संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
क्षुद्ररोगनिदान

माधवनिदान - क्षुद्ररोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


क्षुद्ररोग अनेक प्रकारचे आहेत ; त्यांची नावे व लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे जाणावी .

अजगल्लिका .

स्निधा : सवर्णा ग्रथिता नीरूजा मुद्नसन्निभा :

कफवातोत्थिता ज्ञेया बालानामजनगल्लिका : ॥१॥

कफवातापासून तुळतुळीत , शरीराच्याच वर्णाच्या , गाठाळलेल्या व वेदना होत नसलेल्या अशा मुलांच्या अंगावर ज्या पुटकुळया उद्भभतात त्यांस अजगल्लिका म्हणतात .

यवप्रख्या

यवाकारा सुकठिना ग्रथिता मांससंश्रिता ॥

पिडका कफवाताभ्यां यवप्रख्येति सोच्यते ॥२॥

कफवातापासून उद्भभवलेली , जवासारखी ( मध्ये जाड व टोकांता बारीक अशी ) गाठाळलेली , कठीण व मांसाचा आश्रय करून असलेली अशी जी पुळी उत्पन्न होते तिला यवप्रख्या असे म्हणावे .

अंत्रालजी ,

घनामवक्वां पिटिकामुन्नतां परिमण्डलाम्‌ ॥

अन्त्रालजीमल्पपूयां तां विद्यात्‌ कफवातजाम्‌ ॥३॥

कठीण , तोंड नसलेली , वर उचललेली व वाटोळी अशी जी पुळी उद्भवून जिव्यामध्ये पू थोडा असतो ती अंत्रालजी होय . हीहि कफवातापासूनच उद्‌भवते .

विवृता .

विवृतास्यां महादाहां पक्वोदुम्बरसन्निभाम्‌ ॥

परिमण्डलां पित्तकृतां विवृतां नामतो विदु : ॥४॥

पित्तापासून , अत्यंत दाह करणारी , मोठया तोंडाची , पिकलेल्या उंबराच्या वर्णाची व वाटोळी अशी जी पुळी होते तिला वैद्य विवृता असे नाव देतात .

कच्छपिका .

ग्रथिता : पञ्च वा षडवा दारुणा : कच्छपोपमा : ॥

कफानिलाभ्यां पिडका ज्ञेया कच्छपिका बुधै : ॥५॥

जेव्हा कफापासून गाठाळलेल्या , कठीण व कासवाच्या पाठीप्रमाणे वर उचललेल्या अशा पाच किंवा सहा पुळया एकाच ठिकाणी उत्पन्न झालेल्या असतात तेव्हा त्यास कच्छपिका म्हणतात .

वल्मीक ( वारूळ )

ग्रीवांसकक्षाकरपाददेशे सन्धौ गले वा त्रिभिरेव दोषै : ॥

ग्रन्थि : स वल्मीकवदक्रियाणां जात ; क्रमेणैव गत : प्रवृद्धिम्‌ ॥६॥

मुखैरनैकै स्नुतितोदवद्भिर्विसर्पवत्सर्पति चोन्नताग्रै : ॥

वल्मीकमाहुर्भिषजो विकारं निष्प्रत्यनीकं चिरजं विशेषात्‌ ॥७॥

तिन्ही दोषांपासून रोग्याची मान , गळा , हात , पाय , खांदे , काखा व सांधे या ठिकानी जी वारुळासारखी गाठ उत्पन्न होते तिला वल्मीक अथवा वारूळ असे नाव आहे . वारुळ नवीन असताना कष्टसाध्य असते व जुने झाल्यावर असाध्य होते व त्यावर औषधोपचार अगदी लागू पडत नाही . हे उत्पन्न होता क्षणी यावर उपाय न केल्यास हे हळूहळू वाढत जाते ; यास अनेक तोंडे पडतात व ही तोंडे वर उचलली जाऊन विसर्पाप्रमाणे पसरतात ; त्यांच्यातून स्राव होतो व त्यास सुयांनी टोचल्यासारखी वेदना होत असते .

इंद्रविद्धा .

पद्मकर्णिकवन्मध्ये पिडकाभि : समाचिताम्‌ ॥

इन्द्रविद्धां तु तां विद्याद्वातपित्तोंत्थितां भिषक्‌ ॥८॥

वातपित्तापासून उत्पन्न झालेली अशी एक मोठी पुळी कमळाच्या वाटीप्रमाणे मध्यभागी असून तिच्याभोवती अनेक बारीक बारीक पुटकुळया उद्भवल्या असता तिला वैद्य इंद्रविद्धा अशी संज्ञा देतात .

गर्दाभका ,

मण्डलं वृत्तमुत्सन्नं सरक्तं पिटिकाचितम्‌ ॥

रुजाकरीं गर्दभिकां ता विद्याद्वातपित्तजाम्‌ ॥९॥

वातपित्तापासून तांबडया वर्णाचे , फोडांनी व्यापलेले , वर उचलून आलेले व अत्यंत वेदनांनी युक्त असलेले असे जे वर्तुलाकार मंडल उत्पन्न होते त्यास गर्दभिका असे म्हणतात .

पाषाणगर्दभ

वातश्लेष्मसमुद्‌भूत : श्वयथुहनुसन्धिज : ॥

स्थिरो मन्दरुज : स्निग्धो ज्ञेय : पाषाणगर्दभ : ॥१०॥

वातकफापासून हनुवटीच्या संधीवर कठीण , तुळतुळीत व मंद वेदनांनी युक्त अशी सूज उद्भवली असता तिला पाषाणगर्दंभ हे नाव आहे .

पनसिका .

कर्णस्याभ्यन्तरे जातां पिटिकामुग्रवेदनाम्‌ ॥

स्थिरां पनसिकां तां तु विद्याद्वातकफोत्थिताम्‌ ॥११॥

वातकफापासून कानाच्या आत ( अथवा काही वैद्यांच्या मते कानाच्या बाहेर देखील ) कठीण व अत्यंत ठणका असलेली जी पुळी उद्भवते तिला पनसिका असे म्हणावे .

जालगर्दभ

विसर्पवत्सर्पति य : शोथस्तनुरपाकवान्‌ ॥

दाहज्वरकर : पित्तात्स ज्ञेयो जालगर्दभ : ॥१२॥

पातळ , किंचित्‌ पिकणारी व विसर्पाप्रमाणे पसरणारी अशी जी सूज पित्तापासून उद्भवते तिला जालगर्दभ असे नाव असून तिजमुळे दाह व ज्वर या लक्षणांनी रोगी पीडित होतो .

इरिवेल्लिका .

पिटिकामुत्तमाङ्गस्थां वृत्तामुग्ररुजाज्वराम्‌ ॥

सर्वात्मिकां सर्वलिङ्गां जानीयादिरिवेल्लिकाम्‌ ॥१३॥

त्रिदोषांपासून व त्रिदोषलक्षणांनी युक्त अशी जी मस्तकावर वाटोळी अत्यंत पीड देणारी व ज्वर उत्पन्न करणारी पुळी उद्भवते तिला हरिवेल्लिका अशी संज्ञा आहे .

कक्षा ( काखमांजरी ),

बाहुपार्श्वांसकक्षेषु कृष्णास्फोटां सवेदनाम्‌ ॥

पित्तप्रकोपसम्भूतां कक्षामित्यभ्निर्दिशेत्‌ ॥१४॥

हात , खांदे , काखा व बरगडया या ठिकाणी पित्तप्रकोपापासून काळया फोडांनी व्यापलेली व वेदनांनी युक्त असलेली अशी जी पुळी उद्भवते तिला कक्ष अथवा काखमांजरी असे म्हणावे .

गंधमाला . एकामेताद्दशीं द्दष्टवा पिडकां स्फोटसन्निभाम्‌ ॥

त्वग्गतां पित्तकोपेन गन्धमालां प्रचक्षते ॥१५॥

पित्तप्रकोपासूनच त्वचेवर आता सांगितलेल्या काखमांजरीतील पुळीप्रमाणे एकच मोठी पुळी उद्भवली असता तिला गंधमाला असे नाव आहे .

अग्निरोहिणी ( काळपुळी )

कक्षाभागेषु ये स्फोटा जायन्ते मांसदारणा : ॥

अन्तर्दाहज्वरकरा दीप्तपावकसन्निभा : ॥१६॥

सप्ताहाद्वा दशाहाद्वा पक्षाद्धा हन्ति मानवम्‌

तामग्निरोहिणीं विद्यादसाध्यां सर्वदोषजाम्‌ ॥१७॥

काखेसारख्या खोलगट भागावर मांस विदारण कारणारे , वरून रखरखीत निखार्‍याप्रमाणे लाल दिसणारे व अंतर्भागी दाह उत्पन्न करणारे व रोग्यास ज्वर आणणारे असे जे फोड उद्भवतात त्यास अग्निरोहिणी अथवा काळपुळी म्हणतात . ही पुळी त्रिदोषजन्य व असाध्य असून ती वाताधिवय असता सात दिवसांनी , पित्ताधिक्य असता बारा दिवसांनी व कफाधिक्य असता पंधरा दिवसांनी या क्रमाने मृत्यूची जोड मिळवून देते .

चिप्प ( नखुरडें ).

नखममांसमधिष्ठाय वायु : पित्तं च देहिनाम्‌ ॥

कुर्वते दाहपाकौ च तं व्याधिं चिप्पमादिशेत्‌ ॥१८॥

तदेवाल्पतरैर्दोषै : परुषं कुनखं वदेत्‌ ॥

वात व पित्त हे दोन दोष नखाच्या मांसात राहिल्यामुळे त्याचा दाह होऊन ते पिकते . या रोगास चिप्प अथवा नखुरडे असे म्हणतात ; व याच रोगाचा दोषसंचय अल्प असता त्यास कुनख म्हणून निराळे नाव देतात .

अनुशयी .

गम्भीरामल्पसंरम्भां सवर्णामुपरिस्थिताम्‌ ॥

पादस्यानुशयीं तां तु विद्यादन्त : प्रपाकिनीम्‌ ॥१९॥

त्वचेच्याच वर्णाची , खोल , किंचित्‌ सुजणारी व आतून पिकणारी अशी पायावर जी पुळी होते तिला अनुशयी म्हणून संज्ञा आहे .

विदारिका .

विदारिकन्दवद्‌वृत्तां कक्षावङक्षणसन्धिषु ॥

विदारिका भवेद्रक्ता सर्वजा सर्वलक्षणा ॥२०॥

काखेत अथवा जांगाडांत विदारी म्हणजे भुईकोहळा कांद्याप्रमाणे वाटोळी अशी जी तांबडी गाठ उद्भवते तिला विदारिका अशी संज्ञा असून ही ( गाठ ) त्रिदोषजन्य असते व हिच्या ठिकाणी त्यांची सर्व लक्षणे द्दष्टीस पडतात .

शर्करा .

प्राप्य मांसशिरास्नायू : श्लेष्मामेदरतथाऽनिल : ॥

ग्रन्थिं करोत्यसौ भिन्नो मधुसर्पिर्वसानिभम्‌ ॥२१॥

स्नवत्यास्नावमनिलस्तत्र वृद्धिं गत : पुन : ॥

मांसं संशोष्य ग्रथितां शर्करां जनयेत्तत : ॥२२॥

रोग्याचे मांस , शिरा व स्नायु यांमध्ये कफ , मेद व वात यांचा प्रवेश होऊन ते त्यांची गाठ बांधतात व ही गाठ फुटली असता तिच्यातून मध , तूप व चर्बी यासारखा स्राव होतो व या स्रावामुळेही दूषित वायूचा पुन ; प्रकोप होऊन तो मांस शुष्क करून त्याच्या बारीक बारीक अनेक गाठी बनवतो . या प्रकारच्या होणार्‍या रोगास शर्करा असे म्हणावे .

शर्करार्बुद .

दुर्गन्धि क्लित्यमत्यर्थं नानावर्णं तत : शिरा : ॥

सृजन्ति रक्तं सहसा तं विद्याच्छर्करार्बुदम्‌ ॥२३॥

आता सांगितलेल्या लक्षणांची शर्करा झाली असता त्या ठिकाणच्या शिरांमधून तूप , चर्बी यांच्यासारख्या अनेक रंगांचे , लसयुक्त व घाण असे रक्त जेव्हा अकस्मात्‌ स्रवू लागते तेव्हा त्या प्रकारास शर्करार्बुद म्हणावे .

पाददारी .

परिक्रमणशीलस्य वायुरत्यर्थरूक्षयो : ॥

पादयो : कुरुते दारीं पाददारीं तमादिशेत्‌ ॥२४॥

नेहमी पायाने प्रवास करणार्‍या मनुष्याच्या पायांचे ठिकाणी वायूमुळे रूक्षपणा येऊन त्या योगाने त्यांच्या तळव्यास भेगा पडतात त्यांस पाददारी हे नाव देतात .

कदर .

शर्करोन्मथिते पादे क्षते वा कण्टकादिभि : ॥

ग्रन्थि : कोलवदुत्सन्नो जायते कदरं हि तत्‌ ॥२५॥

पायास काटा मोडल्याने अथवा खडा बोचल्याने जी बोरासारखी वर आलेली गाठ येते तिला कदर ( कुरुप ) असे नाव आहे .

अलस ( चिखल्या .)

क्लिन्नङ्ल्तरौपन्य गुदौ कण्डूदाहरुजान्वितौ ॥

दुष्टकर्दमसंस्पर्शादलसं तं विभावयेत् ॥२६॥

विषारी चिखळ पायांनी तुडविला असता त्यांच्या बोटांमधली कातडी कुजतात , त्यातून पाणी येते , त्यास खाज सुटते व ठणका लागतो आणि त्या ठिकाणी आग होते . या रोगास शास्त्रात अलस व मराठीत चिखल्या असे म्हणतात .

इंद्रलुप्त ( चाई ) अथवा खालित्य ( टक्कल ).

रोमकूपानुगं पित्तं वातेन सह मूर्च्छितम्‌ ॥

प्रच्यावयति रोमाणि तत : श्लेष्मा सशोणित : ॥२७॥

रुणद्धि रोमकूपांस्तु ततोऽन्येषामसम्भव : ॥

तदिन्द्रलुप्तं खालित्यं रुह्येति च विभाव्यते ॥२८॥

वायूसह कुपित झालेले पित्त रोमरंध्रांत ( केसांच्या छिद्रांत ) शिरले असता त्यामुळे केस झडणे व मग कफ आणि रक्त यांनी ती रोमरध्रे बंद केली असता त्यामुळे त्या ठिकाणी फिरून दुसरे केस न येणे या प्रकारच्या रोगास वैद्यशास्त्रांत इंद्रलुप्त , रुद्या अथवा खालित्य व आपल्यांत चाई अथवा टक्कल या नांवाने ओळखतात .

दारूणक .

दारूणा कण्डुरा रूक्षा केशभूमि : प्रपच्यते ॥

कफमारूतकोपेन विद्याद्दारुणकं तु तम्‌ ॥२९॥

वातकफाच्या प्रकोपामुळे केसांची जागा कठिण व रखरखीत होऊन त्या ठिकाणी खाजते व पुरळ उद्भवून तो पिकतो . या प्रकारास दारूणक म्हणतात .

अरुंषिका . ( खवडे ).

अरुंषि बहुवक्त्राणि बहुक्लेदीनि मूर्घ्नि तु ॥

कफासृकक्रृमिकोपेन नृणां विद्यादरूंषिकाम्‌ ॥३०॥

मनुष्याच्या डोक्यात रक्त , कफ व कृमि यांच्या कोपाणे खवंदे अथवा व्रण उद्भवतात व त्यास पुष्कळ तोंडे पडून त्यांतून जोराचा लसीचा स्राव होतो ; त्यांना अरूंषिका अथवा खवडे म्हणतात .

पलित .

क्रोधशोकश्रमकृत : शरीरोष्मा शिरोगत : ॥

पित्तं च केशान्‌ पचति पलितं तेन जायते ॥३१॥

क्रोध , शोक व श्रम यामुळे उत्पन्न झालेली शरीरातील उष्णता व पित्त ही मस्तकात जाऊन भिनल्याने केस पिकले असता त्यास पलित म्हणतात .

तारुण्यपिटिका .

शाल्मलीकष्टकप्रख्या : कफमारुतरक्तजा : ॥

युवानपिडका यूनां विज्ञेया मुखदूषिका : ॥३२॥

तरुण मनुष्याच्या मुखावर कफ , वात व रक्त यांपासून सावरीच्या काटयासारख्या ज्या पुटकुळया उत्पन्न होऊन त्या त्याच्या तोंडास विदूप करतात , त्यास तारुण्यपिटिका म्हणतात , या मुरमाच्या पुळया या नावाने आपल्यात प्रसिद्ध आहेत .

पद्मिनीकंटक .

कण्टकैराजितं वृत्तं मण्डलं पाण्डुकण्डुरम्‌ ॥

पद्मिनीकष्टकप्रख्यैस्तदाख्यं कफवातजम्‌ ॥३३॥

कफ व वात यांच्या प्रकोपाने कमळाच्या काटयासारख्या काटयांनी ( फोडांनी ) युक्त असे जे एक पांढर्‍या वर्णाचे , वाटोळे व फार खाजणारे मंडळ शरीरावर उत्पन्न होते , त्यास पद्‌मिनीकंटक असे नाव आहे .

जतुमणी .

सममुत्सन्नमरुजं मण्डलं कफरक्तजम्‌ ॥

सहजं लक्ष्म चैकेषां लक्ष्यो जतुमणि : स्मृत : ॥३४॥

कफरक्तापासून शरीराच्या वर्णासारखे , वर उचललेले व न दुखणारे असे जे मंडळ उद्भवते त्यास कोणी वैद्य लक्ष्य , व कोणी लक्ष्म व कोणी जतुमणी अशा संज्ञा देतात . हे मंडळ जन्मापासूनच उत्पन्न होते व स्त्रीपुरुषाच्या अंगमेदाप्रमाणे चांगले वाईट फळ देते .

माष ( मस .)

अवदेनं स्थिरं चैव यस्मिन्‌ गात्रे प्रद्दश्यते ॥

माषवत्कृष्णमुत्सन्नमनिलान्माषमादिशेत्‌ ॥३५॥

वायूच्या प्रकोपामुळे उडदासारखा काळा , वेदना नसलेला , स्थिर आणि किंचित्‌ वर उचललेला असा जो अंगावर रोग उद्भवतो त्यास माष अथवा मस असे नाव देतात .

तिलकालक ( तीळ ).

कृष्णानि तिलमात्राणि नीरुजानि समानि च ॥

वातपित्तकफोत्सेकात्‌ तान्विद्यात्तिलकालकान्‌ ॥३६॥

वरच्याप्रमाणेच वात , व कफ यांच्या प्रकोपापासून काळया वर्णाचे , तिळाच्या आकाराचे , त्वचेबरोबर असलेले व वेदना होत नसलेले असे जे काळे डाग शरीरावर उठतात ते तिलकालक अथवा तील या नावाने आबालवृद्ध जाणतात .

न्यच्छ ,

महद्वा यदि वाऽत्यल्पं श्यावं वा यदिवा सितंम्‌ ॥

नीरुजं मण्डलं गात्रे न्यच्छमित्यभिधीयते ॥३७॥

शरीराच्या कोणत्याही भागावर मोठे अथवा अति लहान व तसेच सावळे अथवा पांढरे असे जे डाग उद्भवतात त्यास न्यच्छ म्हणतात . यास वेदना बिलकूल नसते .

व्यंग ( वांग ).

क्रोधायासप्रकुपितो वायु : पित्तेन संयुत : ॥

मुखमागत्यसहसा मण्डलं विसृजत्यत : ॥३८॥

क्रोध व आयास यामुळे वायूचा प्रकोप झाला असता तो पिताशी संयुक्त होऊन तोंडावर श्याम वर्णाचे व वेदना नसणारे असे जे एक पातळ मंडल उत्पन्न करतो त्यास व्यंग अथवा वांग असे नाव आहे .

नीलिका .

कृष्णमेवं गुण गात्रे मुखे वा नीलिकाम विदु : ॥४०॥

तेच काळे असून अंगावर अथवा तोंडावरही उद्भबले असता त्यास नीलिका ही संज्ञा देतात .

परिवर्तिका .

मर्दनात्‌ पीडनाद्वाति तथैवाप्यभिघातत : ॥

मेढ्रचर्म यदा वायुर्भजते सर्वतश्वरन्‌ ॥४१॥

तदा वातोपसृष्टत्वात्‌ तच्चर्म परिवर्तते ॥

मणेरधरतात्‌ कोशस्तु ग्रन्थिरूपेण लम्बते ॥४२॥

सवेदनं सदाहं च पाकं च व्रजति क्वचित्‌ ॥

परिवर्तिकेति तां विद्यात्‌ सरुजां वातसम्भवात्‌ ॥४३॥

सकण्डू कठिना वापि सैव श्लैष्मसमुत्थिता ॥

शिश्च चोळले अथवा रगडले किंवा त्यावर कसला अभिघात झाला तर व्यान वायु प्रकोप पावून त्याच्यावरील चर्मात राहतो व ते मागे सारतो ; मग असे झाले असता शिश्नाचा कोस सुजून तो मण्याखाली गाठीसारखा होऊन लोंबतो . अशा प्रकारच्या या रोगास परिवर्तिका अशी संज्ञा असून ही पित्तनुबंधाने झालेली असता हिला ठणका लागतो , आग होते व कधी कधी ही पिकते , वातापासून उद्‌भवली असता हिच्या ठिकाणी टोचल्या सारख्या अत्यंत वेदना असतात ; आणि ही कफापासून होते तेव्हा ती कठीण व फार कंड सुटत असलेली अशी असते .

अवपाटिका .

अंल्पीय : खां यदा हर्षाद्वलाद्नच्छेत्‌ स्त्रियं नर : ॥

हस्ताभिघातादपि वा चर्मण्युद्वर्तिते बलात्‌ ॥४४॥

मर्दनात्‌ पीडनाद्वापि शुक्रवेगविघातत : ॥

यस्यावपाटयते चर्म तां विद्यादवपाटिकाम्‌ ॥४५॥

जिच्या योनीचे छिद्र लहान आहे स्त्रीशी कामुक पुरुषाने बलात्काराने संग केल्यामुळे , किंवा हाताच्या जोराने त्याने बळेच शिश्नाचे चामडे उलटे केल्यामुळे ; तसेच शिश्न चोळल्यामुळे अथवा चेपल्यामुळे किंवा शुक्रावा वेग कोंडल्यामुळे त्याचे ( शिश्नाचे ) कातडे फाटणे या प्रकारच्या रोगास अवपाटिका असे नाव आहे .

निरूद्धप्रकश .

वातोषसृष्टे मेढ्रे वै चर्म संश्रयते माणिम्‌ ॥

मणिश्चर्मोपनद्धस्तु मूत्रस्रोतो रूपद्धि च ॥४६॥

निरूद्धप्रकशेतस्मिन्‌ मन्दधारमवेदनम्‌ ॥

मूत्रं प्रवर्तते जन्तोर्मणिर्विव्रियते न च ॥४७॥

निरुद्धप्रकशं विद्यात्‌ सरुजं वातसंभवम्‌ ॥

शिश्नाचे ठिकाणी वातप्रकोप होऊन त्यामुळे ते पीडित झाले असता त्याचे कातडे सुजून मणी झाकला जातो व अशारीतीने तो मणी झाकला गेल्यामुळे मुत्र मार्गाचा रोध होऊन लष्वी करताना मूत्र थेंब थेंब पडते पण तिडीक वगैरे दुसरी पीडमुळीच नसते ; तरी मणी मात्र मोकळा होऊन कातडयाबाहेर येत नाही . अशा प्रकारच्या या वातजन्य रोगास निरुद्धप्रकश हे नाव वैद्यशास्त्रात सांगितले असून यात शिश्नावरीला कातडयास हस्तस्पर्श झाला असता ते दुखते .

सन्निरुद्धगुद .

वेगसन्धारणाद्वायुविहतो गुदसंश्रित : ॥

निरुणद्धि महास्रोत : सूक्ष्मद्वारं करोति च ॥४८॥

मार्गस्यसौक्ष्म्यात्‌ कुच्छ्रेण पुरीषं तस्य गच्छति ॥

सन्निरूद्धगुदं व्याधिमेतं विद्यात्‌ सुदारुणम्‌ ॥४९॥

मलाचा वेग कोंडून धरला असता गुदद्वाराचे ठिकाणी असलेला अपान वायूही कोंडला जाऊन तो गुदद्वाराचा अवरोध करून त्यास सकुचित करतो व मग अशा प्रकारे मलोत्सर्गाच्या संकुचित झालेल्या मार्गावाटे मल मोठया कष्टानै बाहेर येतो . या भयंकर रोगास सन्निरुद्वगुद या नावाने वैद्य ओळखतात .

अहिपूतन ,

शकृन्मूत्रसमायुक्तेऽधौंतेऽपाने शिशोर्भवेत्‌ ॥

स्विन्ने वाऽस्नाप्यमाने वा कण्डू रक्तकफोद्भवा ॥५०॥

तत : कण्डूयनात्क्षिप्रं स्फोट : स्नावश्च जायते ॥

एकीभूतं व्रणैर्घोरं तं विद्यादहिपूतनम्‌ ॥५१॥

लहान मुलाने मलोत्सर्ग केला असता त्याचे गुदद्वार न धुतल्यामुळे अथवा त्या मुलास घाम आल्यामुळे व त्याचप्राणे न्हाऊ न घातल्यामुळे रक्त व कफ यांचा प्रकोप होऊन त्यापासून त्याच्या ठिकाणी कंड उत्पन्न होतेव मग त्याने खाजवले असता तेथे फोड उत्पन्न होऊन चिघळतो व आणखी व्रण होऊन त्यांच्याशी एकवटून वातात . लहान मुलासच विशेषेंकरून होणार्‍या या भयंकर क्षुद्र रोगाला अहिपूतन असे म्हणतात .

वृषणकच्छू .

स्नानोत्सादनहीनस्य मलो वृषणसंस्थित : ॥

यदा प्रक्लिद्यते स्वेदात्कण्डू : सञ्जायते तदा ॥५२॥

कण्डूयनात्तत : क्षिप्रं स्फोट : स्नावश्च जायते ॥

प्राहूर्वृषणकच्छूं तां श्लेष्मरक्तप्रकोपजाम्‌ ॥५३॥

जो पुरुष अंघोळ करीत नाही अथवा उटणे ( सावण ) लावत नाही , त्याच्या वृषणाचे टिकाणी त्या मळाचा संचय होऊन मग तो घाणाने ओला झाला असता त्याला कंड सुटते व खाजवले असता तत्काळ फोड येऊन ते चिघळतात . या रोगास वृषणकच्छू असे नाव असून हा कफरक्तापासून होतो .

गुदभ्रंश .

प्रवाहणातीसाराभ्यां निर्गच्छत्ति गुदं बहि : ॥

रूक्षदुर्बलदेहस्य गुदभ्रंशं तमादिशेत्‌ ॥५४॥

रूक्ष व अशक्त अशा मनुष्याचे गुदद्वार शौच्याचे वेळी तो कुंथला असत अथवा त्यास अतिसार झाला असता बाहेर येणे या रोगास गुदभ्रंश ही संज्ञा देतात .

सुखरदंष्ट्र ( डुक्करदाढ ).

सदाहो रक्तपर्यन्तस्त्वक्पाकी तीव्रवेदन : ॥

कण्डूमान्‌ ज्वरकारी च स स्यात्सूकरदंष्ट्रक : ॥५५॥

जो शोथ ( सूज ) अथवा व्रण कडेला लाल झालेला , त्वचा पिकलेला व दाह , तीव्र वेदना आणि कंडू यांनी युक्त असा असून त्यामुळे रोग्यास ज्वर येतो , त्यास संस्कृत वैद्यकांत सूकरदंष्ट्र व आपल्यांत डुक्वरदाढ या नावाने जाणतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP