मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
जेव्हां जीवनलेखनास जगतीं ...

राम गणेश गडकरी - जेव्हां जीवनलेखनास जगतीं ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


जेव्हां जीवनलेखनास जगतीं प्रारंभ मीं मांडिला,
जो जो द्दष्टिंत ये पदार्थ सहजीं वाटे हवासा मला !
बाल्याची पहिली अशी बदलती द्दष्टी सदा बागडे,
तेव्हां ‘स्वल्पविराम’ मात्र दिसती स्वच्छंद चोंहींकडे !
आहे काय जगांत ? काय तिकडे ? हें कोण ? कोठें असे ?
सांगा ईश्वर कोण ? त्यापलिकडे तें काय ? केव्हां ?  कसें ?
जें तें पाहुनि यापरी भकतसे, द्दक् संशयें टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तैं ‘ प्रश्नचिन्हां’ कित.
अर्धांगी पुढती करी वश मना शृंगारदेवी नटे,
अर्धें जीवन सार्थ होइल इथें साक्षी मनाची पटे;
प्रेमानें मग एकजीव बनतां भूमीवरी स्वर्ग ये !
केला ‘अर्धविराम ’ तेथ; गमलें येथून हालृं नये !
झाली व्यापक द्दष्टि; चित्त फिरलें साश्रर्य विश्वांतरीं,
दिक्कालादि अनंतरूप बघतां मी होत वेडयापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखीं भ्रमविती; लागे मुळीं अंत न,
त्याकाळीं मग जाहलें सहजची ‘उद्नार’ वाची मन ।
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश---
हीं एकेक समर्थ आज नसतीं चित्ता कराया वश ।
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथें असे जाहला,
देवा !‘ पूर्णविराम’ त्या तव पदीं दे शीघ्न आतां मला !

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP