मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २१ वा

पांडवप्रताप - अध्याय २१ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अजात शत्रु धर्मराज ॥ धर्मपरायण धर्मात्मज ॥ स्वधर्माचरण देवद्विज ॥ भजन न सोडी सर्वथा ॥१॥
कौरव जे परम दुर्जन ॥ कपट द्यूत तयांशीं खेळोन ॥ राज्य सेना देश धन ॥ द्रौपदी सहित हारविलें ॥२॥
पांच पांडव पंचानन ॥ कपट कूपीं पडिले येऊन ॥ कीं तें पंच मराळ नेऊन ॥ पंकगर्तेंत रोंविले ॥३॥
विदुरासी म्हणे दुर्योधन ॥ पांडव जिंकोनि केले दीन ॥ जैसे दग्धवनीं हरिण ॥ तेजहीन क्षुधित पैं ॥४॥
द्रौपदी जाहली आमुची दासी ॥ ऊठ बोलावूनि आणीं सभेसी ॥ तिचें पतिव्रतापण जनांसी ॥ दाखवूं आजी तत्त्वतां ॥५॥
विदुर म्हणे पापखाणी ॥ तुज निकट आली प्राणहानी ॥ काय अपवित्र बोलसी वाणी ॥ महादुर्जना कपटिया ॥६॥
दुर्योधन म्हणे देखा ॥ हा पांडवांचा पाठिराखा ॥ कृत्रिम सांगत विवेका ॥ हितशत्रु घातक पैं ॥७॥
प्रातिकामी सूतपुत्र जाण ॥ त्यासी सांगे दुर्योधन ॥ आणीं पांचालीस बोलावून ॥ भीड सोडून सभेसी ॥८॥
हेर प्रवेशला मंदिरीं ॥ म्हणे अहो द्रुपदराज कुमारी ॥ दुर्योधनें तेथवरी ॥ बोलाविलें जाण पां ॥९॥
धर्में हारविलें समस्त ॥ कोणाचा शब्द न चाले तेथ ॥ द्रौपदी म्हणे मनांत ॥ मांडला अनर्थ निर्धारें ॥१०॥
वाटे काळिजीं घातलीं सुरी ॥ कीं सौदामिनी पडली शिरीं ॥ कीं सुकुमार कमलिनीवरी ॥ वज्रघाय पडियेला ॥११॥
मग द्रौपदी म्हणे तयासी ॥ जाऊनि सांगें भीष्मद्रोणांसी ॥ तुम्ही श्रेष्ठ असतां सभेसी ॥ विपरीत करणी काय हे ॥१२॥
धर्में हारविलें आपणास ॥ तरी तो तुमचा जाहला निःशेष ॥ धर्मास आणि आम्हांस ॥ मग संबंध कायसा ॥१३॥
मी पंचपुरुषांची ललना ॥ मज सर्वथा जिंकिलें नाहीं ॥ नारदें नेमिलें दिन सर्वही ॥ सीमा केली अलोट ॥१४॥
पांचां ठायीं वांटिलें वर्ष ॥ दोन मास द्वादश दिवस ॥ यांत मी स्त्री भीमाची निःशेष ॥ तरी धर्म केवीं हारवी ॥१५॥
सभेंत येऊनि सूतनंदन ॥ सांगे सुयोधनासी वर्तमान ॥ ऋतुस्त्रात द्रौपदीनिधान ॥ कैसी आणूं सभेंत ॥१६॥
त्यासी निर्भर्त्सी दुर्योधन ॥ मग उठविला दुःशा सन ॥ म्हणे धांव आणीं ओढून ॥ केश धरून येथवरी ॥१७॥
आमुची जे जाहली दासी ॥ मग तिची भीड कायसी ॥ दुःशासन धांवला वेगेंसीं ॥ दौपदीपाशीं पातला ॥१८॥
हरिणीवर क्रोधयुक्त ॥ महाव्याघ्र जेवीं झेंपावत ॥ कीं तस्कार जैसा संचरत ॥ राज्य भांडारीं एकलाचि ॥१९॥
कीं मेदिनीगर्भरत्न ॥ धरूं धांवला द्विपंचवदन ॥ तैसा याज्ञ सेनी जवळी येऊन ॥ काय बोले दुरात्मा ॥२०॥
ऊठ आतां वेगें येथून ॥ राजा पाचारी दुर्योधन ॥ तुझे पंच भ्रतार दास करून ॥ आम्हीं जिंकून ठेविले ॥२१॥
तूं आमुची दासी निर्धारें ॥ ऊठ सभे चाल सत्वरें ॥ तुझें भाग्य उदेलें चतुरे ॥ दुर्योधना वरीं आतां ॥२२॥
आयुष्यांतीं यमदूत ॥ तैसा द्रौपदीसी तो भासत ॥ कंठ होऊनि सद्नदित ॥ काय मात बोलिली ॥२३॥
म्हणे देवरा तूं अवधारीं ॥ सभेरी कैसी नेतां नारी ॥ ज्येष्ठ सहोदराची अंतुरी ॥ गांधारीसम तुम्हांतें ॥२४॥
देवरा ऐकें ये समयीं ॥ माझा कैवारी तूंचि होईं ॥ निर्दोष यश पदरी घेईं ॥ कळेल शिष्टाई करीं तैसी ॥२५॥
देवरा तूं होईं माउली ॥ लज्जा रक्षीं आजि आपुली ॥ माझा द्रुपदराज ये वेळीं ॥ तूंचि होईं दयाळा ॥२६॥
किंवा शस्त्र घेऊनि तत्त्वतां ॥ वधीं मज  येथेंचि आतां ॥ लोक धन्य म्हणती ऐकलां ॥ वर्णितील कीर्ति तुझी ॥२७॥
निर्दय बोले पापराशी ॥ ऊठ वाचाळे चाल सभेसी ॥ तुज धरूनि नेईन केशीं ॥ जहालीस दासी आमुची तूं ॥२८॥
हिंसकासी कैंची दया ॥ मार्गघ्नासी कैंची माया ॥ उपरति पैशून्यवा दिया ॥ कदाकाळीं घडेना ॥२९॥
धनलुब्धासी नावडे धर्म ॥ जारासी कायसें सत्कर्म ॥ साधुनिंदका नावडे प्रेम ॥ भजनमार्गं कदाही ॥३०॥
शांत नव्हें कदा विखार ॥ दुर्जन न बोलती कधीं मधुर ॥ ध्यान करूं बैसलें खर ॥ कालत्रयीं घडेना ॥३१॥
असो ओढवला काल कठिण ॥ पांचाळी उठली तेथोन ॥ गृहांत चालली देखोन ॥ दुःशा सन धांवला ॥३२॥
अर्धयोजन आसमास ॥ जिचे तनूचा जाय सुवास ॥ चहूंकडे फांके जिचा प्रकाश ॥ तिचे केश धरियेले ॥३३॥
हांक फोडी श्री कृष्ण भगिनी ॥ आसडूनि पाडिली मेदिनीं ॥ ब्राह्मांड डळमळलें ते क्षणीं ॥ उसळे पाणी सागरींचें ॥३४॥
रोहिणीवर वासरमणी ॥ खचों भाविती तेव्हां धरणीं ॥ वैकुंठ कैलास ते क्षणीं ॥ डळमळले अति दुःखें ॥३५॥
केशीं आकर्षोनि वेल्हाळ ॥ सभे चालिला चांडाळ ॥ जैसा हरिणीसी धरूनि शार्दूल ॥ घेऊनि जाय त्वरेनें ॥३६॥
रोदन करी अधोवदनीं ॥ नयनो दकें भिजे कुंभिनी ॥ म्हणे वीरगुंठी करें करूनी ॥ हळूच तरी धरीं पैं ॥३७॥
भूषणें जाहलीं विगलित ॥ ठायीं गळोनि पडत ॥ मुक्तें वाटेसी विखूरत ॥ तेजें कविगुरुं सारिखीं ॥३८॥
म्हणे राजसा सखया देवरा ॥ हळूचि चालें न करीं त्वरा ॥ केश ओढिसी एक सरा ॥ सुढाळ मुष्ठीं धरीं पैं ॥३९॥
उभा राहें एक क्षण ॥ कासावीस जाहले माझे प्राण ॥ रसना अधर गेले वाळोन ॥ जीवनावीण एधवां ॥४०॥
द्रोण गुरुची तुम्हांची आण ॥ धांवडूं नका मज लागून ॥ तुटोनि पडों पाहती चरण ॥ परी कुलक्षण नायके तो ॥४१॥
सभेसी आणितां सुंदरी ॥ उजेड पडला सकलांवरी ॥ विद्युल्लता जैसी अंधारीं ॥ नभोमंडळीं प्रकाशे ॥४२॥
देखतां द्रौपदीनिधान ॥ संतभक्तीं झांकिले नयन ॥ परम संतोषले दुर्जन ॥ स्वरूप देखोन तियेचें ॥४३॥
जिचिया स्वरूपावरून ॥ कुर्वंडी करिजे रतिरमण ॥ जे अपर्णेची अपरप्रतिमा जाण ॥ गुणनिधान दौपदी ॥४४॥
पाकशा सन कमल जन्मा ॥ त्यांचेनि न करवे जिची प्रतिचा ॥ रंभा उर्वशी तिलोत्तमा ॥ चरणां गुष्ठीं न तुळती ॥४५॥
कृष्णाच ऐसी कृष्ण भगिनी ॥ कीं ओतिली इंद्रनील गाळूनी ॥ खंजन मृग मीन लोचनांवरूनी ॥ ओंवाळूनि टाकावे ॥४६॥
देंत जेवीं हिरेखाणी ॥ बोलतां उजेड पडे मेदिनीं ॥ जिचा मुख प्रकाश देखोनी ॥ रोहिणीवर लज्जित ॥४७॥
कर्ण म्हणे द्रौपदीस ॥ तूं दुर्योधनाचे अंकीं बैस ॥ भोगीं आतां राज्य विलास ॥ सोडीं आशा पांडवांची ॥४८॥
ऐसें ऐकतां ते पद्माक्षी ॥ भीमार्जुनां क्रोधें लक्षी ॥ परी पक्षहीन अंध पक्षी ॥ तैसे दीन दिसती ते ॥४९॥
भीमासी नावरे क्रोध तदा ॥ सांवरूनि करें आकर्षी गदा ॥ म्हणे कौरवांच्या शिरश्छेदा ॥ करीन आतां क्षणार्धें ॥५०॥
पांचालीनें पाहतां विलोकून ॥ माझें ह्रदय जाहलें शतचूर्ण ॥ दावानला जाळी तृणकानन ॥ तेवीं दुर्जन मारीन हे ॥५१॥
धर्म म्हणे ऐकें भीमा ॥ तिहीं पण करूनि जिंकिलें आम्हां ॥ क्रोध आवरीं क्षमा ॥ वेगें पाहें विचारूनि ॥५२॥
तुज क्रोध नावरेचि कदा ॥ तरी माझिये मस्तकीं प्रेरीं गदा ॥ परी स्वधर्मसत्यमर्यादा ॥ सर्वथाही न सांडीं तूं ॥५३॥
चळतील मेरुमांदार ॥ पश्चिमेसी उगवेल जरी मित्र ॥ हेंही अघटित घडेल परी सज्जन नर ॥ असत्य मार्गें न जाती ॥५४॥
उष्णता धरील रोहिणीपती ॥ शिळेवरी कमळें उगवती ॥ हेंही अघटित घडेल परी न वर्तती ॥ भगवद्भक्त असत्यें पैं ॥५५॥
मग भीम म्हणे एकांतीं ॥ वडिलीं तुज सांगितली नीती ॥ नारदव्यासांचिया उक्ती ॥ द्यूतीं रत होऊं नको ॥५६॥
वर्जितां खेळोनि कपट द्यूता ॥ व्यसनीं पाडिलें समस्तां ॥ तोडीन आतां तुझे ह्स्ता ॥ गदाघायें तत्काल ॥५७॥
अवश्य म्हणे महाराज धर्म ॥ गदा उचली क्रोधें भीम ॥ तों सद्विवेकी पार्थ परम ॥ हस्त धरीत भीमाचा ॥५८॥
म्हणे या ब्रह्मांड मंडपांत ॥ धर्मा ऐसा सत्य शांत ॥ नाहीं नाहीं तथार्थ ॥ साक्ष देत सरस्वती ॥५९॥
जो निश्चलगंगेचा लोट जो विवेकरत्नांचा मुकुट ॥ कीं भक्तिवैरागरींचा सुभट ॥ दिव्य हिरा जन्मला ॥६०॥
सद्बुद्धिसरोवरींचा राजहंस ॥ भक्त्युद्यानींचा तापस ॥ जो अजातशत्रु निर्दोष ॥ पंडूसमान आम्हांतें ॥६१॥
तेणें शब्द गोंविला नेमा ॥ तो निश्चय तुम्हां आम्हां ॥ धर्मासी मारूनि भीमा ॥ अपकीर्तीच वरावी ॥६२॥
संसार मृगजलन्याय ॥ याचा भरंवसा असे काय ॥ ये अवनीसी बहुत राय ॥ भोगोनि गेले पुढें जातीं ॥६३॥
भीमाचा क्रोधाग्नि अत्यंत ॥ चालिला विवेकवन जाळीत ॥ तों सुशब्द वर्षला मेघपार्थ ॥ तेणें शांत जाहला तो ॥६४॥
धर्माचे चरण वंदूनी ॥ भीम बैसला स्वस्थानीं ॥ तों दुःशासन केश कवळूनी ॥ झोंका देत द्रौपदीतें ॥६५॥
इंदुवदना पद्मलोचनी ॥ जे पद्मजजनकाची भगिनी ॥ सुकुमार एकवसनी ॥ जाचिली दुर्जनीं दुर्जनीं तेधवां ॥६६॥
पूर्वीं जाहला राज सूय यज्ञ ॥ शेवटीं जाहलें अवभृथस्त्रान ॥ तेव्हां केश मोकळे करून ॥ वीरगुंठी बांधिली ॥६७॥
ते हस्तीं द्दढ धरूनि दुःशा सन ॥ झोंकें देतसे हिंसक दुर्जन ॥ तेव्हां द्रौपदी गुणनिधान ॥ भीष्मद्रोणांकडे पाहे ॥६८॥
तुम्ही वडील न्याय सागर ॥ अन्याय होतो परम दुस्त ॥ इंहीं मज जिंकिलें काय साचार ॥ वदा उत्तर येथवां ॥६९॥
भीष्म वदे ते क्षणीं ॥ ऐकें वो सद्नुणरत्न खाणी ॥ धर्म बोले स्वमुखें करूनी ॥ आम्हांसी पणी जिंकिलें ॥७०॥
तेथें आमुचें न्यायवचन ॥ कोण मानील सांग प्रमाण ॥ मग बोले गुरु द्रोण ॥ भीड धरून कौरवांची ॥७१॥
समुद्राहूनि अगणित ॥ धर्माचें मातें न गणवे तत्त्व ॥ निर्मल अंतर शांत दान्त ॥ वचन विपरीत न बोले ॥७२॥
कोणी भीड टाकून ॥ न बोलेचि यथार्थ वचन ॥ हें देखोनि विकर्ण ॥ बोलता जाहला उठोनियां ॥७३॥
द्रौपदी जिंकिली म्हणतील कोणी ॥ गलित कुष्ठें झडेल वाणी ॥ त्यांसी निकट आली प्राणहानी ॥ येचि क्षणीं जाणिजे ॥७४॥
त्रिवार हांक फोडोनी ॥ म्हणे नाहीं जिंकिली याज्ञ सेनी ॥ हे अन्यायी अवघे या स्थानी ॥ साधु कोणी नसे येथें ॥७५॥
अंतर्बाह्य धृतराष्ट्र अंध ॥ पुत्र लोभें जाहला मंद ॥ अरे हे भीष्म द्रोण वृद्ध ॥ सत्य तेथें न बोलती ॥७६॥
कुलक्ष यासी कारण ॥ तो हा शकुनि आणि कर्ण ॥ अधिकाधिक दुर्योधन ॥ इंहीं बोधून खवळिला ॥७७॥
राजा केवळ राक्षस जाण ॥ व्याघ्ररूपी अवघे प्रधान ॥ केवळ ते सेवक श्वान ॥ मग अन्योन्य वर्ततसे ॥७८॥
दुर्योधनासी सुख वाटत ॥ परी समीप आला अनर्थ ॥ द्रौपदी केली उभी येथ ॥ भुलले मूर्ख सर्वही ॥७९॥
गांजीत द्रौपदी वेल्हाळा ॥ परी हे प्रलयाग्नीची ज्वाळा ॥ तुम्हां पतंगां सकळां ॥ भस्म करील क्षणार्धें ॥८०॥
ऐकोन विकर्णाची वाणी ॥ सुर वर्षती दिव्य सुमनीं ॥ माथें आणि तर्जनी ॥ डोलविती आनंदें ॥८१॥
ऐसें देखोनि ते क्षणीं ॥ कर्ण कोपला शत गुणीं ॥ धर्में बोली करूनि पणीं ॥ याज्ञ सेनी हारविली ॥८२॥
तें असत्य अवघें करूनी ॥ भलतेंचि जल्पसी सभा स्थानीं ॥ तुज वधितों येचि क्षणीं ॥ परी दुखवेल मनीं गांधारी ॥८३॥
शत मूर्ख तूं त्रिशुद्धी ॥ वडिलांसी शिकविसी बुद्धी ॥ येथें काय जाहला अविधी ॥ दासी सभेसी आणिल्या ॥८४॥
एक स्त्री भ्रतार पांच जण ॥ कोणे शास्त्रीं केलें लेखन ॥ हे दोषखाणी जारीण ॥ करा नग्न येथें आतां ॥८५॥
वस्त्रें भूषणें संपूर्ण ॥ आधीं घ्या पांडवांचीं हिरोन ॥ ऐसें ऐकतां पांचही जण ॥ वल्कलें वेष्टून बैसले ॥८६॥
जानु उघडी करून ॥ द्रौपदीसी दावी दुर्योधन ॥ म्हणे बैसें अर्धांगीं येऊन ॥ पट्टराणी हाईं माझी ॥८७॥
भीमें गदा उचलोनि लवलाहें ॥ म्हणे अंधपुत्रा इकडे पाहें ॥ तुझा अंक गदाघायें ॥ चूर्ण करीन जाण पां ॥८८॥
हें जरी न करवेल माझेनी ॥ तरी विऊनि वंध्या कुंती जननी ॥ लज्जा आली सोमवंशालागूनी ॥ कृष्णदास्य व्यर्थ गेलें ॥८९॥
ऐसें ऐकतां वचन ॥ प्रकट बोले दुर्योधन ॥ म्हणे गे द्रौपदी येऊन ॥ बैसें निःशंक मांडीवरी ॥९०॥
ऐसें बोलतां दुर्योधन ॥ द्रौपदी बोले तीक्ष्ण वचन ॥ बळेंचि चेतविला प्रलयाग्न ॥ कौरवकुल जाळावया ॥९१॥
बळें खवळिला भुजंग ॥ कीं शुंडे पिळिला मत्तमातंग ॥ निद्रित व्याघ्र सवेग ॥ नासिकेवरी ताडिला ॥९२॥
तैसी ते पांडवललना ॥ म्हणे चांडाळा दुर्योधना ॥ गलित कुष्ठ भरोनि रसना ॥ झडों दे तुझी पापिया ॥९३॥
महाप्रलय सौदामिनी ॥ हिंसका पडो तुजवरी येऊनी ॥ तुझें द्दष्टीचे कोळसे होऊन ॥ भस्म होऊं दे दुर्जना ॥९४॥
भीमें गदा नेमिली नोवरी ॥ रणचत्वरीं घेईं मांडीवरी ॥ पंचप्राण घालोनि बाहेरी ॥ प्रलयाग्नि लावीं पैं ॥९५॥
तुझ्या स्त्रिया ह्रदय पिटूनी ॥ वाद्यें वाजविती भयंकर वदनीं ॥ रक्तमृत्तिका मिळोनी ॥ हळदी सहजचि लागेल ॥९६॥
मग ते गदा ह्र्दयीं धरून ॥ समरमंचकीं करीं शयन ॥ बंधूंसमवेत यम सदन ॥ पावोनि करीं साडे तेथें ॥९७॥
शब्द शस्त्रांचे घाय तीक्ष्ण ॥ लागतां खवळला दुर्योधन ॥ म्हणे इचे तुकडे करून ॥ सर्षपप्राय टाका रे ॥९८॥
जिव्हा नासिक आणि कर्ण ॥ हस्त शस्त्रें टाका छेदून ॥ दुःशासना फेडी वसन ॥ दावीं नग्न सभेंत ॥९९॥
वामहस्तें केश कवळून ॥ सव्यहस्तें फेडीं वसन ॥ नगर लोक सभा जन ॥ झांकिती नयन अतिदुःखें ॥१००॥
कृष्णासी करावया श्रुत ॥ वेगें पिटिला मनोदूत ॥ म्हणे मांडिला भोर आकान्त ॥ धांवें त्वरित कैवारिया ॥१०१॥
सुभद्रकारिके भवानि ॥ मूलपीठद्वार काविला सिनि ॥ आदिमाये कुलस्वामिनि ॥ धांव जननि लौकरी ॥१०२॥
मन मोहने गोकुल वासिनि ॥ ह्रदयवृंदावनविहारिणि ॥ सांवळे गोवर्धनोद्धारिणि ॥ वेगें करूनि धांवें कीं ॥१०३॥
म्हणे दुर्योधन दुःशा सन ॥ हेचि शुंभ निशुंभ दैत्य पूर्ण ॥ ययां मर्दूनियां जाण ॥ रक्षीं लज्जावसन माझें ॥१०४॥
खगवरकेतना इंदीव्रनेत्रा ॥ इंदिरावरा जलदगात्रा ॥ विश्वव्यापका त्रिनेत्र मित्रा ॥ सुत्रामा नेणे तुझा ॥१०५॥
यादव कुलमुकुटावतंसा ॥ कंसांतका क्षीराब्धि विलासा ॥ सच्चिदानंदा मनोहरवेषा ॥ शरणागता रक्षीं तूं ॥१०६॥
सनकादिकवंद्या जगदुद्धारा ॥ पद्मजातज नका त्रिभुवन सूंदरा ॥ पांडवपालका रणरंगधीरा ॥ अति उदारा श्रीरंगा ॥१०७॥
मायाचक्रचालका निरंजना ॥ महारजपूर्णवसना ॥ मधुमुरकैटभदैत्य भंजना ॥ जगज्जीवना धांवें कां ॥१०८॥
अवतारचक्रचरित्रपालक ॥ धांव अनंत ब्रह्मांडनायका ॥ ब्रह्मानंद मुख मृगांका ॥ दावीं एकदां ये वेळे ॥१०९॥
मुचुकुंदोद्धारका गिरिधरा ॥ पंचशरजनका परात्परा ॥ निगमागमवंद्या अनंतनेत्रा ॥ संकट माझें न देखसी ॥११०॥
अंध जातां घोरकांतारीं ॥ समागमी टाकोनि गेले दूरी ॥ मग तो तळमळी नानापरी ॥ मज मुरारि तेवीं जाहलें ॥१११॥
व्याघ्रें पाडस धरिलें वनीं ॥ तें दिनरजनीं चिंती जननी ॥ वैकुंठपुर विहारिणी ॥ ध्यायी मनीं तेवीं तूतें ॥११२॥
प्रसूत समयीं माध्यान्हीं ॥ तृषित धेतु धेनु दग्धवनीं ॥ तों सह्स्त्र व्याघ्रीं येऊनी ॥ गर्जना करूनि ओढिली ॥११३॥
भक्तवत्सला स्त्रेहाळा हरी ॥ तेवीं मज गांजिलें दुराचारीं ॥ कोठें गुंतलासी कैवारी ॥ कमलायतना ह्रदयस्था ॥११४॥
ये समयीं न येसी करुणार्णवा ॥ उणें येईल कीं बिरुदा नांवा ॥ भक्तवत्सला रमाधवा ॥ बाहतां कंठ शोषला ॥११५॥
गांजिती कौरव दुर्जन ॥ विसांव्या कां सांडिला अभिमान ॥ पांचाळी श्रीरंग तुझी बहीण ॥ घोष गाज त्रिभुवनीं ॥११६॥
कौरव कुबुद्धि समुद्रांत ॥ बुडालें हरि देईं हात ॥ दीन वदन जाहले पंडुसुत ॥ बांधले द्दढ कपट पाशें ॥११७॥
कोरवपीडा वणवा दारुण ॥ जाळितो केशवा वर्षें घन ॥ भीष्मद्रोणांचें न चले वचन ॥ म्लानवदन बैसले ॥११८॥
कौरव सभा भुतमेळीं ॥ पडली तुझीं दासी पांचाळी ॥ पंचाक्षरी तूं वनमाळी ॥ धांव ये वेळीं त्वरेनें ॥११९॥
हरि तूं कंठीरव दयाब्धी ॥ तुझी कन्या मी येथें द्रौपदी ॥ कौरवगजीं वेढिली त्रिशुद्धी ॥ धांव आधीं हांक देत ॥१२०॥
चिंतारोग जडला दारुण ॥ धांवें कृपार सपात्र घेऊन ॥ तुजपाशीं धाडीन प्राण ॥ कुणप येथें टाकूनि हें ॥१२१॥
लपावया तुझे ह्रदयीं ॥ हरि मजला ठाव देईं ॥ लाज गेलिया लवलाहीं ॥ मग काय उरेल ॥१२२॥
करुणाकरा गोपाला ॥ विलंब कां फार लाविला ॥ जाहलिया भगिनीची अवकळा ॥ मग काय डोळां पाहसी ॥१२३॥
कामधेनु श्रीरंग माउली ॥ कोणते वनीं आजि गुंतली ॥ द्रौपदीपवत्स विसंबली ॥ कौरववृकसभेंत ॥१२४॥
अहा श्री कृष्ण यादवेंद्रा ॥ तुज काय लागली योगनिद्रा ॥ द्रौपदी कन्या एकसरां ॥ हांक फोडितां सोकली ॥१२५॥
आपण वाढविलें म्हणून ॥ जड काष्ठ तारी जीवन ॥ पाळिलें जातां बुडोन ॥ ब्रीदें गळोन गेलीं पैं ॥१२६॥
यदुकुलकमल विकास मित्रा ॥ पांडवमान सचकोरचंद्रा ॥ जगद्वंद्या कृपा समुद्रा ॥ करीं त्वरा ये वेळे ॥१२७॥
द्रौपदीचे करुणा शब्द ॥ हेचि उडाले प्रेम मिलिंद ॥ श्री कृष्ण कमलीं सद्नद ॥ गुंजारव जाणविती ॥१२८॥
कौरव सभा कंटकस्थल ॥ जाणोनि द्रौपदीचे शब्द मराल ॥ कृष्ण मानससरोवर विशाल ॥ जाऊनि तेथें बैसले ॥१२९॥
पूर्ण स्वानंद रूप पर्यंक ॥ तेथें पहुडला वैकुंठ नायक ॥ चरण तळहातीं तेथें देख ॥ ज्ञानकला रुक्मिणी ॥१३०॥
अनुभवबोधें सुस्वर ॥ गाती नारद आणि तुंबर ॥ तेथें उद्धव आणि अक्रूर ॥ सुगंग वायु जाणविती ॥१३१॥
सप्रेमलक्ष जोडले करीं ॥ उभा सन्मुख तो सर्पारी ॥ चरण तळहातीं भीमककुमारी ॥ देखे नखमुकुरीं ॥ ब्रह्मांडें ॥१३२॥
कौरवा सभा काल रात्री दारुण ॥ द्रौपदीचें वस्त्रहरण ॥ करावया तस्कार दुःशा सन ॥ घाला घालूं पहातसे ॥१३३॥
तों द्रौपदीचे शब्द सुरेख ॥ ते द्वारकेंत घालिती हांक ॥ जागा जाहला विकुंठनायक ॥ घाबरेपणें विलोकी ॥१३४॥
ज्ञानें पाहे तों यादवेंद्र ॥ पांडवभांडारींचे कौरवतस्कर ॥ द्रौपदीलज्जाधन अपार ॥ नेऊं पाहती हरूनियां ॥१३५॥
रुक्मिणीचे हातींचा चरण ॥ आसडोनि उठिला  मन मोहन ॥ धांव घेतली उठोन ॥ न बोलतां कोणाशीं ॥१३६॥
पीतांबराची रुळत कांस ॥ ती न सांवरीच ह्रषीकेश ॥ मुकुट राहिला रुळती केश ॥ सुंगध सुमनें सांडती ॥१३७॥
कौस्तु भमाला वैजयंती ॥ नीट न सांवरी श्रीपती ॥ खेद पावला श्रीतनू प्रती ॥ कंठ सद्नद जाहला ॥१३८॥
श्रीरंगाच्या वेगापुढें ॥ मन पवन कायनें बापुडें ॥ चिंतिलिया ठाया जावें गरुडें ॥ परी तोही मंद राहिला ॥१३९॥
धांवा केला हें भक्तिलक्षण ॥ परी तो ह्रदयींच नांदे नारायण ॥ सर्वव्यापाक जगन्मोहन ॥ गमनाग मन नसेचि ॥१४०॥
नारद पुसे रुक्मिणी लागून ॥ कां घाबरेपणें गेले जगज्जीवन ॥ ते म्हणे द्रौपदी गांजिली म्हण्वून ॥ न सांवरत धांवते ॥१४१॥
इकडे द्रौपदीचें वसन ॥ फेडूं पाहात दुःशासन ॥ तंव तो पाठीसीं येऊन ॥ उभा ठाकला कैवारी ॥१४२॥
जो पीतांबर आपुला ॥ तेणें झांकिली द्रौपदी बाला ॥ प्रकाश असं भाव्य झळकला ॥ कौरव सभा चमकली ॥१४३॥
क्रुष्णव सन तेजाळ सुवास ॥ तेणें सुंगधें भरलें आकाश ॥ उभा पाठीशीं आदिपुरुष ॥ सद्भक्तींच देखिला ॥१४४॥
आल्हादली पांचाळी ॥ म्हणे कैवारिया वनमाळी ॥ मज गांजिले दुर्जनीं सकळीं ॥ हरिमाउली नसतां तूं ॥१४५॥
हरि म्हणे द्रौपदीसी ॥ जें जें बोलिले पापराशी ॥ तें तें गांजिलें देवकीसी ॥ मी हें मानसीं भावितों ॥१४६॥
आला आणोनि भगवंत ॥ धर्म बंधूंसी खुणावीत ॥ नयनीं वाहती अश्रुपात ॥ कंठ सद्नदित जाहला ॥१४७॥
देखोनि पाठीशीं दयार्णव ॥ विदुरासी नावरती अष्टभाव ॥ भीष्मद्रोणाद्कि भक्त सर्व ॥ ब्रह्मा नंदें डोलती ॥१४८॥
क्रोध नावरे दुर्योधना ॥ म्हणे रे मंदा दुःशासना ॥ भीड कायसी धरिसी वसना ॥ फेडीं पाहूं दे सभेंत ॥१४९॥
तेणें जों आसुडिलें चीर ॥ तों आंत क्षीरोदक सुंदर ॥ म्हणती अद्भुत स्त्रीचरित्र ॥ वस्त्रांत वस्त्र नेसली ॥१५०॥
तेंही ओढिता दुर्जन ॥ आतं देखे सुवर्णवर्ण ॥ द्रौपदी झांकिली संपूर्ण ॥ चरणांगुष्ठही दिसेना ॥१५१॥
सभा जाहली तटस्थ ॥ म्हणती वस्त्रभार ॥ असंख्यात ॥ अमोलिक तेजाद्भुत ॥ कोण पुरवी न कळे हें ॥१५२॥
हांवें चढोनि दुःशासनें ॥ दोहीं हातीं फेडिलीं वसनें ॥ गणती दशशतवदनें ॥ करितां ठायीं पडेना ॥१५३॥
कनकवर्ण वस्त्र ओढी ॥ तों आंत देखे जरीची साडी ॥ त्या आंत कुसुंबी चुनही ॥ तेही ओढी अपवित्र ॥१५४॥
पाटाव ओढी जरतारी ॥ तों कल्हारवर्ण ॥ त्या अंतरीं ॥ जरीचे शिखी मराळ पदरीं ॥ तेंही आवरी वेगें तो ॥१५५॥
कुसुमवर्ण पदर ॥ करवीरवर्ण कोविदार ॥ रक्तोत्पलवर्ण सिंदुर ॥ चंपकवर्ण साजिरीं ॥१५६॥
केशरी हरिद्राकुंकुमवर्ण ॥ दूर्वारंग जंबू चंदन ॥ सप्तरंगें रंगीत पूर्ण ॥ केतकीदलवर्ण एक पैं ॥१५७॥
कीररंगी नीलोत्पलवर्ण ॥ सहस्त्रचौकडी कांठ सुवर्ण ॥ पाचू पेरोज वैडूर्य पूर्ण ॥ वर्णांची निघती असंख्य ॥१५८॥
मिलिंदवर्ण अपार ॥ चंद्र सूर्य कला सुकुमार ॥ निराळवर्ण परिकर ॥ नक्षत्रठसे झळकती ॥१५९॥
गुंजारंग अग्निवर्ण ॥ रंभागर्भ काश्मीरवसन ॥ दुग्धवर्ण कनकसुमनवर्ण ॥ जगज्जीवनें पुरविलें ॥१६०॥
कंबुवर्ण रजतहंस ॥ चामीकरवर्ण पद्मकोश ॥ इंद्रगोपमाणिकरंगविशेष ॥ ह्र्षीकेश पुरवीतसे ॥१६१॥
काशीं कांची अवंतींचीं ॥ अयोध्या मथुरा मायापुरींचीं ॥ वसनें आणिलीं द्वारकेचीं ॥ भगिनीलागीं श्रीधरें ॥१६२॥
भरत रमणक सप्तविधि वंश हिरण्य ॥ कीर्तिद्राक्ष हरित सुवर्ण ॥ या नवखंडींचीं वस्त्रें संपूर्ण ॥ जगज्जीवनें पुरविलीं ॥१६३॥
जंबू शाक प्लक्ष शाल्मली ॥ क्रोंच केतुमाल श्वेतवल्ली ॥ या सप्तद्वीपीचीं वस्त्रें वनमाली ॥ पांचाळीतें पुरवीत ॥१६४॥
अंग वंग दशार्ण कलिंग ॥ कुलिंग काश्मीर भोज सुरंग ॥ सौराष्ट्र श्रीरंग ॥ वसनें सवेग आणीत ॥१६५॥
बंगाल मागध मालव नेपाळ ॥ केरल चोल पांचाळ ॥ गौड मल्याळ स्त्रीराष्ट्र सिंहल ॥ द्राविड कर्नाटक आंध्र पैं ॥१६६॥
करहाटक महाराष्ट्र धोरण ॥ घोट नाट पंजाभ पुलिंद हूण ॥ भिल्ल गांधार विदेह चैद्य जाण ॥ विदर्भ विव्हल केरल ॥१६७॥
कोशल किरात ॥ शूरसेन सेवन समस्त ॥ कोंकण गोकर्ण मत्स्य सत्य ॥ मद्र शाल्व सिंधावती ॥१६८॥
सैंधव पारसीक गुर्जर ॥ यवन बर्बर जालंधर ॥ छप्पन्नदेशींचीं वस्त्रें श्रीधर ॥ देत अपार पांचाळीतें ॥१६९॥
चीन मुलतान लाहोर ॥ काबुल बैंगलूर फिरंगाण थोर ॥ खुरासन आणि कृष्णवस्त्र ॥ वस्त्रें तेथींचीं अपार पैं ॥१७०॥
विष्णुकांची शिवकांची कुंभकोण ॥ चिंदंबर अरुणाचल मल्लिकार्जुन ॥ शेषाचल किष्किंधापट्टन ॥ प्रतिष्ठान करवीर पैं ॥१७१॥
स्वर्ग मृत्यु नागलोक ॥ वैकुंठ कैलास ब्रह्म पद सुरेख ॥ सुरां सहित शचीनायक ॥ वस्त्रीं प्रत्यक्ष रेखिला ॥१७२॥
दशावतार अष्टदिक्पाल ॥ चवदा मनु लिहिले भूगोल ॥ द्वादश मित्र एका दश रुद्र सकल ॥ वस्त्रांवरी पुतळे हे ॥१७३॥
रामायण भारत भागवत ॥ शिवविष्णुचरित्रें अद्भुत ॥ एक सहस्त्रनामें मंडित ॥ कनकाक्षरीं रेखिलीं ॥१७४॥
ऋषि मंडळी सिद्ध चारण ॥ सोळा सिद्ध नव नारायण ॥ चौर्‍यायसीं आसनें योग साधन ॥ ऐशीं वस्त्रें निघालीं ॥१७५॥
शक्त प्रस्थ हस्तिनापुर ॥ कुरुक्षेत्रीं युद्ध पुढें होणार ॥ रणीं पडले कौरव पामर ॥ प्रेतें समग्र रेखिलीं ॥१७६॥
मांडीवरी गदा घालून ॥ भीमें मारिला दुर्योधन ॥ दुःशासनाचें वक्षःस्थळ फोडून ॥ रक्तपान केलें असे ॥१७७॥
इतुकें दुर्ज्न पाहती ॥ परी सावध कोणी न होती ॥ द्रौपदीचा कैवारी जगत्पती ॥ अनंतहस्तें नेसवी ॥१७८॥
अनंत कोटी ब्रह्मांडें ॥ भरलीं जवळी अक्षय्य दिंडें ॥ श्री कृष्णनायकाचीं प्रचंडें ॥ वस्त्रें शेषा न गणवती ॥१७९॥
द्वारकेचा सभाग्य चाटा ॥ वस्त्रश्रेणी पुरवी अचाटा ॥ न कळे हें कौरवांचे थाटा ॥ कांहीं कुचेष्ट न चालती ॥१८०॥
रुई राहाट चिवट माग ॥ कांहीं न घालितां श्रीरंग ॥ अचाट पटसुष्टि सुरंग ॥ पुरवीतसे ते काळीं ॥१८१॥
आपुला पीतांवर शेवटीं ॥ द्रौपदीसी नेसवीत जगजेठी ॥ रत्न दशन रोंवूनि ओठीं ॥ सुदर्शन उचलिलें ॥१८२॥
म्हणे या वसना लावितां हात ॥ दग्ध करीन कौरव समस्त ॥ विदुर द्रोण गंगा सुत ॥ म्हणती अनर्थ मांडला ॥१८३॥
धृतराष्ट्रासी जाणविती मात ॥ सर्वांचा येथें मांडला अंत ॥ दुर्योधन भयभीत ॥ दुःशासनासी वारीतसे ॥१८४॥
दुर्योधन म्हणे वस्त्रभार ॥ भांडारीं ठेवा हे समग्र ॥ तों एकही तेथें न दिसे साचार ॥ अभाग्यासी तेधवां ॥१८५॥
तों अवचिन्हें जाहलीं बहुत ॥ गगनीं उठले त्रिविध केत ॥ मेघ रक्तधारा वर्षत ॥ भयभीत कौरव पैं ॥१८६॥
भक्त साधु नगर जन ॥ द्रौपदीसी करिती सप्रेम नमन ॥ कौरवांसी वाचे निंदून ॥ वर्णिती यश पांडवांचें ॥१८७॥
दुयोंधनासी म्हणे भीम सेन ॥ तुझी मांडी मी करीन चूर्ण ॥ नातरी पूर्वज पावती पतन ॥ जीतचि जाण प्रेत मी ॥१८८॥
गांधारी ह्रदय पिटीत ॥ भीम बोले तें करील यथार्थ ॥ धृतराष्ट्रें पांडव समस्त ॥ द्रौपदी सहित बोळविले ॥१८९॥
आलिंगूनि पांचही जण ॥ म्हणे चांडाळ हा दुर्योधन ॥ येणें तुम्हांसी कष्टविलें पूर्ण ॥ तें कांहीं आठवूं नका ॥१९०॥
मी वृद्ध चक्षुहीन ॥ धर्मा करीं तूं माझें पालन ॥ तथास्तु म्हणे भीमसेन ॥ ऐसेंचि होईल शेवटीं ॥१९१॥
द्रौपदीच्या माथां हस्त ॥ ठेवूनि धृतराष्ट्र बोलत ॥ माये तूं कुलतारक यथार्थ ॥ दुर्जनीं कष्ट दिले तूतें ॥१९२॥
इच्छा असेल जे मनांत ॥ ते तूं माग पुरवीन सत्य ॥ येरी म्हणे पांडव मुक्त ॥  पणीं जिंकिले ते करावे ॥१९३॥
शस्त्रें वस्त्रें राज्य रथा ॥ देऊनि बोळवावें इंद्रप्रस्था ॥ दास न म्हणावें आतां ॥ इतुकेंचि ताता देइंजे ॥१९४॥
ते तत्कालचि केले मुक्त ॥ उपहासूनि कर्ण हांसत ॥ म्हणे धन्य रे तुम्ही पंडुसुत ॥ षंढतीळ संसारीं ॥१९५॥
बंदीं पडिलां समस्त ॥ ते स्त्री प्रयत्नें जाहलां मुक्त ॥ जारकर्म करूनि पाळीत ॥ पति जैसी स्वैरिणी ॥१९६॥
अर्जुन म्हणे रे मशका ॥ भ्रष्टा कौलिकान्न भक्षका ॥ कुलहीना सहस्त्र मूर्खा ॥ ऐकें आतां प्रतिज्ञा हे ॥१९७॥
आम्ही नपुं सक कीं रणशूर ॥ पुढें कळेल हें समग्र ॥ तुझें रणीं छेदूनि मिरवीन शिर ॥ तरीच पुत्र पंडूचा ॥१९८॥
असो रथीं बैसोनि पांचही जण ॥ माता कुंती द्रौपदीनिधान ॥ शिबिकारूढ होऊन ॥ नगरांतून चालिलीं ॥१९९॥
पूर्व द्यूत संपलें ॥ आतां अन्य द्यूत आरंभिलें ॥ तें पुढें असे कथिलें ॥ श्रवण केलें पाहिजे ॥२००॥
अंतरीं येऊनि ते वेळां ॥ श्रीरंग सकळांसी भेटला ॥ धांवोनि द्रौपदी वेल्हाळा ॥ मिठी गळां घालीत ॥२०१॥
नयनोदकें करून ॥ केलें श्री कृष्णचरनक्षालन ॥ म्हणे श्रीरंगा तुजवरून ॥ ओंवाळून जाईन मी ॥२०२॥
तुझे काय आठवूं उपकार ॥ आजि लाज रक्षिली थोर ॥ पांडवकैवारी यादवेंद्र ॥ त्रिभुवनीं थोर ब्रीद गाजे ॥२०३॥
श्री पति म्हणे गे द्रौपदी माये ॥ पांडव मज प्राणांहूनि प्रिय ॥ संकट पडतां लवलाहें ॥ ऐसाचि येईन क्षणोक्षणीं ॥२०४॥
ऐसें बोलोनि सद्नद ॥ द्वारकेसी गेला ब्रह्मानंद ॥ तो पांडुरंग पुंडलीकवरद ॥ भीमातीरी नांदतसे ॥२०५॥
ब्रह्मा नंदा पांडुरंगा ॥ श्रीधरह्रदयकल्हारभृंगा ॥ आदिपुरुषा अव्यंगा ॥ दिगंबरा अविनाशा ॥२०६॥
स्वस्ति श्रीपांडवाप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकविसाव्यांत कथियेला ॥२०७॥
इति एकविंशतितमाध्यायः ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP