राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ५२ ते ५५

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


भारताचा राष्ट्रपती .

५२ . भारताचा एक राष्ट्रपती असेल .

संघराज्याचा कार्यकारी अधिकार .

५३ . ( १ ) संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकार्‍यांमार्फत या संविधानानुसार त्याचा वापर केला जाईल .

( २ ) पूर्वगामी तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येता , संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिपत्य राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्या अधिपत्याचा वापर कायद्याद्वारे विनियमित केला जाईल .

( ३ ) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे ,---

( क ) कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे कोणत्याही राज्याच्या शासनाला किंवा अन्य प्राधिकार्‍याला प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राष्ट्रपतीकडे हस्तांतरित होतात , असे मानले जाणार नाही ; किंवा

( ख ) राष्ट्रपतीव्यतिरिक्त अन्य प्राधिकार्‍यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही .

राष्ट्रपतीची निवडणूक .

५४ . राष्ट्रपती ,---

( क ) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य ; व

( ख ) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य ;

यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून निवडला जाईल .

[ स्पष्टीकरण --- या अनुच्छेदात आणि अनुच्छेद ५५ मध्ये , " राज्य " यात , दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र आणि पॉंडिचेरीचे संघ राज्यक्षेत्र यांचा समावेश आहे . ]

राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत .

५५ . ( १ ) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत , निरनिराळया राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात शक्य असेल तेथवर एकरुपता असेल .

( २ ) राज्याराज्यांमध्ये परस्परांत अशी एकरुपता , तसेच सर्व राज्ये मिळून व संघराज्य यांच्यात समतोल साधण्यासाठी संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास अशा निवडणुकीत जितकी मते देण्याचा हक्क असेल त्या मतांची संख्या पुढील रीतीने निर्धारित केली जाईल :---

( क ) राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास , त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता येणार्‍या भागाकारात एक हजाराच्या जितक्या पटी असतील तितकी मते असतील ;

( ख ) एक हजाराच्या उक्त पटी हिशेबात घेतल्यानंतरची शेष संख्या पाचशेपेक्षा कमी नसल्यास उपखंड ( क ) मध्ये निर्देशिलेल्या प्रत्येक सदस्याच्या मतांमध्ये आणखी एका मताची वाढ केली जाईल ;

( ग ) संसदेच्या कोणत्याही सभागृहातील प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास , उपखंड ( क ) व ( ख ) खाली राज्यांच्या विधानसभांच्या सदस्यांना नेमून दिलेल्या मतांच्या एकूण संख्येस , संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येईल तितकी मते असतील , अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांक म्हणून गणले जातील व इतर अपूर्णांक दुर्लक्षिले जातील .

( ३ ) राष्ट्रपतीची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतली जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल .

[ स्पष्टीकरण --- या अनुच्छेदात " लोकसंख्या " या शब्दप्रयोगाचा अर्थ , ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये अजमावलेली लोकसंख्या असा आहे :

परंतु , या स्पष्टीकरणातील " ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये " या उल्लेखाचा अर्थ , सन [ २०२६ ] नंतर होणार्‍या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत " १९७१ च्या जनगणनेमध्ये " असा लावला जाईल . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP