(१)

प्रभूपदीं नमन तव पद तदधिक शतविधा मजसि
असत हे केकाकार आधीं । प्रभुपदीं ॥धृ०॥

अवगणी म्हणूनि झणिं, हरिहर विधितर न गणिति
अद्य-नग ही गत कवि, प्रभुबल तसा करिसि
जरि प्रसाद मजवरि असा पतित तरि ।
प्रभुभयाहि गणिं निज मनिं नच कधिं ॥१॥

विनवित नव कवि तूं करशिल प्रभुवरा, अमंगल
न जोर, सुमंगलचि तरि, अमंग निज
करि, वितरिशी सहज मजवरी निरवधि ॥२॥

(२)

गगनांत कां राही धरा ही अनंत दीपका ॥
स्थिरतराहि, फिरत राही,
आज कां तारका-मालिका ॥धृ०॥

स्वांतीं किती येति कल्पना,
भ्रांतिप्रति चित्त सोडिना ॥१॥

भ्रम जरि नयनां, स्थिर बघतांना,
शांतिप्रभादे न कां मना ॥२॥

निरखुन बघतां, आधिं अधिकता
अंतीं न कांहींच भावना ॥३॥

(३)

नगरी सारी नटुनी थटुनी सकलाभरणीं ।
सरितामुकुरीं पाही कां ही वदना रमणी ॥धृ०॥

दीप नयनि बघतां पतिला । लजुनि लपवाया तनुला ।
कृष्णतमाची शाल करी ॥१॥

तुषार नच जलयंत्र जलीं । स्पशें आलिंगनकालीं
सगळी । घर्मजलें परि तनु भिजली । होती न हे
ध्वनि पटहें, धडधड हें करि ह्र्दय परी ॥२॥

(४)

प्रलयाग्नीची वृष्टिहि झाली । मत्तनुची जरि रक्षा केली ॥
टाकुनि दिधली जाळे पातालीं । वृत्ति मनीं शांत ॥धृ०॥

श्री जगदीशा प्रेमें गाइन । कल्पांतीं हा असाचि राहिन ।
राज्यपदाचा मोह न ठेविन । वृत्ति मनीं शांत ॥१॥

राज्यलोभ भय धन सुत दारा । व्यर्थ तयांचा जगीं पसारा:
तारा अथवा क्रोधें मारा । वृत्ति मनीं शांत ॥२॥


(५)

जगदीश-पदीं जा शरण
शरणपर अन्य जगांत न या ।
तदितर इतर न दुरित हरित
हरि करील दया तरि हरिल भया ॥धृ०॥

भक्त जरि असे सहस्त्रधा अपराधी
ठेवि श्रीहरि सबा करुणापराधी ॥१॥

कां भयामि अजुनी भाब हा न वधी ?
जावया शरण त्या न करा अवधि ॥२॥

(६)

अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ॥धृ०॥

वर्षती मेघजल, शांतविति भृमितल,
सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥१॥

फिरविसी रविशशी, तेजविसि भूमिसी,
केवि जन सुखविसी, कळत नच पामरा ॥२॥

करिसि गर्भावना, मग पयोयोजना,
पुढति अर्पिशि जनां पवन जल शुभकरा ॥३॥

श्रम जनां-दिनभरी । विश्रमा शर्वरीं,
रमवि संध्या बरी । रंगवुनि अंबरा ॥४॥

दिङ-मंडलावरति नित्य नव विहरती
तारकातति, हरति नयन मन सुखकरा ॥५॥

पक्षि लक्षावधि, श्रवणमुख निरवधि
प्रसरिती स्वन नाद रस निर्झरा ॥६॥

वाग्वैजयंतींत शब्दमणि अगणित
स्वीकरुनि कविरणित, हसुनि खुलवी जरा ॥
गोविंद पूर्वपद अग्रज स्मरुनि पद
उधळि निज हृत्सुखद शब्दरत्नाकरा ॥८॥

(७)

माना वचना; मान्य न हें वच हरिचरणा ॥
आचरणा साच न या यश कधिं जागा ॥धृ०॥

अशरणशरणा, शरण न तरि मरणचि समजा,
स्वजना सकला न करि हरिपदावमाना ॥१॥

(८)

प्रेमाविना । जगतीं गति ना ।
करिते धरा । ही पावना ॥धृ०॥

नसतां रवि । तरि कांहिसा ।
शशि भूषवी । सकला भुवना ॥१॥
परि आटला । प्रेमांबुधि ।
तत्साग्यता । करवे न कुणा ॥२॥

(९)

कां शंका । कराया सांग विकट अघटित अशि
कृति कोणतीहि जी छेदिल या भयपंका ॥
लत्ताघातें कठिण गिरितटा । मुष्टिविधातें तडित्पला ।
द्दक्यातें वर गगनकपाटा । फोडुनि दाखवुं संरुद्ध---
बला वद का ॥

(१०)

आनंदाच्या सागरिं वाही । सृष्टि अशी तर नवल न् काहीं ॥धृ०॥
रमवी स्वकरें नाथ सुतांसी । सुखविति बाळें नाथासही ॥१॥
अशा सेवितां द्विविध सुखासी । मानिति अबला मोह सदाही ॥२॥

(११)

जगदीश तो विदेही । दिसला कुणासि नाही ।
तरि हि त्याविना न कांही ॥धृ०॥
दाही दिशांस राही । व्यापूनिया जगताही
भक्तास दूर न कांहीं तरि ही ॥१॥
स्वजना सदाहि पाही । हृदयीं तयांच्या राही ।
विलया भयासि नेई तरि ही ॥
 
(१२)

अनंत तेजांचा तूं राणा । विनवित देवा नारायणा ।
आणा करुणा करुणाघना ॥धृ०॥
कृति घोर बघुनि ही लाजवीत का दीना ?
घ्या झाकुनि आपुल्या सर्वसाक्षी नयनांना ॥१॥

(१३)

जगदीश वचनासी । करि पूर्ण करुणाराशी ॥धृ०॥
रक्षी तुझ्या ब्रीदासी । दे धन्यता निज दासासी ॥१॥

कर हा अबल वचना या । देतां तुझ्या वाचुनिया ।
धरि कोण अभिमानासी ॥२॥

(१४)

कृतिच मात्र हो नच वचनापरि ।
निर्दयता आचरणी दिसे खरी ॥धृ०॥
करितां न दया आपण नाथा ।
टाकिल कां जगदीश अनाथा ॥
दीनजनां तो नुरतां त्राता ।
सतत अवन करि ॥१॥

(१५)

रम्य आनंदपद पाहतां कानना ।
सहज सहवासपर हो मना कामना ॥धृ०॥
कांतार शांत करि, स्वांतास शांत जरि ।
शांत तर अंत तरि, सहज वाटे मना ॥१॥

(१६)

हा नित मोद सकल भुवना । प्रभुवरि भाव धरा ।
समजुनि, करि न कधिं नाश, कुणाप्रति जाणा ॥धृ०॥
येई धावुनि संकटसमया । भक्त जनांप्रति संरक्षाया ।
सहज करी जी अघटित कार्या । शक्ति न ही अवमाना ।

(१७)

उत्कंठा वैकुंठाची लावि मानसा ।
मोह न तरि आवरतां खास हा असा ॥धृ०॥
शून्य भूमि पापवशा । शून्य तिला मीहि जसा ॥
शून्य जशा दाही दिशा । शून्य मनीं वृत्ति तशा ॥
आयुष्यास पळ ही नीरसा रसा । पळ जीवन सम गमतें; नीरसा रसा ॥

(१८)

पूर्णचंद्रबिम्बवदन एकदा पहा हो ।
धूलिपुलिन मलिन कमल तेंच हें न कां हो ? ॥धृ०॥
धूलिमिश्र अश्रुजला बघुनि तत्त्वतां ।
चुंबनांनि मलिनांबुज मधुसि चाखितां ।
त्यासमचि आमुचेहि अधर माखतां ।
हांसलो परस्परांसि आठवतें कां हो ? ॥१॥

(१९)

देई हीच जोड । आई । विष हें देइ गोड ॥धृ०॥
व्यर्थ हा पसारा सारा । मनिं न देह मोहा थार
तुच्छ मानि या संसारा । माया सोड सोड ॥१॥
हट्ट कधिंहि धरिला नाहीं । हाच आज शेवटचाही ॥
मागणें न याहुनि कांहीं । पुरवी हेंच कोड ॥२॥
पुरवितां न आई ज्याला । कोण घेई जवळी बाळा ?
धीर धरुनि मायाजाळा । आई तोड तोड ॥२॥

(२०)

पंचानन संचारुनि । भीषणरव करित वनीं ॥
नारायणनामध्वनि । त्यांतहि असे ॥धृ०॥
गुंगुनिया कमलदलीं । गुंजारव करित अलि ॥
नारायणनामावलि । त्यांतही असे ॥१॥
वायु करूनि वनिं निनाद । मंडित जणु तरुसि वाद ॥
नारायण हाच नाद । त्यांतही असे ॥२॥
चंडनाद सागरास । निर्झर करि मंद हास ॥
नारायणनामवास । त्यांतही असे ॥३॥
जनका निज ताराया । ब्रह्मार्पण करि काया ।
रक्त समूळ दुरिता या । धवल विमल करि निर्मला ॥
शुभ मुहूर्त शुभ घटिका
हा अपूर्व योग निका
पुण्यबळावाचुनि कां
बाळ तुम्हां लाभला ?
धन्य तुझी पुण्याई । नवलाची नवलाई ।
धन्य तुझी ही आई । धन्य जन्म जाहला ।
जन्म मरण मंगला । अमर बाळ जाहला ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP