हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
अधिकमास आणि क्षयमास

अधिकमास आणि क्षयमास

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


अधिकमास
असंक्रांतिरमांतो यो मासश्चेत्सोऽधिमासकः ।
मलमासाह्यो ज्ञेय़ः प्रायश्चैत्रादिसप्तसु ॥४७॥
द्वात्रिंशद्भिर्गतैर्मासैर्दिनैः षोडशभिस्तथा ।
घटिकानां चतुष्केण पतत्यधिकमासकः ॥४८॥

चांद्रमान किंवा सौरमान या दोहोंचा मेळ असावा, म्हणून मध्यें ज्या एकाद्या अमान्त महिन्यांत सूर्यसंक्रांति होत नाहीं, त्या महिन्याला अधिकमास किंवा मलमास म्हणतात. चैत्रापासून आश्विनापर्यंत जे सात महिने, त्यापैकींच बहुतकरुन एकादा अधिकमास असतो. क्वचित् फाल्गुन देखील येतो. पौष आणि माघ हे मात्र कधीं अधिकमास नसतात. स्थूलमानानें बत्तीस महिने, सोळा दिवस इतका काळ गेल्यानंतर, म्हणजे दर तिसर्‍या वर्षीं अधिकमासाचा संभव होतो. एकदां आलेला अधिकमास प्रायः पुनः १९ वर्षांनीं येतो. अधिकमास धरण्याचें कारण असें आहे कीं, सामान्यतः चांद्रवर्षाचे दिवस ३५४ व सौरवर्षाचे दिवस ३६५ असतात; म्हणजे चांद्रमानाचें वर्ष व सौरमानाचें वर्ष ह्या दोहोंत अकरा दिवसांचें अंतर असतें. हें अंतर भरुन यावें व चांद्रवर्षाचा आणि सौरवर्षाचा मेळ असावा, म्हणून सुमारें ३२॥ महिन्यांनीं एक अधिक महिना धरितात. पूर्वीं पृष्ठ १५ वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेंच अधिकमासाचें नांव असतें. आणि त्या मासनांवाला ‘ अधिक ’ असें विशेषण जोडलेलें असतें. दर तीन वर्षांनीं येणारा अधिकमास शुभ कर्मास वर्ज्य सांगितला आहे; परंतु ज्या वर्षी क्षयमास येतो, त्या वर्षी दोन अधिकमास येतात; त्यांपैकीं क्षयमासापूर्वी येणारा जो अधिकमास, ज्याला संसर्प म्हणतात, तो शुभ कार्यास वर्ज्य नाहीं. मागाहून येणार्‍या अधिकमासास मलिम्लुच म्हणतात, तो मात्र शुभकार्यास वर्ज्य आहे.  

अधिकमास काढण्याची रीति.
मासस्य कृष्णपंचम्यां रविः संक्रमते यदि ।
अधिमासः स विज्ञेयः परवर्षेण योजयेत् ॥४९॥

रीति पहिली--- पूर्वीच्या संवत्सरांत ज्या महिन्याच्या कृष्णपंचमीस सूर्याची संक्रांति येईल, तोच महिना प्रायः पुढील वर्षीं अधिक मास होतो, असें समजावें. तथापि हें स्थूलमान आहे. म्हणून पंचमीच्या मागेंपुढें एकदोन प्रहर संक्रांतिप्रवेश झाला तरी चालेल. उदाहरणार्थ, ग्रहलाघवाप्रमाणें शके १८५५ संवत्सरांत वैशाख कृष्ण पंचमीस त्या महिन्याची वृषभसंक्रांति आली होती, म्हणून १८५६ संवत्सरांत वैशाख हाच अधिकमास झाला.

शाकोऽर्कघ्नोंकभूतष्टोऽक्षाल्पो भूनो दशाल्पकः ।
द्वयुनश्चैत्रात्स एवाधिमासो नैवान्यथा भवेत् ॥५०॥

रीति दुसरी--- शालिवाहनशकास बारांनीं गुणून त्या गुणाकारास एकोणिसांनीं भागावें. आणि शेवटीं जी बाकी राहील ती जर नऊ किंवा नवांच्या आंतील एकदा अंक असेल तर त्या वर्षीं अधिकमास पडेल असें समजावें. तसेंच, चैत्रादि बारा महिन्यांतून कोणता महिना अधिकमास होईल, हें समजण्याची रीति अशी आहे कीं, भागाकाराची बाकी जर पांच किंवा पांचांपेक्षां अधिक असेल तर त्यांतून दोन वजा करावे आणि पांच अंकांच्या आंत असेल तर एक वजा करावा. बाकी जो अंक राहील तो चैत्रापासून मोजून अधिकमास समजावा. उदाहरणार्थ, शके १८३४ या वर्षी अधिकमासाचा संभव आहे कीं नाहीं व असेल तर कोणता अधिकमास येईल हें सिद्ध करावयाचें आहे, म्हणून वरील रीतीप्रमाणें १८३४ x १२ = २२००८ / १९ = ११५८. भागाकाराची बाकी ६ राहिली. ही बाकी नऊ अंकांच्या आंत आहे म्हणून १८३४ या वर्षी अधिकमास आहे हें प्रथम निश्चित झालें. तसेंच, बाकी ६ राहिली आहे, याकरितां रीतीप्रमाणेम त्यांतून २ वजा करितां बाकी ४ राहिली. म्हणून चैत्रापासून चवथा महिना जो आषाढ तो अधिकमास होईल. तथापि ही रीति स्थूलमानाची आहे. या रीतीनें कधीं कधीं थोडा फरक पडतो. उदाहरणार्थ, शके १८३१ या वर्षी वरील रीतीनें भाद्रपद हा अधिकमास येतो, पण त्या वर्षी सुक्ष्म गणितानें श्रावण अधिकमास आला होता.
 
१८५८ भाद्रपद    १८६१ श्रावण    १८६४ ज्येष्ठ       
१८६७ चैत्र    १८६९ श्रावण    १८७२ आषाढ       
१८७५ वैशाख    १८७७ भाद्रपद    १८८० श्रावण       
१८८३ ज्येष्ठ    १८८६ चैत्र    १८८८ श्रावण       
१८९१ आषाढ    १८९४ वैशाख    १८९६ भाद्रपद       
१८९९ श्रावण    १९०२ ज्येष्ठ    १९०४ आश्विन       
१९०७ श्रावण    १९१० ज्येष्ठ    १९१३ वैशाख       
१९१५ भाद्रपद    १९१८ आषाढ    १९२१ ज्येष्ठ       
१९२३ आश्विन    १९२६ श्रावण     १९२९ ज्येष्ठ       
१९३२ वैशाख    १९३४ भाद्रपद    १९३७ आषाढ    

ह्यांशिवाय क्षयमासामुळें शके १८८५ आणि १९०४ या वर्षीं अनुक्रमें कार्तिक व फाल्गुन अधिकमास होतात.

क्षयमास.
द्विसंक्रांतिः क्षयाख्यः स्यात् । कदाचित् कार्तिकत्रये ।
युग्माख्ये स तु तत्राब्दे ह्यधिमासद्वयं भवेत् ॥५१॥

ज्या एका अमान्त महिन्यांत दोन सूर्यसंक्रांति येतात त्याला क्षयमास म्हणतात. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या तीन महिन्यांपैकींच एकादा क्षयमास असतो. याचें कारण असें आहे कीं, या तीन महिन्यांत सूर्याची गति शीघ्र असते; म्हणून वृश्चिक, धनु आणि मकर यांपैकीं प्रत्येक राशि चालून जाण्यास सूर्यास कधीं कधीं चांद्रमासापेक्षां कमी काळ पुरतो. अशा वेळेस एका चांद्र महिन्यांत दोन संक्रांति येण्याचा संभव असतो, म्हणून क्षयमास होतो. क्षयमास येतो तेव्हां क्षयमासाच्या पूर्वी एक आणि क्षयानंतर एक,  असे दोन अधिक महिने कमी अंतरानें येतात. क्षयमास एकदां येऊन गेला म्हणजे बहुतकरुन १४१ वर्षांनीं किंवा १९ वर्षांनी पुनः येतो. मागें शके १७४४ या वर्षीं मार्गशीर्ष क्षयमास आला होता; आतां पुढें शके १८८५ आणि १९०४ या वर्षीं अनुक्रमें कार्तिक व पौष हे क्षयमास होतील.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP