सुदाम्याचे पोहे - प्रसंग १ ते ५

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


[ अवंतीनगरीजवळच्या अंगपान वनांतील सांदीपनी मुनींचा आश्रम , बलराम , कृष्ण , सुदामा , इत्यादी विद्यार्थ्यांसह सांदीपनी मुनि आश्रमाच्या प्रांगणांत प्रातःकालीं सूर्याची प्रार्थना करीत आहेत . गुरुपत्‍नी तुळशीची पूजा करीत असते . ]

उदयगिरीमुपेतं भास्कर पद्नहस्तम् ।

निखिलभुवननेत्रं रत्‍नरत्‍नोपमेयम् ॥

तिमिर - करि - मृगेन्द्रं बोधकं पद्निनीनाम् ।

सुरवरमभिवन्दे सुन्दरं विश्ववंद्यम् ॥

[ सूर्याची प्रार्थना संपतांच सर्व विद्यार्थी गुरु व गुरुपत्‍नी ह्यांना नमस्कार करतात . नंतर गुरु सांदीपनी नित्याचीं कामें त्याना सांगतात . ]

सांदीपनी : कुमारांनो ! तुम्ही दोघे गायींना चरून आणा ... तुम्ही कंदमुळं , फ़ळं घेऊन या .... कृष्ण , बलरामा , तुम्ही आपला धनुर्विद्येचा अभ्यास करा . अन् सुदामा , तूं वेदपठण करीत बैस . माझं ध्यान - अनुष्ठानाचं आन्हिक कर्म मी उरकतों अन् मग तुम्हाला संथा देतों .

शिष्यगण :( नमस्कार करून ) आज्ञा गुरुदेव !

[ सांदपनी दर्भ - समिधा घेऊन अनुष्ठानाला जातात . मुलें आपापल्या उद्योगाला लागतात . आश्रमांत जाऊन बलराम - कृष्ण आपापले धनुष्यबाण घेऊ लागतात . तोंच त्यांना आंतून गुरुपत्‍नीचें बोलणे ऐकू येतें . ]

गुरुपत्‍नी : अगबाई ! सरपण अगदींच संपलंकीं !

कृष्ण :( बलरामास ) दादा , सरपण संपलंय रे !

बलराम : चल , आपण रानांतनं तोडून आणू या !

कृष्ण : अन् तिथचं धनुर्विद्येचा अभ्यासही करूं या . ( धनुष्य - बाण घेऊन जातात . )

सुदामा वेदपाठण करीत बसला आहे . कृष्ण - बलराम कुर्‍हाड व दोर्‍या घेऊन येतात . ]

सुदामा : कृष्णा ! कुठं रे निघालांत ?

कृष्ण : रानांत ! सरपण आणायला !

सुदामा : मी येऊं तुमच्याबरोबर ?

बलराम : तूं ? कशाला ? पावसापाण्याचे दिवस !.... चिखलांत रुतून बसशील कुठं तरी ! जिवंत समाधि मिळेल तुला !

कृष्ण : दादा , असं रे काय त्याला जेव्हां तेव्हां टाकून बोलत असतोस ?

बलराम : मग काय ? हा हाडांचा सांपळा बरोबर न्यायचा ?.... वार्‍या - वावटळीनं कुठं उडून गेला तर ?

कृष्ण : सुदाम्याचं शरीर दुबळं असलं तरी मन मोठं खंबीर आहे .

बलराम : बसा तर एकमेकांना मिठ्या मारीत ...( जातो . )

कृष्णा : सुदाम्या , गुरुदेवांनीं सांगितलय् तें कर . त्यांची आज्ञा मोडूं नकोस . आम्ही लवकरच परत येतों हं !

[ सुदाम्याच्या पाठीवरून प्रेमळपणें हात फिरवून कृष्ण जातो . सुदामा खिन्नपणे पोथी वाचूं लागतो . योंच गुरुपत्‍नी येते . ]

गुरुपत्‍नी : हें काय ? सारेच कुमार बाहेर गेलेत वाटतं ?

सुदामा : होय .... पण मी आहें ना ? ( उठतो . )

गुरुपत्‍नी : तुझा काय उपयोग ?

सुदामा : कां बरं ?

गुरुपत्‍नी : जळणाया लाकडं तोडून आणायचीं आहेत रानांतनं ! ती तू का आणणार आहेस ?

सुदामा : पण कृष्ण - बलराम गेलेत कीं लाकडं आणायला !

गुरुपत्‍नी : ( आश्वर्यानें ) कृष्ण - बलराम गेलेत ? पण त्यांना कुणीं सांगितलं ?

सुदामा : कुणास ठाऊक ! पण ते आत्तांच गेले खरे रानांत .......

गुरुपत्‍नी : हां ! असा अंगांत वारं शिरल्यासारखा धावत जाऊं नकोस . सावकाश जा . चल , खाऊन बांधून देतें .....

[ गुरुपत्‍नी आंत जाते , झटपट पोथी नीट गुंडालून ठेवून सुदामाही जाऊं लागतो . तोंच मोटली बांधीत गुरुपत्‍नी दारांत येते . सुदाम्याला ती मोटली देते . ]

गुरुपत्‍नी : कृष्ण - बलरामांना दे .... अन् तूंही खा हं !

सुदामा : आज्ञा मतोश्री ! ( नमस्कार करून लगबगीनें जातो . )

[ अरण्य . कृष्ण - बलराम रानांत लाकडें तोडीत असतात . ]

( १ ) कृष्ण - बलरामांना शोधत , त्यांना हाका मारीत सुदामा धावत अरण्यांत येतो .

सुदामा : वाट चुकलों वाटतं ?

[ इतक्यांत आभाळांत गडगडतें . सुदामा वर पाहातो . आकाश मेघाच्छादित दिसतें . ]

सुदामा : बाप रे ! पावसाचा रंग दिसतोय् ! ( कृष्ण - बलरामांना हाका मारीत पुन्हा धावत सुटतो . )

( २ ) आकाशांत पावसाचे ढग गोळा होऊं लागतात .

( ३ ) लाकडें तोडीत असतां बलरामाची नजर सहज आकाशाकडे जाते .

बलराम : चांगलाच पाऊस कोसळणारसं दिसतंय् !

कृष्णा : मग हीं लाकडं भिजणार ! ( दूरवर पाहून ) त्या .... त्या समोरच्या गुहेंत तरी नेऊन ठेवूं या .....

[ लाकडांच्या मोळ्या बांधून उचलून नेतात . वाद्ळवारा .... ढगांचा गडगडाट .... विजांचा कडकडाट सुरू होतो , ]

( ४ ) कृष्ण - बलरामांना हाका मारीत सुदामा अरण्यांत दुसरीकडे धावत असतो . तोंच मुसळधार पावसाला सुरुवात होतो . निवार्‍यासाठी सुदामा एका झाडाखालीं बसतो .

[ आश्रम . पावसानें भिजलेले सांदीपनी तोडानें स्तोत्र पुटपुटत येतात . ]

सांदीपनी : सर्वात्मा सर्वकर्ताच सृष्टिजीवनपालकः ।

हितःस्वर्गापवर्गस्य भास्करेश नमोस्तु ते ॥

नमो भगवते तुभ्यं आदित्याय नमो नमः ।

आदित्यः सविता सूर्यः खगः पूषा गभस्तिवान् ॥

[ आंतून गुरुपत्‍नी येते . ]

गुरुपत्‍नी : हें काय ? कधी येणं झालं ? आधीं वस्त्रं तरी बदलायचीं .....

सांदीपनी : अगोदर हें सांग , मुलं घरी आलीं का ?

गुरुपत्‍नी : छे ! कुणीच आलं नाही अजून .

सांदीपनी : कृष्ण - बलराम ?

गुरुपत्‍नी : ते तर रानांत लाकडं आणायला गेलेत !

सांदीपनी : रानांत ? लाकडं आणायला ? धाडलं कुणी त्यांना ? तूं धाडलंस ?

गुरुपत्‍नी : छे बाई , मी कशाला धाडूं ? सरपण संपंलय् असं मीं सहज म्हटलं ..... तें ऐकून मला न विचारतां परस्परच निघून गेले ते !

सांदीपनी : शिव ! शिव ! काय केलंस हें ? श्रीकृष्णाला ... साक्षात् भगवंताला लाकडं तोडायला पाठलंस ! अग , श्रीकृष्ण म्हणजे ईश्वरी अवतार !.... आतां शोधायचं तरी कुठं त्यांना रानावनांत .... अशा पावसापाण्यांत ?

[ बोलत बोलत तसेच परत जाऊं लागतात . ]

गुरुपत्‍नी : मी म्हणतें , थोडा फ़लाहार तरी करून जावं ....

सांदीपनी : फ़लाहार ? कृष्ण , बलराम .... सारे कुमार तिकडे रानावनांत उपाशी वणवणताहेत ..... अन् मी इकडे फ़लाहार करूं ?

गुरुपत्‍नी : सुदाम्याला धाडलंय् खायचं देऊन ....

सांदीपनी : म्हणजे ? सुदामाही गेलाय् का ? अरेरे ! काय अवस्था झाली असेल बिचार्‍याची ह्या पावसांत !

[ घाईघाईनें जातात गुरुपत्‍नीच्या नेत्रांत अश्रु तरळतात . ]

[ झाडाखाली बसलेल्या सुदामा थंडीने कुडकुडत असतो . ]

सुदामा : कृष्ण .... कृष्ण .... माझ्या कृष्ण पावसांत भिजला असेल . खूप दमलाही असेल .

( १ ) कृष्ण - बलराम लाकडांच्या मोळ्या घेऊन बसले आहेत .

कृष्ण : बरं झालं ..... सुदाम्याला आणला नाहीं बरोबर . फ़ार काल झाले असते त्याचं

बलराम : मग ? सांगितलं काय तुला ? माझं तूं ऐकतोस कुठं ? तुला हवं असतं त्याचं लोढणं नेहमीं गळ्यांत बांधून घ्यायला ....

( २ ) सुदामा थंडीने कुडकुडत कृष्णाच्या नांवाचा जप करीत झाडाखालीं बसला आहे .

( ३ ) सांदीपनी , ’ कृष्णा , बलराम , सुदाम्या ...’ अशा हाका मारीत रानांतून फिरत असतात .

( ४ ) गुहेच्या तोंडाशीं .

बलराम : कृष्णा , पावसाचा जोर कमी झालाय् . मोळ्या घेऊन चालायला लागूं या .

( ५ ) सांदीपनी : गेले तरी कुठं हे ?... कीं मीच वाट चुकलोंय ?.... कुठं शोधायचं ह्यांना आतां ? ( जातात . )

( ६ ) पाऊस थांबला तरी सुदामा कुडकुडत बसला आहे . तसाच उठून कष्टानें चालूं लागतो . पण लगेच खालीं कोसळतो .

सुदामा : छे ! पाऊलही टाकवत नाहीं . भूक फ़ार लागलीय् .... कुठं शोधायचं कृष्णाला ?.... आतां आपलाच हें सारं खाऊन टाकावं झालं ! ( मोटली सोडून भराभार खाऊं लागतो . )

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP