मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २४ वा

पांडवप्रताप - अध्याय २४ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
जनमेजय म्हणे वैशंपायनास ॥ तुझ्या वदनें अति सुरस ॥ कथा गोड लागे सुधारस ॥ तुच्छ वाटे याहूनि ॥१॥
वैशंपायन म्हणे राया ॥ तुझ्या पूर्वजांची पवित्र चर्या ॥ ऐकतां निरसे तापत्रयमाया ॥ होय काया शीतळ ॥२॥
वंदोनियां कृष्ण चरणा ॥ सांगेन अद्भुत कथेची रचना ॥ पांडव वनीं असतां जाणा ॥ कृष्ण भजना न विसरती ॥३॥
प्रत्यहीं लक्ष संख्या ब्राह्मण ॥ नित्य त्यांसी षड्रसान्न ॥ धर्मराज देत भोजन ॥ त्रिभुवनीं ख्याती पूर्ण जाहली ॥४॥
ब्राह्मण येऊनि गजपुरासी ॥ कीर्ति सांगती दुर्योधनासी ॥ म्हणती धन्य उपमा पांडवांसी ॥ त्रिजगतीं असेना ॥५॥
तुम्हीं बाहेर दिलें दवडून ॥ परी त्यांसी रक्षीत जगज्जीवन ॥ प्रत्यहीं लक्षसंख्या ब्राह्मण ॥ पंक्तीसी जेविती धर्माचे ॥६॥
ऐकोचि पांडवांची स्तुती ॥ दुर्योंधन संतप्त चित्तीं ॥ परिसोनि संतांची स्थिती ॥ निंदक तापती मानसीं ॥७॥
वसंत ऋतुराज देखोनी ॥ कोकिला करिती मधुर ध्वनीं ॥ तो सुंदर स्वर ऐकोनी ॥ वायस मनीं संतापे ॥८॥
देखोनि पंडित व्युत्पन्न ॥ मूर्खाचें ह्रदय जाय जळोन ॥ कीं ऐकोनि हरिकीर्तन ॥ भूतप्रेतें विटती पैं ॥९॥
तैसा दुर्योधान पापमती ॥ अपाय योजी नाना चित्तीं ॥ तों दुर्वास ऋषि महामती ॥ अकस्मात पातला ॥१०॥
त्यासी देखोनि दुर्योधन ॥ करिता जाहला साष्टांग नम ॥ मनीं कापटय कल्पूनि पूर्ण ॥ पांडवां छळूं पाहात ॥११॥
जारण मारणादि अनुष्ठान ॥ तेथें आवडी धरिती कुजन ॥ तैसाचि अर्थ कल्पून ॥ सेवा दुर्योधन करीतसे ॥१२॥
जे जे समयीं जें जें मागे ॥ तें तें देऊनि तोषवी अंगें ॥ रात्रीं चार प्रहर जागे ॥ सेवा स्वांगें दावीतसे ॥१३॥
भूतप्रेत साधनां लागूनी ॥ कुटिल कपटी जागती श्मशानीं ॥ तैसी बहुत सेवा करूनी ॥ दुर्वासऋषि प्रसन्न केला ॥१४॥
तो म्हणे माग वरदान ॥ येरू बोले कर जोडून ॥ आमुचे दायाद पांडव जाण ॥ त्यांसी छळोन येइंजे ॥१५॥
सूर्यें थाली दिली त्यांप्रती ॥ असंख्य जेविती ऋषिपंक्ती ॥ शेवटीं जेवूनि द्रौपदी सती ॥ थाली पालथी घालीत ॥१६॥
थाली पालथी घालितां रात्रीं ॥ मग तेथें अन्न नाहीं निश्चितीं ॥ आपण जावें त्या समया प्रती ॥ भोजन प्रीतीं मागावें ॥१७॥
ते करिती जरी अनमान ॥ तरी भस्म करावें शापून ॥ तों बोले अत्रिनंदन ॥ अवश्य करणें हें आम्हां ॥१८॥
दुर्योधन दुःशासन दुर्वास ॥ तिघांची एक राशि एक रस ॥ तरी अत्रिनंदन निर्दोष ॥ त्यासी मति ऐसी कां ॥१९॥
एक मास पर्यंत जाण ॥ भक्षिलें कौरवांचें अन्न ॥ दुर्जनांचे अन्नाचा गुण ॥ पांडव छळावे वाटलें ॥२०॥
सज्जनाचें सेवितां अन्न ॥ सुबुद्धि उपजे तेणें करून ॥ असो दुर्वासाचें उतावीळ मन ॥ जाहलें पांडव छळावया ॥२१॥
साठसह्स्त्र शिष्यभार ॥ घेऊनि चालिला अत्रिपुत्र ॥ रात्र जाहली दोन प्रहर ॥ द्वैतवना पातले ॥२२॥
ऐकोनि ब्राह्मणांची गजबज ॥ जागा जाहला धर्मराज ॥ बंधूंसह तेजःपुंज ॥ लोटांगण तया घालीत ॥२३॥
म्हणे धन्य धन्य आजिचा दिन ॥ जाहलें साधूचें दर्शन ॥ दुर्वास म्हणे तुझें स्तवन ॥ गोड न लागे ये वेळे ॥२४॥
पोटीं क्षुधेचा अनल अनल ॥ प्राण होताति आमुचे विकल ॥ तुझे उपचार पावले सकल ॥ भोजन आधीं देइंजे ॥२५॥
समय पाहूनि पूजन ॥ चतूरें करावें जाण ॥ कासावीस होताती प्राण ॥ झडकरी अन्न दे आतां ॥२६॥
इच्छा धरूनि भोजनीं ॥ वेगें येतां मार्ग क्रमूनी ॥ तों अस्ता गेला वासरमणी ॥ म्हणोनि रजनी जाहली ॥२७॥
सत्वर येतों स्त्रान करून ॥ पात्रीं वाढोनि ठेवा अन्न ॥ विलंब जाहल्या जाण ॥ मग शापीन क्षणार्धें ॥२८॥
ऐकोनि ऋषीचें वचन ॥ धर्म दचकला मनीं पूर्ण ॥ पाहे द्रौपदीचें वदन ॥ म्हणे परम विघ्न ओढवलें ॥२९॥
द्रौपदी म्हणे धर्मराजा ॥ स्त्राना जाऊं द्या सत्वर द्विजां ॥ ऐसें बोलतां द्रुपदात्मजा ॥ मुनि उठिले सत्वर ॥३०॥
दुर्वास बोले वचन ॥ आमुचें दिवसा जाहलें संध्यानृष्ठान ॥ आतां योतों स्त्रान करून ॥ द्रौपदी म्हणे अवश्य ॥३१॥
घेऊनि ऋषींचे भार ॥ स्त्रानासी गेला अत्रिपुत्र ॥ मागें धर्मराज दीनवक्र ॥ द्रौपदीलागीं बोलतसे ॥३२॥
कैसी करावी आतां गोष्टी ॥ रिघावें कवणा चिया पाठीं ॥ द्रौपदी म्हणे पडतां संकटीं ॥ याद वराया स्मरावें ॥३३॥
मग ते पांडवांची पत्नी ॥ उभी ठाकली वृंदावनीं ॥ द्वारकेकडे कर जोडूनी ॥ मूर्ति ध्यानीं आठविली ॥३४॥
म्हणे श्रीरंगा इंदिरावरा ॥ धराधरशयना विश्वंभरा ॥ भक्तमान सचकोर चंद्रा ॥ करूणा समुद्रा गोपाळा ॥३५॥
मनो अनंत ब्रह्मांड नायका ॥ हे दयार्णवा विश्वव्यापका ॥ वैकुंठपते भव मोचका ॥ मदनजनका जगत्पते ॥३६॥
हे कृष्णा जगदंकुरकंदा ॥ साधु ह्रदया रविंदमिलिंदा ॥ निजजनचातकजलदा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥३७॥
कमलोद्भव जनका कमल नयना ॥ कमल नाभा कमल शयना ॥ कमला नायका कमलवदना ॥ कमल सदना कमल प्रिया ॥३८॥
जय जय श्री कृष्णा विश्वपालना ॥ विश्वव्यापका विश्वकारणा ॥ विश्वमतिचालका विश्वजीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥३९॥
जय जय श्री कृष्णा कमल पत्राक्षा ॥ कंसांतका सर्वसाक्षा ॥ मखपालका निर्विकल्प वृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥४०॥
लाक्षा सदनीं रक्षिलें श्रीहरी ॥ उघडें करितां सभेभीतरीं ॥ उडी घालूनि मुरारी ॥ पूर्ण कैवारी जाहलासी ॥४१॥
तुजवांचूनि ये संसारीं ॥ तारक कोण आहे कंसारी ॥ या वेळीं सत्त्व राखें श्रीहरी ॥ धांव झडकरी माउलिये ॥४२॥
भक्तवत्सला अतिउदारा ॥ श्रीकरधरा श्यामसुंदरा ॥ माझे विसांविया सर्वेश्वरा ॥ करावी त्वरा ये वेळे ॥४३॥
माझे सांवळे कृष्णाबाई ॥ बिरडें सुटलें वाढिते समयीं ॥ मज चतुर्भुज केलें लवलाहीं ॥ तैसा ये समयीं धांवें कीं ॥४४॥
धांवा पुकारीत याज्ञ सेनी ॥ उभी राहोनि वृंदावनीं ॥ द्वारकेउझू बद्धपाणी ॥ स्तवन करी कृष्णाचें ॥४५॥
तों इकडे द्वारकावतीस ते वेळे ॥ ताट रुक्मिणीनें विस्तारिलें ॥ ग्रास घ्यावा तों घननीळें ॥ शब्द ऐकिले भगिनीचे ॥४६॥
द्रौपदीचे शब्द कोमळ ॥ करुणारसभरित सुढाळ ॥ ह्रदयीं गहिंवरला गोपाळ ॥ ताट दूरी ढकलिलें ॥४७॥
उभा राहिला चक्रपाणी ॥ तटस्थ पाहे रुक्मिणी ॥ धांव घेतली ते क्षणीं ॥ न बोलतां अति वेगें ॥४८॥
सत्वर येऊनि वनमाळी ॥ उभा ठाकला द्रौपदीजवळी ॥ प्रेमें आलिंगिली पांचाळी ॥ तये वेळीं गोपाळें ॥४९॥
नेत्र उघडोनि द्रौपदी पाहे ॥ तों पुढें घनश्याम उभा आहे ॥ द्दढ धरूनियां पाय ॥ मुख पाहे श्रीहरीचें ॥५०॥
सुहास्यवदन अति उदार ॥ मुकुटकुंडलें मकराकार ॥ आकर्णनेत्र सुकुमार ॥ निढळीं केशर विराजे ॥५१॥
सर्वालंकारीं मनोहर ॥ उभा देखिला जगदुद्धार ॥ द्रौपदी म्हणे ऋषीश्वर ॥ स्त्राना गेले गोविंदा ॥५२॥
श्रींरग म्हणे द्रौपदीमाये ॥ मज बहु क्षुधा लागली आहे ॥ धांवोनि आलों लवलाहें ॥ ताट दूरी करोनियां ॥५३॥
द्रौपदी म्हणे कमलाधवा ॥ ऋषींलागीं केला तुझा धांवा ॥ जगज्जीवना केशवा ॥ आतां बाहुं कोणासी ॥५४॥
कृष्ण म्हणे झडकरी ॥ कांहीं तरी पाहें गृहांतरीं ॥ थाली मज दावीं लवकरी ॥ कांहीं तरी असेल आंत ॥५५॥
द्रौपदी सद्नद बोले वचन ॥ थाली म्यां पालथी घातली धुऊन ॥ कृष्ण म्हणे कांहीं भक्षिल्याविण ॥ माझें मन तृप्त नव्हें ॥५६॥
थाली मज पाहूं दे आधीं ॥ ते आणोनि दाखवी द्रौपदी ॥ तों एक भाजीचें पान कृपानिधी ॥ दावी हात करोनियां ॥५७॥
जगत्पालक जगन्नाथ ॥ द्रौपदीपुढें ओढवी हात ॥ येरीनें घातलें त्यरित ॥ म्हणे मी तृप्त इतुकेनि ॥५८॥
तें शाकादल लवलाहीं ॥ मुखीं घाली क्षीराब्धीचा जांवई ॥ ढेंकर दिधला ते समयीं ॥ म्हणे धालें त्रिभुवन हो ॥५९॥
आतां पाचारा ब्राह्मण ॥ द्रौपदी पाहे आश्रमांत येऊन ॥ तों अन्नाचे पर्वत देखिले पूर्ण ॥ जेणें त्रिभुवन जेवूनि उरे ॥६०॥
तों गंगा तीरीं ऋषि मंडळी ॥ अघमर्षणीं गंगाजळीं ॥ तेथें प्रकटोनि वनमाळी ॥ भोजन शाला रचियेल्या ॥६१॥
द्रौपदी आणि पांडव ॥ दुसरे निर्मूनि माधव ॥ दुर्वा सादि ऋषि ॥ जेवा वया बैसवी ॥६२॥
घमघमीत सुवा सान्न ॥ देवही लाळ घोंटिती देखोन ॥ वसंन करी प्रदक्षिण ॥ म्हणे हें अन्न कैंचे मज ॥६३॥
देवें अमृत दिधलें आणोन ॥ तरी ऋषि म्हणती नेदूं हें अन्न ॥ ब्रह्मा दिकांसी दुर्लभ पूर्ण ॥ प्रीती करून जेविती ॥६४॥
रत्न जडित आडणिया तळीं ॥ त्यांवरी कनकाचीं ताटें मांडिलीं ॥ बैसा वया सुवर्णपीठें दिधलीं ॥ समसमान सर्वांसी ॥६५॥
पृथक्‍  पृथक्‍ ठाणविया ॥ वरी रत्न दीपिका लावोनियां ॥ कांचना चिया झारिया ॥ उदकें भरिल्या सुवासें ॥६६॥
जैसा सोमकांताचा पर्वत ॥ तैसा वाढिलासे शुभ्र भात ॥ सुवर्णाचल अद्भुत ॥ तैसें वरान्न दिसतसे ॥६७॥
पंचभक्ष्य परमान्न ॥ साठ पत्रशाखा सुवासें पूर्ण ॥ धृतमधुदुग्धसरोवरें जाण ॥ दधि शर्करा अपार ॥६८॥
जैसें अलात चक्र फिरताहे ॥ तैसी द्रौपदी वाढूनि जाय ॥ चुडे झळकती विद्युत्प्राय ॥ उजेड ऋषींवरीं ॥६९॥
प्रार्थना करीतसे कृष्ण ॥ भीम विनवी कर जोडुन ॥ स्वामी सावकाश कीजे भोजन ॥ उशीर बहु जाहला कीं ॥७०॥
तृप्त जाहले ऋषि समस्त ॥ म्हणती सदा काळ रहावें येथ ॥ सद्भक्तांचें अन्न पुनीत ॥ द्रौपदीहस्तें जेविजे ॥७१॥
आयुष्य असावें कल्पवरी ॥ सदा रहावें धर्माचे घरीं ॥ ऐसें बोलोनि ऋषीश्वरीं ॥ कर प्रक्षालन केलें पैं ॥७२॥
सकल ऋषी आंचवले ॥ त्रयोदश गूणी विडे घेतले ॥ सर्वही सुगंधें चर्चिले ॥ मग निजले नावेक ॥७३॥
मंत्राक्षता द्यावयासी ॥ उठले मागुती जों ऋषी ॥ तों पांचाळी सहित ह्रषीकेशी ॥ गुप्त जाहले पांडवही ॥७४॥
तों सहदेव पातला वेगेंसीं ॥ म्हणे स्वामी चलावें भोजनासी ॥ पात्रें वाढूनि तुम्हांसी ॥ बोलावूं मी पातलों ॥७५॥
मग बोले अत्रिनंदन ॥ परम चांडाल दुर्योधन ॥ हरिभक्तांची छळणा करून ॥ तपश्चर्ये आंचवलों ॥७६॥
दुर्जनांची बुद्धि ऐकिजे ॥ हरिभक्तांचें छळण कीजे ॥ साधूंचा अंत पाहिजे ॥ हिं द्वारें अनर्थाचीं ॥७७॥
पूर्वीं अंबऋषीचें केळें छलन ॥ पाठीं लागलें सुदर्शन ॥ परम चांडाळ दुर्योधन ॥ तेणें बुद्धि चेतविली ॥७८॥
दुर्वास म्हणे सहदेवातें ॥ माझा आशीर्वाद सांगा धर्मातें ॥ विजय कल्याण हो तुम्हांतें ॥ शत्रु क्षयातें पावती ॥७९॥
वज्रचूडे मंडित महासती ॥ माझा आशीर्वाद सांगा तिज प्रती ॥ तुज साह्य असेल सर्वार्थी ॥ जो कां श्रीपति सर्वदा ॥८०॥
ब्राह्यण गेले तेथून ॥ सहदेव आला परतोन ॥ मग येऊनि जगज्जीवन ॥ प्रकट भेटला पांडवां ॥८१॥
आलिंगोनि पांडवांप्रती ॥ ह्रदयीं धरिली द्रौपदी सती ॥ म्हणे तुम्ही पडल्या संकटावर्तीं ॥ मी श्रीपति रक्षीन ॥८२॥
ब्रह्मानंद यादवेंद्र ॥ आज्ञा मागोनि सर्वेश्वर ॥ द्वारकेसी गेला श्रीकरधर ॥ अभंग साचार न विटे ॥८३॥
असो यावरी द्वैतवनीं ॥ असतां पांडव याज्ञ सेनी ॥ तों जगद्नुरु येऊनी ॥ व्या सदेव भेटला ॥८४॥
शत्रुविध्वंसासी कारण ॥ अर्जुना करी तूं तीर्थटन ॥ शिव आणि शचीरमण ॥ अस्त्रें शस्त्रें देतील बहु ॥८५॥
ऐसें बोलोनि अर्जुनासी ॥ व्यास गेला बदरिकाश्रमासी ॥ अर्जुन उद्विग्न मानसीं ॥ तपोवनासी जावया ॥८६॥
गुरु बुद्धि विशेष जाणोन ॥ तीर्थाटना निघाला अर्जुन ॥ हिमालय पर्यत ओलांडून ॥ इंद्रकील पर्वता ॥८७॥
तेथें वृक्षपर्णें भक्षून ॥ घोर तप करी अर्जुन ॥ दुसरे मासीं जल सेवून ॥ धूम्रपान तृतीयमासीं ॥८८॥
चवथे मासीं वायु आहार ॥ एकांगुष्ठावरी पार्थवीर ॥ ऊर्ध्व बाहु करूनि तीव्र ॥ तप आचरे कौतेय तो ॥८९॥
जैसा माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तपें तेजस्वी तैसा अर्जुन ॥ भोंवत तपस्वी ब्राह्मण ॥ पार्थतेज साहूं न शकती ॥९०॥
व्योमकेशा प्रति जाऊन ॥ ऋषी सांगती वर्तमान ॥ अर्जुनाच्या तप स्तेजें करून ॥ सहस्त्रकिरण झांकोळला ॥९१॥
ऐसें ऐकोनि मृडानी भर्ता ॥ येता जाहला इंद्रकील पर्वता ॥ किरात रूप जाहला धरिता ॥ अतिविशाल तेजस्वी ॥९२॥
रूप पालटोनि शक्ती ॥ संगें वना आली हैमवती ॥ भूतपाळे असंख्य निघती ॥ उमाधवा वेष्टीत ॥९३॥
तों मूकनामें दैत्य बलविशेष ॥ त्या प्रति बोले व्यो मकेश ॥ तूं धरोनि वराहवेष ॥ अर्जुना सन्मुख जाईं पैं ॥९४॥
मग आज्ञा वंदूनि तो असुर ॥ वराहवेषें धांवे भयंकर ॥ मुसांडी घेऊनि सत्वर ॥ पार्थावरी चवताळला ॥९५॥
मेघनादाहूनि घोष गहन ॥ सूकर करितां ऐके अर्जुन ॥ गांडिवासी सित चढवून ॥ लाविला बाण चापासी ॥९६॥
पवनवेगें सूकर जाता ॥ पाठीं लागला वीर पार्थ ॥ तों किरातरूपें उमाकांत ॥ वेगें धांवत आडवा ॥९७॥
पार्थासी म्हणे उमावर ॥ म्यां पिटीट आणिला सूकर ॥ संधानीं लक्षिला साचार ॥ तूं त्यासी मारूं नको ॥९८॥
तें न मानीच अर्जुन ॥ धांवोनि चापासी लाविया बाण ॥ वर्मीं भेदितां जाण ॥ सूकरें प्राण सोडिला ॥९९॥
परम पुरुषार्थी सुभद्रारमण ॥ किरातासी पुसे तूं कोण ॥ स्त्रिये सहित निर्भय पूर्ण ॥ एकला वनीं विचरसी ॥१००॥
किरात म्हणे येचि भूमीं ॥ वसती करितों सदा आम्ही ॥ तूं कोण आहेस अधर्मी ॥ सूकर माझा वधिला कां ॥१०१॥
तूं गर्व बहुत करिसी ॥ तरी युद्ध करीं मजशीं ॥ आमुच्या वना तूं कां आलासी ॥ मानववेषें सुकुमारा ॥१०२॥
योद्धा म्हणविसी निपुण ॥ तरी टाकीं मजवरी स्वेच्छ बाण ॥ अर्जुनें मांडिलें वज्रठाण ॥ शर दारुण सोडीत ॥१०३॥
असंख्यात सोडिले बाण ॥ परी शिवा अंगीं न रुपती जाऊन ॥ सुमनवृष्टि होतां जाण ॥ इभ जैसा न गणीच ॥१०४॥
तृण शिला पडतां सबळ ॥ अचल न सोडी जैसें स्थळ ॥ तैसें पार्थाचें बाणजाळ ॥ जाश्वनीळ मानीना ॥१०५॥
जें जें पार्थ सोडी अस्त्र ॥ मुख पसरोनि ग्रासी त्रिनेत्र ॥ कुंतीचा जो तृतीयपुत्र ॥ विस्मित होऊनि पाहातसे ॥१०६॥
मग सुभद्रामनोरंजन ॥ म्हणे तूं सांग रुद्र कीं शचीरमण ॥ किरात न बोले एकही वचन ॥ अपार बाण ग्रासीत ॥१०७॥
बाणजाल सोडितां बहुत ॥ परम त्रासला वीर पार्थ ॥ बाण सरले समस्त ॥ अक्षय्य भाता रिता पैं ॥१०८॥
म्हणे अग्निदत्त अक्षय्य तूणीर ॥ बाण कां आजि सरले समग्र ॥ हा कोण पुरुष निर्धार ॥ न कळे पार तयाचा ॥१०९॥
मग गांडीवदंडें करून ॥ मारीत उठिला अर्जुन ॥ तों रुद्रें पस्रोनि वदन ॥ चापही गिळिलें तेधवां ॥११०॥
मग दिव्य खङ्ग घेऊन ॥ शिवासी ताडी अर्जुन ॥ तेंही गिळिलें न लागतां क्षण ॥ मग अर्जुनें वृक्ष टाकिले ॥१११॥
वृक्ष सरले संपूर्ण ॥ शिला पर्वत घाली उचलोन ॥ हाणितां मुष्टि प्रहारें करून ॥ मल्लयुद्धासी मिसळले ॥११२॥
चार घटिका पर्यंत ॥ शिवें युद्ध केलें अद्भुत ॥ अर्जुन जाहला मूर्च्छागत ॥ मग उमाकांत काय करी ॥११३॥
कृपाकरें कुरवाळून ॥ सावध केला अर्जुन ॥ प्रत्यक्ष दशभुज पंचानन ॥ प्रकट जाहला तेधवां ॥११४॥
म्हणे प्राण सखया पार्था ॥ प्रसन्न जाहलोम माग आतां ॥ विजयी होईं सर्वथा ॥ शत्रुसंग्रामीं सर्वदा तूं ॥११५॥
पार्थें घातलें लोटांगण ॥ स्कंदतातें दिधलें अलिंगन ॥ मग श्वेतवाहनें पूजून ॥ दिव्य स्तवन मांडिलें ॥११६॥
पंचवदना विरूपाक्षा ॥ विश्वंभरा कर्माध्यक्षा ॥ भक्त वल्लभा सर्वसाक्षा ॥ माया चक्रचालका ॥११७॥
गंगा धरा हिमनग जामाता ॥ गजास्यजनका विश्वनाथा ॥ विष्णुवल्लभा प्रतापवंत ॥ त्रिपुरांतका त्रिलोचना ॥११८॥
विशाल भाला कर्पूरगौरा ॥ नीलग्रीवा सुहास्यवक्रा ॥ दक्षमखदलना विश्वेश्वरा ॥ गजांतका स्मरारे ॥११९॥
हे भवभवांतका भवनिवारा ॥ भोगि भूषणा महाभयहरा ॥ हेमगर्भक्तजन प्रियकरा ॥ अंधक संहारा वृषभध्वजा ॥१२०॥
तारकारिजनका त्र्यंबका ॥ गुणातीता ताप त्रयहारका ॥ हे पशुपते दोषत्रयनिवारका ॥ पंचमुकुटा पुरातना ॥१२१॥
पंचवदनें ऐकूनि ऐसें स्तवन ॥ ह्रदयीं आलिंगिला फाल्गुन ॥ विज म्हणे माझे अपराध संपूर्ण ॥ क्षमा करीं दयाळा ॥१२२॥
गिळिलें होतें चाप तूणीर ॥ शिवें दिधलें काढूनि समग्र ॥ मग पाशुपत ब्रह्मास्त्र ॥ किरीटी लागीं दीधलें ॥१२३॥
स्त्रान करूनि अर्जुन ॥ न्यासमंत्र विधिपूर्वक जाण ॥ अत्यादरें शिव पूजन ॥ बीभत्सु करिता जाहला ॥१२४॥
मग म्हणे उमाकांत ॥ जे निर्बल युद्ध टाकोनि पळत ॥ त्यांवरी हीं अस्त्रें टाकितां यथार्थ ॥ जाळितील त्रिभुवना ॥१२५॥
तरी पुढें युद्ध मांडेले दारुण ॥ गुरुसुत गुरु कानीन ॥ त्यांवरीच प्रेरीं हीं गहन ॥ आणि कां योग्य न होती ॥१२६॥
अर्जुनें करितां अस्त्र ग्रहण ॥ कुंभिनी गजबजली भयें करून ॥ सकलरायां अंगीं ज्वरशहारे दारुण ॥ कंप सुटला दुष्टांसी ॥१२७॥
धन्य धन्य मी कृतकृत्य ॥ ऐसें मानोनि वीर पार्थ ॥ पुढत पुढती नमीत ॥ विरूपाक्षासी आदरें ॥१२८॥
यावरी अष्टदिक्पाल ॥ विजय पहावया आले सकल ॥ शचीसहित आखंडल ॥ स्तविती तेव्हां पार्थातें ॥१२९॥
यम दंडास्त्र देत ॥ वरुण मंत्र देत विधियुक्त ॥ प्रसारणा कुंचन सहित ॥ वरुणें पाश दीधले ॥१३०॥
कुबरे प्रस्वापनास्त्र देत ॥ कृशानु शक्ति ओपी अद्भुत ॥ लोकप्राणेश समर्पीत ॥ वेग अत्यंत स्यंदनाचा ॥१३१॥
बिडौजा म्हणे पार्था ॥ तूं अमरावतीस येईं तत्त्वतां ॥ मातलि सारथी आणि रथा ॥ न्यावयालागीं पाठवितों ॥१३२॥
पार्थासी देऊनि वरदाना ॥ दिक्पाल गेले स्वस्थाना ॥ तों मातलि घेऊनि स्यंदना ॥ गगनपंथें येतसे ॥१३३॥
भूतळीं उतरला सूर्य नारायण ॥ कीं विकुंठींहूनि उतरला सुपर्ण ॥ तैसा तो उत्तम रथ घेऊन ॥ मातलि आला पार्थापाशीं ॥१३४॥
म्हणे शक्रात्मजा शक्रें ये वेळे ॥ तुम्हां स्वपद पहावया बोलाविलें ॥ मग अर्जुनें स्त्रानदान केलें ॥ शुचिष्मंत होऊनि ॥१३५॥
उदयाचलीं उगवला मित्र ॥ तैसा रथीं शोभला कृष्ण मित्र ॥ वृत्र शत्रु पहावया सत्वर ॥ सुभद्रावर चालिला ॥१३६॥
तंव सहस्त्रांचीं सहस्त्र विमानें ॥ अंतरिक्षीं देखिलीं कुंतीनंदनें ॥ जैशीं जल सागरीं गहनें ॥ जहाजें सत्वर धांवती ॥१३७॥
कीं पृथ्वीवरी पुरें पट्टनें ॥ दिसती श्रीयुक्त विराज मानें ॥ स्वर्गवासी राजे नयनें ॥ पार्थवीरें विलोकिले ॥१३८॥
मनुष्यांसी तारे दिसत ॥ परी ते स्वर्गस्थ ॥ मूर्ति मंत ॥ तों अमरावती देखे पार्थ ॥ ऐरावत द्वारीं उभा असे ॥१३९॥
कर्पूरा ऐसा शुद्ध श्वेत ॥ कीं दुसरा कनकाद्रि मूर्ति मंत ॥ तो सहज चालतां ऐरावत ॥ उर्वी लवत भारें ज्याचे ॥१४०॥
हिर्‍यां ऐसे चार दंत ॥ विशाल जैसा मलय पर्वत ॥ वरी उद्यानें विराजत ॥ सरोवरें उचंबळती ॥१४१॥
जवळ देखिलें नंदनवन ॥ लागलें कल्पद्रुमांचें वन ॥ जे मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ ते तरु तेथें विराजती ॥१४२॥
कामधेनूंची खिल्लारें ॥ चिंतामणींचीं धवळारें ॥ चंद्र सूर्य़ां ऐसे तेजाक्ररें ॥ पाषाण तेथें मिरवती ॥१४३॥
ऐसें तें शक्रपद वरिष्ठ ॥ निर्जरांचा जेथें थाट ॥ तेथें अर्जुन पावला सुभट ॥ शक्रादरें करोनियां ॥१४४॥
महा पुण्य़ाच्या कोटयनुकोटी ॥ शुद्ध असती ज्याचे गांठीं ॥ त्याचे अमरावती पडे द्दष्टी ॥ ते पाहे किरीटी प्रीतीनें ॥१४५॥
तेथें वेदांच्या प्रत्यक्ष मूर्ति ॥ शास्त्रें समोर ॥ पार्थें शक्रासी नमस्कार ॥ साष्टांग केला तेधवां ॥१४७॥
पुढें सप्रेम धांवोन ॥ अमरेशें दिधलें आलिंगन ॥ करूनि मस्तकीं अवघ्राण ॥ मांडीवरी बैसविला ॥१४८॥
ह्रदयींच्या परम आर्तें ॥ मुख कुरवाळिलें अमरनाथें ॥ विजय मूर्ति पाहतां शक्रांतें ॥ तृत्पि नव्हे सर्वांशीं ॥१४९॥
आपुले निजासनावरी ॥ शक्रें बैसविला शेजारीं ॥ अष्टनायिका ते अवसरीं ॥ नृत्य करिती चपलत्वें ॥१५०॥
ज्यांचे अंगींचा सुवास पूर्ण ॥ भोंवता धांवे एक योजन ॥ ज्यांचिया पदनखांवरून ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१५१॥
पद्मिणी नागिणी सुंदरी ॥ वर्णिती बहुत लोकांतरीं ॥ त्या दासीपणें निर्धारीं ॥ शचीनायकापाशीं सर्वदा ॥१५२॥
असो त्यांचें नृत्य गायन ॥ पाहूनि तोषला अर्जुन ॥ पांच संवत्सर संपूर्ण ॥ राहिला तेथें कोंतेय ॥१५३॥
सकल विद्या अस्त्रें ॥ जे अनुच्छिष्ट मंत्र यथाविधि यंत्रें ॥ चौसष्टिकला पार्थवीरें ॥ चतुर्दश विद्या अभ्यासिल्या ॥१५४॥
चित्रसेन गंधर्वा पासून ॥ गायाननृत्यकला संपूर्ण ॥ तांडव अनालस्यें करून ॥ यथासांग अभ्यासी ॥१५५॥
राग उपराग भार्यां सहित ॥ मूर्च्छना सारी कल्पित ॥ पुढें राग मूर्ति मंत ॥ आळवितां उभे ठाकती ॥१५६॥
कोणे एके दिवशीं ॥ नृत्या निघाली उर्वशी ॥ अर्जुन विलोकितां तिजसी ॥ परम संतोष वाटला ॥१५७॥
उर्वशीचें मन नयन ॥ वेधले पार्थ मुख पाहोन ॥ दुसरे दिवशी सहस्त्र नयन ॥ चित्ररथा प्रति सांगत ॥१५८॥
अर्जुना चिये सेवेसी ॥ वेगें पाठवीं उर्वशी ॥ गंधर्वें बोधोनि तियेसी ॥ निशीमाजी धाडिलें ॥१५९॥
ते श्रृंगारसरोवरमराळिका ॥ जे सकल प्रमदांची नायिका ॥ नयनकटाक्षें देखा ॥ मूर्च्छित तापसां पाडीत ॥१६०॥
द्विजराज मुखी परम सगुण ॥ मृगराज कटी विराज मान ॥ करिराज सम जिचें गमन ॥ पार्थापाशी त्वरें आली ॥१६१॥
धनंजय निजला निज सदनीं ॥ तों जाणविलें सेवकें येऊनी ॥ उर्वशी आली हंसगमनी ॥ दर्शनालागीं तुमच्या पैं ॥१६२॥
तो उर्वशीस देखोन ॥ पार्थें दिधलें अभ्युत्थान ॥ म्हणे माते आपुलें आगमन ॥ काय निमित्त जाहलें ॥१६३॥
उर्वशी सांगें वर्तमान ॥ शक्रें पाठविलें मजलागून ॥ तूं बोलसी माते म्हणोन ॥ जाहलें क्षीण तेणें मी ॥१६४॥
अर्जुन म्हणे जैसी शारद्वती ॥ माता माद्री किंवा ॥ कीं रमा शची आम्हां प्रती ॥ त्याचि पंक्तींत माये तूं ॥१६५॥
तुझे मी धरितों चरण ॥ स्वस्थळा जाईं परतोन ॥ उर्वशी बोले शापवचन ॥ नपुंसकत्व पावसी तूं ॥१६६॥
स्त्री ना पुरुष निर्धार ॥ होशील एक संवत्सर ॥ स्त्रियां मध्यें वास निरंतर ॥ तुज घडेल मम शापें ॥१६७॥
उर्वशा गेली परतोन ॥ पार्थ सांगे शक्रासी येऊन ॥ गेली ती मज व्यर्थ शापून ॥ मग शचीरमण बोलत ॥१६८॥
हा हित रूपी शाप निर्धार ॥ तुज कार्या येईल एक संवत्सर ॥ अज्ञा तवास करितां साचार ॥ विराट गृहीं जाण पां ॥१६९॥
ऐकोनि पार्थ संतोषला ॥ तों लोमशषि तेथें आला ॥ शक्रें सन्मानूनि बैसविला ॥ काय बोलिला मुनि तो ॥१७०॥
तुझे आसनीं बैसला पार्थ ॥ कोण पुण्य आचरला बहुत ॥ शक्र म्हणे हा माझा सुत ॥ मजसमान तेजस्वी ॥१७१॥
विष्णु आणि हा जिष्णु जाण ॥ बद्रिकाश्रमीं तप करून ॥ अवतरले नरनारायण ॥ भूभार सर्व उतरावया ॥१७२॥
इंद्र म्हणे लोमशऋषी ॥ तुवां जावें द्वैतवनासी ॥ इतुकें सांगें धर्मासी ॥ मजपाशीं पार्थ आहे ॥१७३॥
संपूर्ण विद्या शिकवून ॥ पाठवितों तुझे भेटी लागून ॥ लोमश द्वैतवन लक्षून ॥ येता जाहला भूतळीं ॥१७४॥ 
इकडे व्यासशिष्य संजय जाण ॥ धृतराष्ट्रासी सांगे वर्तमान ॥ सकळविद्या प्रवीण ॥ पार्थ जाहला शक्रापाशीं ॥१७५॥
प्रसन्न जाहला उमारमण ॥ शस्त्रास्त्रें दिधलीं संपूर्ण ॥ सकल देवांनीं वरदान ॥ बहुसाल दिधलें तया ॥१७६॥
तुझे पुत्रांचें कर्मस्मरण ॥ रात्रंदिवस करितो सुभद्रारमण ॥ केव्हां मांडेल घोर रण ॥ घेईन प्राण शत्रूचा ॥१७७॥
वस्त्रहरण आठवून ॥ गदा घेऊनि भीमसेन ॥ वधावया उदित पूर्ण ॥ परी धर्मराज आवरी तया ॥१७८॥
जैसा वारणचक्रांत येऊन ॥ एकला संहारी पंचानन ॥ कीं एकला विष्णुवाहन ॥ असंख्य संहारी विखार ॥१७९॥
तैसा एक सुटतां वृकोदर ॥ करील असंख्य वीरांचा संहार ॥ तुझे पुत्रां विषयीं थोर ॥ धुसधुसीत अंतरीं ॥१८०॥
नकुल सहदेव बलाद्भुत ॥ रणसमयाची वाट पाहात ॥ ऐसा ऐकतां घृत्तान्त ॥ धृतराष्ट्र उद्विग्न जाहला ॥१८१॥
असो इकडे द्वैतारण्यांत ॥ धर्म भीम माद्रीसुत ॥ रात्रं दिवस चिंत्ता करीत ॥ वाट पाहात पार्थाची ॥१८२॥
पांच संवत्सर जाहले संपूर्ण ॥ कां अजूनि न येचि अर्जुन ॥ माझे जिवलगासी आलिंगन ॥ केव्हां देईन मी आतां ॥१८३॥
भीम म्हणे पार्थाविण ॥ आम्ही दिसतों अवघे दीन ॥ जैसें दीपाविण सदन ॥ कीं नासिकाविण वदन पैं ॥१८४॥
प्राणाविण शरीर ॥ कीं जीवनाविण सरोवर ॥ तेवीं पार्थाविण आम्ही समग्र ॥ दीन बलहीन दिसतों पैं ॥१८५॥
धर्मभीमांचे नयनां ॥ अश्रु येती क्षणक्षणां ॥ आठवूनि पार्थाचिया गुणां ॥ चिंताग्रस्त द्रौपदी ॥१८६॥
भीम म्हणे धर्मा लागून ॥ तुझें टाळितां न ये नेमवचन ॥ नाहीं तरी गजपुरा जाऊन ॥ कौरव मारीन सर्वही ॥१८७॥
कपट द्युत पणें करून ॥ केवढें पाडिलें दुर्धर व्यसन ॥ त्रयोदश वर्षें संपूर्ण ॥ कधीं होतील नेणवे ॥१८८॥
दुःशासनाचें ह्रदय फोडून ॥ केव्हां करीन रक्तपान ॥ त्याचा सव्य हस्त उपडून ॥ दावीन केव्हां द्रौपदीसी ॥१८९॥
दुर्योधन अंकावरी बैस ॥ सभेंत बोलिला द्रौपदीस ॥ त्याचा अंक कधीं निःशेष ॥ चूर्ण करीन गदाघायें ॥१९०॥
धिक्‍ गांडीव सायकासन ॥ धिक्‍  हे गदा काय रक्षून ॥ आरण्यांतील शुष्क हीन ॥ शत्रूंनीं नांव ठेविलें आम्हां ॥१९१॥
असो चिंताग्रस्त मानसीं ॥ धर्म भीम अहर्निशीं ॥ तों बृहदश्वा महाऋषी ॥ धर्मापाशीं पातला ॥१९२॥
करूनि तयाचें पूजन ॥ धर्म सांगे आपुलें वर्तमान ॥ आम्ही वनवासें पीडलों पूर्ण ॥ दुःख दारुण आमुचें ॥१९३॥
आम्हां सारिखे कष्टी ॥ सांगा कोण असती सृष्टीं ॥ पूर्वींही ऐसी गोष्टी ॥ कवणासी जाहली नसेल ॥१९४॥
मग बृहदश्वा म्हणे धर्मासी ॥ तुमचे कष्टांची लेखा कायसी ॥ नैषधरायाचे कष्टांसी ॥ गणती नाहीं धर्मराया ॥१९५॥
तेणेंही द्यूत खेळोन ॥ हारविलें राज्य संपूर्ण ॥ सेवूनि एकाकी घोर विपिन ॥ बहुत क्लेश पावला ॥१९६॥
तूं बंधुस्त्रीसमवेत ॥ सुखी अससी वनांत ॥ मुनिजन सदा वेष्टित ॥ अन्न सत्र तुजपासीं ॥१९७॥
धर्म म्हणे जी आतां ॥ सांगावी नलाची कथा ॥ बृहदश्वा म्हणे समस्तां ॥ सावध ऐका प्रीतीनें ॥१९८॥
द्रौपदी आणि पांडव ॥ सावध ऐकती ऋषी सर्व ॥ वैशंपायन म्हणे नरदेव ॥ कथा अपूर्व ऐका हे ॥१९९॥
ब्रह्मा नंद म्हणे श्रीधर ॥ कथा सुरस रसाळ फार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ सप्रेमचित्तेंकरोनियां ॥२००॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चोविसाव्यांत कथियेला ॥२०१॥
॥ इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि चतुर्विंशाध्यायः ॥२४॥ श्री कृष्णार्पनमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP