मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
भाऊ नाना तलवार धरून । गेल...

पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


भाऊ नाना तलवार धरून । गेले गिलच्यावर चढाई करून ॥ध्रुपद॥
सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर पुणे वसविले मोहरा पुतळ्यांला नाही काहि उणे । चमके नंगी तलवार सैन्य हे सारे लष्कर पाहून ॥ गर्व कोंदला फार जैसा लंकापती रावण । होणारासारखे अक्षर कैसे लिहिले ब्रह्माने ॥( चाल )॥ नामांकित सरदार थोर । नामे ऐका तपशीलवार ॥ बोलावून अवघे वजीर । सजवृनया सभा सदर ॥ मग कैसा केला विचार । लिहिली एकच तार ॥ अष्टप्रधान पानकरी सार । जरीपटकाऐंशी हजार ॥ गाईकवाड सैनापती भार ॥ भाला ऐंशी हजार होळकर । बारा हजार बाणांची कतार । चाळीस हजार भोसले नागपुरकर ॥ वीस हजार अरब सुमार । तीस हजार हपशी बरोबर ॥ आले मल्हारराव होळकर । फौजेमध्ये कुल अकत्यार । अठरापगड लोक सार ॥ आपल्याला भिसलीवर ॥( चाल )॥ चाळीस हजार पठाण नित्य तेघे चमकती । अर्बुज जात ही खंदी फिरे भोवती ॥ सिंध जाट रोहिला नाही त्याला गणती । घोरपडे नाईक निंबाळकर नौबद वाजती ॥ घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । ढालेशी ढाल भिडे जरीपटक्याचे हत्ती ॥ हे मानकरी भाऊचे ऐसे दुनया बोलती ॥ एक एकाबरोबर ऐसै पतके किती । चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । बाराभाई जमले नाही त्यांची गणती ॥ सांडणीस्वाराची डांक फिरेभोवती ।..........॥ अशी  जमाबंदी करून । भाऊ नाना ॥१॥

शाण्णव कुळीच भूपाळ सारे मानकरी बरोबर ॥ धायगुडे पायगुडे मोरे शेडगे पांढरे महाशूर ॥ खल्लाटे लोखंडे भिसे वाघमारे आणिक हटकर । शेळके बोळके काळे खचल खराडे नाही त्याला सुमार । शिरके महाडिक मिसाळ पिसाळ बोधे बरगे आहेत बरोबर । जाधव धुळप पोळ चवाण डफळे भोसले गुजर रणशूर ॥ लिगाडे कदम फडतारे घाडगे यादव थोरात भापकर । आंगरे इंगळे शेवाळे शितोळे रणदिवे वाबळे खळदकर ॥ गाढवे रसाळे जगताप जगदाळे काकडे काटकर । बोबडे ढुबल भोइटे लिंगाडे सांवत खिरसागर ( क्षीरसागर ) । गोडासे निकम दुधे फाळके धुमाळ गजरे वालकर तेरदाळकर । बागल कोकाटे कडमकर रणनवरे कालेवार आयरेकर ॥ हे सारे सुभे भाउचे उभे आपलाल्या बाजूवर ॥( चाल )॥ चाळीस हजार करवल जमले । सोडिले शिरावर समले ॥ रास्ते पटवर्धन नाही गमले । ढमढेरे तळेकर तुमले ॥ आले पंत जागा त्यांनी आखले । कितुरकर देसाई हाती भाले हैदराबादकर मोंगल आले ॥ मंत्री चिटणीस नरगुंदवाले । कोल्हटकर महारा? खटाववाले ॥ कुडुकवाल्यांनी खजिने पाठविले । गोवेकर फरास पुढे गेले ॥ लहान लहान मानकरी चुकले । थोर थोर जमेसी धरले ॥ नाना फौज पाहतांना चकले ॥ दलबादल डेरे दिधले । नगारखाने झाडू लागले ॥ गोसावी त्यामधि वायले । फक्क्ड ते सोटेवाले ॥ मग लाग्नण कितीक आले ॥ बावन पागा फारच झाले ॥( चाल )॥ कोतवाल घोडे सजविले श्यामकर्ण । भरगच्ची हत्तीवर झुला दिसे आरूण ॥ अयन्याची अंबारी गगनी तारांगण । आघाडी चालली लगी भडक निशाण ॥ सूत्रनाळी जंबुरे उंटावर रोखुन । खंडा ?? सुरे तिरकमान कटार लावून ॥ ढाल फिरंग नवाजखाणी निशंग गगन लकेरी खुन । पिस्तुल बंदुक चकमक चमके संगीन ॥ कराबीन बकमार याची खूण । राहिले एकदिल खूण करून ॥ जमराडे सरदार झांबरे शूर अतिरथी । लई धनगर शाण्णव कुळीचे मराठे होती ॥ ह्त्यार जमई जमदाड माडु घेऊन हाती । बिचवा लवंगी गुरगुज सांग सोटा बरची फेकिती ॥ सुरसेप दारूचे कैफ धुंद लढयेती । फसत बालमपेच खुबचार मारलई होती ॥ देणे महाराजांचे परिपूर्ण । चाले फौज काय पाहता दुरून ॥ भाऊ नाना. ॥२॥

नाना भाऊंनी विचार केला फौजा पहाव्या म्हणून । स्वारी निघाली बाहेर दर्शना पर्वतीच्या कारण ॥ डंके झाले चहूंकडून घोडयावर ठोविले जीन । भले भले सरदार चालती आपआपल्या मिसलीन ॥ पेंढार पुढे तोफा चालल्या दारू गोळा बार भरून । हत्तीवर सूत्रनाळ उंटावर बाण भरूण ॥ बारा हजार उंट बाणांच्या कैच्या मागे चाले दबा धरून । कराबीन बक्कामार आरब सिंध रोहिले गोलचे गोल भरून ॥ करवलवाले एकांडे पन्नास हजार रहदारी करून । बासडीवाले धनगर निवडक बाजूवर ठरून ॥( चाल )॥ पुढे होळकर चालला । शिंदेशाई नाही ( येत ) गणतीला ॥ साडेसातशे कोतवाल सजविला । त्यांला भरगच्ची झुला ॥ सहा हजार तोफा बार भरला । पायदळ निशाण कडक पुढे उडाला ॥ चार हजार सोटेवाला । सात हजार बल्लमवाला ॥ गोलचा गोल नाईक आला । मागे फौज करनाटकवाला ॥ बावन पागा बारगीर जमला ॥ माय मोर्तब आले गणतीला । साठ मानकरी मोरचलवाला ॥( चाल )॥ रंगविले हत्ती पाखरा भरजरी जरा । अंबारी साडेसातशे मोती झालरा ॥ नाना भाऊंनी करून पोषाग चंदेरी तर्‍हा । गळा कंठी पाच शिरपेच मोत्यांचा तुरा ॥ कपाळी केशरी टिळा चंद्र दुसरा । हौद्यांत बसून शाहीचा घेत मुजरा ॥( चाल )॥ नऊ लाख सैन्य एकदिल घोडा शिरा । तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा । संगे झडती चौघडे शिंगे तुतारा ॥ पर्वतीचे दर्शन घेऊन येत माघारा । असा गवे चढून ॥ शहर पुण्यास मुजरा करून । भाऊ नाना. ॥३॥

बाण बालम जिरीटोप बकतारे चाळीस हजार गणतीला । जामदारखाने फोडून पैसा सार्‍या सेनेशी वांटिला ॥ कडी तोडे पोषाग कंठया दिल्या झाडून फौजेला । शांत केली चित्तवृत्ती मग मनसुबा काढला ॥ हत्ती लढविले गिलचे पेशवे यश आले शत्रूला । राघोबादादा म्हणे भाऊशी प्रश्र पाहूं चांगला ॥ समस्तांनीं अर्जविले भाऊ ऐकेना कोणाला । दक्खनची सौभाग्य गळसरी तुटली त्या समयाला ॥ चाल केली गिलचावर डंके वाजवित चालला ॥( चाल )॥ धरिली दिल्लीची वात । अजिंठयाचा उतरला घाट ॥ बंडावे मोडल वाट । सातपुडयाची बारी दाट ॥ नऊ कोट मारवाडी नीट । त्यानें येऊन घेतली भेट ॥ दिल्ली जमाबंदी चट । बादशहाने आणविला जाट ॥ लखनोरचे नबाब जबघाट । दीडलाख फौजेचा थाट ॥ सेना जमली अटोकाट ॥( चाल )॥ नाना -  भाऊंनी जाऊन यमुनेवर डेरा दिला । घारचे पवार जयपूर उदेपुरवाला । रातोरात पोंचली डाक सरंजामाला । भिडविले मोचें लढती किल्ल्याला ॥ किल्लेदार बडा रणशूर मार लाविला । बारा हजार तोफा सरबत्ती दिली तोफेला ॥ मोचें भिडती फौज लढती केली हल्ला । घेतला किल्ला जरबस्त बादशहा केला ॥ भाऊची खराबी गणीत नाही जखमेला ॥ भाऊ दिलगिर फार दिला हुकूम तोफेला ॥ दिल्लीत माईना मुडदा गंज पडला । दिल्ली शहर घेतले सर करून । भाऊ नाना. ॥४॥

अटोकाट जमले पठाण कुंजपुर्‍यास साठ हजार । दोहिरी लाविल्या तोफा पुढे कोसाचा मार ॥ कुंजपुरा येईना हातीं भाऊअ जाहले मनीं दिलगिर । बोलावून पेंढारी मग त्यांनी काढला विचार । होळकराशी हुकूम झाला । बाण मग सोडी नागपूरकर ॥ फराशीस पुढे गेले गरनाळा । मरगोळ्यांचा मार । पेंढार्‍यांनी वेठ उठविला तोफखान्यासमोर ॥( चाल )॥ जागोजाग छबिने भाऊचे । राऊत पायदळाचे ॥ तट पाडिले किल्ल्याचे । फार सैन्य पडले भाऊचे ॥ चढलें निशाण शिंद्यांचे । नऊ हजार पेंढार भाल्याचे । लूट मुभा तुम्हा दिल्लीचे ॥( चाल )॥ जाटानें येऊन हुजूर अर्ज केला । “जुनी गादी तक्त बाच्छाई नये हात लावू तक्त्ताला ॥ जो लागेला पैका तुम्हा देतो खर्चाला । शिवाय फौज देतो तुमच्या कुमकेला ॥” नाहीं ऐकिले भाऊसाहेबांनी अपमान केला ॥ फोडिलें तक्त दिल्लीचें खजिना काढिला । लूट माफ होऊन दहा कोट खजिना धरला जमेला ॥ द्रव्यानें भरले छकडे बैलगाडयाला । लुटलें शहर सारे आग्र्यावर ढाला दिल्या । लखनोरचा नबाब रातोरात पळून गेला ॥ राजा रंजीस जाट रणभूर लाहोरवाला ॥ लिहून धाडिलें पत्र रुमशामाला ॥ “चवदाशें कोस घोडा अटकेस पाणी पाजला” । रातोरात डाक गेली गिलचाला ॥ आले वकील सलाम करून । भाऊ नाना. ॥५॥

वकील उभे हात जोडून बोलती नानाभाऊकारण । लंब धाडली, तुम्हा खर्च झाला पैसा देईन ॥ पुण्यापर्यंत राज्य करावें दिल्ली अटकेपासून। क्रोध आला भाऊशी नऊ कोट रुपये द्यावे धाडून ॥ चवदाशे कोस आलों पुढें चवदाशें कोस जाईन । इस्तंबूल द्या किल्ला मुलुख रुमशामचा पाहीन ॥ दोन्ही हात बांधून शरण यावे तेव्हा परतून जाईन । गिलचा बोले कोणी आशा ठेविली आलें आम्हा मरण ॥ फेर पत्र पाठविलें दातीं धरून यावें तृण ।.....॥(चाल)॥ पत्र वाची त्या वेळेशीं । कळविलें अवघ्या फौजेशीं ॥ भाऊ बोले तेव्हा नानाशीं । दहा हजार फौज घ्या खाशी ॥ गोविंदराव बुंदेले बनशी ॥ दोन पतके बरोबर खाशी ॥ केला रवना फौजेसी । दाणा वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक गिलचाशीं ॥ आले चालून मग त्या पाशीं । कापिले दहा हजार फौजेशी ॥ शिर पाठविलें भाऊशीं ॥ भाऊ म्हणे कोणे एकाशीं ॥ असे नऊ लाख माझेपाशी ।.....॥(चाल)॥ गिलचाची फौज आली चालून भाऊवर । भाऊ हटेना लढणार तोही रणशूर ॥ केली रवाना फौजेसी । दणा वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक वैरण आणवायाशीं ॥ अग्र्यावर गेले त्या दिवशीं । खजिने भरले छकडयाशीं । रातोरात डाक गिलचाशी ॥ आले चालून मग त्यापाशीं । कापिले दहा हजार फौजेशी ॥ शिर पाठविलें भाऊशीं । भाऊ म्हणे कोणे एकाशीं ॥ असे नऊ लाख माझेपाशीं ।.....॥(चाल)॥ गिलचाची फौज आली चालून भाऊवर । भाऊ हटेना लढणार तोही रणशूर ॥ केली हातघाई दिवस पहिला सोमवार । अरबांनी केली गर्दी गोळी अपार ॥ गिलचाचे पडले मुडदे पळतां बेजार । धाडिलें पत्र रुमाला गलीस शिरजोर ॥ बडा खंडा बम्मन नऊ लाख फौज रणशूर । पानपतावर छावणी खंदक चौफेर ॥ आम्ही तरी मरून जाऊ हातीं घेतलें शिर । घाडा सडी फौज खाशी करून तय्यार ॥ चार द्स्ते घोडा पाठवा एकदिल सार ।....॥ धाडा खर्ची खजिना भरून । भाऊ नाना, ॥६॥

बाच्छायानें पत्र वाचतां झाले मनीं दिलगीर । इस्तंबूल मागतां किल्ला चवथाई द्यावी कोठवर । भाऊक्षदोरी तुटली आम्हावर कोपला ईश्वर ॥ मरून खेरें होऊ परंतु ना जाऊं ह्याचे हार ॥ सांडणीस्वार फेंकिले कंधार पंजाब, पंचीन, बहाद्दर । वजीर बोलावून, विडे दिले; गिलचांस केलीं वस्तर ॥ फत्ते करा तलवार बक्षिसा देईन मुलुख महामूर । गादीचे नाव राखावे गलिमाला करावें जेर ॥(चाल)॥ चार दस्ते घोडा बोलाविला । दिला पोषाग पिंवळ्या शाला ॥ दुराण्या राऊत बोलाविला । बादशहाने शिरी हात ठेविला ॥ पुढें चालतां कडक उसळला ॥ हिरवें निशाण हिरव्या ढाला । फौजेचा ढग जसा वळला ॥ शहराबाहेर डेरा दिला ह्या दिवशी मुक्काम केला । बोलविलें अस्तरीला ॥ आम्ही जातो रणघराला । आतां आले रांडपण तुला ॥(चाल)॥ तोडुन गरसुळी फोडून हातची कांकण ॥ झाली निरवानिरवी शिरीं बाशिंग बांधून ॥ पैजेचे उचचिले विडे य़श घेइन । चारदस्त पडतील तेव्हां रूम सोडीन ॥ बादशहास बोलती कधी ना येऊ परतून । शंभर कोट रुपये खर्च दिला धाडून ॥ येईन किंवा जाईन मरून । भाऊ नाना. ॥७॥

शंभराची कुंपीन अकराशांचे एक पलटण । अकरा पलटणांचा कंपु अकरा कंपूंचे एक दस्तन ॥ अशीं दोन दस्त ठेविलीं रुमाच्या गादीला राखण । चारदस्त सरंजाम नदी सत्रंजी आले उतरून ॥ पिंवळे करून पोषाक नवरे तळहातात शिर घेऊन । धाडिले वकील गिलचांनी मसुदे बोलाया कारणें ॥ नाहीं ठरलें बोलणें भाऊसाहेबाशीं गर्व दारुण । वकील आले माघारे वृत्तांत कळविला जाऊन ॥(चाल)॥ गिलचांनी कावा केला । तीन कोस सोडून भाऊला ॥ भंवता वेढा घातला । रस्ता चालूं देईना झाला ॥ वाणी उदमी बंद केला । पुढें धारण आली फौजेला ॥ दीडकोळवें दाणे रुपयाला । खरा खोटा घ्या दाखला ॥ मीठ मिरचीचा तोटा पडला । निजींव अंतकाळ झाला ॥(चाल)॥ नानाभाऊनी बसून डेर्‍यांत करिती विचार ॥ अन्न दृष्टि पडेना झालें आम्हा खोबरें ॥ पाण्याची किंमत रुपयास झालें शेर । निमें अन्न निमी शाडू भक्षिती सार ॥ पोटाचे महादुःख सोसेना तिळभर । पोटावीण ओढून काचा बांधी कंबर ॥ म्हणे भांग तमाखूअ अफीम राहिली दूर । भाऊशी बोलती मिळून अवघे लष्कर ॥ नेऊन घाला गिलचांवर झालों निष्ठुर । हत्ती घोडे उंट मरती ठाणावर ॥ कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना०॥८॥

गिलचांनी हिकमत करून भाऊ वेढिला बहुत युक्तीनें । जठराग्री चेतला खवळला व्याघ्र पंचानन ॥ झांगड नौबत वाजती दणादण भेर बाजे संगीन । डंके झाले चौघडे घोडयावर - जीनसामान ठेउन ॥ फौज झाल्या तयार निष्ठुर करवलाचे मैदान (ना)। चोरडाक होती गिलचांची नाहीं कळलें संधान ॥ भाऊस बातमी कळली जरीपटका गेला चालून ॥(चाल)॥ गिलजांनी रणखांब पुजिला । भाऊशी वर्तमान कळला ॥ काय पाहतां गलीम सांपडला । एकदांच हर हर केला ॥ रोखिले आघाडी जेजाला । कडाबीन सुत्रनाला ॥ ऐशीं हजार होळकर भाला । शिंद्यांनी मार खूप दिला ॥ बाण सुटती तीर कमानीला । अरब हपशी तो रोहिला ॥ गोसावी धुंदकत चालला । करवलाने घोडा चमकाविला ॥ भाऊसाहेब अंबारीत दुल्ला । दादू महाताने हत्ती पुढे नेला ॥ तीरकमान हत्ती धरला । पांडवदळी भीमसेन आला ॥ की पार्थवीर खवळिला । दिली सरबत्ती तोफेला । नऊ हजार गोळा उडाला ॥(चाल)॥ तासे मर्फे ते ते तंबूर किती वाजती । कर्णे कितीएक रणबहिरी कर्कती ॥ गिलचांच्या तोफा कुलपी गोळे गर्जती । ध्रुकोट बाण जशी ढगात वीज चमकती ॥ दणादण मेरूमांदारधरणी कापती । आडू माडू शिपाई व्याघ्र उढाण साठती ॥ वीरास वीर तरकून पुढे सरकती । झाली हमका शत्रुला विरास विर घुमती ॥ केली खनाजंगी स्वारस स्वार धडकती । बारा हजार पालखी भाऊची झाली रिती ॥ तीन लाख घोडा गर्द जरीपटक्याचा हत्ती । ऐशी हजार होळकर गुप्त नाही दिसती ॥ पायदळाचे गोळे जागोजान पडले किती । सोडला कंठ मग पाणी पाणी होळकर गुप्त नाही दिसती ॥ पायदळाचे गोळे जागोजाग पडले किती ॥ सोकला कंठ मग पाणी पाणी बोलती ॥ जखमांची नाही गणती कबंध नाचती । झांकोळले गगन सूर्य गेला भिऊन । भाऊ नाना० ॥९॥

झाकोळला सूर्य गगनीचा मग पडला अंधकार । गलिमाने पुरविली पाठ भाऊ हटेना तो रणशूर ॥ पानपतावर सुरू लढाई भाऊ अंबारीत कमान तीर । बाण बंदुकीचे फैर झडती तोफेचे गोळे पडे जसे गार ॥ गोळ्यासरसा भाऊ उडाला दादू महात चकाचूर । बापासी लेक वळखेना धरणीमाय जागा देईना क्षणभर ॥ नानासाहेबाशी डाक आली ते गेले हामी सादर । झाले घोडयावर स्वार बाईस कळले धरला पदर ॥ बोले गोपिकाबाई पुण्याचे राज्य कोण करणार । भाऊसाहेब गेले आम्ही तरी काय राहून करणार ॥ ब्रह्यणीराज्य पेशवाई बुडाली असे नाही होणार ।..........॥(चाल)॥ पैजेचा विडा उचलला ॥ सारी शाही पाहती नानाला ॥ ढाला पट्टा सुरई दाबला । दोन लाख घोडा बरोबरीला ॥ रणामध्ये येऊन शिरला । झाली चकमक एकच हला ॥ चाळीस हजार जिरेटोपवाला । नानापाशी कत्तल झाला । होळकराने फितवा केला । हे ठाऊक नाही नानाला ॥ वैर्‍यांनी वैर ह्पशीपत्रे रोहिला । तो घारीवाणी उडाला ॥ घोडयाहून खाली आला । लढण्याचा हेत नाही पुरला ॥ नाना पडला धर मग सुटला । गिलचाने मार खूप केला ॥(चाल)॥ खंडकांत माईना लोक उंट घोडे सारे । गिलचांचा एक द्स्त यश रणशूर ॥ नऊ लाखातले सातशे उरले सारे । तोफा बंदुका पडल्या सुने दिसती डेरे ॥ मोहरा पुतळ्या रुपयांचे जागोजाग पडले ढिगारे । पडलेल्या फौजेचे मागे कोण घेणार ॥ हत्ती उंट मोकळे घोडयांचे खिल्लार । कोणी लूट घेईना पळता जीव बेजार ॥ गेले दाही दिशांवर पळून । भाऊ नाना० ॥१०॥

शके सोळाशे पांसष्ट फाल्गुन वद्य षष्ठी आदितवार ॥ नऊ रात्र नऊ दिवस लढाई मग फिरले माघार ॥ सातशांनी धरली वाट पुण्याची निर्माल्य लष्कर । खेडया -  खेडयाचे पाटिल लुटती महार चांभार । बेदड घालिती छापे वाट चालेना तिळभर ॥ पुढे बिकट बारी कैसा तारील परमेश्वर । असे सांडाव देत आले अटक अटक उतरून नऊ कोशांवर ॥(चाल)॥ तिथून अवघे फुटले पुण्याचे रस्ते भुलले ॥ फारदिसा भुलीमधे गुंगले ॥ नऊखंड फिरता चकले । अन्नाविण वाळून सुकले ॥ भक्षिती झाडांचे पाले । गोसावी कितीएक झाले ॥ तुंब हाती घेतले । किती रामेश्वराकडे झुकले ॥ काशीचे रस्ते धरले । या रितीनें सैन्य खपलें ॥ दैवाचे पुण्याशीं आले । लाखोटे सदरेवर पडाले ॥ दुःखांचे सागर फुटले ।........॥(चाल)॥ लाखोटे वाचिता झाले अवघे घाबर । नानाभाऊ बुडाले पुण्यास आली खबर ॥ नानाभाऊ बुडाले परंतु लौकिक दुनयावर । नवलाख बांगदी फुटली असा हाहाकार ॥ दक्षिण बुडाली सती पडल्या महामूर । श्रीमंताच्या तक्तापाशी भले भले मनसुबीदार ॥ स्थापिले गादीवर माधवराव नेणार । सोन्याची जळली भट्टी उरले खापर ॥ शाहू छत्रपतीचे देणे सांब अवतार । गातो सगनभाऊ ठिकाणा शाहुनगर ॥ गातो फत्तेजंग पोवाडा करून । भाऊ नाना०॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP