श्रीदत्त विजय - अध्याय आठवा

स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.


श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । कृष्णातटाक यात्रा करीत । नागार्जुन सागरा स्वामी येत । ईश्वर आज्ञे करोन । तेथेचि राहते झाले ॥१॥

असंख्य लीला होती तेथ । येथे पाहू संक्षिप्त । श्रीदत्तचरित्र अदभुत । कोणी वर्णू शकेना ॥२॥

अन्नपूर्णाम्मा कृष्णभक्त । येई स्वामी दर्शनार्थ । स्वामी लागी पुसत । श्रोते तुम्ही अवधारा ॥३॥

कृष्णदर्शन व्हावे मजप्रत । ऐसे वाटे मनात । स्वामी आशीर्वाद देत । होईल दर्शन म्हणोनिया ॥४॥

त्या रात्री स्नान करोन । सहज बैसे डोळे मिटोन । ज्योती एक प्रकटोन । कृष्ण त्यात दिसतसे ॥५॥

ज्योतीचे तेज प्रखर । अम्माचे भ्याले अंतर । डोळे उघडोनी सत्वर । घराबाहेर येतसे ॥६॥

उभी राही अंगणात । तेथेही ज्योती दिसत । हळूहळू मोठी होत । जाई पाहा ज्योती ती ॥७॥

भूमि गगनपर्यंत । ती ज्योती मोठी होत । आकाशा एवढा दिसत । श्रीकृष्ण पाहा तिजलागी ॥८॥

मुंबईहूनी वनिता दीक्षित । येती स्वामी दर्शनार्थ । अल्पा मेघल सवे असत । दर्शना येती स्वामींच्या ॥९॥

विराट ऋषींच्या रुपात । स्वामी बैसले ध्यानस्थ । हे पाहोनी विस्मित । होती ताई तेधवा ॥१०॥

नारळी पौर्णिमे निमित्त । ताई राख्या बांधत । राख्या अदृश्य होत । विस्मये पाहती सर्व ते ॥११॥

नागार्जुनसागर आश्रमात । स्वामी वृक्ष लावत । वड पिंपळ औदुंबर वृक्ष । स्वामी लाविती तेथवरी ॥१२॥

ते वृक्ष मोठे होत । ते स्वामींसवे बोलत । त्यांचेही सुख - दुःख घेत । स्वामी पाहा समजोनी ॥१३॥

स्वामी प्रवासासी जात । रामय्या सेवक आश्रमात । वृक्षांना पाणी देण्याप्रत । ठेवला होता स्वामींनी ॥१४॥

काही दिवसांनी परत । स्वामी येती आश्रमात । पिंपळ वृक्ष ध्यानात । येवोनी म्हणे स्वामींना ॥१५॥

नाही आठ दिवसात । दिले पाणी मजप्रत । रामय्या झोपा काढत । आहे येथे राहिला ॥१६॥

स्वामी सेवकाते पुसत । तो म्हणे हे खोटे असत । मी प्रतिदिनी नित्य । देतो पाणी वृक्षांना ॥१७॥

स्वामी म्हणती ते जाऊ देत । जा पाणी दे वृक्षाप्रत । ऐसे म्हणोनी पाठवीत । पाणी द्याया वृक्षांना ॥१८॥

गुंडू नरसिम्हा स्वामी भक्त । माध्यान्ही येई आश्रमात । दोघे बैसले बोलत । नरसिम्हा आणि रामय्या ॥१९॥

रामय्या म्हणे गुंडू नरसिम्हास । नाही पाणी दिले पिंपळास । मोजूनी आठ दिवस । दिले नाही पाणी ते ॥२०॥

परी ही गोष्ट स्वामीस । कैसी कळली ते न कळत । त्यांनी पुसले मजप्रत । न दिले पाणी म्हणोनिया ॥२१॥

ऐसा स्वामी श्रीदत्त । वृक्षही ज्यासवे बोलत । स्वामी भक्ताते सांगत । मान राखावा वृक्षांचा ॥२२॥

जैसा आत्म्याचा मनुष्य देह । तैसा आत्म्याचा वृक्षदेह । आपण आत्मरुप सर्व । विश्व आवरण आत्म्यांचे ॥२३॥

काही काळानंतर । गुंडू नरसिम्हा परिवार । आश्रमात तेथवर । येवोनिया राहिला ॥२४॥

स्वामीवरी प्रेम बहुत । सेवा करी आश्रमात । पिंपळवृक्षांत साधू दिसत । एके दिवशी तया लागी ॥२५॥

कधी कधी आश्रमात । दिसे मारुति फिरत । देव देवता अनेक । दिसती काही भक्तांना ॥२६॥

गुंडू पत्नी चन्नम्मा । स्वामीवरी बहु प्रेमा । आल्या गेल्या अतिथीना । जेवू घाली प्रेमाने ॥२७॥

रोज जाई रानात । लाकडे घेवोन येत । एकदा लाकडे बहुत । मिळती पाहा तिजलागी ॥२८॥

परी जव भारा उचलू जात । तो जराही न हलत । आसपास कोणीही न दिसत । मनुष्य मात्र तिजलागी ॥२९॥

शेवटी स्वामींसी आठवीत । म्हणे नर रुपात भगवंत । स्वामी करी मज मदत । धाव पाव दत्ता तू ॥३०॥

ऐसे म्हणोनी भारा उचलत । तो हलका लागत । डोईवरी घेवोनी येत । लोक विस्मये पाहताती ॥३१॥

मनामाजी लोक म्हणत । चार जणांचे ओझे असत । ही एकली कैसी उचलत । म्हणोनी विस्मय करताती ॥३२॥

ऐशा लीला अनंत । झाल्या असती होत असत । श्रीदत्त चरित्र अदभुत । व्यापोनी राहे विश्वाते ॥३३॥

मनोकामना पूर्ण होत । आरोग्य मिळे रोग्यांप्रत । अपमृत्यू न होत । पुण्यवान त्या जीवांचा ॥३४॥

ईश्वर नामक एक भक्त । सोळा वर्षे लग्नास होत । परी संतान नसत । म्हणोनी कष्टी असतसे ॥३५॥

स्वामी तीर्थ देत । संतान होईल म्हणोनी सांगत । एक वर्षात तयाप्रत । पुत्रानंद मिळतसे ॥३६॥

एक ड्रायव्हर असत । लग्नासी वर्षे बहुत । होवोनी संतान न होत । दुसरे लग्न करितसे ॥३७॥

दोन भार्या करोन । न पावे तो संतान । येवोनी स्वामींसी शरण । कृपा करा म्हणतसे ॥३८॥

स्वामी आशीर्वाद देत । दोन्ही भार्यांसी संतान होत । ऐसा दाता भगवंत । भक्त इच्छा पुरवीतसे ॥३९॥

चिन्न नरसिम्हा नामे भक्त । लग्नासी सहा वर्षे होत । परी न संतान होत । स्वामी लागी प्रार्थितसे ॥४०॥

विभूति तीर्थ स्वामी देत । कन्या होईल म्हणोनी सांगत । त्याच वर्षी त्याजप्रत । कन्यारत्न होतसे ॥४१॥

दत्तेश्वरी नाम ठेवीत । कृतज्ञतेने सेवा करीत । ऐसे करिता कन्या होत । उपवर वीस वर्षांची ॥४२॥

वीस वर्षांची कन्या होत । तिचे लग्न करोनी देत । सासरी जव कन्या जात । बहुत छ्ळती तिजलागी ॥४३॥

दत्तेश्वरी येई रडत । स्वामींसी सर्व सांगत । सासरचा सर्व वृत्तांत । करी कथन स्वामींसी ॥४४॥

स्वामी म्हणती तिजप्रत । मी करतो बंदोबस्त । तुझ्या सासरचे भक्त । होवोनी जातील ईशकृपे ॥४५॥

ऐसे म्हणोनी तीर्थ देत । सासरची सर्व पालटत । भक्ती करु लागत । ऐसा महिमा दत्ताचा ॥४६॥

ईश्वरय्या म्हणून एक । येवोनी स्वामींसी विनवीत । कन्या एक असत । पुत्र नसे मजलागी ॥४७॥

व्हावा पुत्र म्हणोनी प्रार्थित । स्वामी आशीर्वाद देत । पुत्र होई एक वर्षात । ऐसा महिमा स्वामींचा ॥४८॥

सत्यय्या नामे आणिक एक । तीन कन्या त्यासी असत । त्यासी होई पुत्र प्राप्त । स्वामी कृपे करोनिया ॥४९॥

रामलू लासकर भक्त । त्यासही तीन कन्या असत । स्वामी कृपेने पुत्र होत । भक्तवत्सल श्रीस्वामी ॥५०॥

भक्तकाम कल्पद्रुम । भक्त इच्छा करी पूर्ण । तो अवधूत निरंजन । सदैव रक्षी भक्तांना ॥५१॥

लक्ष्मीअम्मा नामे भक्त । नेमे दर्शनासी येत । तीन पिढया सुखी होत । केवळ दर्शने स्वामींच्या ॥५२॥

कथा तिसर्‍या पिढीत । कैसी पाहा घडे तेथ । लक्ष्मीअम्माची नात । सुखी सासरी असे हो ॥५३॥

तिच्या सासुरवाडीत । औदुंबराचे झाड असत । पती झाड तोडू पाहात । पत्नी नको म्हणतसे ॥५४॥

माझी आजी गुरुभक्त । तिचे गुरु असती दत्त । औदुंबरी वास नित्य । तोडू नका हो वृक्षाते ॥५५॥

परी पती न ऐकत । औदुंबर वृक्ष तोडीत । नात पाहे स्वप्नात । त्याच रात्री नवल ते ॥५६॥

साधू दिसे स्वप्नात । मी येथोनी जातो म्हणत । ऐसे म्हणोनी निघोन जात । ऐसे स्वप्नी दिसतसे ॥५७॥

तदनंतर पंधरा दिवसात । अनेक आपत्ती येत । गाडीचा होई अपघात । नुकसान धंद्यात होतसे ॥५८॥

ऐसे नुकसान होत । येती स्वामींपाशी धावत । सांगती सर्व वृत्तांत । स्वप्न औदुंबर वृक्षाचा ॥५९॥

स्वामी अभय देत । चिंता नको म्हणोनी सांगत । तोडलेल्या जागी नित्य । पाणी घाला म्हणताती ॥६०॥

स्वामी आज्ञेप्रमाणे । करिती नित्य जल सिंचन । पंधरा दिवस करिता जाण । औदुंबर वृक्ष उगवतसे ॥६१॥

साधू पुन्हा येई स्वप्नात । मुली मी आलो परत । ऐसे सांगोनी हसत । आनंद मुलीसी होत असे ॥६२॥

ऐसा स्वामी समर्थ । सदैव भक्तांसी सांभाळीत । तो अवधूत निरंजन दत्त । सदैव रक्षी भक्तांना ॥६३॥

एकदा दूर अरण्यात । स्वामी असती तप करीत । नागार्जुन आश्रम असत । हजार मैल दूर तो ॥६४॥

तेथे असती ध्यान करीत । औदुंबर वृक्ष येई ध्यानात । स्वामींशी येवोन सांगत । माती हवी मजलागी ॥६५॥

तात्काळ स्वामी पत्र लिहेत । आश्रमवासियांना कळवीत । माती द्या म्हणोनी सांगत । तया औदुंबर वृक्षासी ॥६६॥

वीस वर्षे तो वृक्ष । सर्वां शीतल छाया देत । तदनंतर मुक्ती घेत । मरोनी तो जातसे ॥६७॥

श्रीस्वामी त्या जागेत । एक कट्टा बांधत । पादुका स्थापना करीत । सन्मान करिती वृक्षाचा ॥६८॥

स्वामी प्रत्यक्ष दत्त । तेही वृक्षाचा सन्मान करीत । मर्त्य मानव मात्र । जंगल तोडीत जातसे ॥६९॥

हा अध्याय करिता पठण । प्राप्त होईल संतान । लग्न येईल जुळोन । सुख होईल संसारी ॥७०॥

सहस्रवेळा करावे पठण । फलश्रृती प्राप्त व्हावया कारण । श्रीदत्त विजय सिद्ध ग्रंथ । असे सिद्धींनी भरलेला ॥७१॥

॥ अध्याय आठवा ॥ ॥ ओवी संख्या ७१ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP