मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
नूह

सूरह - नूह

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने २८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

आम्ही नूह (अ.) ला त्याच्या राष्ट्राकडे पाठविले (या आदेशानिशी) की आपल्या राष्ट्राच्या लोकांना खबरदार करावे यापूर्वी की त्यांच्यावर एक यातनादायक प्रकोप कोसळेल. (१)

त्याने सांगितले, “हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मी तुमच्यासाठी एक स्पष्टपणे खबरदार करणारा (पैगंबर) आहे (तुम्हाला सावध करतो) की अल्लाहची भक्ती करा आणि त्याच्या कोपाचे भय बाळगा व माझी आज्ञा पाळा. अल्लाह तुमच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करील आणि तुम्हाला एका ठराविक वेळेपर्यंत बाकी ठेवील, वास्तविकता अशी आहे की अल्लाहने निश्चित केलेली वेळ जेव्हा येऊन ठेपते तेव्हा ती टाळता येत नाही, जर तुम्हाला याचे ज्ञान झाले असते? (२-४)

त्याने विनविले, “हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या राष्ट्रातील लोकांना रात्रंदिवस हांक दिली परंतु माझ्या हांकेने त्यांच्या पलायनातच वृद्धी केली आणि ज्या ज्या वेळी मी त्यांना बोलाविले जेणेकरून तू त्यांना माफ करावे, त्यांनी कानात बोटे खुपसली आणि आपल्या वस्त्रांनी तोंडे झाकली आणि आपल्या चालीवर अडून बसले आणि मोठा गर्व केला. मग मी त्यांना पुकारून व हाक देऊन आवाहन केले. मग मी जाहीरपणेही त्यांच्यात प्रचार केला व गुपचुपगुपचुपदेखील समजाविले. मी सांगितले, “आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा, नि:संदेह तो मोठा क्षमाशील आहे. तो तुमच्यावर आकाशांतून खूप पावसाचा वर्षाव करील. तुम्हाला मालमत्ता आणि संततीने उपकृत करील. तुमच्यासाठी बागा निर्माण करील आणि तुमच्यासाठी कालवे प्रवाहीत करील, तुम्हाला झाले तरी काय की अल्लाहसाठी तुम्ही कोणत्याही प्रतापाची अपेक्षा धरीत नाही? वस्तुत: त्याने तर्‍हेतर्‍हेने तुम्हाला बनविले आहे. काय पाहत नाही की कसे अल्लाहने सात आकाश थरावर थर बनविले आणि त्यात चंद्राला प्रकाश व सूर्याला दीप बनविले? आणि अल्लाहने तुम्हाला जमिनीतून गवताप्रमाणे उगविले, मग तो तुम्हाला याच जमिनीत परत नेईल आणि यातून अकस्मात तुम्हाला काढून उभे करील. आणि अल्लाहने पृथ्वीला तुमच्यासाठी बिछान्याप्रमाणे अंथरले जेणेकरून तुम्ही त्यात खुल्या मार्गाने वाटचाल करावी.” (५-२०)

नूह (अ.) ने सांगितले, “माझ्या पालनकर्त्या, यांनी माझे म्हणणे रद्द केले आणि त्या (श्रीमंता) चे अनुकरण केले जे मालमत्ता व संतती लाभल्याने अधिकच विफल झाले आहेत. या लोकांनी महाभयंकर कुटिलतेचे जाळे पसरून ठेवले आहे. यांनी सांगितले, कदापि सोडू नका आपल्या उपास्त्यांना, आणि ‘वद्द’ व ‘सुवाअ’ यांनाही सोडू नका आणि यगूस व यऔक आणि नसरलादेखील. यांनी बर्‍याचशा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे, आणि तूसुद्धा या अत्याचार्‍यांना पथभ्रष्टतेखेरीज इतर कोणत्याच गोष्टीत उन्नती देऊ नकोस.” (२१-२४)

आपल्या अपराधापायीच ते बुडवून टाकले गेले आणि अग्नीत झोकून दिले गेले, मग त्यांना स्वत:साठी अल्लाहपासून वाचविणारा कोणीही सहायक आढळला नाही. आणि नूह (अ.) ने सांगितले, “माझ्या पालनकर्त्या, या अश्रद्धावंतांपैकी पृथ्वीवर कोणी निवास करणारा सोडू नकोस. जर तू यांना सोडून दिलेस तर हे तुझ्या दासांना पथभ्रष्ट करतील आणि यांच्या वंशात जो कोणी जन्मेल तो दुराचारी आणि कट्टर अश्रद्धावंतच असणार. माझ्या पालनकर्त्या मला व माझ्या आईवडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात श्रद्धावंत म्हणून शिरला आहे आणि सर्व श्रद्धावंत पुरुषांना आणि स्त्रियांना क्षमा कर, आणि अत्याचार्‍यांसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस.” (२५-२८)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP