्या पांच कोसांत प्रयाग, काशी व रुद्रगया हीं तीन पवित्र स्थलें आहेत. प्रयाग व काशी तीर्थांत स्नान करुन जे दानधर्म करितात त्यांचें पूर्वज आपणांस धन्य मानितात व उद्धरुन जातात. आपला वंशज रुद्रगयेस पिंडदान करितो यामुळें आपल्यास उत्तम गति प्राप्त होईल हें जाणून त्यास परमानंद होतो व असा योग केव्हां येतो ह्मणून ते त्याची मार्गप्रतीक्षा करित असतात.

अगस्ती ह्मणाले, प्रिये ! अशा पुण्यपावन क्षेत्रास आपण लवकर जाऊं कारण त्याचा वियोग आतां मला सहन होत नाहीं.

नारद ह्मणाले, मार्कंडेया ! पतीच्या मुखांतून वरील वृत्तांत ऐकून लोपामुद्रेनें अगस्तीस विचारिलें कीं, श्रीमहालक्ष्मीनें करवीरक्षेत्र हातांत कां धरिलें, याचें कारण व करवीर माहात्म्य मला कथन करा.
हें ऐकून अगस्ती सांगूं लागले. पूर्वी लक्ष्मी आणि शंकर आपआपलीं क्षेत्रें अधिक थोर असा वाद करीत असतां वैकुंठनायक शंकारास ह्मणाले. तूं साक्षात् विश्वनाथ आहेस व मीं लक्ष्मीचें रुप धारण केलें आहे; करितां काशी व करवीर या दोन्ही क्षेत्रांस जमिनीचा आधार योग्य नाहीं; करितां तूं हातीं शूल घेऊन त्याच्या अग्रावर आपलें क्षेत्र धरावें व  लक्ष्मीनें हातांत गदा घेऊन तिच्या टोंकावर आपले क्षेत्र धरावें. हें ऐकून शंकरांनीं शूलाग्रावर आपलें क्षेत्र धरिलें व लक्ष्मीनें आपल्या डावे हातात गदा घेऊन ती करवीर क्षेत्र उचलूं लागली. परंतु त्यामध्यें पुष्कळ तीर्थें असल्यामुळें तें उचलेना. करितां उजव्या हातानें तिनें आपलें क्षेत्र उचलिलें तें तसेंच तिनें हातावर धरिलें, तेव्हां विष्णू दोघांस ह्मणाले कीं, कोणतें क्षेत्र लहान व कोणतें मोठें याचा निर्णय तुह्मीच करा. हें ऐकून, लोपामुद्रे ! आपले क्षेत्रापेक्षां करवीरक्षेत्र मोठें असें जाणून शंकर उमा व गण यांसहित करवीरीं येऊन राहिले. शिव तेथें गेल्याचें ऐकून तीर्थ रुपानें काशी तेथें जाऊन राहिली व माणिकर्णिकादि तीर्थें तेथें गेलीं. तसेंच द्वारका, सेतुबंध, गोकुळ, कुरुक्षेत्र, श्रीशैल्यादि तीर्थें करवीरीं येतीं झालीं. तेथील पापनाशन तीर्थांत स्नान केल्यानें पापिणी वेश्या पवित्र होतात. दुरितापहतीर्थांत स्नान करुन अजामिळ मुक्ति पावला. सप्तकुलोद्धारतीर्थांत स्नान करुन भागीरथाचे सात कुळांचा उद्धार झाला; ब्रह्मदेवाचें शिर शंकरांनीं छेदिले त्या ब्रह्महत्येचें पातक शंकरांनीं रुद्रतीर्थांत स्नान केल्यानें नाहीसें झालें; इंद्रकुंडात स्नान करुन इंद्राचें वृत्रहत्येचें पातक गेलें; चंद्रानें आपल्या स्त्रीचा त्याग करुन गुरुस्त्रीचा उपभोग घेतला, हें त्याचें पातक चंद्रकुंडांत स्नान करुन व बहुत दानें देऊन नाहींसें झालें; सुशर्मा ब्राह्मण ऋणमोचनतीर्थांत स्नान करुन ऋणत्रयापासून मुक्त झाला; पातकी चंद्रसेन ब्राह्मण कपिलतीर्थांत स्नान करुन ऋणत्रयापासून मुक्त झाला; पातकी चंद्रसेन ब्राह्मण कपिलतीर्थांत स्नान करुन यमाच्या यातनेपासून मुक्त झाला; माता व क्षत्रिय यांच्या वधाचें पातक परशुरामतीर्थांत स्नान करुन परशुरामानें घालविलें;  कोणी शूद्र ब्रह्महत्यादि पातकांनीं गलित कुष्टयुक्त होता, तो अग्नितीर्थांत स्नान करुन मुक्त झाला. तसेंच प्रिये ! पांचालतीर्थावर पांचालेश्वर आहे. त्याचे सेवनानें पांडववीर गोत्रहत्येच्या पातकांतून सुटले; प्रल्हादतीर्थांत स्नान करुन प्रल्हाद पितृद्रोहाच्या पापांतून मुक्त झाला. दुर्वास मुनी दुर्वासतीर्थांत स्नान करुन मिथ्यापवादांतून मोकळे झाले. दक्षाच्या शापानें नारद मुनिं एक क्षणही एके ठिकानीं रहात नव्हता तो जयंती गोमती संगमांत स्नान करुन शापापासून मुक्त होऊन तेथें असलेल्या श्रीकृष्णाच्या दर्शनास लुब्ध होऊन या ठिकाणीं वास करुन राहिला. दुसरे ठिकाणीं जे शाप होतात ते करवीरवासानें नाहींसे होतात. लोपामुद्रे, आतां क्षेत्राचें परिमाण ऐक. हें क्षेत्र कृतयुगीं अठ्ठेचाळीस योजनें, त्रेतायुगीं चोवीस व द्वापारांत बारा योजनें परिघाचें पुण्य क्षेत्र होतें. कलियुगांत सहा योजनें परिघाचें पवित्र क्षेत्र आहे. त्या सीमेंत रहाणारे सर्व प्राण्यांस स्वर्गप्राप्ति होते. त्यांत ह्या देवीच्या आसपास पांच कोसांत रहाणारे प्राणी संसारतापासून सुटून मुक्त होतात. एक कोसाच्या आंत वास करण्याची ब्रह्मादि देव इच्छा करितात. श्रीच्या स्थानाच्या आसपास अगदीं जवळ भूमि क्षेत्र फारच पवित्र असून कामधेनूप्रमाणें सर्व इच्छित फळ देणारें आहे. मुक्तिमंडपांत होम अगर दान केल्यास तें अगणित होऊन अनंत फळ देतें. प्रिये लोपामुद्रे ! असें क्षेत्र दुसरें नाहीं. नवकोटीसखीसह कात्यायनी सुवर्णपात्रांत दीप लाऊन दररोज "उदय उदय" म्हणून लक्ष्मीस ओंवाळिते. तसेंच ब्रह्मादि देव त्रिकाळ नीरांजन आरती करितात. चौसष्ट योगिनी हातीं चौर्‍या विजणें घेऊन त्रिकालीं श्रीचें सेवन करितात. त्या वेळीं दंडपाणि व भैरवगण मेरीवाद्यें वाजऊन छत्रचामरें घेऊन धूपारतीच्या वेळीं श्रीची सेवा करितात. अशी आरती नित्य पहाणारें नर धन्य होत. गुरुदारागमन मद्यप्राशन, चौर्य, मित्रघात, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, राजवध, गोहत्या व पितृवध इत्यादि घोर पातकांपासून प्राणी करवीरवासानें मुक्त होतो. तूपवाती घालून श्रीस नीरांजन आरती करणारे नर कोटिकल्पपर्यंत स्वर्गवास करितात. नैवेद्याच्या वेळी श्रीलक्ष्मीकडे पाहतात ते यमदंडास पात्र होतात. महालक्ष्मीची आरती भक्तीनें त्रिकाळ जे जन पहातात, त्यास वैकुंठ प्राप्त होतो. त्रिकाळ श्रीच्या आरतीचें दर्शन व भक्तीनें भिक्षा दान हीं दोन मुख्य कर्में करवीरवासाचें फळ जें पापविमोचन तें देणारीं आहेत; तीं न केल्यास क्षेत्रवास फळ मिळत नाहीं. चार वेद दररोज मंत्रपुष्पांजली श्रीस अर्पण करितात, त्या वेळीं जे नर आरतीनंतर त्रिकाळीं पुष्पांजली अर्पण करितात, ते आपली तीन कुळें पवित्र करितात. श्रीच्या मुक्तिमंडपांत करवीरमाहात्म्य किंवा इतर पुराणाचें श्रवण अथवा कथन करितात व जे तेथें कीर्तन, नृत्य अगर भजन करितात अगर करवितात, ते सर्व निष्पाप होऊन इंद्रलोकास जातात. या क्षेत्रीं मृत्यूची भीति नाहीं.

कामदं हि सकामानां निष्कामानां च मोक्षदं ॥
नान्यदृष्टं मया क्षेत्रं करवीरपुरं विना ॥
(क.म. ६-११)

सकामानें भक्ति करणार्‍यांची इच्छा पूर्ण करणारें व निष्कामास मुक्ति देणारें करवीरक्षेत्रासारिखें अन्य क्षेत्र नाहीं. प्रिये लोपामुद्रे ! याच ठिकाणीं पराशर मुनीनी सकाप तप करुन आपले मनोरथ पूर्ण करुन घेतले.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP