मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २८ वा

पांडवप्रताप - अध्याय २८ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


अध्याय २८.

॥ श्रीगणेशाय नमः ॥ लोमशऋषि परम चतुर ॥ बोलका जैसा अंगिरापुत्र ॥ याज्ञवल्क्याचें चरित्र ॥ धर्माप्रति कथियेलें ॥१॥
तीर्थयात्रा पावन परम ॥ त्याहीवरी संतसमागम ॥ मार्गीं जातां लोमश उत्तम ॥ इतिहास सुरस सांगत ॥२॥
पुण्यश्लोकांच्या कथा पावन ॥ निर्दोष यश ऐकतां पूर्ण ॥ चरणीं चालतीं निर्भर मन ॥ शीण न वाटे मानसीं ॥३॥
धर्म म्हणे लोमशमुनी ॥ द्रौपदीसारिखी सद्नुणखाणी ॥ रूपवती मधुरवचनी ॥ पूर्वीं कोण होती पैं ॥४॥
लोमश म्हणे सावधान ॥ ऐकें इतिहास पावन ॥ स्त्रियांहीं ऐकतां सौभाग्यवर्धन ॥ परम कल्याण पुरुषांसी ॥५॥
मद्रदेशींचा नृपती ॥ नाम ज्याचें अश्वपती ॥ वेदविहित चाले नीतीं ॥ उदार धर्मात्मा सर्वज्ञ ॥६॥
त्यासी नसे पुत्रसंतान ॥ म्हणोनि बहुत वर्षें तप करून ॥ सावित्रीचें आराधन ॥ करिता जाहला तो साक्षेपें ॥७॥
करी दहा लक्ष जप पूर्ण ॥ लक्षसंख्य प्रत्यहीं हवन ॥ पलमात्र दुग्धप्राशन ॥ दहा दिवसांत एकदां करी ॥८॥
यावरी अष्टादश वर्षें भरलीं ॥ सावित्री देवी प्रसन्न जाहली ॥ अश्वपति म्हणे ते वेळीं ॥ पुत्रसंतान मज द्यावें ॥९॥
देवी म्हणे पुत्रसंतान ॥ तुझे अद्दष्टीं नसे जाण ॥ परी लावण्यखाणी दिव्यरत्न ॥ कन्या एक होईल तुज ॥१०॥
भूमंडळीं विख्यात होईल ॥ त्रिभुवनीं महिमा वाढेल ॥ पतिव्रताशिरोमणि सुशील ॥ कीर्ति वर्णितील पुराणीं ॥११॥
ऐसें बोलूनि अर्कनंदिनी ॥ गुप्त जाहली तेचि क्षणीं ॥ हर्ष खेद दोन्ही पावोनी ॥ राव आला स्वनगरा ॥१२॥
नवमास भरतां पूर्ण ॥ पट्टराणी गुणनिधान ॥ तिचे पोटीं दिव्यरत्न ॥ कन्या सगुण जाहली ॥१३॥
ते साक्षात सूर्यपुत्री ॥ नाम ठेविलें सावित्री ॥ उमा रमा निर्जरेंद्रनारी ॥ उपमे सरी त्यांचीच ॥१४॥
तिचें स्वरूप तेजःपुंज ॥ देखोनि नाचे शफरीध्वज ॥ कीं लावण्यामृताची सहज ॥ निन्मगा भरूनि चालिली ॥१५॥
बहुत वर्णिल्या नितंबिनी ॥ मयजा सुलोचना नैषधराणी ॥ परी अश्वपतीची नंदिनी ॥ सावित्री श्रेष्ठ सर्वांत ॥१६॥
मृगशावाक्षी सुहास्यवदनी ॥ विद्रुमाधरी द्विज हिरेखाणी ॥ पिकस्वरी ताटंक कर्णीं ॥ मित्रमृगांकांसमान ॥१७॥
हरिमध्या हंसगमनी ॥ अंगसुवास न माये सदनीं ॥ सरलघ्राणी मुक्तासुपाणी ॥ भुंजगवेणी कोमलांगी ॥१८॥
चातुर्यसरोवरमराळी ॥ परम सुकुमार श्रृंगारवल्ली ॥ दिवसेंदिवस थोर जाहली ॥ ते वेल्हाळी गुणालय ॥१९॥
कन्या अवतरतां परम ॥ वृद्धिंगत होत ऐश्वर्यद्रुम ॥ सावित्रीऐसें ललाम ॥ राव लाधला परम तपें ॥२०॥
तिजयोग्य वर न दिसे क्षितीं ॥ मग तो नृप म्हणे कन्येप्रती ॥ तूं पुरुषरत्न शोधूनि निश्चितीं ॥ वर वरीं मानेल तो ॥२१॥
सवें दळबार घेऊनी ॥ कन्या बैसली दिव्य यानीं ॥ छप्पन्न देश स्वनयनीं ॥ पहातसे राजबाळा ॥२२॥
तों द्युमत्सेन राजेश्वर ॥ सत्यवान त्याचा कुमार ॥ तो ईश्वराचा अंश साचार ॥ तिणें वर नेमिला ॥२३॥
ग्रामासी आली परतोन ॥ सांगे पितयासी वर्तमान ॥ राव संतोषला ऐकोन ॥ तों नारदमुनि पातला ॥२४॥
रायें बैसवूनि उत्तमासनीं ॥ मुक्ताभिषेक केला ते क्षणीं ॥ पूजासंभार समर्पूनी ॥ सांगे वर्तमान कन्येचें ॥२५॥
मग नारद बोले वचन ॥ सत्यवानपिता द्युमत्सेन ॥ त्याचे गेले जाण ॥ दायादीं हिरोन राज्य घेतलें ॥२६॥
दारिद्यदूःखे व्यापूनी ॥ भार्यापुत्र संगें घेऊनी ॥ द्युमत्सेन हिंडे वनीं ॥ आपदा नयनीं पहावेना ॥२७॥
कंदमूलें सेवून ॥ वृक्षातळीं करिती शयन ॥ पिता म्हणे दुजा वर पाहून ॥ लावण्यगंगा हे द्यावी ॥२८॥
येरी म्हणे प्राण जावो निर्धार ॥ मनें वरिला तो न सांडीं भ्रतार ॥ प्रत्यक्ष घडतो व्यभिचार ॥ पतिव्रताधर्म बुडेल ॥२९॥
सत्यवानावांचून ॥ वडील समवय लहान ॥ पिता बंधु कीं नंदन ॥ पुरुषमात्र सर्व मातें ॥३०॥
शुद्ध कृष्ण पक्ष निश्चित ॥ तैसें दारिद्य ऐश्वर्य येत जात ॥ भाग्याभ्र कालीं वितळत ॥ परी निश्चयध्रुव न ढले पैं ॥३१॥
नारद म्हणे तुझा नेम सत्य ॥ परी तेथें आहे अनर्थ ॥ एक संवत्सर भरतां मृत्य ॥ सत्यवाना असे हो ॥३२॥
तो मरण पावलियावरी ॥ तूं काय करिशील राजकुमारी ॥ येरी म्हणे निर्धारीं ॥ प्राण देईन त्यासवें ॥३३॥
सुकृत पदरीं असेल निश्चय ॥ तरी विष तेंचि अमृत होय ॥ मृत्तिका जेथें खणों जाय ॥ तेथें निधान लागेन ॥३४॥
हातीं धरितां पाषाण ॥ तो परीस होय करी सुवर्ण ॥ घरच्या दासी दिद्धी होऊन ॥ कल्पिलेंमात्र पुरविती ॥३५॥
कृपा करील कमलदलाक्ष ॥ तरी अंगणींचे तरु होतील कल्पवृक्ष ॥ शत्रु ते मित्र होती प्रत्यक्ष ॥ पूजा करूनि वंदिती ॥३६॥
क्षण न लागतां निर्धारें ॥ तृणगृहें होतील सुवर्णमंदिरें ॥ नृप येऊनि गृहा आदरें ॥ राखितील सर्वस्वें ॥३७॥
नारद म्हणे धन्य धन्य ॥ माझें तुज आशीर्वचन ॥ तुझेही मनोरथ पूर्ण ॥ मद्वरें होतील पैं ॥३८॥
यावरी विष्णुनाभनदंन ॥ तत्काल पावला अंतर्धान ॥ अश्वपति कन्या घेऊन ॥ तया वनाप्रति पावला ॥३९॥
त्याच्या आपदा देखूनि डोळां ॥ अश्वपति सद्नद जाहला ॥ द्युमत्सेन म्हणे अंधाला ॥ मावळला भाग्यसूर्य ॥४०॥
आम्हांसी अवदशा संपूर्ण ॥ तुझें व बैसे कदा मन ॥ हे कन्या सुलक्षण ॥ देईं नेऊन आणिका वरा ॥४१॥
राव म्हणे कन्येचा निर्धार ॥ वरुणदिशेसी उगवेल मित्र ॥ हेंही घडेल परी मी वर ॥ दुसरा न वरीं निर्धारें ॥४२॥
मग पाहूनियां सुदिन ॥ रायें लावविलें तेथें लग्न ॥ चार दिवस संपादून ॥ दिधलें आंदण बहुतचि ॥४३॥
कन्या ठेवूनि त्यापाशीं ॥ अश्वपति गेला स्वनगरासी ॥ सावित्री भ्रतारसेवेसी ॥ दिवसनिशीं सादर ॥४४॥
सासू सासरा भ्रतार ॥ यांचे सेवेसी परम पत्पर ॥ हेंचि तप खडतर ॥ आचरे तेव्हां सावित्री ॥४५॥
स्त्रियांसी साधन हेंचि थोर ॥ आपुला पति तोचि ईश्वर ॥ सेवा करावी सादर ॥ दुजा विचार नसावा ॥४६॥
सकळांचे अन्याय सोसून ॥ दासदासींचें राखी मन ॥ अवघीं निजल्या करी शयन ॥ सर्वांआधीं जागी होय ॥४७॥
चार प्रहर रात्र स्वयें ॥ तळहातीं भ्रताराचे पाये ॥ पतीनें आग्रह करितां पाहें ॥ निद्रा करीत क्षणभरी ॥४८॥
दरिद्री हो वृद्ध भ्रतार ॥ दीर्घरोगी दुःखें जर्जर ॥ द्वव्य न जोडी क्रूर ॥ परी न कंटाळे पतिव्रता ॥४९॥
सेवा करी घडोघडी ॥ म्हणे जितुकी पडे तितुकी थोडी ॥ शारीरपोषणीं आवडी ॥ सर्वही सोडी सती ते ॥५०॥
पिता वृद्ध दरिद्री भ्रतार ॥ अक्षीर गाय अनाथप्रेतसंस्कार ॥ अंध पांगुळ मुके बधिर ॥ यांसी पाळितां हरि तुष्टे ॥५१॥
व्याथाभूत गुरूचें सेवन ॥ दरिद्री ब्राह्मणाचें कुटुंबपालन ॥ दरिद्रियाचें करितां लग्न ॥ हरि तुष्टे त्यावरी ॥५२॥
असो ते पतिव्रता नारी ॥ भ्रताराआधीं भोजन न करी ॥ षड्रस उत्तम फळे निर्धारीं ॥ न भक्षीच पतीविणें ॥५३॥
ग्रामासी जातां भ्रतार ॥ न सेवी उत्तम वस्त्रालंकार ॥ दर्पण न पाहे अहोरात्र ॥ चिंता मानसीं पतीची ॥५४॥
जारजारिणींचा संग न धरी ॥ परवस्त्र न नेसे निर्धारीं ॥ न्याहाळूनि क्षणभरी ॥ परपुरुषा न पाहे ॥५५॥
एकान्त जरी निःसंग ॥ पडदणीविण न धुई अंग ॥ परम पुरुषार्थी अभंग ॥ पतीच आपुला भावीत ॥५६॥
परघरीं निद्रा न करी ॥ एकली मार्ग न चाले क्षणभरी ॥ क्रीडासमयींच विनोद करी ॥ पतीचें मन पाहूनि ॥५७॥
गुणसरिता ते परम चतुर ॥ निजमनें मोहीत प्राणेश्वर ॥ पतिकार्या दक्ष गुणगंभीर ॥ साध्यसाधनभाव जाणे ॥५८॥
दूर गेल्या प्राणनाथ ॥ सर्व भोगांचें धरी व्रत ॥ पांच दिवसपर्यंत ॥ रजस्वला द्दष्टीं न पडे ॥५९॥
भ्रताराची प्रीति जे ठायीं ॥ तिचा स्त्रेह तिकडेचि पाहीं ॥ पतिद्वेषी सहसाही ॥ त्यातें प्रीति करीना ॥६०॥
जारजारीण येऊं नेदी घरा ॥ आपण न जाई त्यांच्या मंदिरा ॥ संगें नसतां भ्रतारा ॥ विवाहयात्रे नवजाय ॥६१॥
पतीचे अवगुण लपवीत ॥ कीर्ति सद्नुण वर्णीत ॥ पतीचें आयुष्य वित्त ॥ कळों नेदी कोणातें ॥६२॥
भ्रतारासी प्रिय निर्धारीं ॥ त्या त्या गोष्टींचा साक्षेप करी ॥ अंतर्बाह्य अहोरात्रीं ॥ तिरस्कार नसे तीतें ॥६३॥
पतीच्या मनांतील सर्व जाणे ॥ स्वामीवरी रुसों कधीं नेणे ॥ भ्रतार मारितां हंसतचि म्हणे ॥ कर तुमचे दुखती पैं ॥६४॥
न घेतां भ्रताराची आज्ञा ॥ कोणएक व्रत नेम करीना ॥ आचरे ती आयुष्यवर्धना ॥ पतीचें व्हावया निर्धारें ॥६५॥
भ्रतार दूर गेलिया जाण ॥ त्यासी प्रिय तें न भक्षी आपण ॥ नाना वस्त्र भोग भूषण ॥ सतीस न गमे कदाही ॥६६॥
धनधान्य वस्त्रालंकार ॥ भ्रतारासी न वंची अणुमात्र ॥ असूनि नाहीं म्हणणें निर्धार ॥ प्राणांतींही घडेना ॥६७॥
कांहींएक संकटव्यथा ॥ कदा न घाली प्राणनाथा ॥ पति आनंदरूप असतां ॥ आपण सुख मानीतसे ॥६८॥
भ्रतारा होय व्यथा भारी ॥ अन्न न घे उपवास करी ॥ नानावस्तु निर्धारीं ॥ मन त्यांवरी नसे तिचें ॥६९॥
भ्रताराचें स्वरूप लिहून ॥ दूरी गेलिया पाहे विलोकून ॥ अन्न न घे तीर्थाविण ॥ पादुकापूजन ह्रदयीं करी ॥७०॥
ऐसी उत्तम गुणखाणी ॥ पतीचा वेध लावी मनीं ॥ जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ न वंची कांहीं तयातें ॥७१॥
जाईल तरी जावो प्राण ॥ परी पतीचें न बोले न्य़ून ॥ जन्मोजन्मीं हाचि हो म्हणोन ॥ सर्व देवां नमस्कारी ॥७२॥
भ्रतारासी न कळत ॥ कांहींएक न ठेवी वस्त ॥ ब्रह्मा विष्णु उमाकांत ॥ स्वरूप भावी पतीचें ॥७३॥
पतीचें मन रंजे जेणें ॥ तेंचि बोले कौतुकवचनें ॥ मनीं म्हणे अहेवपणें ॥ मी जाईन याआधीं ॥७४॥
पूर्वतपाच्या राशी पूर्ण ॥ तरी ऐसी पावे सुलक्षण ॥ तीस इहलोकीं मान ॥ परत्रीं धन्य म्हणवीत ॥७५॥
स्वर्गींच्या सर्व पतिव्रता ॥ तीस सामोर्‍या येती तत्त्वतां ॥ ओंवाळूनि आरत्या ॥ दिव्य पुष्पवृष्टि करिती ॥७६॥
या सद्नुणें मंडित पूर्ण ॥ सवित्री देवी गुणनिधान ॥ परी नारद गेला सांगोन ॥ तो दिवस जवळी आला ॥७७॥
मरणाचे दिवस चारी ॥ उरले तें कळलें सुंदरी ॥ तीन दिवस निर्धारीं ॥ सावित्री करी उपोषण ॥७८॥
न घे फल मूल जीवन ॥ अंध श्वशुर बोले वचन ॥ म्हणे माये करिसी उपोषण ॥ कां निर्वाण मांडिलें ॥७९॥
पतीचा मृत्युदिवस आला जवळी ॥ कोणा न सांगे वेल्हाली ॥ तों सत्यवान सकाळीं ॥ वनाप्रति चालिला ॥८०॥
सावित्रीदेवी वारीत ॥ परी त्यासी जवळी आला मृत्य ॥ फरशी घेऊनि निघत ॥ फळें मूळें आणावया ॥८१॥
सवें सुकुमार ॥ हिंडती दोघें घोरकांतार ॥ पतीचे चरण वारंवार ॥ धुऊनि चुरी वृक्षातळीं ॥८२॥
पर्यटन करितां तये वेळीं ॥ अस्ताचला गेला चंडमौळी ॥ निशा घोर प्राप्त जाहली ॥ झगमगती उडुगणें ॥८३॥
पतीस विनवी राजबाळा ॥ आश्रमाप्रति स्वामी चला ॥ तो वटवृक्षीं उभा ठेला ॥ शुष्क काष्ठें मोडीत ॥८४॥
एक काष्ठ बळें मोडीत ॥ तें कपाळीं आदळलें अकस्मात ॥ पाषाण जेवीं वर्मीं बैसत ॥ पडिला मूर्च्छित सत्यवान ॥८५॥
देखोनि पतिव्रता धांवली ॥ मुखीं मस्तकीं उदक घाली ॥ मांडी आपुली उसां दिधली ॥ वारी घाली निजपल्लवें ॥८६॥
रात्र एकप्रहर पूर्ण ॥ तेव्हां गेला पतीचा प्राण ॥ लावण्यसागरींचें निधान ॥ शोकार्णवीं पडियेलें ॥८७॥
म्हणे जी प्राणनाथा ॥ आश्रमीं वाट पाहती मातापिता ॥ मज सांडूनि तत्त्वतां ॥ दूरी पंथा सेविलें ॥८८॥
पिता अंध माता अशक्त ॥ प्राण देतील ऐकतां मात ॥ उठा जाहलां क्षुधाक्रांत ॥ बोला शब्द एक मजशीं ॥८९॥
माझे अन्याय बहुत ॥ समर्थें घालावे पोटांत ॥ रुसणें सांडूनि एक मात ॥ मजशीं बोला प्रियकरा ॥९०॥
आपुली प्रिया सोडून ॥ उचित नव्हे करितां गमन ॥ तुम्हांसी फल मूल जीवन ॥ आणूनि कोण देईल ॥९१॥
अहा कर्म कैसें विचित्र ॥ भंगूनि गेलें माझें छत्र ॥ दिसे शून्य त्रिभूवनमात्र ॥ काय करूं यावरी ॥९२॥
मज टाकूनि कांतारीं ॥ सांगातिया गेलां दूरी ॥ शोक करितां सुंदरी ॥ यम तेथें पातला ॥९३॥
त्याचा लिंगदेह काढून ॥ यम चालिला दक्षिणपंथें घेऊन ॥ सवित्रीने प्रत्यक्ष देखोन ॥ पाठीं धांवे तयाचे ॥९४॥
मुखें करीत स्तवन ॥ क्षणक्षणां घाली लोटांगण ॥ म्हणे महाराज तूं कोण ॥ नाम खूण सांगें पां ॥९५॥
येरू म्हणे मी यम जाण ॥ तूं पतिव्रता थोर म्हणोन ॥ दूत न दिले धाडून ॥ मीच आलों न्यावयातें ॥९६॥
ऋणानुबंध सरला पूर्ण ॥ जाई भ्रताराचें करीं दहन ॥ येरी म्हणे गेलिया प्राण ॥ तुझे चरण न सोडीं मी ॥९७॥
पतिप्राणासांगातें आतां ॥ मजही नेईं त्वरें समर्था ॥ मी तुझी कन्या तत्त्वतां ॥ उठवीं जामाता आपुल्या ॥९८॥
तुझी कन्या वेल्हाळा ॥ तीस वैधव्यशब्द नको दयाळा ॥ यावरी प्रेतनाथ बोलिला ॥ सहसा न घडे गोष्टी हे ॥९९॥
एक पतिप्राण वेगळा करून ॥ माग तुज जाहलों प्रसन्न ॥ मागसी तें देईन ॥ बोलें वचन सुकुमारे ॥१००॥
येरी म्हणे द्युमत्सेन श्वशुर ॥ देईं त्यासी महाराजा नेत्र ॥ यम म्हणे तुझा लागतां कर ॥ येईल द्दष्टि निर्धारें ॥१०१॥
यावरी माघारीं जाईं आतां ॥ म्हणे सोडूनि तुजऐसा पिता ॥ कोणीकडे जावें ताता ॥ मज माहेरा न्यावें समागमें ॥१०२॥
माझें भ्रतारचरणीं असेल मन ॥ तरी तूं होसील दयाघन ॥ संत महंत साधुजन ॥ भावें वंदिले असतील जरी ॥१०३॥
मग बोले विश्वहंता ॥ पति वेगळा करूनि माग आतां ॥ पतिव्रता म्हणोनि तत्त्वतां ॥ प्रसन्न जाहलों दुसर्‍यानें ॥१०४॥
यावरी बोले सुंदरी ॥ श्वशुराचें राज्य दे झडकरी ॥ तथास्तु म्हणे भास्करी ॥ आतां माघारीं जाईं कां ॥१०५॥
येरी म्हणे दयाळा वैवस्वता ॥ पतिसमागमें मज ने आतां ॥ आम्हां चक्रवाकांसी तत्त्वतां ॥ आदित्यात्मजा एक करीं ॥१०६॥
ब्रत तप आणि दान ॥ जरी घडलें असेल पूर्वीहून ॥ माता पिता लक्षूनि नारायण ॥ मानूनि पूजिलीं असतील ॥१०७॥
अनाथप्रेताचें दहन ॥ केलें असेल दरिद्रियाचें लग्न ॥ सत्समागम सच्छास्त्रश्रवण ॥ सद्नुरुसेवन भावार्थें ॥१०८॥
तरी तुज दया उपजेल मनीं ॥ मग तो बोले यम वाणी ॥ सत्यवान वेगळा करूनी ॥ माग साजणी अभीष्ट ॥१०९॥
माझ्या पित्यासी शत पुत्र ॥ देईं अर्कजा तूं सत्वर ॥ धर्मराज देत उत्तर ॥ तथास्तु ऐसें त्रिवाचा ॥११०॥
बाई तुझी भीड फार ॥ म्हणूनि दिधले इतुके वर ॥ आतां जाईं सत्वर ॥ अग्नि देईं पतिलागीं ॥१११॥
बोले पतिव्रताशिरोरत्न ॥ दुष्काळामाजी अन्नदान ॥ तृषार्तासी जलपान ॥ करविलें असेल उष्णकाळीं ॥११२॥
व्याधिग्रस्त दुर्बल क्षीण ॥ त्याचें केलें असेल रक्षण ॥ हरिस्वरूप मानून ॥ जरी ब्राह्मण पूजिले मीं ॥११३॥
हरिहरां अभेद पूर्ण ॥ मानूनि केलें असेल भजन ॥ हरिकथा पुराणश्रवण ॥ केलें असेल भावार्थें ॥११४॥
तरीच मज देखोन ॥ दयाळु होय भानुनंदन ॥ मग यम बोले हांसोन ॥ चतुर्थ वर मागें कां ॥११५॥
व्यर्थ शब्द तत्त्वतां ॥ मज नको दयाळा आतां ॥ शतपुत्री सफल ताता ॥ उदरलतिका करीं माझी ॥११६॥
पुत्रवती गुणवती ॥ जन्मसावित्री सौभाग्यवती ॥ मंगलमाहेश्वरी मज म्हणती ॥ करीं ख्याती त्रिभुवनीं ॥११७॥
फलविण तरु जाण ॥ कीं वेदघोषाविण द्विजसदन ॥ हरिस्मरणाविण वदन ॥ व्यर्थ जैसें पशुवत ॥११८॥
तेवीं कुळीं नसतां पुत्र ॥ कैसा होईल वंश पवित्र ॥ मी तुझें ताता कृपापात्र ॥ करीं माहेर कन्येसी ॥११९॥
तुजसंगें पंथ क्रमिला आतां ॥ नाहीं मजऐशी सौभाग्यसरिता ॥ मज रिकामें सर्वथा ॥ दवडूं नको या वेळीं ॥१२०॥
श्राद्धदेव होऊनि दयाळ ॥ म्हणे कन्ये तुज दिधलें सकळ ॥ तुझे गुण देखोनि निर्मळ ॥ संतुष्ट जाहलों सर्वस्वें ॥१२१॥
सावित्री म्हणे सर्वज्ञमूर्ती ॥ बोलें सत्यवानासी आयुष्य किती ॥ येरू म्हणे तूं मम कन्या सुमती ॥ महासती विख्यात ॥१२२॥
चारशत वर्षेंपर्यंत ॥ सत्यवान आयुष्यवंत ॥ तुज होतील शंभर सुत ॥ पौत्रही बहुत देखसी ॥१२३॥
वैरी नासती सर्वथा ॥ सकळ राज्य येईल हाता ॥ तूं पतीपाशीं जाईं आतां ॥ स्पर्शतां प्राण येईल पैं ॥१२४॥
मग तो दक्षिणदिशेचा इंद्र ॥ अंतर्धान पावला सत्वर ॥ सावित्रिस आनंद थोर ॥ भ्रतारासन्निध पातली ॥१२५॥
हनुवटीस लावूनि हात ॥ म्हणे प्राणवल्लभा उठा त्वरित ॥ तंव तो गडबडोनि उठत ॥ आलिंगीत प्राणप्रिये ॥१२६॥
म्हणे तूं श्रमलीस फार ॥ फळें भक्षीं न करीं निराहार ॥ येरी म्हणे सासू श्वशुर ॥ त्यांविण न भक्षीं सर्वथा ॥१२७॥
भाग्य येई दरिद्र सरतां ॥ तेवीं उदय पावे यमपिता ॥ स्वर्गाहूनि सकल पतिव्रता ॥ सावित्रीदर्शना पातल्या ॥१२८॥
कुंभिनीवरील सर्व कामिनी ॥ षोडशोपचारें पूजा घेऊनी ॥ वटवृक्षातळीं येऊनी ॥ पूजिती सावित्रीसत्यवानां ॥१२९॥
सौभाग्यद्रव्यें अर्पून ॥ वटवृक्षासी करिती प्रदक्षिण ॥ वटसावित्री तैंपासून ॥ अद्यापि पूजिती सर्व वनिता ॥१३०॥
जी न पूजितां गर्वें राहे ॥ ती जन्मोजन्मीं विधवा होये ॥ आचरती त्यांतें सौभाग्य़ पाहें ॥ सर्वदाही वर्धमान ॥१३१॥
असो यावरी सावित्री सती ॥ भ्रतारासी धरूनि हातीं ॥ जात आपुले स्थलाप्रती ॥ बोलें तोषवी पतीतें ॥१३२॥
सिंह व्याघ्र सर्पादि येऊन ॥ सवित्रीचे वंदिती चरण ॥ माते तुझें घेतां दर्शन ॥ निष्पाप आम्ही जाहलों ॥१३३॥
सावित्री म्हणे पतीलगून ॥ तुचचे निजकेशीं झाडीन चरण ॥ हळू चला कंटक पाषाण ॥ चरणीं रुतती सुकुमारा ॥१३४॥
तों इकडे काय जाहलीं पुत्र सून ॥ दोघें वृद्धें करिती रोदन त्यांचा शोक ऋषी ऐकोन ॥ धांवोनि समाधान करिताती ॥१३५॥
तों अकस्मात येऊन ॥ उभीं ठाकलीं पुत्र सून ॥ सावित्री स्पर्शतां नयन ॥ उघडले तत्काळ तयांचे ॥१३६॥
जाहला एकचि ब्रह्मानंद ॥ गगनीं पाहती निर्जरवृंद ॥ दिव्य सुमनें सुगंध ॥ वर्षती तेव्हां उल्हासें ॥१३७॥
वृद्धांसी फळें अर्पूनि तत्त्वतां ॥ देता जाहला मग समस्तां ॥ तों दळभार वाद्यांसह येतां ॥ मंत्री देखिले द्युमत्सेनें ॥१३८॥
वैरी प्रधानें निवटोन ॥ सर्वांसी चालिला घेऊन ॥ रत्नजडित शिविकेंत निधान ॥ सवित्रीदेवी बैसविली ॥१३९॥
मागें पुढें दळभार घेऊन ॥ स्त्रीपुत्रांसमवेत द्युमत्सेन ॥ दिव्यवहनीं बैसोन ॥ वाद्यगजरें चालती ॥१४०॥
सत्यवानावरी छत्र ॥ पित्यानें धरिलें पवित्र ॥ सावित्रीस शतपुत्र ॥ पित्याशीं समान जाहले ॥१४१॥
ऐकोनि कन्येची कीर्ति ॥ दर्शना धांवला अश्वपति ॥ सावित्रीच्या वरें तो नृपति ॥ शतपुत्र पावला ॥१४२॥
लोमश म्हणे धर्माप्रती ॥ ऐसी सावित्रीची सत्कीर्ती ॥ तेवीं हे द्रौपदी सती ॥ श्रींरगभगिनी पतिव्रता ॥१४३॥
सावित्रीसत्यवानांचे परी ॥ तुम्ही स्वराज्य पावाल झडकरी ॥ हें चरित्र ऐकतां नरनारी ॥ दीर्घायुषी होतील ॥१४४॥
स्त्रियांसी सौभाग्य पूर्ण ॥ पुरुषांसी ऐश्वर्य कल्याण ॥ महारोग होय हरण ॥ गंडांतर मृत्यु निरसे पैं ॥१४५॥
धर्म मार्गें तीर्थासी जातां ॥ लोमशें सांगितली जे कथा ॥ कथारूपें हे तत्त्वतां ॥ चंपकमाला सुवासिक ॥१४६॥
मूर्ख जे मतिमंद मिलिंद ॥ त्यांसी नावडे तेथींचा सुगंध ॥ पुढें चित्त द्या सज्जनवृंद ॥ कथेलागीं अत्यादरें ॥१४७॥
श्रीधर म्हणे ब्रह्मानंद पिता ॥ सावित्री माता गुणसरिता ॥ त्यांसी वंदिलें पुढें आतां ॥ कथा परिसा नवलाची ॥१४८॥
धर्म म्हणे लोमशमुनी ॥ कथा पवित्र ऐकिली श्रवलीं ॥ तीर्थेंही दावसी मेदिनीं ॥ श्रेयस्कर परम जीं ॥१४९॥
लोमश म्हणे कुरुभूषणा ॥ तिसरी आवृत्ति तीर्थाटना ॥ तुझे संगें पुण्यपरायणा ॥ सौख्य अद्भुत वाततें ॥१५०॥
असो यावरी ब्रह्मांडभुवनीं ॥ सकल तीर्थांत मुकुटमणी ॥ तीर्थराज प्रयाग नयनीं ॥ धर्मरायें देखिला ॥१५१॥
द्दष्टी देखतां संगमत्रिवेणी ॥ शतजन्मांचीं पापें जाती जळोनी ॥ होतां स्पर्श जीवनीं ॥ त्रिशतजन्मांचे दोष जाती ॥१५२॥
तेथें जे स्त्रान करिती ॥ त्यांचीं सहस्त्रजन्मांचीं दुःखें वितळती ॥ याहूनि तीर्थ नसे जगतीं ॥ साक्ष सरस्वती देतसे ॥१५३॥ 
तेथें जो देहू समर्पीत ॥ त्यासी नसे पुनर्जन्म सत्य ॥ ब्रह्मानंदसुख अद्भुत ॥ होय हस्तगत तयाचे ॥१५४॥
यद्यपि प्राप्त जाहलें अंग सहज ॥ तरी बैसावया होय द्विजराज ॥ भोगेंद्रतल्पकीं शेज ॥ होय सतेज अद्भुत ॥१५५॥
चतुर्भुज होय तो सांग ॥ शंख पद्म गदा रथांग ॥ सच्चिदानंदतनु अभंग ॥ होय अव्यंग हरिरूप ॥१५६॥
आपुले घरीं करितां स्त्रान ॥ करिती जे प्रयागस्मरण ॥ सकल पापें संहारून ॥ विष्णुपदाप्रति जाती ते ॥१५७॥
प्रयागमाहात्म्य संपूर्ण ॥ धर्मराजें केलें श्रवण ॥ तीर्थविधि करूनि आनंदवन ॥ पहावया सर्व चालिले ॥१५८॥
शास्त्रांमाजी वेदांतज्ञान ॥ देवांमाजी इंदिरारमण ॥ कीं शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ तेवीं वाराणसी क्षेत्रांत ॥१५९॥
जे पाहतां वाराणसी ॥ घरोघरीं मुक्ति दासी ॥ वाहती पाणी दिवसनिशीं ॥ सिद्धि सेवेसी तिष्ठती ॥१६०॥
नंदीवरी बैसोनि कैलासनाथ ॥ क्षेत्रामाजी सर्वदा हिंडत ॥ तारकमंत्र उपदेशीत ॥ प्राणी मरण पावतां ॥१६१॥
अहंकार टाकूनि शमदमीं ॥ नित्य स्मरे जो निजधामीं ॥ त्यासी काशीवास नेहमीं ॥ प्राप्त होतो निश्चयें ॥१६२॥
असो काशीमाहात्म्य ॥ श्रवण करी महाराज धर्म ॥ तीर्थविधि करूनि उत्तम ॥ गयादर्शन घेतलें ॥१६३॥
फल्गूचे वाळवंटीं जाण ॥ तिष्ठती सर्व पितृगण ॥ कीं आम्हां येथें पिंडदान ॥ स्ववंशीं येऊन करील कोणी ॥१६४॥
गदाधरपदीं पिंडदान ॥ दे जरी शमीपत्रप्रमाण ॥ तरी सप्तगोत्रें उद्धरोन ॥ हरिपदा पावे तो ॥१६५॥
धर्मरायें गयावर्जन ॥ यथाविधि केलें संपूर्ण ॥ अक्षय्यवटीं विप्रभोजन ॥ पितृगण तृप्त तेणें ॥१६६॥
गयावासियांसी धन ॥ अपार देत कुंतीनंदन ॥ जें लागे तें रुक्मिणीरमण ॥ द्वारकेहून पुरवीत ॥१६७॥
गयामाहात्म्य श्रवण करीत ॥ पुढें देखिलें अगस्त्यतीर्थ ॥ लोपामुद्रेसी वंदूनि समस्त ॥ श्रवण करी महिमा तो ॥१६८॥
आतापी वातापी इल्वल ॥ अगस्त्य ऋषीनें मारिले सबळ ॥ केला समुद्राचा चूल ॥ मग भरिला जान्हवीनें ॥१६९॥
कपिलाच्या शापापासून ॥ सगर उद्धरिले संपूर्ण ॥ लोमशऋषि सर्वप्रवीण ॥ आख्यानें श्रवण करवीत ॥१७०॥
श्रृंगऋषिमहिमा विचित्र ॥ श्रवण केलें परशुरामचरित्र ॥ कार्तवीर्यमहिमा अपार ॥ स्मरणें निर्भय जयाचे ॥१७१॥
कार्तवीर्याचे स्मरणें ॥ बारा वाटां पळती विघ्नें ॥ धर्मराज ऐकूइ श्रवणें ॥ परम सुख पावला ॥१७२॥
पुढें प्रभासतीर्था आले ॥ यादव सर्व तेथें भेटले ॥ गंधमादन पर्वताखालें ॥ वारा सुटला अद्भुत ॥१७३॥
वृक्ष पडती उन्मळून ॥ उडोनि जाती जड पाषाण ॥ द्रौपदीस मूर्च्छा येऊन ॥ भ्रमित तेव्हां पडियेली ॥१७४॥
सुटलासे प्रलयवात ॥ मार्ग पुढें न दिसत ॥ मग घटोत्कचाचें स्मरण करीत ॥ भीमसेन तेधवां ॥१७५॥
तो पावला सेनेसहित ॥ ऋषींसमवेत चार्‍ही पार्थ ॥ द्रौपदीसह स्कंधीं घेत ॥ मग नेत द्वीपांतरा ॥१७६॥
पुढें देखिला बदरिकाश्रम ॥ अलकनंदा पावन परम ॥ नरनारायणाश्रम उत्तम ॥ दर्शन घेत चालिले ॥१७७॥
तेथें सहस्त्रदलकमलसुवास ॥ द्रौपदीसी येत आसमास ॥ जैसे संतांचे गुण निर्दिष ॥ न सांगतां प्रकट होती ॥१७८॥
द्रौपदी भीमाचा हात धरून ॥ सहास्य वदनें बोले वचन ॥ म्हणे या सुवासिक कमलेंकरून ॥ धर्मराया पुजावें ॥१७९॥
माझें ह्रदयींचें आर्त ॥ तुजविण पुरवील कोण यथार्थ ॥ यावरी पृथेचा द्वितीय सुत ॥ वचनासरसा चालिला ॥१८०॥
ऐकतां अवनिजेचें वचन ॥ मृगवधा धांवे मित्रकुलभूषण ॥ त्याचि प्रकारेकरून ॥ भीमसेन धांवला ॥१८१॥
नाना पर्वत घोर कांतार ॥ उल्लंघोत जाय वृकोदर ॥ नाना श्वापदें पक्षी अपार ॥ भयंकर देखिले ॥१८२॥
चंचूहस्तीम चारा धरून ॥ जे पक्षी जाती उडोन ॥ तितुक्यांचाही ग्रास करून ॥ सवेंचि धांवती आणिक ॥१८३॥
कर्दलीवन ओलांडिलें ॥ पुढें महापर्वत देखिले ॥ तेथें हनुमंत बैसला निजबळें ॥ आगळा श्रेष्ठ ब्रह्मांडीं ॥१८४॥
जांभई देतां वाढे आवेश ॥ वाटे ग्रासील हें आकाश ॥ भुभुःकार देतां आसमास ॥ कमलभवांड गजबजे ॥१८५॥
भयानक भ्रुकुटी पाहतां पूर्ण ॥ वाटे कृतांताचा जाईल प्राण ॥ ऐसा अंजनीह्रदयरत्न ॥ सीतासंतापहरण देखिला ॥१८६॥
शेषाकृति लांगूल पसरून ॥ बैसलासे मार्ग रोधून ॥ देखोनि भीमें केलें गर्जन ॥ खेचर भूचर हडबडले ॥१८७॥
कपींद्र म्हणे मानवा ॥ हांकेनें पळविलें सर्वजीवां ॥ हा पुरुषार्थ बरवा ॥ पाहतां न भरे मन्मानसीं ॥१८८॥
सर्वांभूतीं राम व्यापक ॥ त्यावरी दया असावी सम्यक ॥ पुढें तूं नको जाऊं एकाएक ॥ महा अनर्थ दिसतसे ॥१८९॥
भीम म्हणे पुच्छ काढीं त्वरा ॥ आंजनेय म्हणे मी म्हातारा ॥ मज उचलेना चतुरा ॥ वृकोदरा काढीं तूं ॥१९०॥
मग भीम रगडुनि अधर ॥ मदोन्मत्त इभ नवसहस्त्र ॥ त्यांचें बळ समग्र ॥ पंडुपुत्र वेंची तेव्हां ॥१९१॥
धापें दाटला अद्भुत ॥ न चाले कांहीं पुरुषार्थ ॥ म्हणे सांग तूं कोण यथार्थ ॥ विधि रमावर कीं उमावर ॥१९२॥
मग बोले वानरेश ॥ दशकंठहरणाचा मी दास ॥ तूं श्रीकृष्णभक्त महापुरुष ॥ गर्वरहित वर्तें सदा ॥१९३॥
मग लोकप्राणेशसुत ॥ घटोत्कचजनकातें आलिंगन देत ॥ भीमसेन स्तवन करीत ॥ मी भावंड धाकुटें तुझें ॥१९४॥
षोडशसहस्त्र योजन ॥ येतां जातां मार्ग क्रमून ॥ तुवां आणिला गिरिद्रोण ॥ लक्ष्मणा प्राणदान दीधलें ॥१९५॥
तो नव्हेचि गिरिद्रोण ॥ तो साक्षात लक्ष्मणाचा प्राण ॥ जो जात होता रुसोन ॥ तो समजावून आणिला ॥१९६॥
कीं द्रोणाचल दीप जाण ॥ महावली वाती उजळोन ॥ ओंवाळिला जनकजाप्राणजीवन ॥ प्रेमेंकरून कपिराया ॥१९७॥
कीं जय घेऊनि गेला दशकंधर ॥ कपिसेनेंत पडला अंधार ॥ तूं नगरूप आणोनि भास्कर ॥ जय समग्र ओढिला ॥१९८॥
माझी आळी पुरवीं ये वेळे ॥ तुवां लंकादहनीं रूप धरिलें ॥ तें मज दाखवावें दयाळें ॥ कृपा करोनि क्षणभरी ॥१९९॥
बोले राघवचरणारविंदमिलिंद ॥ तें भयानक रूप अगाध ॥ अपरप्रतिमा कृतान्त विशद ॥ द्दष्टीं पाहूं शकेना ॥२००॥
तूं पाहतां पडशील मूर्च्छित ॥ जीवां प्रलय होईल अत्यंत ॥ ब्रह्मकटाह समस्त ॥ डळमळेल एकदांचि ॥२०१॥
त्या रूपाचे सहस्त्रांशेंकरून ॥ रूप धरितों आतां लहान ॥ मग भीमाचे उभय नयन ॥ निजकरें कपीनें स्पर्शिले ॥२०२॥
म्हणे भीमा पाहें सावधान ॥ तों आकाशा दिलें टेंकण ॥ तैसा कपि भयानक दारूण ॥ काळासही न देखवे ॥२०३॥
ब्रह्मांड रगडील दाढेखालें ऐसें विशाळ मुख पसरिलें ॥ सूर्यबिंब वाटे हारपलें ॥ नेत्रप्रकाशें त्याचिया ॥२०४॥
भीम भयभीत नुघडी डोळे ॥ म्हणे झांकीं रूप ये वेळे ॥ ऐकतां लघु स्वरूप प्रकटविलें ॥ सावध केलें वृकोदरा ॥२०५॥
प्रसन्न होऊनि मारुती ॥ म्हणे मी साह्य होईन किरीटीप्रती ॥ कौरव दैत्य पापमती ॥ संहारीन वृकोदरा ॥२०६॥
ऐसें बोलूनि त्वरितगतीं ॥ गुप्त जाहला तेथें मारुती ॥ पुढें निःशंक होऊनि पंथीं ॥ भीम जात पवनवेगें ॥२०७॥
उल्लंघीत नानावनें गहन ॥ बहुत तरु न कळे नामाभिधान ॥ नवलक्ष योनींत पक्षी निर्माण ॥ नाना वर्ण भिन्न ध्वनि ॥२०८॥
सुवर्णभूनि रत्नमय पाषाण ॥ सरोवरें देखिलीं विशाल गहन ॥ दशदिशा कोंदल्या सुवासेंकरून ॥ कमळें पाहिली सहस्त्रदलें ॥२०९॥
भीमें घेतलीं बहुत कमळें ॥ युद्धा निघाले राक्षसपाळे ॥ ते कुबेरदूत वहिले ॥ रक्षक होते कमळांसी ॥२१०॥
मांडिलें युद्ध परम दुर्धर ॥ भीमें संहारिले बहुत असुर ॥ धनेशा जाणविती समाचार ॥ पुरुष भयानक एक आला ॥२११॥
कुबेर म्हणे तो कृष्णभक्त ॥ कमळें नेऊं द्या त्यासी बहुत ॥ मग यातुधान जाहले शांत ॥ भीम त्वरें परतला ॥२१२॥
प्रभंजन सुटला अद्भुत ॥ उडोनि जाती थोर पर्वत ॥ तैसाचि भीम गडगडत ॥ धर्मदर्शना जात त्वरें ॥२१३॥
चिंता करीत युधिष्ठिर ॥ कमळें आणूं गेला वृकोदर ॥ केव्हां पाहीन सहोदर ॥ त्याविण दीन सर्व आम्ही ॥२१४॥
तों अकस्मात कमळें घेऊन ॥ उभा ठाकला भीमसेन ॥ वंदिले धर्माचे चरण ॥ वर्तमान सांगीतलें ॥२१५॥
ऐकोनि संतोषला धर्म ॥ मग कल्हारें आणिलीं जीं उत्तम ॥ त्यांहीं पूजिले द्विजोत्तम ॥ लोमशधौम्यादि सर्वही ॥२१६॥
गुंफुनि कमळांच्या माळा ॥ द्रौपदी घाली धर्माचे गळां ॥ भीम नकुल सहदेव पूजिला ॥ अत्यादरेंकरूनियां ॥२१७॥
यावरी गंधमादनीं परतोन ॥ येते जाहले कुंतीनंदन ॥ तों तेथें ब्राह्मणवेष धरून ॥ जटासुर पातला ॥२१८॥
नित्य सेवेसी तिष्ठत ॥ धर्मपंक्तीस भोजन करीत ॥ जेवीं मैंद यात्रेसी येत ॥ वेष धरूनि साधूचा ॥२१९॥
भीम नसतां अकस्मात ॥ द्रौपदीस न्यावया तो जपत ॥ जेवीं दुर्जन उणें पाहात ॥ सज्जनांचें सर्वदा ॥२२०॥
घटोत्कचासह भीमसेन ॥ गेला वना मृगयेलागून ॥ धौम्य लोमश अनुष्ठान ॥ स्वर्धुनीतीरा करूं गेले ॥२२१॥
तिघां बंधूसह द्रौपदी ॥ असूरें उचलोनि घेतली स्कंधीं ॥ अंतरिक्ष उडाला कुबुद्धी ॥ अंडजाऐसा त्वरेनें ॥२२२॥
तिघांचीं शस्त्रें घेतलीं हिरोन ॥ मागुती न देचि परतोन ॥ धर्मराज बोले वचन ॥ जटासुराप्रति तेधवां ॥२२३॥
शस्त्रें आमुचीं दे झडकरी ॥ समरांगणीं धर्मयुद्ध करीं ॥ तंव तो म्हणे गिरिकंदरीं ॥ तुम्हां तिघांसी मारीन ॥२२४॥
भीमासही वधीन शोधून ॥ द्रौपदीस माझी स्त्री करीन ॥ धर्म दशदिशा विलोकून ॥ वाट पाहे बंधूची ॥२२५॥
तों ईश्वरगति विचित्र ॥ त्याचि मागें आला वृकोदर ॥ तों चौघांसी घेऊनि असुर ॥ पळतां देखिला ते वेळी ॥२२६॥
गर्जना करी भीमसेन ॥ म्हणे आमुचें अन्न भक्षून ॥ बरा जाहलासी उत्तीर्ण ॥ महापतिता राक्षसा ॥२२७॥
दैत्य चौघांसी उतरोन ॥ युद्धा प्रवर्तला दुर्जन ॥ दहा घटिला संपूर्ण ॥ युद्ध जाहलें सबळ तेथें ॥२२८॥
वाली सुग्रीव जेवीं भिडती ॥ सुंदोपसुंद जेवीं युद्ध करिती ॥ हिडिंबाऐसा पापमती ॥ जटासुर प्रबल तो ॥२२९॥
बकासुर आणि किर्मीर ॥ तेवीं भीमाशीं झगटत असुर ॥ मग त्यासी भोंवंडूनि सत्वर ॥ वृकोदरें आपटिला ॥२३०॥
तेव्हां त्याचें शिर मोडूनी ॥ महीवरूनि भिरकाविलें गगनीं ॥ शशी आणि तरणी दोन्ही ॥ देखोनि कंपित जाहले ॥२३१॥
शिर पडलें भूमंडळीं ॥ आनंदे सर्व ऋषिमंडळी ॥ सुमनवर्षात ते काळीं ॥ सुखरीं केला प्रीतीनें ॥२३२॥
मग आश्रमासी आले परतोन ॥ चालिले ऋषिमंडळ घेऊन ॥ घेती महापुरुषांचें दर्शन ॥ गिरि उपगिरि ओलांडिती ॥२३३॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार ॥ ध्यान धारणादि प्रकार ॥ समाधिलक्षण साचार ॥ जाणते पुरुष देखिले ॥२३४॥
एक शमदमसादनीं प्रवर्तले ॥ एकीं मनोजय वासनाक्षय केले ॥ ते महाराज धर्में वंदिले ॥ पूजाप्रकार समर्पूनि ॥२३५॥
अगस्त्याच्या आश्रमीं अपार ॥ सुख पावला युधिष्ठिर ॥ पुढें माल्यवंत धराधर ॥ सरळ विशाल उंच तो ॥२३६॥
त्या पर्वतावरी चढोन ॥ कुबेरनगर पाहती देदीप्यमान ॥ तेथें कलधौतभूमिका समान ॥ सर्व पाषाण रत्नमय ॥२३७॥
त्या नगराचि पाहतां रचना ॥ धणी न पुरे सर्वांच्या मना ॥ परकीय देखतां नयना ॥ मणिमंत पुत्र धांवला ॥२३८॥
यक्ष धांवले अपार ॥ युद्ध जाहलें घोरांदर ॥ भीमें दळ संहारिलें समग्र ॥ मग धनेश्वर धांवला ॥२३९॥
तेणें ओळखिले पंडुनंदन ॥ वैश्रवणें दिलें आलिंगन ॥ घटोद्भवाचें शापवचन ॥ येथें सत्य जाहलें ॥२४०॥
मानवहस्तें दळ ॥ संहारेल तुझें सकळ ॥ असो कुबेर म्हणे स्थल निर्मळ ॥ येथें सुखी राहा तुम्ही ॥२४१॥
वांच्छित असेल जें मन ॥ तें कार्य सांगा मजलागून ॥ धर्म म्हणे जाहलें तव दर्शन ॥ इतुकेन कृतकृत्य जाहलों ॥२४२॥
तों तेथें कलशोद्भव येऊन ॥ निजकरें शिंपूनि जीवन ॥ कुबेरपृतना उठवून ॥ सजीव केली मागुती ॥२४३॥
अगस्त्याचे चरणीं ॥ पांडव लागती तये क्षणीं ॥ तीर्थें पाहात मेदिनीं ॥ तेथूनि पुढें चालिले ॥२४४॥
पांडवप्रताप मित्र केवळ ॥ उदय पावला तेजाळ ॥ संशयभगणें सकळ ॥ लया पावतील एकदांचि ॥२४५॥
पंडित भक्त श्रवणसत्कर्म ॥ करूं लागले होऊनि सप्रेम ॥ फिटोनि गेला तेव्हां भ्रम ॥ वस्तु संपूर्ण विलोकिती ॥२४६॥
परी दिवाभीत दुर्जन ॥ न येती समोर घेऊनि वदन ॥ असो जे सुरस ज्ञानसंपन्न ॥ आनंदघन देखतां ॥२४७॥
श्रीमद्भीमातटविहारा ॥ ब्रह्मानंदा दिगंबरा ॥ श्रीधरवरदा निर्विकारा ॥ अक्षया अभंगा निरुपाधिका ॥२४८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठाविसाव्यांत कथियेला ॥२४९॥
इति श्रीपांडवप्रताप वनपर्वणि अष्टाविंशतितमाध्यायः ॥२८॥ श्रीकृष्णार्पनमस्तु ॥



N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP