श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह १

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.


१. दत्त दत्त म्हणे वाचें । काळ पाय बंदी त्याचे ॥१॥
दत्तचरणीं ठेवी वृत्ति । होय वृत्तीची निवृत्ति ॥२॥
दत्तरूप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥
एकाजनार्दनीं दत्त । ह्रदयीं वसे सदोदित ॥४॥

२. धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥
त्यांचें होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥
शरण एकाजनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥

३. उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥
त्याचे चरणीं लीन व्हावें शुद्धभावें करूनी ॥२॥
मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥
पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥
म्हणे एकाजनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥

४. कलियुगिं तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥
त्याचें नाम नित्य गावें । भवसिंधूसि तरावें ॥२॥
दत्तमूर्ती ह्रदयीं ध्यातां । पावें मोक्ष सायुज्यता ॥३॥
दत्त वसे जया मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य स्वानंदभरित ॥५॥

५. लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥
तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसि पामरा । तेणें तूं अघोरा पावशील ॥३॥
एकाजनार्दनी चिंती दत्तपायां । दत्तरूप काया झाली त्याची ॥४॥

६. माझी दत्त ती माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनि लावी स्तना । नोहें निष्ठु क्रोध नाहीं मनीं ॥२॥
भक्तासी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥
एकाजनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतित ॥४॥

७. दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखी नाहीं दुजा ॥१॥
भावें दत्त दत्त म्हणतसे वाचें । कळिकाळ त्याचें पाय वंदी ॥२॥
दत्ताचें पैं रूप ज्याचें वसे नेत्रीं । आहिक्य परत्रीं तोचि सुखीं ॥३॥


८. केलें आवाहन । जेथे नाहीं विसर्जन ॥१॥
भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥
गातं येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥
एकाजनार्दनीं खूण । विश्वीं भरला परिपूर्ण ॥४॥

९. सहज सुखासनीं अनसूयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ति निवे ॥१॥
बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावें ॥२॥
कारण प्रकृति न घेचि माया । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥
एकाजनार्दनी ह्रदयीं आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥

१०. गुरु दत्तराया देईं आलिंगन । तयासी वदंन करितों सर्व ॥१॥
दत्तरायाची जे करितात यात्रा । त्यांचेनी पवित्र होती तीर्थे ॥२॥
ज्याचे चित्तीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥३॥
दत्तालागीं अर्पीं तन मन धन । परब्रह्म पूर्ण तोचि झाला ॥४॥
दत्तचरणतीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥५॥
दत्तावरूनियां कुरवंडी काया । तयाचिया पायां मोक्ष लागे ॥६॥
एकाजनार्दनीं मुखीं दत्त नाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP